कहाणी ज्येष्ठागौरीची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एके दिवशीं काय झालं ? भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनीं गौरी आणल्या, रस्तोरस्तीं बायका दृष्टीस पडूं लागल्या. घंटा वाजूं लागल्या. हें त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं. मुलं घरीं आलीं. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण ! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करूं ? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर कांहीं नाहीं. तुम्ही बापाजवळ जा, बाजारांतले सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन ! मुलं तिथून उठलीं, बापाकडे आलीं. बाबा बाबा, बाजारांत जा, घावनघाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील ! बापानं घरांत चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दुःखी झाला. सोन्यासारखीं मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवतां येत नाहीं. गरिबीपुढं उपाय नाहीं. मागायला जाव तर मिळत नाहीं. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धांवा केला. तळ्याच्या पाळीं गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरांत गेली आणि आंबिलीकरितां कण्या पाहूं लागली. तों मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवलं वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली. सगळीं जण आनंदानं निजलीं. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मला न्हाऊं घालायला सांग, म्हणून म्हणाली. घावनघाटलं देवाला कर, नाहीं कांहीं म्हणूं नको, रड कांहीं गाऊं नको. ब्राह्मण तसाच उठला, घरांत गेला, बायकोला हांक मारली, अग अग ऐकलंस का ? आजीबाईला न्हाऊं घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलांबाळांसुद्धा पोटभर जेवलीं. म्हातारीनं ब्राह्मणाला हांक मारली. उद्यां जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी, आजी, दूध कोठून आणूं ? तशी म्हातारी म्हणाली, तूं कांहीं काळजी करूं नको. आतां ऊठ आणि तुला जितक्या गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावीं बांध. संध्याकाळीं गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नांवं घेऊन हांका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ ! ब्राह्मणानं तसं केलं, गाई-म्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांसुद्धां धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई-म्हशींनीं भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसर्‍या दिवशीं खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आतां पोंचती कर ! ब्राह्मण म्हणूं लागला- आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आतां सगळं प्राप्त झालं. आतां तुम्हाला पोचत्या कशा करूं ? तुम्ही गेलां म्हणजे हें सगळं नाहीसं होईल ! म्हातारी म्हणाली, तूं कांहीं घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला कांहीं कमी पडणार नाहीं. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच ! मला आज पोंचती कर ! ब्राह्मण म्हणाला, हें दिलेलं असंच वाढावं असा कांहीं उपाय सांग ! गौरीनं सांगितलं, तुला येतांना वाळू देईन, ती सार्‍या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, गोठ्यांत टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाहीं. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यांत तळ्याच्या पाळीं जावं. दोन खडे घरीं आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशीं घावनगोडं, तिसरे दिवशीं खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवूं घालावं. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत मिळेल. ही साठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं देवाच्या दारीं, गाईंच्या गोठीं, पिंपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP