मनोजय

नाथांची भारूडरचना विविध स्वरुपाची साहित्य रचना करून, लोकजीवनातील उदाहरणे देऊन लोकभाषेतून, अध्यात्म शिकवले आहे. 

६३

बैसता निश्चळ । मन करी तळमळ ।

ध्यान-धारणा ते विधि । मने न पावेचि सिध्दि ।

ऐशिया मना काय करावे । कोठे निवांत बैसावे ।

एका जनार्दनी शरण । मन धावे सहजपणे ।

 

भावार्थ:

 

मन हे अत्यंत चंचळ असून ते सतत सहजपणे एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी भरकटत असते , तळमळत असते. ध्यानधारणा यासारख्या विधिंमध्ये मन एकाग्र होत नाही , त्यामुळे ध्यानधारणेतून् सिध्दी प्राप्त होत नाही. अशा चंचळ मनाला कोणत्या उपायाने एकाग्र करावे हे समजत नाही. जेथे मनाला निवांतपणा लाभेल असे ठिकाण सापडत नाही. एका जनार्दनी म्हणतात, गुरुचरणांपाशी मात्र हे मन सहजपणे धाव घेऊन स्थिर होते.

 

६४

शत्रु असती दूर देशी । येता बहु दिवस लागती तयांसी ।

बाह्य शत्रुंचे अल्पं दु:ख । मन: शत्रुंचे वर्म अशेख ।

आसनी शयनी एकांती । जगी अथवा ध्यान-स्थिती ।

ऐशिया मना न जिंकिता । देवपण न ये हाता ।

देवपणाचे भुलले हावे । एका जनार्दनी नेणती देव ।

 

भावार्थ:

 

बाह्य शत्रू आपल्यापासून दूर असतात , त्यांना जवळपास येण्यास काही कालावधी लागतो , बाह्य शत्रुंचे भय काही प्रमाणात कमी वाटते. परंतु मनात असलेले अविवेक , अहंकार , संशय यासारख्या शत्रुंचे मूळ रहस्य समजत नाही. आसनावर बसलेले असतांना किंवा मंचकावर निद्रिस्त असतांना , एकांतात जप करीत असतांना किंवा ध्यानात असतांना या मनाला जिंकता न आल्यास देवपण येत नाही एका जनार्दनी म्हणतात. देवपणाचा हव्यास धरणारे देवालामात्र नीटपणे ओळखत नाहीत.

 

६५

वैर करूनि मन मारावे । मना-अधीन न व्हावे ।

मनामागे जाऊ नये । मन आकळूनि पाहे ।

मन म्हणे ते न करावे । मने मनासी बांधावे ।

मन म्हणेल ते सुख । परि पाहता अवघे दु:ख ।

एका जनार्दनी मन । दृढ ठेवावे आकळून ।

 

भावार्थ:

 

मनाचा शत्रू होऊन त्याचे दमन करावे , मनाच्या अधीन होऊ नये , मन सांगेल तसे आचरण करू नये. आपण मनामागे न जाता मनाला आपल्या बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करावा. मनाला जे सुखाचे वाटते ते दु:खाचे कारण असू शकते. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनाला निश्चयपूर्वक संयमाचे बांध घालावेत.

 

६६

माझ्या मनाचे ते मन । चरणी ठेवावे बांधून ।

मग ते जाऊ न शके कोठे । राहे तुमच्या नेहटे ।

मनासी ते बळ । देवा तुमचे सकळ ।

एका जनार्दनी देवा । मन दृढ पायी ठेवा ।

 

भावार्थ:

 

देवाने आपले मन त्याच्या चरणांशी दृढ करावे. त्यामुळे ते कोठेही जाऊ शकणार नाही , तर चरणकमळी गुंतून राहिल. मनाला एकाग्र करण्याची शक्ति केवळ एका परमेश्वराकडे आहे. देवाने कृपा करून मनोबल वाढवावे अशी प्रार्थना करतात.

 

६७

आम्ही अलकापुरचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी ।

तेणे चुकती चौर्‍यांशी । होरा ऐका दादांनो ।

नका जाऊ मनामागे । थोर-थोर झाले दगे ।

मी बोलत नाही वाउगे । सावध राहा दादांनो ।

वासना वाईट बा ही थोर । पुरविले लहान थोर ।

फिरती चौर्‍यांशी लक्ष घरे । पडाल फशी दादांनो ।

एका जनार्दनी जोशी । सांगेन शकून सर्वत्रांसी ।

राम-नाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनो ।

 

भावार्थ:

 

एका जनार्दनी म्हणतात, आपण देवनगरीचे ज्योतिष असून या शास्त्रात निष्णात आहोत. ज्यामुळे चौर्‍यांशी लक्ष योनींचे फेरे चुकतिल असा होरा (भविष्यातील मार्ग) सुचवतो , चंचळ मनाच्या मागे गेल्याने फसवणूक होण्याची शक्यता असते. मनोवासना अतिशय वाईट असते असा अनुभव आहे. वाचेने सतत रामनामाचा जप केल्याने संसार सागरातून विश्वासाने तरून जाता येते , हा शकून सर्वांना कल्याणकारी आहे.

 

६८

सर्व भावे सुख असता घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ।

ऐसा अनुताप घडता मानसी । भजन ते मुखासी येत स्वभावे ।

एका जनार्दनी अनुतापेविण । भजन प्रमाण नोहे देवा ।

 

भावार्थ:

सर्व प्रकारची सुखे हात जोडून समोर असतांना परमेश्वरप्राप्तीसाठी जो कठोर साधना करतो , संसारातील दु:ख व क्लेष यांनी जो पोळला गेला आहे , ज्याला पश्चाताप झाला आहे तो साधक ईश्वरभजनाचा संकल्प करतो. त्याच्या वाणीतून सहजपणे भजन घडते. एका जनार्दनी म्हणतात, अनुतापाशिवाय घडलेले भजन देवाला मान्य होत नाही.

 

६९

अनुतापावाचूनि नाम न ये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ।

मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुध्द तेणे ।

अनुताप झालिया सहज समाधि । तुटेल उपाधी सहजचि ।

एका जनार्दनी अनुतापे पाहे । मग देव आहे जवळी तया ।

 

भावार्थ:

 

संसाराती तापाने होरपळलेला जीव पश्चातापदग्ध होतो , तेव्हा त्याच्या मुखातून हरीनामाचे भजन सहजपणे घडते. अनुतापातूनच भजनाचा संकल्प होतो , त्यामुळे चित्त शुध्द होते. अनुताप झाल्यावर ईश्वरभजनात मन तल्लीन होऊन सहज समाधि लागते आणि सर्व उपाधी (सर्व शीण , कष्ट) नाहिसे होतात , असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अशा साधकाच्या जवळ देव सतत राहतो.

 

७०

देही वाढे जो जो शांति । तो तो विरक्ती अंगी बाणे ।

ऐसा आहे अनुभव । देही देव प्रकाशे ।

देही आत्मा परिपूर्ण । भरला संपूर्णची देही ।

एका जनार्दनी रिता ठाव । नाही वाव पाहता जगी ।

 

भावार्थ:

साधक सातत्याने साधना करीत असतांना मनाला शांतीचा अनुभव येऊ लागतो. या शांतीतून विरक्तिचा लाभ होतो आणि दैवीकृपेचा लाभ होवून देहातून दैवी गुण प्रकाशू लागतात असा अनुभव येतो. देहात आत्मतत्व संपूर्णपणे व्यापून राहिले आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊन विश्वातील प्रत्येक अणुरेणूत हे आत्मतत्त्व भरले असून कोठेही रिकामा ठाव नाही याची जाणिव होते , असे एका जनार्दनी म्हणतात.

 

७१

साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्त-वृत्ती

एकचि गुण जे पुरता जोडे । ते एकविधा वृत्ति

एकचि न जोडे गुणावस्था । या लागी नोहे एकविधता

एका जनार्दनी पूर्ण । चित्त चैतन्य संपूर्ण

 

भावार्थ:

 

साधक नेहमीच असा प्रश्न विचारतात की , कोणत्या गुणांमुळे चित्तामध्ये बाधा निर्माण होऊन चित्त विचलित होते. या प्रश्नाला उत्तर देताना एका जनार्दनी सांगतात की एकच गुण पूर्णपणे आत्मसात करून एकविध वृत्ति वाढते. एकाच प्रकारची गुणावस्था जोडली गेली नाही , तर एकविधता साधली जात नाही. चित्त हे चैतन्याने पूर्णपणे भरलेले आहे.

 

७२

आंबेया पाडू लागला जाण । अंगी असे आंबटपण ।

सेजे मुरल्याची गोडी । द्वैताविण ते चोखडी ।

अग्नीपोटी निपजे अन्न । वाफ जिरता परमान्न ।

एका जनार्दनी गोडी । तोडा लिगाडाची बेडी ।

 

भावार्थ:

 

आंबा पाडाला लागला तरी त्याची चव आंबट असते. तो भट्टीत घालून पिकवला की गोड होतो. अग्नी देवून अन्न शिजवतात , पण वाफ जिरली की ते परमान्न होते. साधक साधनेत एकाग्र झाला , तेव्हाच परमेश्वराशी एकरूप होतो.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP