मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
रजोदर्शननियम

धर्मसिंधु - रजोदर्शननियम

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


(विटाळशीनें) तीन दिवस कोणालाही शिवूं नये. तैलाभ्यंग, डोळ्यांत काजळ घालणें, दिवसां झोंप घेणें, विस्तवाला शिवणें, दांत घांसणें, मांस खाणें, सूर्य पाहाणें व जमिनीवर रेघा ओढणें, ह्या गोष्टी वर्ज्य कराव्यात. पलंगादिकांवर न निजतां, खालीं निजावें. ओंजळीनें व तांब्याच्या किंवा लोखंडाच्या भांडयानें पाणी पिऊं नये. लहान भांडयानें पाणी पिणार्‍या स्त्रीला खुजा मुलगा होतो. नखें कुरतडण्यानें वाईट नखांचा मुलगा होतो. व पानांच्या द्रोणादिकांनीं पाणी प्यायल्यास उन्मत्त मुलगा होतो. दुसर्‍या तिसर्‍या वगैरे विटाळशीपणांत प्रवास, गन्धपुष्पादिक, विडा व दूध यांचा त्याग करावा. पाट, चौरंग वगैरेवर बसूं नये. मातीच्या किंवा लोखंडाच्या भांडयांत अथवा जमिनीवर जेवण करावें. ग्रहणादिकांच्या निमित्तानें जर आंघोळ करावी लागली, तर पाण्यांत बुडी मारुन स्नान करुं नये. दुसर्‍या भांडयांत पाणी घेऊन, त्याने आंघोळ करावी. व वस्त्र पिळूं नये. किंवा दुसरेंहि नेसूं नये, सुतकादिकामुळें स्नान करणें भाग झाल्यास, त्या बाबतींतहि असेंच करावें. एका गोत्रांतल्या किंवा सख्ख्या बहिणी अशा दोघी ब्राह्मणी जर विटाळशीपणा न जाणतां एकमेकींना स्पर्श करतील, तर वरीलप्रमाणें स्नान केल्यानें शुद्ध होतात. जाणूनबुजून शिवाशिव केल्यास एक रात्र उपास करावा. गोत्रादिकांचा संबंध नसतां अजाणपणानें जर शिवतील, तर स्नान करावें आणि त्या दिवशीं जेवूं नये. जाणूनबुजून शिवाशिव केल्यास शुद्धि होईपर्यंत जेवण करुं नये, व जेवल्यास जितके दिवस जेवण केलें असेल तितके दिवस शुद्धीनंतर उपास करावा. उपास करण्याची शक्ति नसल्यास, त्याबद्दल ब्राह्मणभोजन घालावें. सर्व शुद्धि झाल्यानंतर पंचगव्य प्यावें. शूद्री व ब्राह्मणी अशांचा जर परस्पर स्पर्श झाला, तर शुद्धि होईपर्यंत ब्राह्मणीनें जेवूं नये; आणि शुद्धीनंतर कृच्छ्र प्रायश्चित घ्यावें. शूद्र स्त्रीनें पादकृच्छ्र प्रायश्चित्त घ्यावें. विटाळशीला किंवा बाळंतिणीला जर चाण्डाळाचा स्पर्श झाला तर शुद्धि होईपर्यंत जेवूं नये. व शुद्धीनंतर अतिकृच्छ्र प्रायश्चित करावें. न समजतां स्पर्श झाला तर प्राजापत्य प्रायश्चित्त करावें. काठी वगैरेच्या परंपरेनें जर चांडाळादिकांचा स्पर्श होईल, तर प्राजापत्य प्रायश्चित करावें. काठी वगैरेच्या परंपरेनें जर चांडाळादिकांचा स्पर्श होईल, तर प्राजापत्य प्रायश्चित करुन, बारा ब्राह्मणांना जेवूं घालावें. मिताक्षरा ग्रंथांत असें सांगितलें आहे कीं, पतित, अन्त्यज व चाण्डाळ यांचा जर समजून उमजून स्पर्श होईल तर शुद्धि होईपर्यंत जेवण करुं नये, आणि पहिल्याच दिवशीं जर स्पर्श झाला असेल, तर शुद्धीनंतर तीन दिवस उपास करावा. दुसर्‍या दिवशीं स्पर्श झाल्यास