उद्गार - ७७१ ते ७८०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


७७१

कृपा तुमची फळा आली । बुध्दी झाली निश्चळ ॥१॥

नामचि एक उच्चारिलें । तेथेंचि बैसलें मन माझें ॥२॥

इंद्रियांची पुरली धांव । बुध्दिभाव ठसावला ॥३॥

निळा म्हणे निरंतर । न पडे विसर चित्तासी ॥४॥

७७२

केला माझा अंगिकार । ठेविले कर जेणें कटीं ॥१॥

आतां सुखा नाहीं उणें । नामस्मरणें याचिया ॥२॥

तीर्थे व्रतें तपोवनें । वसती स्थानें भासती ॥३॥

निळा म्हणे साधनसिध्दि । दर्शनें उपाधी निरसिल्या ॥४॥

७७३

केलें तैसें वदलों देवें । अनुभवें उद्गार ॥१॥

नाहीं येथें चालों येत । तर्क मत पायांपें ॥२॥

स्वामीसवें निकटवासें । जैसें तैसें केंवि सरें ॥३॥

खोटी याची नव्हे चाली । निवडिली पारखितां ॥४॥

निळा म्हणे केला धंदा । परमानंदा आज्ञेचा ॥४॥

७७४

कोटी दिवाळया दसरे सण । घडलें श्रीचरण देखिलें ॥१॥

सकळही पर्वेव्रतें जोडलीं । तुमचीं वंदिलीं पदांबुजें ॥२॥

आलिंगनें शीतळ काया । निवाल्या बाह्या जीव प्राण ॥३॥

निळा म्हणे अवघींच अंगें । तुमच्या संगे सुस्नात ॥४॥

७७५

खेळविलें अंगावरी । अळंकारी शोभविलें ॥१॥

मी तों नेणें नेणपणें । होती शहाणे विस्मित ॥२॥

परस्परें अनुवादती । एक सांगती एकापें ॥३॥

कैसा निळा भाग्यवंत । मायबाप संत जवळी त्या ॥४॥

७७६

गणगोत अवघें धन । आम्हां चरण विठोबाचें ॥१॥

आणखी दुजें नेणों कांहीं । चाडचि नाहीं धनमानें ॥२॥

देवाविण वाटती ओस । वैकुंठ कैलास नावडती ॥३॥

निळा म्हणे आवडी जाणें । पुरवी खुणें जिवींचे तो ॥४॥

७७७

गोमटे पाय देखिले दिठीं । समान नेहटी वीटेचिये ॥१॥

तैंचिपासुनी लागला छंद । याचिया वेध स्वरुपाचा ॥२॥

कटांवरी कर तुळसीमाळा । चंदनाचा टिळा मुगुट माथा ॥३॥

निळा म्हणे वेढिलें वसन । विदयुल्लतें समान तेज त्याचें ॥४॥

७७८

घांट गर्जे महाव्दारीं । विठ्ठल नामें वागेश्वरीं ॥१॥

निळा उभा तो देखिला । भाव भक्ति आलिंगिला ॥२॥

इटे उभा तो देखिला । भाव भक्ति आलिंगिला ॥३॥

निळा म्हणे आवडी पोटीं । हदय सांठविला संपुष्टीं ॥४॥

७७९

चित्तीं माझें पांडुरंग । बैसला अभंग न ढळेसा ॥१॥

जातां दिवस जातां राती । स्वप्नीं जागृतीं सुषुप्तीं तो ॥२॥

देखतां डोळा ऐकतां कानीं । बोलतां वदनीं तोचि पुढें ॥३॥

निळा म्हणे बुध्दीमन । गेलीं विरोन त्यामाजीं ॥४॥

७८०

जडला जीवीं तो नव्हेचि परतां । चित्तीं चिंता व्यापूनियां ॥१॥

बुध्दीमाजीं याचेंचि ठाणें । राहटें करणें अहोरात्रीं ॥२॥

अंत:करणीं धरिला थारा । आंतु शरीरा बाहेरी हा ॥३॥

निळा म्हणे अवघाचि हरि । आम्हां घरीं दारीं दाटला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP