८३
सर्वांमाजी सार नाम विठोबाचे
। सर्व साधनांचे घर जे का ।
शुकादिका नाम साधिलेसे दृढ
। प्रपंच-काबाड निरसिले ।
एका जनार्दनी जनी ब्रह्म-नाम
। तेणे नेम धर्म सर्व होय ।
भावार्थ:
विठोबाचे नाम हे सर्व साधनांचे
सार आहे , सर्व साधना जेथे फलदायी होऊ शकतात असे धाम म्हणजे विठोबाचे नाम. शुक , सनकादिक
ऋषी नामावर दृढ श्रध्दा ठेवून प्रपंचाच्या बंधनापासून मुक्त झाले. एका जनार्दनी
म्हणतात, सामान्य जनांसाठी नाम हेच ब्रह्म असून नामाने सर्व धर्म साध्य
होतात.
८४
संसार-सागरी बुडलिया प्राणी
। करी सोडवणी कोण त्याची ।
अविद्यादी पंचक्लेश हे तरंग
। बुडाले सर्वांग प्राणियांचे ।
एका जनार्दनी उच्चारील नाम
। सुखाचा आराम प्राप्त होय ।
भावार्थ:
संसार-सागरात अविद्येसारखे
पाच प्रकारांचे क्लेश-तरंग उसळत असतात. त्यांत
प्राण्याला बुडण्याचे भय सतत भेडसावत असते. संसारसागरात
बुडणार्या प्राण्याला हात देवून सोडवणारे फक्त नामच आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, जो परमेश्वराच्या
नामाचा मनापासून वैखरीने जप करतो त्याला सुख-शांति प्राप्त होते.
८५
ओखद घेतलिया पाठी । जेवी
होय रोग-तुटी ।
तैसे घेता राम-नाम । नुरे
तेथे क्रोध-काम । घडता अमृत-पान । होय जन्माचे खंडन ।
एका जनार्दनी जैसा भाव ।
तैसा भेटे तया देव ।
भावार्थ:
औषध घेतल्यानंतर ज्याप्रमाणे
शारिरीक व्याधींचे निराकरण होते किंवा अमृत प्राशन करताच अमरपद प्राप्त होऊन जन्ममरणाच्या
चक्रातून सुटका होते , त्याप्रमाणे राम-नाम हे अत्यंत प्रभावशाली औषध किंवा अमृत आहे
असे समजावे. राम-नाम रुपी रसाने मनातिल काम क्रोधादि विकारांचा निचरा होतो
असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, जशी ज्याची
श्रध्दा तशी त्याच्यावर देवाची कृपा होते.
८६
आपुले कल्याण इच्छिणे जयासी
। तेणे या नामासी विसंबू नये ।
करील परिपूर्ण मनाचे हेत
। ठेवलिया चित्त नामापाशी ।
भक्ति आणि मुक्ति वोळंगती
सिध्दि । होईल ही बुध्दि आत्मनिष्ठे ।
एका जनार्दनी जाता हे नाम
। पुरवील काम जो जो हेतु ।
भावार्थ:
ज्या साधकाला आपले कल्याण
साधायचे असेल त्याने हे नामाचा जप करण्याचा आळस करू नये. हे नाम
चित्तात सतत धारण केल्याने मनातील सर्व हेतू पूर्ण होतील. भुक्ति
आणि मुक्ति या सिध्दि पायाशी लोटांगण घालतील , बुध्दी
देहनिष्ठा सोडून आत्मनिष्ठ बनेल. या नामाचा जप करणार्या साधकाच्या
सर्व कामना पूर्ण होतील असे एका जनार्दनी खात्रीपूर्वक सांगतात.
८७
नाही जया भाव पोटी । तया
चावटी वाटे नाम ।
परी येता अनुभव । चुकवी हाव
संसार ।
येरझारी पडे चिरा । नाही
थारा जन्माचा ।
एका जनार्दनी खंडे कर्म ।
सोपे वर्म हाता लागे ।
भावार्थ:
ज्याची परमेश्वराच्या नामावर
श्रध्दा नाही , मनात भक्तिभाव नाही त्याला नाम निरर्थक वाटते. परंतु अनुभवांती
नामस्मरणात संसारातील ऐहिक इच्छा चुकवण्याचे सामर्थ्य आहे , जन्म-मरणाच्या
वाटेवर धोंडा पडतो आणि जन्माचा थारा राहात नाही. एका जनार्दनी
म्हणतात, जन्ममरणाचे मुळ कारण कर्म असून त्याचे खंडन नामस्मरणाने होते
हे रहस्य जाणून घेतले पाहिजे.
८८
विठ्ठल म्हणता विठ्ठलचि होसी
। संदेह ये विशी धरू नको ।
सागरी उठती नाना पै तरंग
। सिंधु तो अभंग विठ्ठल एक ।
तैसे मन करी द्वैत न धरी
। सर्व चराचरी विठ्ठल एक ।
एका जनार्दनी विठ्ठलावाचूनि
। दुजा नेणो कोणी स्वप्नी आम्ही ।
भावार्थ:
सागरांत अनेक तरंग उमटतांना
दिसतात. परंतु त्या तरंगांनी सिंधुचे एकत्व भंगत नाही , तो सागर
अभंग असतो. तसा विठ्ठल नाना रुपांनी चराचरांत प्रतिबिंबीत होत असला; तरी
तो एकमेवाद्वितीय , अभंग आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात; मनांत द्वैतभाव न
आणता एका विठ्ठलाशिवाय दुसरा कोणी आहे , अशी कल्पना
स्वप्नातदेखिल करू नये. विठ्ठलाचे नाम घेता-घेता त्या चराचरांत व्यापून राहिलेल्या विठ्ठलाशी
एकरुप होशील यात संदेह धरु नये.
८९
लोह परिसासी झगटे । मग काळिमा
कैची भेटे ।
तैसे विनटो राम-नामा । पहिलेपण
कैचे भेटे ।
गंगा मीनली सागरी । परतेना
ती ब्रह्म-गिरी ।
एका जनार्दनी भेटी । चौ देहाची
सुटे गाठी ।
भावार्थ:
लोखंड परिसाच्या सान्निध्यात
आले की , त्याचा काळिमा लोपून त्याच्यात परिसाचे गुणधर्म येतात. गंगेचा
प्रवाह सागराला जाउन मिळाला की , तो उगमस्थाकडे परत येत नाही. तसे मन
एकदा रामनामी गुंतले की ते फिरुन संसारिक व्यापात गुंतत नाही. असे सांगून
एका जनार्दनी म्हणतात, परमेश्वरी कृपेने जेव्हा सद्गुरूंची भेट होते तेव्हा स्थूल , सूक्ष्म
कारण , महाकारण या चारी देहाच्या गाठी सुटून देहबुध्दी लयास जाते.
नामावर विश्वास
९०
जनार्दने मज सांगितला मंत्र
। रामनाम पवित्र जप करी ।
सोडवील राम संसार-साकडी ।
ना पडेचि बेडी अरिवर्गा ।
एका जनार्दनी टाकूनि संशय
। नाम मुखी राहो प्रेम पोटी ।
भावार्थ:
जनार्दनस्वामींनी राममंत्र
देवून रामनामाचा पवित्र जप करण्यास सांगितले. संसार-संकटापासून
राम सुटका करतील आणि काम , क्रोध , मोह , लोभ , मत्सर या
षड्रिपुंची बेडी तुटून पडेल. एका जनार्दनी म्हणतात, मनातील
सर्व संशय टाकून हृदयात प्रेम व मुखी रामनामाचा जप असावा.
९१
असंख्य वचने असोनि नसती ।
कोण तया रीती चालतसे ।
हरि-नाम वचन एकचि प्रमाण
। हे तो अप्रमाण करील कोण ।
जनार्दनाचे वचना द्यावे अनुमोदन
। एका जनार्दन प्रमाण तेचि ।
भावार्थ:
भक्तिमार्गावरुन वाटचाल करतांना
अनेकांची असंख्य उपदेशपर वचने ऐकावयास मिळतात. ती सर्वच
आचरणात आणणे शक्य नसते असा अनुभव येतो. हरिनाम
वचन हेच प्रमाण मानले जाते. ते कोणीही अमान्य करीत नाही. एका जनार्दनी
म्हणतात, सद्गुरूवचनास प्रमाण मानून , त्यास अनुमोदन
देऊन त्याचा स्वीकार करावा.
९२
जागृती स्वप्नं सुषुप्ती
माझारी । जपे नाम हरि सर्व काळ ।
साधन आणिक न लगे सकळ । रामनाम
निखळ जपे आधी ।
पापाचे पर्वत छेदी नाम-वज्र
। हाचि निर्धार ऋषीश्वर ।
एका जनार्दनी नाम निज-धीर
। पावन साचार राम-नाम ।
भावार्थ:
जागेपणी , स्वप्नी
व गाढ झोपेत असताना सतत हरिनामाचा जप अखंडपणे सुरू ठेवावा. हेच परमेश्वर
प्राप्तीचे एकमेव साधन आहे , याशिवाय वेगळ्या साधनाची गरज नाही. अनंत पापांचे
पर्वत छेदून टाकण्याचे सामर्थ्य या नामरुपी वज्रात (अमोघ शस्त्र) आहे असे थोर ऋषी सांगतात. नाम हे
आत्मधैर्य देणारे साधन असून ते मनाला पावन करते असे एका जनार्दनी सांगतात.
९३
चिंतातुर मन नसावे कदा काळी
। हृदयी नामावळी जप करी ।
वारंवार चिंतावी देवाची पाउले
। जेणे जन्म जाळे उकलेल ।
एका जनार्दनी आलासे प्रत्यय
। सर्व भावे गाय नाम त्याचे ।
भावार्थ:
मनातील सर्व चिंता सोडून
देऊन अंत:करणात नामाचा सतत जप करावा आणि वारंवार देवाच्या पावलांचे चिंतन करावे. अत्यंत
भक्तिभावाने देवाला आळवावे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, त्यामुळे
जन्माचे जाळे उकलून त्यातून सुटका होईल याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.
९४
चिंतने नासतसे चिंता । चिंतने
सर्व कार्य ये हाता ।
चिंतने मोक्ष सायुज्यता ।
घर शोधितसे ।
ऐसें चिंतनाचे महिमान । तारिले
अधम खल जन ।
चिंतने समाधान । प्राणिमात्रा
होतसे ।
चिंतने तुटे आधि-व्याधि ।
चिंतने तुटतसे उपाधि ।
चिंतने होय सर्व सिध्दि ।
एका जनार्दनाचे चरणी ।
भावार्थ:
येथे एका जनार्दनी ईश्वरचिंतनाचे
महत्त्व सांगत आहेत. चिंतनाने सर्व चिंताचा परिहार होतो. चित्त शुध्द
होऊन सायुज्यता मुक्तीचा लाभ होतो व प्राणिमात्रांचे समाधान होते. चिंतनाने
शरिराच्या व्याधी व मनाच्या व्यथांचा निरास होतो. चिंतनाने
जीवनातील सर्व कटकटी मिटून जातात व सर्व कार्ये सिध्दीस जातात. अनेक दुष्ट
व पापी लोकांचा उद्धार केवळ ईश्वरचिंतनाने होतो असा अनुभव आहे.
९५
घाली देवावरी भार । आणिक
न करी विचार ।
योगक्षेम निर्धार । चालवील
तुझा ।
वाचे नाम नामावळी । वासुदेवी
वाहे टाळी ।
प्रेमाचे कल्लोळी । नित्यानंदे
सर्वदा ।
सोस घेई का रे वाचे । राम-कृष्ण
वदता साचे ।
धरणे उठते यमाचे । नि:संदेह
।
शरण एका जनर्दनी । करी राम-नाम-ध्वनि
।
कैवल्याचा दानी । रक्षिल
तुज ।
भावार्थ:
साधकाने देवावर विश्वास ठेवून
भविष्याचा विचार न करता परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन व्हावे. देव सर्व
योगक्षेम चालविल अशी खात्री बाळगावी. ईश्वरप्रेमात
रंगून सतत भजनात दंग व्हावे. वाचेने राम-कृष्णाच्या नामाचे संकिर्तन
करीत असताना यमयातना चुकतील. स्वामी जनार्दनांना शरणागत असलेले
संत एकनाथ म्हणतात, श्रीराम कैवल्याचा दानी असून केवळ नामस्मरण केल्याने तो भक्तांचे
रक्षण करतो.
९६
पशु आणि पक्षी तरले स्मरणे
। तो तुम्हा कारणे उपेक्षीना ।
धरूनि विश्वास आळवावे नाम
। सद्गद ते प्रेम असो द्यावे ।
सुख-दु:ख कोटी येती आणि जाती
। नामाविण विश्रांती नाही ।
एका जनार्दनी नामाचा प्रताप
। नुरेचि तेथे पाप ओखदासी ।
भावार्थ:
परमेश्वराच्या नामस्मरणाने
पशु-पक्षीसुध्दा संसार-सागरातून तरून नेले जातात; तर नामावर विश्वास ठेवून प्रेमाने
आळवल्यास देव उपेक्षा करणार नाही अशी खात्री धरावी. संसारात
अनेक प्रकारची सुख-दु:खे येतात आणि जातात , परंतु नामाशिवाय
विश्रांती मिळवण्याचा दुसरा साधना-मार्ग नाही. एका जनार्दनी
म्हणतात, नाम इतके प्रत्ययकारी आहे की पाप तेथे औषधालासुध्दा उरत नाही.
९७
कोणी काहीतरी म्हणो । आम्ही
न जाणो तया बोला ।
गाऊ मुखे नामावळी । सुख-कल्लोळी
सर्वदा ।
नाचु संत-मेळा सदा । कीर्तनी
गोविंदा रंजवू ।
एका जनार्दन हाचि धंदा ।
वाया शब्दा न लागु ।
भावार्थ:
एका जनार्दनी म्हणतात, आम्ही संतजन
मुखाने गोविंदाची नामावळी गात , त्याच्या कीर्तनात रंगून जाऊन भक्तीसुखात
गोविंदाला रंजवु. कोणी काही बोलले तरी त्यांच्या बोलण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष
करु. हाच आमचा एकमेव धंदा आहे.
नाम-स्मरणाचे पथ्य
९८
जग राम-नाम म्हणे । तयां
का न येती विमाने ।
नवल स्मरणाची ठेव । नामी
नाही अनुभव ।
नष्ट गणिका राम म्हणे । तिसी
वैकुंठीचे पेणे ।
एका जनार्दनी ध्यात । राम
पाहे ध्याना आत ।
भावार्थ:
सामान्य माणसे रामनामाचा
जप करतात. पण त्यांच्यावर राम-कृपा होऊन मुक्ती मिळत नाही , नामाचा
अनुभव येत नाही. कारण त्यांचा जप वरवरचा असतो , ती स्मरणातील
ठेव नसते. एका जनार्दनी म्हणतात, रामानामाचा
ध्यानी-मनी-स्वप्नी ध्यास लागला तरच गणिकेवर झाली तशी रामकृपा होईल.
९९
नाम घेता हे वैखरी । चित्त
धावे विषयावरी ।
कैसे होता हे स्मरण । स्मरणामाजी
विस्मरण ।
नाम-रूपा नव्हता मेळ । नुसता
वाचेचा गोंधळ ।
एका जनार्दनी छंद । बोला
माजी परमानंद ।
भावार्थ:
केवळ मुखाने रामनामाचा जप
सुरू आहे पण चित्त मात्र इंद्रिय-विषयांचे चिंतन करीत असेल , तर ते राम-स्मरण
नव्हे विस्मरण आहे. नामस्मरण करतांना रामरुप ध्यानी नसेल , तर तो केवळ
वाचेचा गोंधळ समजावा असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, रामनामात
परमानंद असून तो मनाला लागलेला छंद आहे.
१००
भव रोगासी ओखद । राम-हेचि
शुध्द ।< । येणे तुटे रोग-व्यथा । भक्ति मुक्ति वंदिती माथा ।
न लगे आणिकांचे काम । वाचे
वदे राम-नाम ।
पथ्य एक शुध्द क्रिया । एका
जनार्दनी लागे पाया ।
भावार्थ:
राम-नाम हेच भव-रोगावरचे
शुध्द औषध आहे. त्यामुळे सर्व रोग , आधि-व्याधी
समूळ नाहिशा होतील. रामनामाशिवाय वेगळ्या उपायांची गरज नाही. वाचेने
राम-नाम घेणे ही एक प्रकारची शुध्दी-क्रिया असून ते भव-रोगावरचे पथ्य आहे ते पाळणे
आवश्यक आहे असे एका जनार्दनी आग्रहाने सांगतात.
१०१
हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी
दोष ।
श्रवण स्मरण भक्ति तेणे पडली
ओस ।
हरिनामाचेनि बळे करिसी अधर्म
।
देवाचेनि तमुचे शुध्द नोहे
कर्म ।
सत्यव्रती धर्म सद्-यज्ञ-निष्ठ
।
असत्य-वचनी त्याचा पडला अंगुष्ठ
।
एका जनार्दनी संत-सोयीने
चाले ।
सद्गुरू-वचन सबाह्य शुध्द
झाले ।
भावार्थ:
हरिनाम घेऊन भक्ति करणारा
साधक दोषपूर्ण आचरण करीत असेल त्याचे नामस्मरण आणि भक्ति व्यर्थ आहे असे समजावे. हरिनामाच्या
बळावर केलेला अधर्म हे अशुध्द कर्म होय. सत्याचे
व्रत घेऊन आचरलेला धर्म हा सद्-यज्ञ आहे. असत्यवचनाने
तो यज्ञ फलद्रुप होणार नाही असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, हे सद्गुरूवचन
असून अंतर्बाह्य शुध्द आहे. संतजन त्याप्रमाणे आचरण करतात.
१०२
व्यापक विठ्ठलनाम तेव्हाचि
होईल । जेव्हा जाईल मी-तूपण
आपुले ते नाम जेव्हा ओळखील
। व्यापक साधेल विठ्ठल तेणे ।
आपुले ओळखी आपण सापडे । सर्वत्र
हि जोडे विठ्ठलनाम ।
नामाविण जन पशूच्या समान
। एका जनार्दनी जाण नाम-जप ।
भावार्थ:
जेव्हा साधकाच्या मनातील
मी-तूपण (द्वैतभाव) समूळ नाहीसा होईल , हे सर्व
विश्व एकाच आत्मरूप चैतन्याने भरलेले आहे याचा साक्षात्कार होईल तेव्हाच विठ्ठलनामाची
व्यापकता समजून येईल आणि स्वत:ची खरी ओळख पटेल. तेव्हा
मनाचे उन्मन होईल. एका जनार्दनी म्हणतात, नाम-जपाने
माणुस पशूचा माणुस बनेल.