उद्गार - ७९१ ते ८००

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


७९१

त्याचे पायीं माझी बुध्दी । जडली कधीं न ढळेची ॥१॥

ज्याचे ध्यानीं मनीं हरी । नामें वैखरी उच्चार ॥२॥

नित्य कीर्तनांचें घोष । करिती उल्हास आवडीं ॥३॥

निळा म्हणे त्यांची गोठी । ऐकतां पोटीं सुख वाटे ॥४॥

७९२

दिवसरात्रीं हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुणकीर्ति ॥१॥

स्वप्नामाजी सुषुप्ती आंत । जागृतीये मात याचाचि ॥२॥

खातां जेवितां बोलतां । आठवे कथा नित्य याची ॥३॥

निळा म्हणे लगटोनि आलें । पीक चांगले असंभाव्य ॥४॥

७९३

दिसे तोचि जनीं वनीं । विठ्ठल  ह्रदयीं त्रिभुवनीं ॥१॥

लेणें नेसणें भूषणें । विठ्ठल  वस्त्रें परिधानें ॥२॥

अन्न भोजन उदक पान । विठ्ठल  सुषुप्ती शयन ॥३॥

निळा म्हणे वाचा बोली । विठ्ठल  होऊनियां ठेली ॥४॥

७९४

न कळे केव्हां दिवस गेला । रात्रीं झाला तमनाश ॥१॥

निद्राचि नाहीं स्वप्न तें कैंचें । नि:शेष जागृतीचें विस्मरण ॥२॥

भोक्ताचि नाहीं कैचा भोग । अनंगीं अभंग हारविलें ॥३॥

निळा म्हणे ठांई ठावो । देवीं देवो मावळला ॥४॥

७९५

न पडे विसर याचा मना । झाली तद्रुप वासना । मही व्यापूनियां गगना । दिसे नयना रुप पुढें ॥१॥

जें जें आढळें दृष्टीपुढें । तें तें याच्या स्वरुपें मांडें । व्यापुनी सकळांमाजिवडें । वसें अंतरीं सकळांचे ॥२॥

स्वरुप सांवळें सगुण । अंगकांति मेघवर्ण । करीं धरुनियां जघन । दृष्टी अवलोकीं पुंडलिका ॥३॥

कर्णी कुंडलें विशाळ डोळें । जैसीं विकासलीं दिव्य कमळें । हदयावरीं कंठमाळे । पदकीं रत्नें झळकती ॥४॥

कास पितांबरें घातलीं । मेखळा कटीं सूत्रें रेखिलीं । पाउलें विटेवरीं शोभलीं । निळयां झालीं प्रसन्न तीं ॥५॥

७९६

न धरी आतां शंका । कशासाठी भिऊं लोकां ॥१॥

ज्याचें ओझें तयावरी । मज हे ऐशी काय थोरी ॥२॥

सांगितलें करुं काज । ज्याची तया चिंता लाज ॥३॥

निळा म्हणे गेलो भेवो । जाणोनि साह्य पंढरिरावो ॥४॥

७९७

नाहीं उपेक्षिलें कोणा । थोरा लहाना निवडुनी ॥१॥

ऐसी संत देती ग्वाही । पुराणेंही गर्जती ॥२॥

आम्ही आतां न फिरों मागें । करुं वेगें वेगुचि ॥३॥

निळा म्हणे पळें पळ । साधु काळ भेटीचा ॥४॥

७९८

नाहीं ऐसें उणेंचि कोठें । भरतो पोट तोंडवरी ॥१॥

बाहेर येती वोसंडोन । चाही कोन उथळोनी ॥२॥

झाली आनंदा दाटणी । गर्जे वाणी त्या सुखें ॥३॥

निळा म्हणे माझी सत्ता । नाहीं वदता विठ्ठल  ॥४॥

७९९

नाहीं कोठें गोंविला हेत । ठेविलें चित्त याचिवरी ॥१॥

सगुण सुंदर देखिलें दिठीं । विटे नेहटी तेंचि पुरे ॥२॥

वामभागीं विराजमान । स्वरुपीं समान रुक्मिणी ॥३॥

निळा म्हणे लाभला छंद । याचाचि वेध मनासीं ॥४॥

८००

नाहीं माझा उरविला । संदेह अवघाचि फेडिला ॥१॥

म्हणोनियां त्याच्या सुखें । नाचें कीर्तनीं मी हरिखें ॥२॥

बोलविती जें जें वाचें । तें तें अक्षर निश्चयाचें ॥३॥

निळा म्हणे मी नेणें गति । अर्थ त्याचा ते जाणती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP