११०
आवडी करिता हरि-कीर्तन ।
हृदयी प्रगटे जनार्दन ।
थोर कीर्तनाचे सुख । स्वये
तिष्ठे आपण देख ।
घात आलिया नावाची । चक्र
गदा घेउनी करी ।
कीर्तनी होऊनी सादर । एका
जनार्दनी तत्पर ।
भावार्थ:
आवडीने हरिचे कीर्तन करतांना
मनाला जे सुख मिळते त्याची तुलना दुसर्या कोणत्याही सुखाची होऊ शकत नाही. हे सुख
अप्रतिम असते कारण त्या वेळी प्रत्यक्ष जनार्दन हृदयात प्रगट होतात. काही संकट
आल्यास चक्र , गदा हाती घेऊन येतात व त्या संकटाचे निवारण करतात म्हणुनच एका
जनार्दनी कीर्तनभक्ती सर्वांत श्रेष्ठ भक्ती आहे असे मानतात.
१११
कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी
घाली धावा
नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनी
नाचतसे ।
भोळ्या भावासाठी । धावे त्याच्या
पाठोपाठी ।
आपुले सुख तया द्यावे । दु:ख
आपण भोगावे ।
दीन-नाथ पतित-पावन । एका
जनार्दनी वचन ।
भावार्थ:
दीनांचा नाथ , पतित-पावन
अशा देवाला कीर्तनाची इतकी आवड आहे की तो कीर्तनासाठी वैकुंठाहून धावत येतो आणि नवल
असे की , तो संताच्या मेळ्यात , कीर्तनाच्या
रंगात रंगून नाचतो. भोळ्या भाविकांच्या भावासाठी देव त्यांच्यापाठोपाठ धावत येतो. त्यांचे
दु:ख आपण भोगतो आणि त्यांच्या सुखाचा भागीदार बनतो. हे एका
जनार्दनीचे वचन सार्थ आहे.
११२
नवल रोग पडिपाडु । गोड परमार्थ
झाला कडु ।
विषय व्याधीचा उफाडा । हरि-कथेचा
घेई काढा ।
ऐसा रोग देखोनि गाढा । एका
जनार्दनी धावे पुढा ।
भावार्थ:
अंगामध्ये ताप असला की , जिभेची
चव जाते आणि गोड पदार्थ कडु लागतात. तसेच इंद्रियविषयांचा
मोहरुपी रोग जडला की , परमार्थ कडु वाटतो. हा रोग
बळावला असता हरिकथेचा काढा घ्यावा आणि रोग विकोपाला गेला तर गुरुचरणांना शरण जावे असे
एका जनार्दनी म्हणतात.
११३
हरि-कीर्तने चित्त शुध्द
। जाय भेद निरसूनि ।
काम-क्रोध पळती दुरी । होत
बोहरी महापापा ।
गजरे हरीचे कीर्तन । पशुपक्षी
होती पावन ।
एका जनार्दनी उपाय । तरावया
भव-नदीसी ।
भावार्थ:
हरिकीर्तनाने चित्त शुध्द
होते. मी-तूपणाचा द्वैतभाव लयास जातो. काम-क्रोधरुपी
शत्रु परागंदा होतात. महापापांची होळी होते. हरिकीर्तनाच्या
गजराने पशुपक्षीसुध्दा पावन होतात. एका जनार्दनी
म्हणतात, संसारसरिता तरून जाण्याचा हरिकीर्तन हा एकच उपाय आहे.
११४
करिता कीर्तन श्रवण । अंतर्मळाचे
होत क्षालन ।
तुमचे कीर्तन पवित्र कथा
। पावन होत श्रोता वक्ता ।
तुमचे कीर्तनी आनंद । गाता
तरले ध्रुव प्रल्हाद ।
एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही
देव वंदिती रण ।
भावार्थ:
परमेश्वराचे कीर्तन म्हणजे
त्याच्या पवित्र कथांचे श्रवण. या श्रवणभक्तीने अंत:करणातील वाईट
भावनांचे निर्मूलन होते , कीर्तन करणारा आणि ऐकणारा दोघेही पावन होतात. भक्त प्रल्हाद
आणि ध्रुव दोघेही कीर्तनभक्तीने मोक्षाप्रत गेले. एका जनार्दनी
म्हणतात, ब्रह्माविष्णुमहेश हे तिन्ही देव कीर्तनकारांना वंदन करतात.
११५
तुमचे वर्णिता पोवाडे । कळिकाळ
पाया पडे ।
तुमची वर्णिता बाळलीळा ।
ते तुज आवडे गोपाळा ।
तुमचें वर्णील हास्य-मुख
। त्याचे छेदिसी संसार-दु:ख ।
तुमचे दृष्टीचे दर्शन । एका
जनार्दनी ते ध्यान ।
भावार्थ:
देवाच्या कीर्तीचे गुणगान
कळीकाळालासुध्दा वंदनीय आहे. आपल्या बाळलीळांचे वर्णन गोपाळकृष्णाला
ऐकायला आवडते. देवाच्या हास्यमुखाचे वर्णन करणार्या भक्तांचे संसारदु:ख देव
नाहीसे करतो. एका जनार्दनी म्हणतात, देवाच्या
कृपादृष्टीचे मनाला ध्यान लागते.
११६
मागणे ते आम्ही मागु देवा
। देई हेवा कीर्तनी ।
दुजा हेत नाही मनी । कीर्तनावाचूनि
तुमचिया ।
प्रेमे हरिदास नाचत । कीर्तन
होत गजरी ।
एका जनार्दनी कीर्तन । पावन
होती चराचर जाण ।
भावार्थ:
हरिकीर्तनाच्या गजरात हरिदास
जेव्हा आनंदाने नाचतात , तेव्हा सर्व चराचर सृष्टी पावन होते. या कीर्तनसुखाची
मागणी एका जनार्दनी देवाकडे करतात. याशिवाय
दुसरी कोणतीही मागणी नाही असे ते देवाला सांगतात.
कीर्तनभक्तीचा आदर्श
११७
नवल भजनाचा भावो । स्वत:
भक्तचि होय देवो ।
वाचे करिता हरिकीर्तन । उन्मनी
मन निशीदिनी ।
नाही प्रपंचाचे भान । वाचे
सदा नारायण ।
एका जनार्दनी मुक्त । सबाह्य
अभ्यंतरी पुनीत ।
भावार्थ:
कीर्तन \ भक्तीचा
महिमा एवढा आश्चर्यकारक आहे की , कीर्तनात रंगलेला भक्त स्वत:च देव
बनतो. मन एका उच्च पातळीवर पोचून तेथेच स्थिर होते. ह्या उन्मनी
अवस्थेत मन रात्रंदिवस गुंतुन राहते. वाचेने
सतत हरिनामाचा जप अखंडपणे सुरू असतो. प्रपंचाचे
भान हरपून जाते. आंतरबाह्य शुध्द झालेले मन देहबंधनापासून मुक्त होते असा अनुभव
एका जनार्दनी येथे व्यक्त करतात.
११८
आजी नवल झाले वो माझे । पाहण्या
पाहणे दृष्टि धाये ।
ऐसा लाघवी सुखकर मूर्ति ।
संतसंगे झाली मज विश्रांति ।
योगीश्वर जया चिंतिती । सनकादिक
जया ध्याती ।
योग-साधन नातुडे जो माये
। एका जनार्दनी कीर्तनी नाचतु आहे ।
भावार्थ:
योगी-मुनीजन ज्याचे सतत चिंतन
करतात आणि सनकादिक श्रेष्ठ मुनी ज्याच्यावर निरंतर ध्यान लावतात , अशा पांडुरंगाचे
दर्शन योगसाधनेने मिळत नाही. हरिची लाघवी , सुंदर मूर्ती
पाहून डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी धावत असताना नवल घडले आणि संतकृपेने मिळालेल्या
दर्शनसुखाने मन अपार भरून विश्रांत झाले. आनंदाने
एका जनार्दनी कीर्तनरंगी रंगून गेले.
११९
जे पदी निरुपण तेचि हृदयी
ध्यान । तेथे सहजी स्थिर राहे मन ।
कीर्तनासी तोषोनि कळिकाळ
। तुष्टला समाधीसी समाधान रे ।
कीर्तनी सद्भाव अखंड अहर्निशी
। पाप न रिघे त्याच्या देशी ।
निज-नामे निष्पाप अंतर देखोनि
। देव तिष्ठे तयापाशी रे ।
हरि-नाम-कीर्तने अभिमान सरे
। आणिक श्रेष्ठ आहे काज ।
सद्भावे कीर्तनी गाता पै
नाचता । लोकेषणा सांडी लाज रे ।
व्रता तपा तीर्था भेटे जो
न पाहता । तो कीर्तनी सापडे देवो ।
तनु मनु प्राणे कीर्तनी विनटले
। भावा विकिला वासुदेवो रे ।
एका जनार्दनी कीर्तन भावे
। श्रोता वक्ता ऐसे लाहावे ।
गर्जत नामे निशाण लागुनी
। सकळिका वैकुंठासी जावे रे ।
भावार्थ:
कीर्तनातील पदात ईश्वरीतत्वांचे
जे निरुपण केले असेल त्याचे हृदयात ध्यान करीत असतांना तेथे मन सहजपणे स्थिर राहते. कीर्तनात
रंगलेला कळिकाळसुध्दा आनंदी होवून समाधानाने समाधिस्त होतो. अत्यंत
सात्विक भावाने जो अखंडपणे दिवस-रात्र कीर्तनात रंगतो त्याच्याकडे पाप प्रवेश करीत
नाही. नामजपाने निष्पाप बनलेले अंत:करण पाहून देव त्या ठिकाणी उभा
राहतो. हरि-नाम-कीर्तनात रंगून गातांना , नाचतांना
भक्त लौकिकाची , लाज-लज्जेची चाड विसरून जातो. अभिमान , मीपणा पिकलेल्या
फळाप्रमाणे गळून पडतो. जो परमेश्वर अनेक प्रकारच्या व्रतांनी , खडतर तपाने , तीर्थक्षेत्री
भेटत नाही तो कीर्तनात हमखास सापडतो. कीर्तन
भक्तीभावाला वासुदेव हरि विकला गेला आहे. एका जनार्दनी
म्हणतात, कीर्तनभक्तीत श्रोता , वक्ता हाती
हरिनामाचा झेंडा घेऊन हरिचा नामघोष करित वैकुंठाची वाटचाल करतात.
१२०
नित्य नवा कीर्तनी कैसा ओढावला
रंग ।
श्रोता आणि वक्ता स्वये झाला
श्रीरंग ।
आल्हादे वैष्णव करिती नामाचा
घोष ।
हरि-नाम गर्जता गगनी न माये
हरुष ।
पदोपदी कीर्तनी निवताहे जग
मन ।
आवडी भुकेली तिने गिळिले
गगन ।
एका जनार्दनी गाता हरीचे
नाम ।
निमाली इंद्रिये विषय विसरली
काम ।
भावार्थ:
कीर्तनभक्तीत रंगून गेलेले
श्रोते आणि वक्ते श्रीरंगात तल्लीन होऊन स्वत: श्रीरंगमय होतात. जेव्हा
वैष्णव हरिनामाचा जयघोष करतात , तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा
होतो. भक्तांच्या प्रत्येक पदागणिक श्रोत्यांचे मन निवत जाते , विश्रांती
पावते. एका जनार्दनी म्हणतात, हरिचे नाम
गातांना इंद्रिये विषयवासना विसरून जातात , मन निष्काम
बनते; हा एक अलौकिक पारमार्थिक अनुभव आहे.
१२१
कीर्तनाची मर्यादा कैसी ।
देव सांगे उध्दवासी ।
गावे नाचावे साबडे । न घालावे
कोडे त्या काही ।
मिळेल तरी खावे अन्न । अथवा
पर्णे ती भक्षून ।
जाईल तरी जावो प्राण । परी
न संडावे कीर्तन ।
किरकीर आणू नये । बोलू नये
भलती गोष्टी ।
स्वये उभा राहून । तेथे करी
मी कीर्तन ।
घात आलिया निवारी । माता
जैसी बाळावरी ।
बोले उध्दवासी गूज । एका
जनार्दनी बीज ।
भावार्थ:
या भजनात श्रीहरी उध्दवाला
कीर्तनभक्तीच्या मर्यादा विशद करुन सांगत आहेत. हरिभजनात
गावे , नाचावे. मिळाले तर अन्न खावे नाहीतर झाडाची
पाने खाऊन भुक भागवावी. प्राण गेला तरी कीर्तन सोडू नये. कीर्तनात
कोणतीही तक्रार करु नये किंवा अजाणतेपणी भलत्याच गोष्टींची चर्चा करु नये. कीर्तनकाराच्या
ठिकाणी आपण स्वत: उभा असून कोणतेही संकट निवारण्यास सज्ज असतो , जशी माता
आपल्या बाळाचे संकट निवारण करते. एका जनार्दनी म्हणतात, कीर्तन-भक्तीचे
हे रहस्य देव भक्त उध्दवाला सांगतात.
१२२
सगुण चरित्रे परम पवित्रे
सादर वर्णावी ।
सज्जन-वृंदे मनोभावे आधी
वंदावी ।
संत-संगे अंतरंगे नाम बोलावे
।
कीर्तन-रंगी । देवा-संनिध
सुखे डोलावे ।
भक्तिज्ञानविरहित गोष्टी
इतरा न कराव्या ।
प्रेमभरे । वैराग्याच्या
युक्ति विवराव्या ।
जेणे करुनी मूर्ति ठसावे
। अंतरी श्रीहरिची ।
ऐशी कीर्तन-मर्यादा हे संताचे
घरची ।
अद्वय-भजने अखंड-स्मरणे ।
वाजवी कर-टाळी ।
एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी
।
भावार्थ:
सज्जनांच्या समुदायाला मनोभावे
वंदन करुन परमेश्वराची अत्यंत पवित्र अशी सगुण-चरित्रे कीर्तनात वर्णन करावी. संतजनांबरोबर
मनापासून ईश्वर नामाचा जयघोष करावा. प्रेमाने , विवेकाने
वैराग्य कसे मिळवता येईल याचे विवरण करावे. श्रोत्यांच्या
अंतकरणात श्रीहरिची स्पष्ट प्रतिमा स्थापन करावी. ही संतांची
कीर्तनभक्तीची पध्दत आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीच्या
अखंड नाम स्मरणाने अद्वैत निर्माण होऊन भक्त ईश्वराशी एकरुप होऊन तात्काळ भव-बंधनातून
मुक्त होतो.
१२३
धन्य तोचि जगी एक हरि-रंगी
नाचे ।
राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे
वाचे ।
सुख दु:ख समान सकळ जीवांचा
कृपाळ ।
ज्ञानाचा उद्बोध भक्ति-प्रेमाचा
कल्लोळ ।
विषयी विरक्त जया नाही आप-पर
।
संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक
निर्धार ।
जाणीव शाहणीव ओझे सांडूनिया
दूरी ।
आपण वस्तीकर वर्ततसे संसारी
।
एका जनार्दनी नित्य हरीचे
कीर्तन ।
आसनी शयनी नित्य हरीचे चिंतन
।
एका जनार्दनी नित्य हरीचे
कीर्तन ।
आसनी शयनी नित्य हरीची चिंता
।
भावार्थ:
राम कृष्ण वासुदेव या नामाने
स्मरण करुन हरिकीर्तनात दंग होऊन नाचतो तो धन्य होय. या हरिभक्ताच्या
दृष्टीने सुखदु:खे समान असतात. तो सुखाने हरखून जात नाही आणि दु:खाने
खचून जात नाही. तो सृष्टीतील सर्व जीवांवर प्रेम करतो. त्याच्या
अंतरात भक्ती-प्रेम उसळून येते व बुद्धीत विवेकाचा संचार होतो. विवेकातून
वैराग्याचा उगम होतो , मी-तूपणा , आपपर भाव लयास जातो. तो सदा
संतुष्ट , समाधानी असतो. ज्ञानाचे
ओझे दूर फेकून तो एखाद्या वाटसरूसारखा विरक्तपणे संसारात राहतो. आसनावर
बसून किंवा मंचावर शयन करतांना तो सतत हरीकीर्तनात , चिंतनात
मग्न असतो. त्याचा हरिभक्तीचा निर्धार पक्का असतो. असा भक्त
धन्य होय असे एका जनार्दनी म्हणतात.
सत्संगती आणि गुरुभक्ती
१२४
वैष्णवा घरी देव सुखावला
। बाहीर न वजे दवडो निघातला ।
देव म्हणे माझे पुरतसे कोड
। संगत या गोड वैष्णवांची ।
जरी देव नेउनी घातला दूरी
। परतोनि पाहे तंव घराभीतरी ।
कीर्तनाची देवा आवडी मोठी
। एका जनार्दनी पडली मिठी ।
भावार्थ:
वैष्णवांच्या गोड संगतीत
देव सुखावला , कारण देवाला कीर्तन-भक्ती अतिशय प्रिय आहे. वैष्णव
देवाच्या सर्व इच्छा पुरवतात. वैष्णवांची संगत देवाला आवडते. वैष्णव
देवाला दूर करतात , पण देवाला वैष्णवांचा दुरावा सहन होत नाही. एका जनार्दनी
म्हणतात, देव आनंदाने कीर्तन-भजनात भक्तांशी एकरुप होतो.
१२५
संता-अंकी देव वसे । देवा-अंकी
संत बैसे ।
ऐसी परस्परे मिळणी । समुद्रतरंग
तैसे दोन्ही ।
हेम-अलंकारवत । तसे देव-भक्त
भासत ।
पुष्पी तो परिमळ असे । एका
जनार्दनी देव दिसे ।
भावार्थ:
देव व संत यांचा निकटचा संबंध
वर्णन करतांना एका जनार्दनी म्हणतात, सागराच्या
पृष्ठभागावर जसे लाटांचे तरंग उमटतात तसे देव व संत एकरुप असतात. सोने आणि
सुवर्णाचे अलंकार भिन्न-रुप भासतात , परंतु ते
एकरुप असतात. सुमन आणि सुगंध जसे वेगळे करता येत नाहीत तशी संत व देवाची संगत
असते.
१२६
संत आधी देव मग । हाचि उमग
आणा मना ।
देव निर्गुण संत सगुण । म्हणोनी
महिमान देवासी ।
मुळी अलक्ष लक्षा नये । संती
सोय दाविली ।
एका जनार्दनी संत थोर । देव
निर्धार धाकुला ।
भावार्थ:
संताची थोरवी वर्णन करतांना
एका जनार्दनी सांगतात, भक्तिमार्गावर साधकाला संत आधी भेटतात. संताच्या
मार्गदर्शनाने देव ओळखता येतो. संत सगुण असून देव निर्गुण आहे. संत आपल्या
विवेकाने , विचारांनी , वाणीने , कृतीने
देवाला निर्गुणातून सगुणात आणतात. दृष्टीला
जो अगोचर असतो तो प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा करतात. संत वाल्मिकींनी
निर्गुण विष्णुरूप रामरुपाने सगुणात आणले. त्यामुळे
देवाचा महिमा वाढला. संत हे देवापेक्षा थोर आहेत हे समजून घ्यावे.
१२७
संताचा महिमा देवचि जाणे
। देवाची गोडी संतासी पुसणे ।
ऐसी आवडी एकमेका । परस्परे
नोहे सुटिका ।
बहुत रंग उदक एक । या परी
देव संत दोन्ही देख ।
मागे पुढे नव्हे कोणी । शरण
एका जनार्दनी ।
भावार्थ:
देवाच्या नवविधा-भक्तीची
गोडी चाखण्यासाठी संतांच्या सहवासात राहावे आणि संतांचा महिमा देवच जाणतो. देव आणि
संत एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. जसे पाण्याचे
रंग वेगवेगळे दिसतातम् पण उदक एकच असते. एका जनार्दनी
म्हणतात, देव आणि संत दोन्ही सारखेच प्रत्ययकारी असतात. दोघांना
समदृष्टीने बघावे.
अभंग १२८
अभक्ता देव कंटाळलो । परी
सरते करिती संत त्या ।
म्हणोनी महिमा त्यांचा अंगी
। वागविती अंगी सामर्थ्य ।
मंत्र-तंत्रा नोहे बळ । भक्ति
प्रेमळ पाहिजे ।
आगम-निगमाचा पसारा । उगाचि
भारा चिंध्यांचा ।
वेद-शास्त्रांची घोकणी ।
ती तो कहाणी जुनाट ।
एका जनार्दनी सोपा मार्ग
। संत-संग चोखडा ।
भावार्थ:
अभक्तांना देव कंटाळतो , परंतु संतकृपेने
तो भवसागर तरुन जातो. असे सामर्थ्य संताच्या अंगी असते. प्रेमळ
भक्तीचे बळ मंत्र-तंत्रापेक्षा अधिक असते. वेद-शास्त्रांचे
पाठांतर ही जुनाट पध्दत असून वेद , उपनिषदे हे केवळ कालबाह्य , जीर्ण भांडार
आहे असे सांगून एका जनार्दन म्हणतात, संतांचा
सहवास हा सर्वात सोपा व अचूक मार्ग आहे.
अभंग १२९
संतासी जो नांदी देवासी जो
वंदी । तो नर आपदी आपदा पावे ।
देवासी जो निंदी संतांसी
जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ।
कृष्णा कंस द्वेषी नारदा
सन्मानी । सायुज्य-सदनी पदवी पावे ।
एका जनार्दनी गूज सांगे कानी
। रहा अनुदिनी संत-संगे ।
भावार्थ:
संतांची निंदा करून जो भक्त
देवाला वंदन करतो , तो परमेश्वरी कृपेला पात्र होत नाही. पण संतांना
आदरभावाने वंदन करतो आणि देवाची निंदा करतो. असा भक्त
मात्र गोविंदाला आपलासा वाटतो हे पटवून देण्यासाठी एका जनार्दनी कंसाचे उदाहरण देतात. कंस सतत
कृष्णाचा द्वेष करतोम् पण नारदांचा सन्मान करत असतो. त्याला
सायुज्य मुक्तीचा लाभ होतो. सतत संतांच्या सहवासात रममाण व्हावे
असे एकनाथ महाराज सांगतात.
संतांचे अवतार-कार्य
अभंग १३०
मेघापरिस उदार संत । मनोरथ
पुरवितो ।
आलिया शरण मनें वाचा । चालविती
त्याचा भार सर्व ।
लिगाड उपाधि तोडिती । सरते
करिती आपणामाजी ।
शरण एका जनार्दनी । तारिले
जनी मूढ सर्व ।
भावार्थ:
संत हे मेघाप्रमाणे उदार
असून मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. काया-वाचा-मनाने
शरण आलेल्या भक्ताचा सर्व प्रकारे भार हलका करतात. भक्तांच्या
सर्व उपाधी , संकटे दूर करतात. भक्ताला
आपल्यासारखे बनवतात. अज्ञानीजनांना मार्गदर्शन करून तारुन नेणार्या गुरूचरणांना
एका जनार्दनी शरणागत होतात.
अभंग १३१
जया जैसा हेत । तैसा संत
पुरविती ।
उदारपणे सम देणे । नाही उणे
कोणासी ।
भलतिया भावे संत-सेवा । करिता
देवा माने ते ।
एका जनार्दनी त्याचा दास
। पूर्ण वोरस कृपेचा ।
भावार्थ:
प्रत्येक साधकाच्या मनातील
हेतु समजून संत तो हेतु पूर्ण करतात. उदारपणे
सर्वांना समप्रमाणात , कोणताही दुजाभाव न ठेवता दान देतात. कोणत्याही
भावनेने संत-सेवा केली तरी परमेश्वराला ती मान्य असते. एकनाथमहाराज
जनार्दनस्वामींचे दास असून ते आपल्यावर पूर्ण कृपेचा वर्षाव करतात असे एका जनार्दनी
म्हणतात.
अभंग १३१
संतांचे ठायी नाही द्वैतभाव
। रंक आणि राव सारिखाचि ।
संतांचे देणे अरि-मित्रा
सम । कैवल्याचे धाम उघडे ते ।
संतांची थोरवी वैभव गौरव
। न कळे अभिप्राव देवासी तो ।
एका जनार्दनी करी संत-सेवा
। परब्रह्म ठेवा प्राप्त झाला ।
भावार्थ:
संतांच्या मनात कोणताही दुजाभाव
नाही , त्यांना धनवान आणि निर्धन सारखेच असतात. त्यांना
शत्रू आणि मित्र समानच वाटतात. संत म्हणजे मोक्षाचे उघडे द्वार
! संतांचा गौरव हेच त्यांचे वैभव असून तेच त्यांचा थोरपणा , त्याचा
ठाव देवांना सुध्दा लागत नाही. एका जनार्दनी म्हणतात, संतसेवेमुळेच
त्यांना परब्रह्मज्ञानाचे भांडार प्राप्त झाले.
अभंग १३२
संत माय-बाप म्हणता । लाज
वाटे बहु चित्ता ।
माय बाप जन्म देती । संत
चुकविती जन्म-पंक्ति ।
माय बापा परिस थोर । वेद-शास्त्री
हा निर्धार ।
शरण एका जनार्दनी । संत शोभती
मुकुट-मणी ।
भावार्थ:
संतांना जेव्हा आपण माय-बाप
म्हणतो , तेव्हा मनापासून लाज वाटते. कारण माय-बाप
जन्म देतात तर संत जन्ममरणाच्या फेर्यातून सुटका करतात. वेद-शास्त्र
जाणणारे संत मायबापापेक्षा खात्रीपूर्वक श्रेष्ठ आहेत. संत सर्वात
मुकुटमण्याप्रमाणे शोभून दिसतात असे एका जनार्दनी म्हणतात.
अभंग १३३
जयाचेनि चरणे तीर्था तीर्थपण
। तो ह्रदयी केला साठवण ।
नवल महिमा हरिदासंतसाची ।
तीर्थे उपजती त्याचे कुशी ।
काशी-मरणे होय मुक्ति । येथे
वचने न मरता मुक्ति ।
एका जनार्दनाचे भेटी । सकळ
तीर्थे वोळंगती दिठी ।
भावार्थ:
ज्यांच्या चरणस्पर्शाने तीर्थाला
पावित्रपणा येतो त्या संतांची ह्रदयात साठवण केली. संतांचा
महिमा इतका मोठा आहे की त्यांच्या कुशीतून तीर्थे उगम पावतात. काशी या
तीर्थक्षेत्री मरण आल्यास मुक्ति मिळते असे सांगितले जाते , पण संतांच्या
गावी न मरताच मुक्तिचा लाभ होतो. एका जनार्दन जेव्हा गुरूंना भेटतात
तेव्हा सर्व तीर्थे पायाशी लोळण घेतात असे एका जनार्दनी अभिमानाने सांगतात.
अभंग १३४
सर्वांगी सुवास परि तो उगला
न राहे ।
सभोवते तरु चंदन करीतचि जाये
।
वैरागर मणि पूर्ण तेजाचा
होये ।
सभोवते हरळ हिरे करितचि जाये
।
एका जनार्दनी पूर्ण झालासे
निज ।
आपणा सारिखे परी ते करितसे
दुजे ।
भावार्थ:
चंदनाचे झाड़ सर्वांगात सुवासाने
भरलेले असते. परंतु ते वेगळे न राहता आपल्या सभोवतालच्या वृक्षांना सुगंधित
करते. पूर्ण तेजस्वी असा वैरागर मणि जवळपासच्या पाषाणांचे मौल्यवान
हिरे बनवतो. एका जनार्दनी म्हणतात आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण असलेले संत
आपल्या संगतीने सामान्यांना उन्नत करतात.
अभंग १३५
निवृत्ति शोभे मुकुटाकार
। ज्ञान सोपान वटेश्वर ।
विटु पंढरीचे राणे । ल्याले
भक्तांची भूषणे ।
गळा शोभे वैजयंती । तिसी
मुक्ताई म्हणती ।
अखंड शोभे माझ्या बापा ।
पदकी तो नामा शिंपा ।
कासे कसिला पीतांबर । तो
हा जाणावा कबीर ।
चरणी वीट निर्मळ । तो हा
झाला चोखामेळ ।
चरणा तळील ऊर्ध्वरेखा । झाला
जनार्दन एका ।
भावार्थ
पंढरीचा विठुराणा आपल्या
भक्तांची भूषणे लेऊन विटेवर उभे आहेत अशी सुंदर कल्पना एकनाथमहाराज या अभंगात करतात. विठुरायाच्या
मस्तकावर निवृत्ती रूपी मुकट शोभून दिसते आहे आणि गळ्यात मुक्ताई नावाची वैजयंतीमाळ
विराजमान झाली आहे. या वैजयंतीमाळेतील मोहक पदक म्हणजे संत नामदेव ! पंढरीरायाने
कमरेला बांधलेला रेशमी पीतांबर हेच संत कबीर , विठोबा
ज्या विटेवर उभा आहे ती वीट झाली आहे संत चोखामेळा तर चरण तळीची वर जाणारी रेषा म्हणजे
संत एकनाथ असे एका जनार्दनी म्हणतात.
अभंग १३६
धर्माची वाट मोडे । अधर्माची
शीग चढे ।
तै आम्हा येणे घडे । संसार-स्थिती
।
आम्हा का संसारा येणे । हरिभक्ति
नामस्मरणे ।
जड जीव उध्दरणे । नाम-स्मरणे
करुनि ।
सर्व कर्म ब्रह्मस्थिति ।
प्रतिपादाच्या वेदोक्ति ।
हेचि एक निश्चिती । करणे
आम्हा ।
नाना मते पाखंड । कर्मठता
अति बंड ।
तयाचे ठेंचणे तोंड । हरि-भजने
।
विश्वरूप सृष्टी । अर्जुना
दाविली दृष्टी ।
भिन्न भेदाची गोष्टी । बोलू
नये ।
एका जनार्दनी । धरिता भेद
मनी ।
दुर्हावले येथुनी । निंदक
जाण ।
भावार्थ:
जेव्हा धर्माची अवनती होते
आणि अधर्माचे प्राबल्य वाढते , तेव्हा संतांना पृथ्वीवर जन्म घ्यावा
लागतो. हरिभक्ति व नामस्मरण या साधनांनी जड जीवांचा उध्दार करणे व वेद
वाणीचे प्रतिपादन करून कर्म योगाचे महत्त्व वाढवणे या दोन गोष्टी संताना कराव्या लागतात. नास्तिकता
वाढवणारी पाखंडी मते व कर्मठता यांचा हरिभजनाने निरास करण्याचा प्रयत्न करावा लागतो. अर्जुनासारख्या
भक्तांना विश्वरुप दाखवण्यासाठी नविन दृष्टी देवून भगवंतानी त्याच्या मनातील सर्व संशय , भेदाभेद
नाहिसे केले. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनातले
सर्व भेद नाहिसे झाले तर चित्त परमेश्वरी शक्तीशी एकरूप होते आणि निंदक दुरावतात.