उद्गार - ८११ ते ८२०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


८११

पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसूनियां देह बुध्दि भेद ॥१॥

येऊनी एकांतीं उपदेशिलीं कानीं । बीजमंत्रें दोन्हीं निजाक्षरें ॥२॥

जीवा शिवा शेज रचिली आनंदीं । आउटावें पदीं आरोहण ॥३॥

निजीं निजरुपीं निजविला निळा । अनुहातें बाळा हल्लरु गाती ॥४॥

८१२

फुटलें धरण आला लोंढा । नावरे तोंडा माझिया तो ॥१॥

कृपाघनें वृष्टी केली । वाचा गर्जिन्नली बोधवरें ॥२॥

प्रतीति विदयुल्लता झळकती । थेंबुटे पडती ब्रम्हरसें ॥३॥

निळा म्हणे पिकलें पीक । आलें सकळीक भागासी तें ॥४॥

८१३

बरवें झालें बरवें झालें । आत्मराम ह्रदयीं आले ॥१॥

सद्गुरुनीं कृपा केली । वस्तु डोळां पैं दाविली ॥२॥

आनंदीं आनंद । पाहे तिकडे हा गोविंद ॥३॥

निळा म्हणे मी निष्काम । परिपूर्ण आत्माराम ॥४॥

८१४

बरवा झाला वेवसाय । चित्तीं आठवितां पाय ॥१॥

राम ह्रदयीं राहिला । परमानंद प्राप्त झाला ॥२॥

व्दैत तेंहि मावळलें । परब्रम्ह प्रकाशलें ॥३॥

निळा म्हणे धन्य झालों । गुरुकृपें स्थिरावलों ॥४॥

८१५

बैसला तो ध्यानीं मनीं । पाहतां लोचनीं विठ्ठल  ॥१॥

रुप गोजिरें सुंदर । वेधिलें अंतर मन बुध्दी ॥२॥

नाठवेंचि कांहीं आतां । त्याविण चित्ता दुसरें ॥३॥

निळा म्हणे लाविलें पिसें । मी मज नुमसे आठवितां ॥४॥

८१६

बैसला तोचि माझिये ध्यानीं । कटीं कर दोन्ही वसवितां ॥१॥

नयनाचि माजीं नवचे दुरीं । आंतु बाहेरीं कोंदला ॥२॥

याविण नाठवे आणिक कांहीं । देहादेहीं तोचि तो ॥३॥

निळा म्हणे दिवसरातीं । स्वप्नीं सुषुप्तीं जागृतींत ॥४॥

८१७

बोलों जातां वचनाक्षरें । माजी संचरे निरोपण ॥१॥

ऐशी दाटली दाटणी । वाचा गुणी गुंडाळिली ॥२॥

नाना संकल्प ते मुराले । स्तवनींचि झाले सादर ॥३॥

निळा म्हणे निमिषोनिमिष । झाले श्वासोश्वास अक्षरें ॥४॥

८१८

ब्रम्हानंदा भरणी आली । तेचि केली सामोरी ॥१॥

वंचिलें नाहीं कोणापाशीं । होतें मानसीं धरिलें तें ॥२॥

अवघे नाम विठोबाचें । स्वरुप त्याचें ध्यानीं मनीं ॥३॥

निळा म्हणे देतां हांके । उभाचि ठाकें सन्मुख ॥४॥

८१९

वणिंतां चरित्रे न पुरे धणी । वाचा लांचावली हरीच्या गुणीं । स्वानंदाची उघडली खाणी । नामस्मरणीं मातली ॥१॥

अधिक् अधिक् स्फूर्तीचा प्रसर । आगळीं अक्षरें चालती फार । नेणों फुटलें हें चिदांबर । मेघवृष्टिन्यायें होतसें ॥२॥

आवरताही नावरे मती । लिहितां न पुरे हे दिवसरातीं । न कळें काय केलें संतीं । देउनी प्रसाद आपुला ॥३॥

अवघेंचि उघडूनियां भांडार । दृष्टी दाविलें सारासार । लेववूनियां ते अलंकार । केलें समोर बोलावया ॥४॥

अक्षरें वाचे येती । ते ते  प्रमेयेसीचि उठती । नेणों गुंफोनी ठेविलीं होतीं । तेचि प्रसादीं वोपिलीं ॥५॥

नाहीं वाचेसी गुंतागोवा । तात्पर्यार्थाचि हा अघवा । ऐसा योजूनियां बरवा । मुहूर्त दिधला समर्थी ॥६॥

निळा आईत्या पिठावरी । रेघा आढीत बैसला घरीं । दैव मोडोनी आलें वरी । होतें संचितीं म्हणउनी ॥७॥

८२०

वाम चरणीं वाहे नीर । गंगा अमृताचे पाझर ॥१॥

आवडे तें माझया मना । धणी न पुरेचि लोचना ॥२॥

महिमा जोडला मुद्रिका । ध्वज वज्र अंकुश उर्ध्वरेखा ॥३॥

निळा म्हणे मुंजुळ गाती । वाळे वांकी रुणझुणिती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP