मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
आग्र्याहून सुटका

शिवाजी महाराज पोवाडा - आग्र्याहून सुटका

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

चौक १

धन्य धन्य जिजाई माऊली । प्रेमाची साऊली ।

होती भाग्यशाली । पुत्र रत्‍नाचा लाभ जाहला ।

साक्षात् शंभूमहादेव अवतरला । हिंदु धर्माच्या रक्षणाला ॥

कित्येक होऊनी गेले । जन्माला आले ।

परि बिनजोड शिवाजी भोसले ।

साक्षात् शंकरजी अवतरले । म्लेच्छांना निरदाळिले ।

हिंदु धर्माचे रक्षण केले

जर नसते धांवत आले । तर हिंदु धर्माचे बीज नसते उरले ॥

जगामंदी दादा । खरोखर दादा ॥जी जी॥

धा.क.

बडे बडे सरदारांना लावले शिवाजीनं वाटेला चढला संताप अवरंगजेबाला ।

बोलावल दोघा लढवय्याला । मिर्झा जयसिंग दिलेरखानाला ।

पाठविलं युद्ध करण्याला । जिंकुनी यावं प्रदेशाला ।

प्रदेशाला । हो। आणा पकडूनी शिवाजीला ॥जी जी॥

जगदंबा

निघाले घेऊनी प्रचंड फौजा मिर्झाराजे दिल्लेरखान ।

करीत चालले दाणादाण । महाराष्ट्रांत येऊन ।

किल्ले प्रदेश करण्याचा चंग बांधून । कळताच बातमी शिवाजीला ।

योजूनी युक्तिला । तह करण्याचा बेत ठरविला ॥जी जी॥

लगट

पाठविला निरोप मिर्झाराजाला । आहे मी तैयार तहनाम्याला ।

कसा करार केला सांगतो तुम्हांला ।

दिला सिंहगड पुरंदर आणि इतर २३ किल्ल्याला ।

अन् किल्ल्याच्या परिसरातील मुलुख ४ लाखांचा देतो तुम्हाला ।

आन् ठेवा आम्हाला रायगड, राजगड, यांच्या परिसरांतला ।

एक लाखाचा प्रदेश ठेवा आम्हाला ।

चाल

ऐकतांच अटी मिर्झाराजे खुष जाहले ।

एकमेकांच्या करारावरती सह्या जाहल्या ।

कटाव

मिर्झाराजा बोलला शिवाजीला । जाऊनी सांगा तुम्ही आग्र्‍याला ॥

आहे माझा मुलगा दिमतीला । रामसिंग म्हणतात त्याजला ॥

जहाले शिवाजी तैयार जाण्या आग्र्‍याला ॥

चाल

निघाले शिवाजी संभाजीसह लोक निवडक घेऊनी ।

मजल दर मजल करीत पोहोचले येऊनी । दोन महिन्यांनी ।

होती चालली धांदल आग्र्‍यांत । अवरंजेबाच्या वाढदिवसाची ।

अन् आले त्याच दिवशी शिवाजी, रामसिंग यादी घेऊनी कराराची ।

लगट

जाऊनी सरदार बोलले बादशाहाला ।

रामसिंगासह शिवाजीही आला ॥

बोलला अवरंगजेब सरदाराला ।

बसवा सामान्य माणसांत शिवाजीला ॥

ऐकतांच अवरंगजेबाचे बोल ।

अनावर राग शिवाजीचा जाहला ॥

चाल

बोलले शिवाजी रामसिंग अन् सरदाराला ।

नाही आलो करुनी अपमान घेण्याला तुमच्या दरबाराला ।

जाहले तंग वातावरण । शिवाजीचे भर दरबारात ।

अन् प्रकार सारा पहातांच अवरंगजेब गेला होऊनी स्तब्ध ॥

कटाव

हुकूम सरदारांना सुटला । ठेवा नजर कैदेत शिवाजीला ॥

ऐकतांच औरंगजेबाचा आवाज । संतप्त शिवाजी जाहला ॥

चाल

काळ लोटला तीन महिन्यांचा नजर कैदेत ।

योजिली युक्ती सुटका होण्यासाठी एका क्षणांत ॥

कटाव

सोंग आजारपणाचे घेतले । उलटी जुलाब होऊं लागले ॥

घेऊनी वैद्याला आले । प्रकृती त्यांची पाहुनी गेले ॥

त्यावरती औषध दिधले । पोट दुखीने व्याकुळ जाहले ॥

कण्हत कण्हत मोठयाने राहीले । होते चालू उपचार सगळे ॥

शिवाजी युक्ति युक्तिने चालले ।

औरंगजेबाला प्रथम कळविले । देतो पाठवूनी लोक सगळे ।

तैनातीला माझ्या दोन तीन ठेविले । असे औरंगजेबाला कळविले ।

निवडक लोकांना सारे सांगितले ।

शिवाजी संभाजी हिरोजी फक्त राहिले ।

धा.क.

तीन महिन्यांचा काळ आजारपणात गेला ।

प्रकृतीला आराम पडला । केली सुरवात दानधर्माला ।

अवलीया आन् गरीब लोकांला । केली सुरवात मिठाई वाटण्याला ।

मागितली परवानगी बादशाहाला । मिळाली परवानगी मिठाईला ।

चाल

सुटला हुकूम तो मिठाईचे पेटारे बाहेर जाण्याला ।

पहा उघडोनी प्रत्येक पेटारा दिली वर्दी पहारेकर्‍याला ।

धा.क.

कळली बातमी सार्‍या आग्र्‍यातील फकिराला ।

गरीब भिकार्‍याला तसेच अवलीयाला ।

येवून बसले ताजमहालाच्या मैदानाला ।

देतो आशिर्वाद शिवाजीला ।

नाही असा कोणी मराठी राजा भला पाहिला ।

जाहला आश्चर्य चकीत सारा अवलीया ।

भिकारी आग्र्‍याला खरोखर दादा ॥जी जी॥

धा.क.

असा नित्यनियम सुरु जाहला । पुढे पुढे पहारा ढिला पडला ।

पाहारेकरी हैराण जाहला । न बघता देती सोडून पेटार्‍याला ॥

चाल

काय घडले ते सांगतो तुम्हाला । सारा प्रकार शिवाजीना कळला ।

विचार मनामध्ये ठरविला । शिवाजी संभाजी पेटार्‍यात बसले ।

दुसर्‍यातूनी हिरोजी निघाले । पेटार्‍याच्या तळात बसले ।

मिठाईच थर वरती लाविले । पहारेकर्‍यांनी नेहमीप्रमाणे सोडूनी दिधले ॥

चाल

आगध्याबाहेर पेटारे ते नेऊनी ठेविलेले ।

अन् काढूनी बाहेर संभाजीला । मथुरेला कृष्णाजीपंता घरी नेले ।

छत्रपती शिवाजि, हिरोजी बाहेर पडले ।

गोसाव्याचे कपडे केले । आल्लख निरंजन बोलत चालले ।

कशी दिली तुरी शिवाजीनं औरंगाच्या हातावरी ।

ऐका रसीक जन हो । इतिहासाचे वर्णन ऐका शाहीरी ॥

नाही कोणी रचिला, संपूर्ण माहिती असलेला इतिहास ।

सांगे शाहीर आडविलकर तुम्हांस ।

शब्द रुपे फुलांच्या गुंफुनिया हारास

अर्पियेली श्रीशिवछत्रपतींच्या चरणांस ॥

N/A

References :

शाहीर : आडविलकर

Last Updated : April 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP