मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
गर्भाधानविधिसंक्षेप

धर्मसिंधु - गर्भाधानविधिसंक्षेप

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


ज्वरादिक रोगांनीं विटाळशी हैराण असल्यामुळें स्नान करण्यास जर असमर्थ असेल, तर दुसर्‍या स्त्रीनें अथवा पुरुषानें दहा वेळां स्पर्श करुन, तिच्यासाठीं आपण स्पर्शागणिक स्नान व आचमन हीं करावींत. हैराण स्त्रीला प्रत्येक स्पर्शाला निराळें वस्त्र नेसावयाला द्यावें व शेवटीं तीं सारीं वस्त्रें टाकून द्यावींत. नंतर ओलें वस्त्र मध्यें घेऊन वाळलेलें शुद्धवस्त्र नेसावें आणि ब्राह्मणभोजन व पुण्याहवाचन हीं करावींत, म्हणजे शुद्धि होते. सर्व प्रकारच्या आतुरांची (रोगानें हैराण) शुद्धि याचप्रमाणें करावी. शुद्धीनंतर शुभ दिवस पाहून दुष्टरजोदर्शनानिमित्त शौनकानें सांगितलेली भुवनेश्वरी शांति किंवा ग्रंथांतरीं सांगितलेली इतर शान्ति करुन गर्भाधान करावें. सूर्यग्रहणांत जर रजोदर्शन झालें, तर सूर्य व तो ज्या नक्षत्रीं असेल तें नक्षत्र यांच्या सोन्याच्या प्रतिमा करुन, राहूची शिशाची कारावी व त्यांची पूजा करावी. सूर्यासाठीं रुईच्या समिधांनीं, नक्षत्रांकरितां पळसाच्या समिधांनीं व राहूप्रीत्यर्थ दूर्वांनीं होम करावे. तूप, भात व तीळ यांचाहि होम करावा. रजोदर्शन जर चंद्रग्रहणांत होईल, तर रुप्याची चंद्रप्रतिमा व पळसाच्या समिधा एवढा त्याचा विशेष समजावा. ग्रहण, व्यतीपात वगैरे अनेक दोष असतां जर रजोदर्शन झालें, तर दुसर्‍या रजोदर्शनाच्यावेळीं शान्ति करुन गर्भाधान करावें. गर्भाधानाच्या बाबतींत गुरुशुक्रादिकांचे अस्त, अधिक महिना वगैरे जरी दोष नाहींत, तरी पहिल्या विटाळशीपणाच्यावेळीं जर शान्ति केली नसेल आणि दुसर्‍या विटाळशीपणाच्यावेळीं जर गुरुशुक्रादिकांच्या अस्तादिकांचा दोष असेल, तर अस्तादिकांत ऋतुशान्ति करुं नये. कारण, निमित्त घडतांच जर नैमित्तिक कर्माचें अनुष्ठान केलें असेल, तर अस्तादि दोष नसतो; पण मुख्यकाळ उलटून गेला असतां अस्तादि दोष आहेत, असा जो सामान्य निर्णय, त्या निर्णयाला अनुसरुन शान्ति करुं नये व यामुळेंच गर्भाधानहि करुं नये असें मला वाटतें. शान्ति ग्रहमखासह करावी. शान्तींत मुख्य देवता भुवनेश्वरी असून, इंद्र व इंद्राणि या पार्श्वदेवता (पाठीराख्या) देवता आहेत. या तीन देवतांच्या तीन प्रतिमा तीन कलशांवर स्थापन कराव्या. रुई वगैरेंच्या समिधा, भात व तूप हीं ग्रहांचीं द्रव्यें, पार्श्वदेवतांचींही जाणावींत. पायस स्थंडिलावरच शिजवावें. घरांत शिजविलेलें घेऊं नये. ग्रहांच्या होमासाठीं जो भात लागतो, तो घरांत शिजविलेला घ्यावा. पात्रांची स्थापना करतांना पायस शिजविण्यासाठीं एक व घरांत शिजविलेला घ्यावा. पात्रांची स्थापना करतांना पायस शिजविण्यासाठीं एक व घरांत शिजविलेल्या भाताचा संस्कार करण्याकरितां दुसरी, अशा दोन स्थाली (थाळया) घ्याव्या. तुपाचा होम करणारे जर अनेक जण असले, तर अनेक स्त्रुवापात्रें (अग्नींत तुपाची आहुति देण्याची लाकडी पळी ) मांडावींत. तुपाबरोबरच तीन होमद्रव्यें आणि घरांत तयार केलेला भात-या चार द्रव्यांना अग्निसंस्कार करावा. स्त्रुवादिक पात्रांचा संस्कार झाल्यानंतर, घरांत करुन आणिलेला भात, त्याच्या (मागें सांगितलेल्या) थाळींत घालून, ती थाळी अग्नीवर ठेवावी व तो शिजल्याप्रमाणें करुन, त्यावर आज्यसंस्कारापासून दर्भांच्या आसादनापर्यंतचें कर्म करावें, आणि नंतर त्याला पायसाचा आज्यसंस्कार करुन, तो उतरुन खालीं ठेवावा. अन्वाधान व हविर्द्रव्यांचा त्याग-हीं कर्में करतांना प्रधानदेवता जी भुवनेश्वरी तिच्या अथवा सवितृ यांच्या पदाचा उच्चार करावा; कारण, गायत्रीमंत्रानें होम करणयास सांगितलें आहे. आज्यभाग झाल्यानंतर, यजमानानें जसें अन्वाधान केलें असेल तर जो त्यागाचा उच्चार करावा तो येणेंप्रमाणें :-

’प्रतिदैवतं अष्टाविंशत्याहुति पर्याप्तमर्कादिजातीयसमिच्चर्वाज्यात्मकं

हविस्त्रयं सूर्याय सोमाय भौमाय बुधाय बृहस्पतये शुक्राय शनये राहवे केतवे न मम ।

अष्टाष्टसंख्यापर्याप्तं हविस्त्रयं तत्तधिदेवताप्रत्यधिदेवताभ्यो न मम ।

चतुश्चतुः संख्यापर्याप्तं तद्धविस्त्रयंअ विनायकादिभ्यः ऋतुसंरक्षणक्रतु साद्गुण्यदेवताभ्यो न मम । अष्टोत्तरशतसंख्याकाहुतिपर्याप्तं दूर्वातिलगोधूमपायसाज्येति हविश्चतुष्टयं भुवनेश्वर्यै न मम ।

यद्वा सवित्ने न मम ।

एवमष्टाविंशति संख्यापर्याप्तं तच्चतुष्टयमिन्द्रेन्द्राणीभ्यां न मम ।’

रजोदर्शनकालीं जर अनेक दोष असतील, तर भुवनेश्वरीचा होम १००८ करावा व इंद्रइंद्राणीचा १०८ करावा. इंद्र इंद्राणींचा होम केला किंवा न केला तरी चालेल. होमानंतर नवग्रह, भुवनेश्वरी वगैरेंना बलि देऊन अभिषेक करावा. असा हा संक्षेप समजावा. याशिवाय मंत्रसहित व विचारपूर्वक प्रयोग ज्यानें त्यानें आपआपल्या शाखेप्रमाणें समजावा. संकल्प, स्वतिवाचन, ब्राह्मणवरण, भूतनिः-सारण, पंचगव्यानें भूमीचें शुद्धीकरण, मुख्यदेवतापूजन, अग्निप्रतिष्ठा, सूर्यादि नवग्रहांची स्थापना करुन त्यांची पूजा करणें, देवतांचें अन्वाधान, पालस्थापन, हविर्द्रव्यें सिद्ध करणें आणि जसा परिपाठ असेल त्याप्रमाणें होम व त्याग करणें--हा पूर्वींच्या अंगभूत कर्मांचा अनुक्रम समजावा. पूजा, स्विष्टकृत, होमशेष, बलि, पूर्णाहुति, पूर्णपात्रविमोचन, अग्निपूजन, अभिषेक,मानस्तोके० या मंत्रानें विभूतिधारण, देवतापूजन व विसर्जन श्रेयोग्रहण, दक्षिणादि दान आणि सर्व कर्म ईश्वरार्पण करणें हा उत्तरांगभूत कर्माचा क्रम समजावा. ही अशी कर्माची स्थिति आहे. मदनरत्‍न व बोधायन यांनीं जी शांति सांगितली आहे, ती कौस्तुभांत पाहावी. रजोदर्शनापूर्वीं जर पत्‍नीगमन केलें, तर ब्रह्महत्येचा दोष येतो, असें सांगितलें असल्यानें किंचित्‌ प्रायश्चित करावें असें मला वाटतें. ऋतुकालीं (पत्‍नी) गमन करणें अवश्य आहे; न केल्यास भ्रूणहत्येचा (गर्भ मारल्याचा) दोष लागतो; पण तोही मनांत इच्छा असतांहि क्रोधादिकामुळें स्त्रीसंभोग न करणारासच मात्र हा दोष लागतो असें समजावें. विरक्त पुरुषाला कशाचाच दोष नाहीं असें श्रीमद्भागवतांतल्या ’लोकेव्यवाया०’ या श्र्लोकांत व त्यावरील टीकेंत स्पष्ट सांगितलें आहे. रजोदर्शनाच्या दिवसापासून सोळा दिवसपर्यंत ऋतुकाळ जाणावा. त्यांतले पहिले चार दिवस, अकरावा आणि तेरावा हे (सहा) दिवस समागमाला वर्ज्य आहेत. बाकीच्या दिवशीं पुत्राची इच्छा करणारानें सम दिवशीं व मुलीची इच्छा करणारानें विषम दिवशीं स्त्रीशीं संग करावा. त्यांतल्यात्यांत पुढच्या पुढच्या रात्री प्रशस्त होत. एका रात्रींत एकदांच संग करावा. व तोहि सम रात्रींतच करावा असें कांहीं ग्रंथकार जसें म्हणतात, तद्वतच इतर कांहीं असें सांगतात कीं, कांहीं अडचणीमुळें जर स्त्रीगमन करणें अशक्य झालें, तर श्राद्ध, एकादशी वगैरे दिवशींहि गमन करण्यास हरकत नाहीं. स्त्रीच्या कामाचा नाश करणारा पापी होतो, असा जो स्त्रियांचा वर, त्याचें स्मरण करुन ऋतुकाळ नसतांहि स्त्रीच्या संगोसुकतेनें, जो स्त्रीसंबंध करील त्याला जरी दोष लागत नाहीं, तरी त्याच्या ब्रह्मचर्याची हानि होते. जो पुरुष ऋतुकालींच फक्त भार्यागमन करतो. व ऋतुकालावांचून कधींहि करीत नाहीं तो यावज्जीव ब्रह्मचारी आहे, असें मुनींचें वचन आहे. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावस्या, सूर्यसंक्रांति, वैधृति, व्यतीपात, परिघाचा पूर्वार्ध कल्याणी, संधिकाल, मातापितरांचा मृत दिवस, श्राद्धतिथि, श्राद्धाच्या आधींचा दिवस व जन्मनक्षत्र यांवर स्त्रीगमन वर्ज्य करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP