कहाणी वसुबारसेची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होतीं. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळीं, मुगाळीं वासरं होतीं. एके दिवशीं काय झालं ? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशीं म्हातारी सकाळीं उठली, शेतावर जाऊं लागली. सुनेला हांक मारली, मुली मुली इकडे ये ! सून आली, काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जातें. दुपारीं येईन. तूं माडीवर जा, गव्हाचे,मुगांचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं. आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. गहूं मूग काढून ठेवले. खालीं आली, गोठ्यांत गेली. गव्हाळीं मुगाळीं वसरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारलीं, चिरलीं व शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसलीं. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूनं देखलं. तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणुन सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजतां चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशीं जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा कर ! गाईवासरं जिवंत कर ! असं न होईल तर संध्याकाळीं मीं आपला प्राण देईन ! असा निश्चय केला. देवापाशीं बसून राहिली. देवानं तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण देखिलं. पुढं संध्याकाळीं गाई आल्या. हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाहीं असं देवास वाटलं. मग देवान काय केलं ? गाईचीं वासरं जिवंत केलीं. तीं उड्या मारीत मारीत प्यायला गेलीं. गाईंचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाईगोर्‍ह्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली. आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊं. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं, देवाब्राह्मणाचे दारीं, पिंपळाच्या पारीं, गाईंच्या गोठी सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP