मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
शिवाजी महाराज

शिवाजी महाराज पोवाडा - शिवाजी महाराज

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

चाल : पोवाडयाची

धन्य धन्य छत्रपती, शिवाजी नृपति, पराक्रमि अती,

राखिला हिंदु धर्म धरतीस, म्लेंच्छाना दूर धुडकाविले खास,

स्थापिले हिंदुपद राज्यास ॥जी जी॥ध्रु०॥

शिवनेरी जन्म जाहला, सोळाशेतल्या, सत्तावीस साला,

जन्मला जिजा माते पोटी, काळ हिंदूना दुःख दाटी,

हिंदी जनतेला लागे ओहोटी ॥जी जी॥१॥

पिता त्यांचे शहाजि भोसले, योद्धे चांगले, कीर्तिचे भले,

सरदार होते विजापुरचे, मान दरबारीं अती त्यांचे,

शूर लढवय्ये गूण साचे ॥हो जी जी॥२॥

बालपणी शिक्षण दिले, मातेने भले, पुराणातले,

गोष्टी भीमार्जुनही त्यांच्या, खर्‍या नीतिनें वागण्याच्या,

मोठ्ठेपणा येइ अंगि त्यांच्या ॥हो जी जी॥३॥

तलवार दांडपट्टयाचे, भाला फेकिचे, शूर बनण्याचे,

शिक्षण दिले दादोजीनी, कोंडदेव होते त्यांत ज्ञानी,

न्याय नीति नी राजकारणी ॥हो जी जी॥४॥

चाल : बदल

जमविले मावळे मित्र, रोहिडेश्वरी एकत्र ॥जी जी॥

आणा---भाका देति शिवबाना, बेल-भांडार उचलुनि नाना ॥

सोळाव्या वर्षि तोरणा, गड घेऊन बांधी तोरणा ॥

डागडुजी त्याचि करताना, धनलाभ जाहला त्यांना ॥

मग करी सैन्य भरतीला, दे तलवार पागोटयाला ॥

चाल : चढात

किल्ल्यापुढे किल्ले घेती । स्वराज्य मग स्थापीती ॥

चाल : सुरात

हर हुन्नरि मंडळि होती । धाडशी-शूर नच गणती ॥

स्वशिर तळ हाती घेती । मालसुरा तो तान्हाजी नी एसाजी कंक ॥

पासलकर बाजी नि मित्र हे लाभले कित्येक ॥१॥

गद्य

(शिवाजी महाराजांचे सच्चे मित्र कोण कोण होते--हिरोजी फर्जन्द, नेताजी पालकर, सूर्याजी मालुसरे, जिवा महाला, गोमाजी नाईक, फिरंगोजी नरसाळा, संभाजी कावजी, माणकोजी दहातोंडे शिवाय शिवाजी महाराजानी जोडलेले मित्र होते--हिरडस मावळचा बाजी प्रभू, महाडचा मुरारबाजी, हबशाच्या मुलखातला आवाजी आवाजी हे जिवाल जीव देणारे मित्र लाभले होते---स्वराज्याच्या कामांत महाराजाना अखेर पर्यंत साथ देणारे----)

चाल-दांगटी

मोरोपंत पिंगळे भला । निराजी पंडित लाभला ।

रावजी सोमनाथ आला । दत्तोजी गोपिनाथ भला ।

रघुनाथ पंत त्यातला । अण्णाजी दत्तो चांगला ।

अखेरपर्यंत होते साथीला, नि व्हय म्हण दादा । दाजिरं ॥

दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन लागलेले-----

थोर रघुनाथ बल्लाळ । शामरावपंत सोज्ज्वळ ।

सोनदेव आबाजि निर्मळ । नारोपंत हणमंते काळ।

दादोजी कोंडदेव यांचे शिष्य सोज्ज्वळ । दादारं जिरं दाजि ॥

स्वराज्य स्थापनेच्या कार्यात हातभार लावणारे प्रमुख

चाल

शेती शेतकरी पोवाडयाची उत्तम शेती ऋग्वेदाचे प्रतापराव गुजर,

हंबिरराव मोहिते वीर ।

आणी सूर्यराव काकडे । नेमाजि शिंदे, कान्होजि जेधे ।

परसो-रुपा भोसले ।

जनार्दन पंत हणमंते । लोहोकरे, डबिर, कोरडे ते ।

बापुजी नरेकर हो ते । राघो बल्लाळ ते अत्रे ।

पानसंबळ नाइक कर्ते । माणसांचे मोहोळ हे पुरते ।

पवार, रांझेकर, सर्वांनी स्वराज्य स्थापाया ॥

दिधले आपले तन, मन, धन सारे शिवबाला ॥१॥

चाल : धन्य धन्य भू-पाल शिवाजी

शून्यातुन ब्रह्मांड निर्मिले, त्या शिवरायाने ,

निवडिले योग्य लोक त्याने ॥हा जी रं जी रं॥

गुण पारखुनी अचूक त्यांचे, योजित कामाला,

लोकसंग्रह करितसे भला ॥हा जी रं जी रं॥

"लोकोत्तर पुरुष" तो चांगला, "पुरुषोत्तम" म्हणती,

"लोक-नेतेहि" श्रेष्ठ ठरती ॥हा जी रं जी रं॥

चाल : मग बोलावून काकाला

मुलकी नि राज्य-कारभार, पिंगळे पिता पुत्राला ।

आण्णाजी दत्तो आणी, आबाजि सोनदेव याला ।

रघुनाथ बल्लाळही त्याला, शामराव पंत जोडीला ॥

चाल : धन्य

अशा जनांना नेमुन कामें, दिधलि शिवाजीने,

राज्य सुरळीत चाले याने ॥हा जी रं जी रं॥

चाल : उत्तम शेती

दिलेरखाना बरोबर तो पुरंदरी लढला ।

मुरारबाजी अतुल पराक्रम दाखवि सकलाला ।

सिद्याच्या युद्धांत गाजला रघु बल्लाळ अत्रे ।

कोंडाणा घेताना हरपला तान्हाजि मालुसरे ।

घोडखिंडी बाजी प्रभुने । चाकणी फिरंगोजीने ।

जावळी संभाजि कावजीने । कोकणी लढे तो बाजी ।

शाहिस्त्यासम येसाजी । औरंगाबादि नेताजी ।

असे शूर ते योद्धे लढले थोर शिवाजीचे ॥

म्हणून आम्हा हिंदू म्हणुनी भाग्य हे जगण्याचे ॥१॥

(छत्रपति शिवाजी महाराजांना लक्ष्मीची हाक )

चाल : कमिनी हंस गामिनी के सौदामिनी

प्रधानगड किल्ला मोक्याचा, अती झोकाचा, छान बांधणीचा

याच प्रांताचा, याच प्रांताचा, किल्लेदार होता केशरसिंगही त्याचा ॥१॥

लढुनहि त्याच्याबरोबर, किल्ला केला सर, यश खरोखर,

घेत सत्वर, घेत सत्वर, शिवराय लढुनि तो घेतला असा रणधीर ॥२॥

पालखीत बसुन ते जाती, किल्ल्यावरती, सैन्य संगती,

आनंदे अती, आनंदे अती, वाटेत नवल एक घडले ऐका ती कीर्ती ॥३॥

बोरिचे झाड वाटेत, उभे ऐटित, होते डुल्लत, ढाळि लोंबत,

ढाळि लोंबत, अडकुनी शेला शिवबाचा खालि तो पडत ॥४॥

बोरिने अटकाव केला, शिवबाचा शेला, खाली पडला,

त्याच ठिकाणाला, त्याचा ठिकाणाला,

खणण्याचा सेवकाना त्यानी हुकुम सोडीला ॥५॥

खणताच घागरी बाविस , कढया चार खास, मोहोरा होनास,

सोन्या कांबीस, सोन्या कांबीस, भरुनिया सापडल्या,

धन शिवाजी राजास ॥६॥

शिवाजी महाराजानी स्वराज्यासाठी पैसा जमविला.

सुरत शहर लुटले

शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा मुख्य, बहिर्जी नाईक

याने सुरत शहरातील श्रीमंतीची संपूर्ण माहिती शिवरायाना सांगितली.

चाल दांगटी

सुरतेचि, बात्‌मि आणली । बहिर्जिने अती चांगली ।

गोर्‍यांच्या वखारीमधली । संपत्ति अती साठलेली ।

धनमान नगरि झालेली । सोने, मोती, हिरे चांगली ।

पैक्याने नगरी भरलेली । खंडणी देत ना मुळीं ।

व्यापारी पैक्याने भली । जरि संपत्तीहि लाभली ।

स्वराज्याच्या कामि खर्चली । राजाना युक्ति सुचली ।

जर सुरत लटूनी नेली । स्वराज्याच्या खर्चा साधली ॥

राज्याला स्थिरता भली । एक दिनी करुन विचार, सुरत लूटली ॥

दादारं । जीरं दाजि ॥जी जी॥

कल्याण खजिना : चाल : सुरवातीची

कल्याणचा खजिना लुटला, घेऊनी आला, सुपूर्द केला,

आबाजी सोनदेव यानी, गनीमीकावा केला त्यानी,

अर्पिला शिवबाच्या चरणी ॥हो जी॥जी जी॥१॥

सुस्वरुप रत्‍न लाभले, सुभेदार भले, त्याच्या घरातले,

स्नुषा त्याचि रुपवती होती, सापडली लुटीमधे हो ती,

विचार आबाजिंच्या मनीं येती ॥हो जी जी जी॥२॥

अर्पावी शिवाजि राजाला, बेत मनीं झाला, मिळेल बक्षिशिला,

खूष होतील राजे आपुले, ह्या विचारे मनीं आनंदले,

शाबासकी वरति खूप लाभेल ॥जी जी जी॥३॥

सून आणुन उभी ती केली, बुरखा घेतलेली, सौंदर्यकळी,

आबाजिनि लवुन मुजरा केला, बुरखा मुलिवरचा दूर सारला,

खजिना हा तुमच्यासाठी आणिला ॥हो जी जी जी॥४॥

आबाजी म्हणाले----"महाराज, हे बहुमोल रत्‍न मुद्दाम आपल्यासाठी

आणले आहे--त्याचा स्वीकार करावा"

शिवबानी मुख पाहिले, मुदितही झाले, वाहवा ही केले,

म्हणति ते काय आबाजीना, माता मम सुंदर इज सम ना,

मीहि सुंदर असाच असतो ना ! ॥जी जी जी॥५॥

शिवबा म्हणाले--"वाहवा आवाजी ! तुम्हाला सौंदर्याची पारख चांगली करता येते.

अहो ! आमच्या माँसाहेब जर इच्या प्रमाणे सुंदर असत्या,

तर आम्ही ही असेच सुंदर-सुस्वरुपी जन्मलो असतो--आबाजी !---

ही माता भगिनी आमुची, अलंकाराची, साडी---चोळिची,

माहेरचे लेणे देवुन इजला, इत्‌मामाने पाठवावे सासरला,

बंदोबस्ताने पाठवा इजला ॥हो जी जी जी॥६॥

या वागण्याने शिवाजी महाराजांची कीर्ति सर्वत्र पसरली.

आग्र्‍याची अटक-चाल

उत्तम शेती ऋग्वेदाचे वचन असे पहिले. औरंगजेबाने जयसिंगाला, शिवाजीला आग्र्‍यापर्यन्त आणण्यास सांगितले----

दिल्लीपतीचा बादशहा तो औरंगजेब कसला ! ॥

जयसिंगाला म्हणे आणावे दख्खनच्या शिवबाला ॥

रामसिंग तो तुमचा मुलगा आहे दख्खनला ॥

तयास सांगा आण एथवर शिवाजि चोराला ॥

वागवू तया अदबीने ।

राजाच्या इतमानाने । ना कसूर यात खात्रीने ।

आगर्‍याच्या दरबारांत । राजपद देइन येथ ।

यावेच तुम्ही निश्चीत ।

पत्र पाठवा रामसिंगाला तुमच्या पोराला ॥

निश्चित यावे घेऊन तुम्ही शिवाजी संगतीला ॥१॥

चाल

(उद्धवा शांतवन कर जा, त्या गोकुळवासि जनांचे )

पत्र ते लिहुन जयसिंगे, राम्‌सिंगहि त्या पुत्राला ॥

आण-भाक देवुनी त्याला, दख्खनच्या शिवराजाला ॥

दरबारी आग्र्‍या आणिला, अपमान तयाचा केला ।

सरदार समजुनी त्याला, रांगेत उभा त्या केला ॥

अपमान सहन ना झाला । जयसिंगा बोलु लागला ।

हाच शब्द तुम्ही पाळीला । गडबड ही शिव करतांना,

बंदिस्त होउनी पडला ॥

विश्वासघात हा केला, हिंदूने या घटकेला ॥१॥

चाल : सुरवातीची

युक्तिने सुटका ती केली, अक्कल चालविली, भरारी दिली,

पोलादखान वेडा झाला, औरंगजेब दाढि उपटु लागला,

आग्रा शहरात कल्लोळ उठला ॥हो जी जी जी ॥१॥

किति कीर्ति गाऊ शिवबाची, थोर राजाची, अक्कलबाजाची,

पराभव नच कधि त्या शिवला, थोर योद्धा तो सूज्ञि गणला,

म्हणुनि जग वंदितही त्याला ॥हो जी जी जी ॥२॥

शिवाजी तो शूर छत्रपती, स्मरु कीरती, शिकविली नीति,

प्रतापगडिं पटविलि हो जनतेस, शौर्य-धूर्तता संगम खास,

म्हणुन पोवाडे गातो आम्ही त्यास ॥जी जी जी॥३॥

चाल : ओवीची

नत करी पदीं वंदन । शिवराया गाऊं तुज कवन ॥

हा दीन "औंधकविभूषण" । नत मस्तक होई ॥१॥

बोला---श्रीछत्रपति शिवाजी महाराज की जय !

N/A

References :

शाहीर : औंधकविभूषण शिंदे

Last Updated : April 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP