TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

कहाणी सोमवतीची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


कहाणी सोमवतीची

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. त्याला सात मुलगे व एक मुलगी होती. त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नांव धनवती नि मुलीच नांव गुणवती होतं. त्यांच्या घरी अशी चाल होती की, आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनीं त्याला भिक्षा घालावी, नमस्कार करावा. पुढे एके दिवशी काय झाल ? एक मोठा सूर्यासारखा ब्राह्मण आला. सगळ्यांनीं त्याची पूजा केली. साती सुनांनीं त्याला भिक्षा घातलीं. नमस्कार केला. बाह्मणानी त्यांना आशीर्वाद दिला. संपत वाढो, तुमचं सौभाग्य अक्षयी असो ! धनवतीबाईनें आपल्या मुलीला सांगितलं, मुली, मुली भीक्षा घाल ! मुलगी उठली, भिक्षा घातली नि नमस्कार केला. ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला. धर्मिणि हो ! मुलीनं आपल्या आईला सांगितलं, आई आई, भटजींनीं जसा आपल्या वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली, चल पाहूं, त्याला पुन्हा भिक्षा घाल ! मुलीनं पुन्हा भिक्षा घातली. नमस्कार केला. ब्राह्मण म्हणाला, धर्मिणी हो ! तेव्हां धनवतीनं त्याला विचारलं, हिला असा आशीर्वाद का देतां ? ब्राह्मण म्हणाला, हिला लग्नांत वैधव्य येणार आहे ! धनवतीनं ब्राह्मणाचे पाय धरले नि म्हणाली, जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल ! माझी एकुलती एक मुलगी रंडकी झाली तर मी काय करूं ? याचा मला कांहीं उपाय सांगा. असे म्हणून रडू लागली. ब्राह्मणाला तिची दया आली. बाई, बाई रडूं नका. मी एक उपाय सांगतो. सातां समुद्रापलीकडे एक बेट आहे, तिथं एक सोमा नावाची परटीण आहे. तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुमचं दुःख दूर होईल ! लगीन झाल्यावर तिला वाटेस लावा ! असं म्हणून ब्राह्मण आपला दुसर्‍या घरीं भिक्षेस गेला.

इकडे काय झालं ? धनवतीनं आपल्या नवर्‍याला सांगितलं - अशी गोष्ट आहे. कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरीं आणलं पाहिजे. तेव्हां त्यानं आपल्या मुलांना जवळ बोलावलं. त्यांना सांगू लागला. ज्यांची आमच्यावर भक्ति असेल त्यांनीं आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं. सोमेला आणायला जावं. तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणूं लागले. तुझी सगळी माया मुलीवर ! आमच्यावर कांहीं माया नाहीं. सातां समुद्रापलीकडे आम्ही कांही जात नाही ! हें ऐकून आईला रडूं आलं, बापाला वाईट वाटलं. तो आपल्या बायकोला म्हणाला, तूं कांहीं भिऊं नको. आपल्याला सात मुलगे असून-नसून सारखेच. तूं आपली निपुत्रिकच आहेस असं समज ! तूं कांहीं काळजी करूं नकोस ! मीच जातों नि सोमेला घेऊन येतों. तेव्हां त्यांतला धाकटा मुलगा होता तो आपल्या बापाला म्हणाला, बाबा बाबा, आम्ही सातजण असून तुम्ही आपल्याला निपुत्रिक असे कां म्हणून घेता ? मी ताईला बरोबर घेऊन जातों नि सोमेला घेऊन येतों. पुढं आईबापांना नमस्कार केला आणि ती आपली बहीणभावंड निघालीं.

जातां जातां समुद्र आला. वार्‍याचा सोसाटा चालूं लागला. समुद्राच्या लाटा येऊं लागल्या. पलीकडे कसं जावं हे सुचेना. जवळ कांहीं खायला नाहीं, प्यायला नाहीं, सारं त्रिभुवन दिसूं लागलें. परमेश्वराचें स्मरण केलं, देवा देवा, आतां तूच ह्या संकटातून पार पाड ! असा देवाचा धांवा केला. तिथ एका वडाच झाड होतं. त्याच्याखालीं ती जाऊन बसली. सगळा दिवस उपास पडला. त्या झाडावर गृध्रपक्ष्यांचं घरटं होतं. त्यांत त्या पक्ष्यांची पिलं होतीं. संध्याकाळ झाली. गृध्रपक्षी घरीं आले. पिलांना चारा देऊ लागलें. पिलं कांहीं चारा घेत ना. त्यांनी आपल्या आईबापांना सांगितलं, आपल्या घरीं दोन पाहुणे आले आहेत. झाडाखालीं उपाशीं आहेत. त्यांना टाकून आम्ही जेवणार नाहीं ! गृध्रपक्षी खालीं आले, ब्राह्मणाला पुसूं लागले, तूं असा चिंतेंत कां पडला आहेस ? तुझं काय काम असेल तें आम्हांला सांग, आम्ही तें काम पार पाडूं. तुझी चिंता दूर करूं. उपाशी कांहीं निजू नको. आम्ही तुला फळे देतों, तीं थोडीशीं तूं खा, थोडींशी ह्या मुलीला दे ! ब्राह्मणाला आनंद झाला. देवाचे त्यानं आभार मानले. गृध्रपक्ष्यांना आपला हेतु सांगितला. पक्षी म्हणाले, उद्यां उजाडल्यावर तुम्हांला मी घेऊन जातों. सोमा परटिणीच्या दारीं नेऊन सोडतो. मग बहीणभावांनीं फळं खाल्लीं, रात्रीं आनंदानं झाडाखाली निजलीं

उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले. बहीणभावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशीं नेऊन सोडलं. पक्षी आपले चरायला गेले. पुढं बहीणभावंडांनी काय केले ? रोज पहांटेस उठावं, सोमा परटिणीचं अंगण झाडावं, शेण घेऊन सारवून ठेवावं. असं करतां करतां वर्ष निघून गेलं. एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना व सुनांना विचारलं, रोज सकाळीं कोण उठतं ? माझं अंगण कोण झाडतं ? त्याच्यावर सारवण कोण घालतं ? ही म्हणे मी नाहीं, ती म्हणे मी नाहीं. तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं. कांहीं केल्या पत्ता लागेना. मग दुसरे दिवशी सोमा जागत बसली. तीन प्रहार रात्र उलटून गेली. चौथ्या प्रहरीं काय झालं ? ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे, तिचा भाऊ तें सारवतो आहे, असं पाहिलं. सोमा परटीण पुढं आली. तिनं विचारलं, मुलांनो, तुम्ही कोण आहात ? ह्यांनी सांगितलं, आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत. सोमा म्हणाली तुम्ही ब्राह्मण, मी परटीण. आमचीं नीच जात. तुम्ही आमचं अंगण कां झाडतां ? कां सारवतां ? आम्हाला पाप लागेल ! ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही. तेव्हा तुम्ही सेवा का करतां ? तसं तिला ब्राह्मणाच्या मुलानं सांगितलं. ही माझी बहीण आहे. हिचं लगीन करायचं आहे. तूं लग्नाला यावंस अशी आमची इच्छा आहे. आईबापांची आज्ञा घेतली आणि तुला बोलावूं आलों तर तुला लग्नाला आलंच पाहिजे. तूं न आलीस तर हिला लग्नांत वैधव्य येईल, असं एका ब्राह्मणानं सांगितलं आहे. तूं प्रसन्न होऊन यावंस म्हणून आम्ही तुझी सेवा करतों. मग सोमा म्हणाली, तुम्ही सेवा करूं नका. मी तुमच्याबरोबर येतें. घरांत गेली, आपल्या सुनांना सांगितलं, मी ह्या ब्राह्मणाबरोबर जातें. ह्या मुलीचं लगीन झाल म्हणजे मग परत येईन. तोंपर्यंत आपल्या घरांत किंवा सोयर्‍याधायर्‍यांत कोणी मेलंबिलं तर त्याला दहन करूं नका ! असं सांगून ती निघाली.

ती समुद्राचे कडेस आली. ब्राह्मणाच्या मुलाला नि मुलीला समुद्राच्या पार केलं, आपण आकाशांत उड्डाण करून त्यांच्याजवळ आली. सोमेला घेऊन तो आपल्या घरी आला. सर्वांना आनंद झाला. धनवतीनं परटिणीची पूजा केली. धाकटा भाऊ उज्जयनीस गेला. बहिणीजोगा नवरा पाहून आणला. सुमुहूर्तावर लगीन लावलं. वधूवरांवर अक्षता टाकल्या. तों एकाएकीं काय झालं ? नवर्‍यामुलाला मूर्च्छा आली, धाडकन भुईवर पडला. हलत नाहीं, बोलत नाहीं. सगळे लोक घाबरले. सोमेनं जवळ येऊन पाहिलं. मुली मुली, घाबरूं नको. म्हणून धीर दिला. मी तुला सोमवतीचं पुण्य देते. त्यानं तुझा पति जिवंत होईल, असं सांगितलं. मग सोमा उठली, हातीं उदक घेतलं, संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं. तसा तिचा नवरा जिवंत झाला. सगळ्यांना आनंद झाला. पुढं लगीन झाल्यावर सोमा घरीं यायला लागली.

इकडे सोमेच्या घरीं काय झालं ? पहिल्यानं तिचा मुलगा गेला, मागून नवरा गेला, त्याच्यामागून जावई गेला. इकडे सोमा आपली घराची वाट चालतेच आहे. वाटेनं तिला सोमवती अवस पडली. त्या दिवशीं काय झाल ? एक म्हातारी बाई वाटेत भेटली. तिच्या डोईवर कापसाचा भारा होता. ती सोमेला म्हणाली, बाई बाई, माझ्या डोक्यावर भार झाला आहे, एवढा खालीं उतर ! आपण दोघी बरोबर जाऊं. सोमेनं तिला उत्तर केलं, आज सोमवती अवस आहे. मला नेम आहे. धर्म आहे. मला कापसाला शिवायचं नाहीं. पुढं जातां जातां काय झाल ? एका नदीच्या कांठीं आली. तिथं पिंपळाचं झाड दिसलं. नदीचं स्नान केलं. श्रीविष्णूची पूजा केली. तिच्याजवळ कांहीं नव्हतं म्हणून शंभर नि आठ वाळूचे खडे हातीं घेतले नि पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं काय झालं ? तिच्या घरीं तिचा मुलगा, नवरा, जावई सारे जिवंत झाले.

सोमा आपल्या घरीं आली. सुनांनीं तिला विचारले, सासूबाई, सासूबाई, तुम्ही गेल्यावर घरांतील सर्व माणसे मेली होतीं. ती आम्हीं तशीं ठेवलीं होतीं आणि तुमची वाट पहात बसलो होतो. तुम्ही यायच्या अगोदर ती जिवंत झाली. असा चमत्कार कशानं झाला ? सोमा म्हणाली, मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलाला दिलं, तिचा नवरा जिवंत केला. माझ्याजवळचं पुण्य खपलं, म्हणून इकडे असं अशुभ झालं. वाटेंत मला सोमवती अवस पडली. मीं पुन्हां हें व्रत केलं. कापसाला शिवलें नाहीं, मुळ्याला शिवलें नाहीं, श्रीविष्णूची पूजा केली, पिंपळाला शंभर नि आठ प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं घरांतलीं माणसं जिवंत झालीं. तुम्हीहि ह्या व्रताचं आचरण करा म्हणजे तुम्हांला वैधव्य प्राप्त होणार नाहीं. संतत, संपत अक्षयी राहील !

तेव्हा सुनांनी विचारलं, हें व्रत कसं करावं ? तशी ती म्हणाली, सोमवती अवस आली म्हणजे सकाळीं उठावं, स्नान करावं. मुक्यानं वस्त्र नेसावं, पिंपळाच्या पारावर जावं, श्रीविष्णूची पूजा करावी. श्रीमंतांनी हिरे, माणकं घ्यावीं, मोतीं पोवळीं घ्यावीं. सोन्या-रुप्याचीं भांडी घ्यावीं. गरिबांनीं तांब्या काश्याची घ्यावीं. चांगलीं चांगलीं फळं पुष्प घ्यावीं. जशीं अनुकूल असतील तशीं घ्यावी. पण हीं सगळीं शंभर नि आठ मोजून घ्यावी. तितक्या प्रदक्षिणा घालाव्या, आणि जें आपण घेतलं असेल तें ब्राह्मणाला द्यावं, सवाष्ण-ब्राह्मणाला जेवूं घालावं आणि आपण मुक्यानं जेवावं. असं व्रत जी करील तिला वैधव्य प्राप्त होणार नाहीं. इच्छित फळ प्राप्त होईल. संपत्ति सतत वाढेल. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T22:31:24.0870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

waiving of recovery

  • वसूली छोड देना 
RANDOM WORD

Did you know?

कोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.