उद्गार - ८३१ ते ८४०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


८३१

सिंधुतनया सेवितां पाय । तुमचे तल्लीन होउनी ठाय ॥१॥

ब्रम्हानंदाची राणीव । चरणरेणु माजी सर्व ॥२॥

म्हणे हे न विसंबें मी आतां । युगें कल्नकोटी जातां ॥३॥

निळा म्हणे सुकुमार ते । विटे सांपडलें आमुतें ॥४॥

८३२

सुखी केलें सुखी केलें । संती दाविलें निज हित ॥१॥

जन्मोजन्मीं दास त्यांचा । पोसणा ठायींचा पुरातन ॥२॥

नित्य आपुला आठव देती । आणि पुरस्कारिती निज सेवें ॥३॥

निळा म्हणे हेंचि त्यांचें । वर्तन ठायीचें पूर्वापार ॥४॥

८३३

सुखीं सांठविलें सुख । हरिखा हरिख भेटविला ॥१॥

आनंदासी आनंद झाला । सद्गुरु भेटला तेचि क्षणीं ॥२॥

प्रतीतीसही प्रतीत झाली । शांति मेळवविली निजशांती ॥३॥

निळा म्हणे सुकाळ ऐसा । केला दशदिशा कोंदलीया ॥४॥

८३४

सेवकाचि परि स्थापिला पदीं । मग त्याचिये बुध्दी कोण तुके ॥१॥

तैसेंचि केलें मजही देवा । निपेक्ष अवघा दावूनियां ॥२॥

आईता वांटा दिधली जोडी । कवडीनें कवडी सांचिली ते ॥३॥

निळा म्हणे देवा आभारचि केले । मल सेवका गौरविलें आपुलिया ॥४॥

८३५

सैंध दाटली अक्षरें । माप नव्हें पुरें । केली माझीया दातारें । अतिवृष्टी कृपेची ॥१॥

लिहितां न पुरे दिवसराती  । वाढविला विस्तार तो मती । जैसे क्षीराब्धीवरीं येती । तरंग मिरविती असंख्य ॥२॥

नाना प्रमेय नाना कथा । नाना पदांचिया चळथा । निघती त्या पंढरीनाथा । आवडती प्रियवादें ॥३॥

संतचरित्रें हरिचें गुण । केलें पवाडें ते विंदान । नाना पतितांचे उध्दरण । केलें संरक्षण दासांचें ॥४॥

ऐशिया स्तवनीं लाविली वाचा । बडीवार हरीचिया नामाचा । केला प्रतिपाळ तो दासाचा । वारंवार आठवितों ॥५॥

नाना नामें नाना चरित्रें । कल्याणरुपें अती पवित्रें । श्रवणें पठणें गातां वक्त्रें । हरिच्या पदातें पावविती ॥६॥

आइती जोडूनियां ठेविलीं । होतीं ठायींचि गुंफिलीं । निळा म्हणे तेचि वोपिलीं । माझिये वदनीं वरदानें ॥७॥

८३६

माझी बुध्दि झाली वेडी । दिधली बुडी हरिनामीं ॥१॥

नुमजे येथें विगुंतली । न करी बोली आणिक ॥२॥

सांडियले वादावाद । छंद बंद आणिक ॥३॥

निळा म्हणे तुमच्या पायीं । जडली ठायीं न ढळेसी ॥४॥

८३७

मीचि माझा विस्मय करी । नवल परी देखोनी ॥१॥

कैशी येणें पांडुरंगें । अंगीं अंगें लपविलीं ॥२॥

पळही मात्र विसर देहीं । न पडेचि ठायीं व्यापियलें ॥३॥

निळा म्हणे नाम वाचे । गुण त्याचें आठवती ॥४॥

८३८

याचा आश्रय झाला आम्हां । या पुरुषोत्तमा विठठलाचा ॥१॥

गातां वाचितां चरित्रें याची । न करी दासांची उपेक्षा हा ॥२॥

आपुला संकेत सिध्दी न्यावा । करणें देवा हेंचि सत्य ॥३॥

निळा म्हणे निष्ठा जाणें । तैसाचि करणें आदर त्या ॥४॥

८३९

याचिया रुपाचें चिंतन । करितां तनु मन वेधलें ॥१॥

देहीं नुरता  देहभाव । झालों स्वयमेव तेंचि रुप ॥२॥

नाईकती शब्दा श्रवण । दुजिया नयन न देखति ॥३॥

निळा म्हणे बावरी ऐसी । दिसें लोकांसी प्रीति वरी ॥४॥

८४०

याचिलागीं तुमचा करितसें धांवा । रात्रंदिवस देवा आळवूनि ॥१॥

नेणें जप तप स्नान संध्या विधी । जड माझी बुध्दि प्रज्ञाहीन ॥२॥

नाहीं आश्रमाचें घडलें विहित । न कळे उचित नित्यादिक ॥३॥

निळा म्हणे माझा कैसा परिपाक । वैकुंठनायक तुम्ही जाणा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP