५४
मत्सर ज्ञानियाते न सोडी
। मा इतर कायसी बापुडी ।
शिणताती मत्सर-वेधे । भोगिताती
भोग विविधे ।
एका जनार्दनी मत्सर । तेणे
परमार्थ पळे दूर ।
भावार्थ:
अत्यंत ज्ञानी साधकसुध्दा
मनातील मत्सराला बळी पडतो. मत्सराने ज्याच्या मनाला वेधून टाकले आहे अशा ज्ञानी साधकाला
अनेक भोग भोगावे लागतात , तर इतर सामान्य माणसाला किती यातना भोगाव्या लागत असतील याची
कल्पनाच करता येत नाही. एका जनार्दनी म्हणतात, मत्सराने
व्यापलेले मन परमार्थाचा विचार करु शकत नाही.
५५
लज्जा अभिमान टाकुनी परता
। परमार्थ सरता करी का रे ।
वादक निंदक भेदक । ऐसे त्रिविध
। यांचा टाकुनी भेद । भजन करी ।
एका जनार्दनी त्रिविधा परता
। होउनी परमार्था हित करी ।
भावार्थ:
जगामध्यें वादक , निंदक
(निंदा करणारे) व भेदक (मनात भेद निर्माण करणारे) असे त्रिविध प्रकारचे लोक असतात. ते भोळ्या
भाविक भक्तांचा बुध्दीभेद करुन , निंदा करुन त्यांना भक्तीमार्गापासून
परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा
विचार करुन भक्तांनी परमार्थ-मार्ग सोडू नये. लज्जा , अभिमान
यांचा त्याग करुन भक्तिमार्गावर श्रध्दा ठेवावी व स्वत:चे हित साधावे , असा उपदेश
एका जनार्दनी करतात.
५६
विवाद-वाद हे तो अधम लक्षण
। भक्तीचे कारण न साधे येणे ।
मुख्य एक करी एकविधपण । सम-दरुशने
देख जगी ।
नर अथवा नारी असो भलते याती
। वंदावे विभूति म्हणोनिया ।
एका जनार्दनी बोध धरी मना
। होऊनिया सान सानाहूनि ।
भावार्थ:
वाद-विवाद करणे हे नीचपणाचे
(अधम) लक्षण आहे. त्यामुळे परमार्थ हे भक्तीचे मूळ साधन साध्य होणार नाही. मतभिन्नतेपेक्षा
समदर्शत्व (सर्वत्र समभावाने पाहणे) अधिक श्रेयस्कर आहे , असे सांगून
एका जनार्दनी म्हणतात, स्त्री-पुरुष , जातिभेद
न मानता सर्व एकाच परमेश्वराच्या विभूति आहेत असे समजून वंदनीय मानाव्यात. विनम्रता
धरुन सर्वांना आपलेसे करावे हा बोध मनी धरावा.
५७
ब्रह्म एक परिपूर्ण । तेथे
नाही दोष-गुण ।
पराचा देखती जे दोष । तेचि
दोषी महा-दोष ।
गुण-दोष जे देखती । एका जनार्दनी
नाडती ।
भावार्थ:
ब्रह्म हे परिपूर्ण असून
ते गुणदोषरहित आहे. तेथे गुण-दोषांचा संपूर्ण अभाव असल्याने इतरांचे दोष पहाणे हा
महादोष आहे व जे दुसर्यांचे दोष बघतात ते महादोषी आहेत असे समजावे , असे एका
जनार्दनी सांगतात.
५८
देह-बुद्धि सांडी कल्पना
दंडी । वासनेची शेंडी वाढवू नको ।
तु तेचि पाही तु तेचि पाही
। पाहूनिया राही जेथीचा तेथे ।
तु ते तूचि पाही जेथे देहो
नाही । मीपणे का वाया गुंतलासी ।
एका जनार्दनी मीपण तूपण ।
नाही नाही मज तुझीच आण ।
भावार्थ:
आपण आत्मरुप नसून देह-रुप
आहोत ह्या देहबुध्दिचा त्याग करावा , कारण देहबुध्दिमुळे
इंद्रियांच्या वासना निर्माण होतात व त्यातून जन्म-मृत्यूचे चक्र चालूच राहते. मीपणाने
त्यात गुंतून पडतो. हे मी-तूपण द्वैत निर्माण करुन परमेश्वरी तत्वापासून साधकाला
अलग करते. एका जनार्दनी सांगतात, आपणच आपल्याला
ओळखावे.
५९
सर्वांभूती देव वसे । नीचाठायी
काय नसे ।
नीच कोठुनी जन्मला । पंचभूतांवेगळा
झाला ।
नीच म्हणोनि काय भुली । एका
जनार्दनी देखिली ।
भावार्थ:
विश्वातिल सर्व प्राणिमात्रांच्या
ठिकाणी परमेश्वर अंशरुपाने व्यापून राहिला आहे असे पारमार्थिक सत्य सांगते. असे असतांना
नीचयोनीत किंवा जातीत जन्माला येणार्यांच्या ठिकाणी परमेश्वर वसत नाही असे समजणे म्हणजे
फार मोठी चूक करणे आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सर्व प्राण्यांची
निर्मिती आकाश , पृथ्वी , वायू , जल , अग्नी या
पंचमहाभूतातून झाली आहे हे शास्त्र-वचन आहे , तर नीच
यापासून वेगळा असू शकणार नाही.
६०
थोर तोचि म्हणावा । नेणे
भूतांचा जो हेवा ।
लहान तोचि म्हणावा । काया
वाचा भजे देवा ।
एका जनार्दनी म्हणे । देवावाचुनी
काही नेणे ।
भावार्थ:
परमेश्वरीसृष्टीतील कोणत्याही
प्रकारच्या श्रेष्ठ किंवा कनिष्ठ प्राण्यांचा जो हेवा करीत नाही , तो थोर
(मोठ्या मनाचा) समजावा आणि जो देहाने , वाचेने , मनापासून
देवाचे निरंतर भजन करतो त्याला विनम्र (लहान) म्हणावे; असे सांगून एका जनार्दन म्हणतात, देवावाचून
कोणी काही जाणू शकत नाही.
६१
आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण
। जाती कुळ नाही लहान ।
आम्हा सोवळे ओवळे नाही ।
विटाळ न देखो कवणे ठायी ।
आम्हा सोयरे जे झाले । ते
जाती-कुळा वेगळे केले ।
एका जनार्दनी बोधु । जाती-कुळाचा
फिटला संबंधु ।
भावार्थ:
एका जनार्दनी येथे अभिमानाने
सांगतात की आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण आहोत , थोर कुळात
जन्मलो आहोत. शुध्द विचारांमुळे सोवळ्या-ओवळ्याच्या संकुचित कल्पनांपासून
दूर असल्यामुळे कोणाचाही विटाळ मानत नाही. जाती-कुळाच्या
अनिष्ट रुढी ज्यांना मान्य नाहीत अशा सज्जनांशी सोयरिक असल्याने जाती-कुळाचा संबंधच
फिटला आहे.
६२
काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर
।
षड्वैरी तत्पर हेचि येथे
।
क्षुधा तृषा मोह शोक जरामरण
।
षड्ऊर्मि पूर्ण देही हेचि
।
आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा
वासना ।
हे अठरा गुण जाणा देहामाजी
।
एका जनार्दनी त्यजुनि अठरा
।
तोचि संसारामाजी शुध्द ।
भावार्थ:
अनिवार वासना , रागीटपणा , हावरटपणा , दांभिकपणा , गर्विष्टपणा , मत्सर हे
माणसाचे सहा शत्रू असून ते माणसाचा विनाश करण्यासाठी अत्यंत तत्पर असतात. भूक , तहान , मोह , शोक , वार्धक्य
या सहा माणसाच्या नैसर्गिक ऊर्मी आहेत. आशा (भविष्यकालीन
इच्छा) मानसिक इच्छा , कल्पना , शारिरीक वासना , अनावर ओढ
असे अठरा मानवी देहाचे गुण आहेत असे समजावे. या अठरा
गुणांचा त्याग करणारा या जगात शुध्द , सात्विक
समजला जातो , असे एका जनार्दनी या भजनात स्पष्ट करतात.