दोन दिवस आणि तिसर्‍या दिवशीं झाल्यास एकच दिवस उपास करावा. अजाणतां स्पर्श झाला असल्यास शुद्धि होईपर्यंत उपास करावा. याप्रमाणेंच----कोंबडा, डुक्कर, कुत्रा, कावळा, धोबी वगैरेंचा स्पर्श झाल्यासहि हाच निर्णय समजावा. उपास करण्याची शक्ति नसल्यास आंघोळ करुन नक्षत्र उगवल्यावर जेवावें. जेवत असतांना जर कुत्रा, चाण्डाळ, वगैरेचा स्पर्श झाला तर शुद्धीनंतर सहा रात्रीं गोमूत्रांत शिजवलेले यव खावेत. अशक्त असल्यास सुवर्णदान करावें. किंवा ब्राह्मणभोजन घालावें. उष्टयानें जर दोघी विटाळशी एकमेकींना शिवतील, किंवा उष्टेपणांतल्या चाण्डाळाचा जर विटाळ होईल, तर कृच्छ्रपायश्चितानें शुद्धि होते. उष्टया ब्राह्मणाचा विटाळ झाल्यास तीन दिवस उपास करावा. ऊर्ध्वोच्छिष्ट (जेवणानंतर आचमन न केलेला) व अधरोच्छिष्ट (लघुशंकेनंतर आचमन न केलेला) अशा ब्राह्मणाचा जर स्पर्श होईल, तर एक दिवस उपास करण्यास सांगितलें आहे. उच्छिष्ट्र शूद्राचा स्पर्श झाल्यास, पूर्वी सांगितलेल्याहून अधिक प्रायश्चित्त करावें. सुतक्यादिकांचा अशुद्ध स्पर्श जर विटाळशीला झाला, तर शुद्धि होईपर्यंत जेवूं नये. जेवल्यास कृच्छ्रप्रायश्चित्त करावें. द्विशफ (दोन खुरांचे) किंवा एकशफ (एक खुराचे) असा पशु किंवा पक्षी यांचा जर स्पर्श होईल, तर शुद्धीनंतर जेवण करावें. रजस्वलेला (विटाळशीला) जर कुत्रा, कोल्हा, गाढव वगैरेचा दंश झाला तर शुद्धि होईपर्यंत जेवूं नये व शुद्धीनंतर पांच रात्रीं उपास करावा. दंश जर बेंबीच्या वरच्या शरिराला झाला असेल, तर शुद्धीनंतर दहा रात्रीं उपास करावा. मस्तकाला दंश झाला असल्यास (शुद्धीनंतर) वीर रात्रीं उपास करावा. एक विटाळशी जेवीत असतां दुसर्‍या विटाळशीला जर पाहील, तर शुद्धि होईपर्यंत तिनें जेवण करुं नये. चाण्डाळ दृष्टीस पडल्यास शुद्धि होईपर्यंत उपास करावा. आणि शुद्धीनंतर तीन दिवस उपास करावा. मुद्दाम जर चाण्डाळाला पाहील, तर प्राजापत्य प्रायश्चित करावें. विटाळशीला जर प्रेताचा किंवा बाळंतिणीचा स्पर्श होईल, तर शुद्धीपर्यंत उपास करुन शुद्धीनंतर तीन रात्रीं उपास करावा. जेवल्यास कृच्छ्रप्रायश्चित्त घ्यावें. वरील सर्व गोष्टींत ब्रह्मकूर्चविधि करुन पंचगव्य पिण्यास सांगितलेलें आहेच. सुतक्यादिकांचा स्पर्श झाल्यानें जें स्नान करावयाचें त्याच्या आधीं जर रजोदर्शन होईल, तर चार दिवसपर्यंत जेवूं नये. अशक्त असल्यास स्नानानंतर जेवावें. याप्रमाणेंच बांधव मेल्याचें समजल्यावर स्नानाच्या आधीं जर रजोदर्शन होइल, किंवा रजोदर्शनानंतर जर मृत बांधवाची वार्ता समजेल, तर शुद्धि होईपर्यंत जेवण करुं नये. अशक्त असल्यास स्नान करुन जेवावें. अस्पृश्याचा जर स्पर्श झाला, तर स्नानानंतर अशक्तानें जेवावें, असा सर्वत्र नियम समजावा. शुद्धीनंतर आपल्याबद्दल दुसर्‍याकडून उपवास करवावा असेंहि कांहीं ठिकाणीं म्हटलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP