मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
शिवाजीचा पोवाडा

शिवाजी महाराज पोवाडा - शिवाजीचा पोवाडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

आधि नमितो श्री गजानना । वंदी तव चरणा ।

मती द्यावी कवना । सकल विद्येचा पाठीराखा ।

जगच्चालका अधिनायका । द्यावी ही स्फूर्ती नित्य बालका ॥जी जी॥

तुज कृपे काव्य गुंफून । दंग होऊन ।

करतो गुणगान । गातो इतिहास शिवाजीचा ।

केला उद्धार पतितांचा । धन्य तो पुत्र जिजाईचा ॥जी जी॥

एके काळी महाराष्ट्रात । थरकाप होई चित्तात ।

अशी केली मोंगलांनी मात । सारे हिंदू झाले भयभित ।

अस कृत्य मोंगलांचं होत । देवतांच्या मूर्ती फोडत ।

जात्यांत त्यांना भरडित । पीठ भूमीवरती टाकत ।

पायान पहा तुडवित । हिंदूना धरुन बडवित ।

लुटमार अब्रू घेतात । धन्यता त्यात मानीत ।

नाही उरला त्राता राष्ट्रात । अशावेळी प्रभू साक्षात ।

शिवरुपे प्रगट जाहला महाराष्ट्रात ॥जी जी॥

शिवप्रभू शिवाजी अवतार । शिवनेरीवर ।

कार्य करणारा असा दुष्टांचा जन्मला काळ ।

कीर्ती ज्याची राहिली पहा तिन्ही ताल ।

भोसले कुळात जन्मले बाळ । ॥जी जी॥

बालशिवाजीचे तेज पाहूनी जिजा राजमाता

थोरांच्या त्या गोष्टी सांगे शौर्याच्या गाथा ॥दा जी रं॥

प्रभू रामचंद्राने मारिले दुष्ट दैत्याला ।

शूरांच्या त्या कथा ऐकता स्फूर्ती शिवबाला ॥दा जी रं॥

लहानपणी तो सवंगडयाचा जमवुनिया मेळा ।

लुटूपुटीची करी लढाई शिवाजी त्या काळा ॥दा जी रं॥

काठीचा घोडा करुन नित्य मिरवीत ॥जी जी॥

जमवुनी लहान बालके सैन्य जमवीत ॥जी जी॥

तशी ढाल तलवार लुटूपुटीची घेत ॥जी जी॥

बाळाचे पाय पाळण्यात दिसू लागत ॥जी जी॥

बालपणाचे पाहूनि खेळा । शिवाजी बाळा ।

पाहुनी डोळा । दादाजी धन्य मानी चित्तास ।

शौर्याचे धडे देई शिवबास । लागले वळण राष्ट्रपुरुषास॥जी जी॥

छत्रपती शिवाजी शूर । पराक्रमी फार ।

झुंज देणार । झळकला वीर युद्धशास्त्रात ।

जमविले मावळे पहा हातोहात । फिरु लागला महाराष्ट्रात ॥जी जी॥

महाराष्ट्रात फिरुनिया सतत । दर्‍या खोर्‍यात ।

कडे कपारींत । जमविले मावळे कैक दिलदार ।

देशसेवा हाच ज्यांचा निर्धार । प्रसंगी प्राण सुद्धा देणार ॥जी जी॥

असे मावळे जमविले ऐका पहा रणगाजी ॥जी जी॥

धन्य ते येसाजी, बाजीप्रभू तानाजी ॥जी जी॥

हिंदूधर्म वाढविण्या प्रयत्‍न करी शिवाजी ॥जी जी॥

परधर्मासाठी सुद्धां मनामधी राजी ॥जी जी॥

हिंदूधर्म करण्या रक्षण । बाधी कंकण ।

शिवाजी जाण । तसा तो होता आत्मज्ञानी ।

परधर्मास वंद्य मानी । धर्मग्रंथ आणि धर्मस्थानी ।

आदर युक्तही असे वाणी ॥जी जी ॥

पण होते वैर धर्माच्या अत्याचाराशी ॥जी जी॥

पण नव्हते वैर शिवाजीचे परधर्माशी ॥जी जी॥

धर्मस्थान पहा तसे त्यांच्या धर्मग्रंथाशी ॥जी जी॥

तशी नव्हती दुष्ट भावना इस्लामाशी ॥जी जी॥

हातच्या काकणाला आरसा कशाला । सबळ पुरावा असे याजला ।

कल्याणचा तो खजिना लुटला । त्यात पकडला अहमद मुल्ला ।

सून मुल्लाची आली हाताला । रुप लावण्य शोभे तिजला ।

मध्येच सोडून कामगिरीला । आले आबाजी घेऊन तिजला ।

दरबारी तो रुजू करण्याला । आणि सांगति श्री शिवबाला ।

आणली सुंदरी ही आपल्याला । आबाजीच्या त्या ऐकून बोला ।

शिवरायाचा पारा चढला । तिळपापड अंगाचा झाला ।

नेत्रामध्ये अग्नि भडकला । शिवाजीच्या त्या रौद्र रुपाला ।

पाहून आबाजी मनी भ्याले चित्ताला ॥जी जी॥

अन्यायासाठी लढणारा । छत्रपति शिवाजी शूर ॥जी जी॥

न्यायनिधी राज्य करणार । आबाजीला सांगे त्रिवार ॥जी जी॥

अशी असता माता खरोखर । झालो असतो अधिक सुंदर ॥जी जी॥

आता ऐका प्रसंग घडलेला तुम्ही सत्वरी ॥जी जी॥

शिवाजीनें परस्त्री माता मानली दरबारी ॥जी जी॥

यावरुन शिवाजीची दिसून येते थोरी ॥जी जी॥

सुखरुप पाठवून देण्या पुढची कामगिरी ॥जी जी॥

आबाजी सोनदेवाच्या वाहिली शिरी ॥जी जी॥

चोळी पातळ चुडा घालुन ओटी मग भरी ॥जी जी॥

मानानं दिले पाठवून तिला विजापुरी ॥जी जी॥

निरपेक्ष पाहुनी निष्ठा । वाढवी प्रतिष्ठा ।

धर्मावरि निष्ठा । ठेवुनि कार्य केले ते चोख ।

राष्ट्र अभिमानी जमविले लोक । मुस्लिम अधिकारी नेमले बिनधोक ॥जी जी॥

शिवाजीने तव आपल्या वेळी विचार हा करता ।

राष्ट्रीय एकात्मता साधण्या प्रयत्‍न केला होता । दाजीरं

शिवाजीचे संपूर्ण चरित्र शोध त्याचा घेता ।

चरित्र म्हणजे महाकाव्य हे दिसेल तत्त्वता ।

हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या प्रयत्‍न हा करता ।

संकटावरी आली संकटे तारिले भगवंता ॥दाजीरं॥

जिचा वरदहस्त शिवबाला । ती माता भवानी सहायाला ।

स्वराज्य स्थापी शेवटाला । समर्थाचा अशीर्वाद ज्याला ।

तशी संत कृपा झाली राष्ट्र पुरुषाला ॥जी जी॥

संतकृपा झाली ही ज्याला । शिवाजी राजाला ।

राष्ट्र पुरुषाला । कमी नाही त्याला । कोणतेही कार्य पुरे करण्यास ।

हिंदवी स्वराज्य स्थापिले खास । फडकला भगवा झेंडा गगनास ॥जी जी॥

राजधानी स्थापण्याचा विचार मग केला ॥जी जी॥

त्यासाठी योग्य ठिकाण पाहता शिवाजीला ॥जी जी॥

गडामध्ये रायरी गड पसंत तो पडला ॥जी जी॥

कुलाबा जिल्ह्यास निसर्गरम्य उभा ठाकला ॥जी जी॥

चवदार तळ्याची कथा माहित सर्वाला ॥जी जी॥

त्या महान गावच्या पहा ना उत्तरेला ॥जी जी॥

चारी बाजूस ताशीव कडे असती किल्ल्याला ॥जी जी॥

बंदिस्त असूनी वाट होती एक त्याला ॥जी जी॥

पण होता परकीय सत्तेनं काबीज केला ॥जी जी॥

शिवाजीने जिंकून त्याचा ताबा घेतला ॥जी जी॥

रायरी गड नांव बदलून रायगड केला ॥जी जी॥

रायगड मग फिरुन पाहिला । त्याक्षणी विचार मनी केला ।

डागडुजी पाहिजे करण्याला । हिरोजी इंदूलकर याला ।

बोलावून घेतले त्या वेळा । रुपरेषा सांगितली त्याला ।

केली सुरवात बांधकामाला । महादरवाजा भव्य बांधिला ।

दोन बुलुंदबुरुज बाजुला । मग तट त्यानं बांधीला ।

इमारतीच्या लागता कामाला । प्रधानांच्या कचेर्‍या उभारल्या ।

गंगासागर तळं जोडीला । रेखीव बाजारपेठ किल्ल्याला ।

देशात तोड नाही ज्याला । राजमहाल भव्य बांधीला ।

अशा वास्तुतुन रायगड सजविला ॥जी जी॥

पुढे १६७४ ॥ या रायगडावर । आनंद संवत्सर ।

शुभ मुहूर्तावर । शके १५९६ साली ।

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आली । शुभ शनिवार उषःकाली ।

सिंहासनावर स्वारी बसली ॥

बंधूनो शिवराज्याभिषेक या सोहळ्याला ॥जी जी॥

गागाभट्ट काशीचा दिले आमंत्रण त्याला ॥जी जी॥

सप्तगंगा सप्त समुद्रजल साक्षीला ॥जी जी॥

महाराजांची करुनिया पहा सुवर्ण तुला ॥जी जी॥

सतरा हजार होनांचा खर्च तयाला केला ॥जी जी॥

कवि भाट कलावंत गुणीजन सर्वाला ॥जी जी॥

ज्यांच्या त्यांच्या मानाप्रमाणें सन्मान केला ॥जी जी॥

शेवटी १६८० सालाला । एप्रिल महिन्याला ।

६ तारखेला । जाहला अंत शिवाजीचा ।

महाराष्ट्राच्या दैवताचा । हिंदूभूमीच्या सुपुत्राचा ॥जी जी॥

राष्ट्रीय कुलकर्णी शाहीर । पोवाडा लिहिणार ।

विचार करी थोर । गर्जु छत्रपति शिवाजी महाराज ।

त्यांच्या कार्याची गरज असे आज । गुंफुनि काव्य चढविला साज ॥

N/A

References :

राष्ट्रीय शिवशाहीर : कुलकर्णी

Last Updated : April 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP