उद्गार - ८४१ ते ८५०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


८४१

भावें आळवितां देवा । लागला हातीं जुनाट ठेवा । दैव मोडीनी आले दैवा । सुख विश्रांती पावलों ॥१॥

आतां वेचूं खाऊं जेऊं । शोभती अळंकार ते लेऊं । आपुलें सुहद गौरवूं । हरिभक्त वैष्णव साबडे ॥२॥

अपार संपत्ती आली घरां । नाहीं आतां वोढावारा । नलगे जाणें आणिकांच्या घरां । कांहीं मागावें यासाठीं ॥३॥

खरें नाणें खरें केणें । खरिया मोलें घेणें देणें । खरें विकें खरेपणें । न पडे उणें भरलेंसे ॥४॥

निळा म्हणे माझिया दैवें । जोडिलें होतें पडिलें ठावें । कृपा केली विठ्ठल देवें । दिधलें भांडार ॥५॥

८४२

मजही भीड नुलंघवे । जें त्या पुसावें मनोगत ॥१॥

सर्वही भावें सेवाऋणी । मजचि करुनी सोडियलें ॥२॥

आशा मात्र नाहीं याशीं । जे कां देहासी नाठविती ॥३॥

निळा म्हणे घातली मिठी । कल्प कोटी न सुटेशी ॥४॥

८४३

मस्तक माझा पायावरी । या वारकरी संतांच्या ॥१॥

प्रतिवर्षी पंढरपुरा । जाती महावव्दरा हरि भेटी ॥२॥

भेटी त्याची इच्छी मन । करिती कीर्तन अनुदिनीं ॥३॥

निळा म्हणे लोटांगण । घालित जाईन सामोरा ॥४॥

८४४

महासुखा पारणें होये । आनंद राहें लिगटोनी त्या ॥१॥

ऐशिया पावविलों विश्रांती । निमग्न वृत्ती इंद्रियांच्या ॥२॥

मनही तेथुनी वेगळेंचि नोहें । पांगुळले पाय प्राणाचे ॥३॥

निळा म्हणे रवि शशी । हारपले निशी दिवस दोन्ही ॥४॥

८४५

मावळली खंती । देहीं देहाची विस्मृती ॥१॥

पांडुरंग ध्यानीं मनीं । रुप बैसलें लोचनीं ॥२॥

पांडुरंग ध्यानीं मनीं । रुप बैसलें लोचनीं ॥३॥

नये कळों दिवस रातीं । स्वप्न निद्रा ना जागृती ॥४॥

निळा म्हणे अखंडता । विठ्ठल रुपीं तादात्म्यता ॥५॥

८४६

भावें वोजावली भूमिका । वरी कृपाघन वोळला निका । संतीं बीज दीधला फुका । तेचि पेरिलें तोचि क्षणीं ॥१॥

वाफलें तें वरावरी । कणिसें दाट आल्या घुमरी । पिकलें न समाये अंबरीं । चहुकोनि सारिखेचि ॥२॥

निळा केला भाग्यवंत । सवंगीता नावरे पीक अदभुत । रसीवा केला नलगे अंत । माप करितां नावरेसा ॥३॥

उमाणु जातां अधीकची वाढे । दिसोंचि लागे पुढें पुढें । सांजे भरले सीग नमोडे । मोडति गोड ओढितां ॥४॥

नवल पिकाची हे धणी । होती संतकृपेची पेरणी । पुरे पुरे नव्हेचि उणी । पदरीं भरुनि बैसलों ॥५॥

निळा झाला सदैव आतां । अपार लेखाचि नव्हे चित्ता । साठऊं जाणतां नेणता । राहो भरिता उरलें तें ॥६॥

८४७

शोधूनी अन्वये वंशवंशावळी । परंपरा कुळीं उच्चारण ॥१॥

म्हणविले पूर्वी जैसे होते तैसे । केले सामरस्यें समाधान ॥२॥

येक छत्र झळके उन्मनि निशाणी । अनुहाताचा ध्वनि गगन गर्जें ॥३॥

निळयास्वामी स्थापी निजपदीं दासा । करुनि उल्हास आवडिचा ॥४॥

८४८

पावलो प्रसाद इच्छा केली तैसी । झाले या चित्तासी समाधान ॥१॥

मायबाप माझा उभा कृपादानीं । विटे सम जोडुनि पदांबुजें ॥२॥

सांभाळीसी येउ नेदिची उणीव । अधिकार गौरव राखे तैसे ॥३॥

निळा म्हणे सर्व जाणें अंतर्बाहे । जया तैसा राहे कवळुनिया ॥४॥

८४९

सुखें जन्मातरें घेऊं । नामें आळवूं श्रीहरीचीं ॥१॥

नाहीं आम्हा त्याचें कोडें । संसार बापुडें तें काये ॥२॥

कळिकाळाचें भय तें किती । पाया पडति यमधर्म ॥३॥

निळा म्हणे सर्वहि सिध्दी । रुळती पदीं हरिनामें ॥४॥

८५०

आटीतो आटणी । करुनि इंद्रियां दाटणी ॥१॥

कवळूनियां नामापाशीं । तुमच्या ठेवितों सायासी ॥२॥

नेदी घेऊं वावो । दुजा न देऊनियां ठावो ॥३॥

निळा म्हणे ज्योती । जागवितो दिवसराती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP