मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
आग्र्याहून सुटका

शिवाजी महाराज पोवाडा - आग्र्याहून सुटका

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

धन्य धन्य राणा शिवराय । वर्णू मी काय ।

तोड जगी न्हाय ॥ सुपुत्र खरा सह्याद्रीचा ।

आदर्श पुत्र जिजाऊचा । कर्दनकाळ दुष्मनांचा ॥ध्रु०॥

शिवबाने जन्मापासून । कष्ट सोसून । घेतले शिक्षण ॥

जन्मभर केला रणसंग्राम । घेतला नाहीं त्यानी कधा आराम ।

प्रजेला वाटे जणू प्रभु राम ॥२॥

१६६५ साल । दुर्दैवाचा काल । प्रजेचे हाल ।

पुरंदरचा तह कारण ज्यास । मिर्झाराजा औरंगजेबाचा दास ।

ज्याच्यामुळे शिवबा गेले आग्र्‍यास ॥३॥

चाल

आग्र्‍यास जावे लागले शिवरायाला ।

संगती न्यावे लागले बाळ शभूला ।

तहामध्ये नाईलाजाने राजा गुंतला ।

मातेच्या हाती कारभार त्यानी सोपविला ।

प्रतापराव, पिंगळे, सोनदेव, दिले साथीला ।

गदगदल्या अंतःकरणाने निरोप घेतला ।

मिर्झा राजाने तेजसिंग कछवा होता पाठविला ।

आग्‍र्‍यास नेण्या शिवबास सज्ज जाहला ।

वाढदिवस औरंगजेबाचा होता आग्‍र्‍याला ॥जी जी॥

चाल

१६६६ सालाला । सोमवारी ५ मार्चला ।

जाण्याचा दिवस ठरविला । साडे तीनशे मावळे संगतीला ।

(ते कोण कोण होते ) निराजी रावजी, सर्जेराव, सबनिस माणकोजी ।

त्रंबक दत्ताजी, फर्जंद हिरोजी, मित्रा राघोजी, गाडगे दावलजी, मदारी

मेहतर त्रंबक डबीर । संगती घेतले असे बहाद्दर ।

साधले तर राजकारण । नाहीतर घेण्या शिक्षण ।

स्वराज्याचे बांधण्या तोरण । नाहीतर शेवटी रणांगण ।

शिवबाचे यांत समावले मुत्सद्दीपण ॥जी जी॥

चाल

आगर्‍यास चालले शिवराय । होणार काय । चिंता आणि भय ।

संगती संभाजी कोवळे पोर । महाराष्ट्रास वाटला घोर ।

औरंगजेब मात्र होता बिनघोर ॥जी जी॥

सह्याद्रीचा सिंह पिंजर्‍यात । आला आग्र्‍यांत । थाटामाटात

१६६६ सालाचा । दिवस होता ११ मेचा । अपमान झाला छत्रपतीचा ॥५॥

रामसिंह पुत्र मिर्झाचे । काम मध्यस्थाचे । महाराज बादशहाचे ।

स्वागतास यायला हवा होता । (पण) मुनशी कारकून आला पुढता ।

अपेक्षाभंग झाला पुरता ॥६॥

शिवबाची निराशा झाली । माडी हवेली । नव्हती त्यांना दिली ।

सराई होती मुलुकचंदाची । धर्मशाळा होती नावाची ।

उतरण्याची सोय शिवाजीची ॥७॥

१२ मे १६६६ चा । औरंगजेबाचा । दिवस होता भाग्याचा ।

रामसिंह मुखलिसखानाचा । बेत ठरला होता कपटाचा ।

शिवबास दरबारी नेण्याचा ॥जी जी॥

शिवराय आले आग्र्‍याला । मनी लपविला । बेत आपला ।

दख्खनची घेण्या सुभेदारी । बादशहाला जिंकण्याची मुखत्यारी ।

जंजीरा किल्याची किल्लेदारी ॥जी जी॥

चाल

आम आणि खास महालात । दरबार आला संपत ।

औरंगजेब आला थाटांत । किल्याचा घुसलखान्यांत ।

राजे चालले भेटण्या तिथ । औरंगजेबास कळली बात ।

बक्षी आसदखानच्या कानांत । म्हणे शिवास घेऊन ये इथ ।

शिवा संभाजी दरबारांत । रामसिंग मुखलीस खान सोबत ।

बादशहाचे पाहून तख्त । राजे आले पुढें चालत ।

एक हजार मोहरा ठेवत । दोन हजार नजराणा साक्षात ।

पांच हजार रुपये देत । तीन वेळा मुजरा करत ।

राजकारण ठेवून लक्षांत । आसदखान ओळख सांगत ।

बादशहाने दुर्लक्ष केले स्वगतात ॥८॥

महाराज उभे रांगेत । पंच हजारी मनसबदारींत ।

संताप आला डोळ्यात । रामसिंहास बोले गर्जत ।

(रामसिंग) हमसे भी आगे कौन खडा बोल तू बात ॥२॥

रामसिंग बोले राजास, जयवंत सिंग नाम हे त्यांस ।

राग आला शिवरायास । जाब विचारी रामसिंगास ।

रागाने बसले बाजूस । गर्जून बोलले त्यांस ।

बादशहापुढे नाहीं येणार सांगतो मी खास ॥जी जी॥

चाल

राग आला औरंगजेबास । ठरवी मनास । मारु शिवबास ।

आग्रा किल्ल्याचा किल्लेदार । शुजाअत खान होता क्रूर ।

राजास धाडले त्याच्या म्होर ॥जी जी॥

राजास ठार मारण्याचा । बेत बादशहाचा । ओळखुनी त्याचा ।

रामसिंह बोले बादशहाला । रजपूत मी बोलेन वचनाला ।

मारु देणार नाहीं शिवाजीला ॥जी जी॥

रामसिंगचे बोल ऐकून । बादशहा रागानं । बोले खवळून ।

जामीन रहा शिवाजीला । काबूलकडे जावे मोहीमेला ।

शिवाजीस घेऊन संगतीला ॥९॥

चाल

आघाडीवर दाद अंदाजखान । कबूल वर जाता चालून ।

शिवबाचा खून पाडून । अपघात झाला म्हणून ।

शिवा मारला शत्रूकडून । बातमी देऊ अशी उठवून ।

औरंगजेब मनातील डाव ठेवी लपवून ॥१०॥

शिवबाने मनी ओळखून । अर्ज केला त्याने विनवून ।

संभाजीस इथे ठेवून । बादशहावर विश्वासून ।

विजापूर घेईन जिंकून तुमच्या हुकुमान ॥११॥

औरंगजेबाने पाहिले वाचून । शिवासाठी काढले फर्मान ।

तुझ्या भेटीस आले जर कोण । भेट नाही हुकुमावाचून ।

रामसिंगाची भेट न घेणं । बंदोबस्तीस पुलादखान ।

पहारे आणि चौक्या बसवून । शिवबास ठेवले कोंडून ।

रघुनाथ त्र्यंबक, निराजी होते संगतीनं ॥१२॥

दुसरा अर्ज केला राजानं । काशीस येतो जाऊन ।

संन्यास तीर्थ घेऊन । सर्वस्वाचा त्याग करुन ।

सोळासे सहासष्ट तारीख १६ जून ॥

औरंगजेब बोले कपटानं । शिवबानं फकिर होऊन ।

आलाहाबादच्या किल्ल्यात राहून । किल्लेदार बहादूरखान ।

देखरेख ठेविल शिवावर बारकाईनं ॥१३॥

पुन्हा शेवटी औरंगजेबानं । योजले कारस्थान ।

त्या वेळी फिदाई हुसेनखान । वाडा घेत होता बांधून ।

शिवबास तेथे नेऊन । ठार मारुन तिथेच पुरुन ।

लावू वाट अशी शिवबाची कपट नीतीनं ॥१४॥

चाल

शिवरायाने सुटण्यासाठी सोंगच वठविले ।

पोटदुखीनं शरीर सारे बिघडुनिया गेले ।

दिसा दिसाने दुखणे त्यांचे वाढतचि गेले ।

औषधोपचार आजारपणावर चालू ठेवियले ॥

दुवा मिळावा दिन दलितांचा स्वप्नच ठरविले ।

मिठाई भरुन मोठे पेटारे रोजच पाठविले ॥

पुलादखानाने मिठाईचे पेटारे पाहिले ।

मिठाई शिवाय नव्हते पेटार्‍यांत खानास पटविले ॥

एके दिवशी शिवबा आणि संभाजी उठले ।

पेटार्‍यांत बसूनिया निसटूनिया गेले ॥

चाल

इसवी सन सोळासे सहासष्ठ । महिना आँगस्ट । तारीख १७ स।

छत्रपती निसटूनीया गेले । स्वातंत्र्य सलामत सुटले ।

औरंगजेबाचे नशिब फुटले ॥जी जी॥

शिवबाच्या जागी हिरोजी । झोपला रणगाजी ।

लावून प्राणबाजी । सोन्याचे कडे राजाने घातले ।

मदारी मेहतरने पाय चेपिले । स्वराज्यासाठी हाल सोसले ॥जी जी॥

वेळ होती सूर्यास्ताची । सुटून जाण्याची । शिवाजी राजाची ।

औरंगजेबाला धडकी भरली । मोंगली सत्तेची झोप उडाली ।

आग्र्‍याहून सुटका अशी घडली ॥१४॥

यादव शाहीर करी वर्णन । सांगे गर्जून । शिवरायानं ।

राखीली शेंडी जाग्यावरती । धर्म स्वातंत्र्यासह संस्कृती ।

राष्ट्रपुरुष म्हणून जगी कीर्ती ॥१५॥

N/A

References :

कवि व शाहीर : यादव, कराड

Last Updated : April 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP