कहाणी आदित्यराणूबाईची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


ऐका आदित्यराणूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा आणावयास रानांत जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसतां ! तो मला सांगा ! तुला रे वसा कशाला हवा ? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! ब्राह्मण म्हणाला, उतत नाहीं, मातत नाहीं घेतला वसा टाकीत नाहीं. तेव्हां त्या म्हणाल्या श्रावणमास येईल. पहिल्या आदितवारीं मौनानं (मुकाट्यानं) उठावं. सचीळ वस्त्रासहित स्नान करावं. अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या (नागवेलीच्या) पानांवर रक्त चंदनाची आदित्यराणूबाई काढावी, सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तांतु करावा, त्यास सहा गांठी द्याव्या, पानफूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप गूळ -खोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा. सह मास चाळई, सहा मास चाळावी. माधीं रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं ? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर. लोणकढं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी. नसेल तर जोडगळसरू द्यावी, नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करवं. अस वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली, तेव्हां राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावूं धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिऊं लागला, कांपूं लागला, तेव्हां राजाचे राणीनं सांगितलं कीं भिऊं नका, कांपूं नका. तुमच्या मुली आमचे येथे द्या ! आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या ? दासी कराल, बटकी कराल ! राणी म्हणाली, दासी करीत नाहीं, बटकी करीत नाही. राजाची राणी करूं, प्रधानाची राणी करूं.

मार्गेश्वराचा महिना आला, ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाचे घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरीं गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गूळ खा, पाणी प्या ! गूळ खात नाही, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे, ती तूं ऐक ! तुझी कहाणी ऐकायला मला कांहीं वेळ नाहीं. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोंच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणूण बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गूळ खा, पाणी प्या ! गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक ! तुझी कहाणी नको ऐकूं, तर कोणाची ऐकूं ? घरांत गेली, उतरंडीचीं सहा मोत्येंआणलीं. तीन आपण घेतलीं, तीन बापाच्या हातांत दिलीं. त्यानं मनोभावें कहाणी सांगितली. लेकीणं चित्तभावें ती ऐकली. नंतर जेवूण खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे ? जिनं कहाणी ऐकली नाहीं, ती दारिद्रानं पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे ! इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितलं. मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन कांहीं दिलं तर घेऊन ये ! पहिल्या आदितवारीं पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या ? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कआ आला आहे ? काय आला आहे ? फाटकं नेसला आहे. तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे ! परसदारानं घेऊन या ! परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊं-माखूं घातला, पीतांबर नेसायला दिला, जेवूं-खाऊं घाअलं, कोहोळा पोखरला, होनमोहोरा भाल्या. बाबा, कोठें ठेवूं नको, विसरूं नको, घरीं जतन करून जा ! वाटेनं आपला जाऊं लागला, तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरीं गेला. विचारलं, काय रे बाबा मावशीनं काय दिलं ? दैवें दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, तें पण सर्व गेलं ! पुढं दुसर्‍या आदितवारीं दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहीला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या ? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन माझा निरोप सांगा. त्यांनीं सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं-माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला, जेवूं-खाऊं घातला, काठी पोखरून होनमोहोरांनी भरून दिली. बाबा, कोठें ठेवूं नको, विसरूं नको, घरीं जतन करून घेऊन जा ! म्हणून सांगितलं. वाटेंत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरीं गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवें दिलें, तें सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाहि पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातला. नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला. कोठें ठेवूं नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरीं जातांना विहिरीच्या कांठीं नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरींत उतरला, तों नारळ गडगडून विहिरींत पडला. घरीं गेला. आईनं विचारलं, 'काय रे बाबा, मावशीनं काय दिलं ?' आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाहि प्रधानाचे राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला जेवूं-खाऊं घातलं. त्याला दह्याची शिधोरी दिली होनमोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला, हातची शिधोरी घेऊन गेला. घरीं गेला, आईनें विचारलं, काय रे बाब, मावशीनं काय दिलं ? आई गं, मावशीनं दिलं पण दैवानं तें सर्व नेलं ! पांचवे आदितवारी आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली, न्हाऊं घातली, माखूं घातली. पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करूं लागली. काय वसा करतेस तो मला सांग ! बहीण म्हणाली, अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करूं ? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणमास आला. सांगिप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले. मला रे पापिणीला छत्रं कोठली ? चामरं कोठली ? पाईक कोठले ? बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली आहे. एकमेकींना बहिणी-बहिणींनी आहेर केले. वाटेनें जाऊं लागली, तों पहिल्या मजलेस सैंपाक केला, राजाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हां कहाणीची आठवण झाली. करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं, वाटेनं एक मोळीविक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये ! तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ ? माझं पोट भरलं पाहिजे ! असं म्हणून तो राणीकडे आला. तशीं सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं व तीन आपल्या हातांत ठेविलीं. मनोभावें कहाणी सांगितली. चित्तभावें त्यानं ऐकली. त्याची लांकडांची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, बाई ! कहाणी ऐकल्याचं काय फळ ? काय वसा आहे तो मला सांगा ! तुला रे वसा कशाला हवा ? उतशी, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! उतत नाहीं, मातत नाहीं. घेतला वसा टाकीत नाहीं ! तेव्हा राणीनं वसा सांगितला.

पुढं दुसर्‍या मजलेस गेली. सैंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हां कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं. माळ्याचा मळा पिकत नाहीं. विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हांक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक ! तो आला. राणीनें सहा मोत्यें घेऊन तीन आपण घेतलीं. तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावें सांगितली, चित्तभावें माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, बाई ! कहाणी ऐकल्याचं एवढं फळ. मग वसा घेतल्याचं काय फळं ? कसा वसा असेल तो मला सांगा ! मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पुढं तिसर्‍या मजलेस गेली. सैंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हां कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं. एक म्हातारी आहे. तिचा एक मुलगा वनांत गेला होता. एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणले, आमच्या बाईची कहाणी ऐक ! ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करूं ? मी मुलांसाठीं रडतें आहे, बरं येतें. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्या प्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावें ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला, डोहांत बुडाला होता तो आला, सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ ? काय वसा असेल तो मला सांग ! मग राणीनं तिलाहि वसा सांगितला.

पुढं चौथे मजलेस गेली. सैंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं. काणा डोळा मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं, पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्यें आपण घेतलीं. राणीनें मनोभावें कथा सांगितली, ती त्यानं ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ ? काय वसा तो मला सांगा ! मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पाचव्या मुक्कामास घरीं आले. सैंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले, साती दरवाजे उघडले. लोहघंगाळ पाणी तापविलं, षड्‌रस पक्वान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घांसास केंस लागला. ते म्हणाले, अग अग, कोणा पापिणीचा केंस आहे ? राजाच्या राणीला बारा वर्षे दरिद्र आलं होतं, तिनें आदितवारी वळचणीखालीं बसून केंस विंचरले होते. काळं चवाळं, डोईचा केंस, वळचणीची काडी डाव्यां खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे ! राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊं नये.

ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणा डोळा, मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो !' ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP