श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय पहिला

श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा


ॐ परमात्मने नम: । श्री सद्गुरवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥
प्रज्ञापुरीचा अवधूत । विद्या कला प्रदायक । श्री स्वामी रुपात्मक । वटगणेश वंदिला ॥२॥
आता वंदितो सरस्वती । चारी वाणी अधिष्ठात्री । स्फुरण रुपा आदिशक्ती । महामंगल मंगला ॥३॥
श्री स्वामी समर्थ कृपावंत । श्री मयुरानंद ख्यात । वर्णावया तयांचा स्मृतीग्रंथ । कृपा कीजे शिवंकरी ॥४॥
ब्रह्मा, विष्णु, महेश्वर । तयांचे चरणी ठेऊनी भाव । सत्‍ चित्‍ आनंदारुप । श्री स्वामी नमो परमईश्वरा ॥४॥
नमू भक्तवृंदासी । अनन्य श्रध्दा स्वामी पदासी । अवधान द्यावे ग्रंथासी । अधिक न्यून नसावे ॥६॥
श्री स्वामींसी साक्षी ठेवून । करितसे मंगलाचरण । सारांश उत्तम तपशिलाहून । सेविजे मधु फुलांचा ॥७॥
कुलदेवता, स्थानदेवता । वस्तुदेवता, ग्रामदेवता । सर्वस्वरुपी तुम्ही एका । श्री दत्तात्रेय स्वामी समर्थ ॥८॥
देव चरित्राहून अधिक । आवडे देवा भक्तचरित्र । ऐसे धरुनी सूत्र । मयुरानंद सेवीतसे ॥९॥
स्मृतिग्रंथाचा मकरंद । सेवोत भक्त मिलिंद । आनंदाचा कंदानंद । धीपूरनिवासा स्वयंशिवा ॥१०॥
एकदा श्री स्वामी समर्थ । वदले आपुल्या भक्तांस । माझे आप्त जरी दूर शत कोस । तरी मग नजीक वसती ॥११॥
जन्मांतरीचे माझे आप्त । तयां जन्मोजन्मी पाचारीत । आणि ते सहज येत । मम सथानासी ॥१२॥
करितो भक्तांचे कल्याण । तोडितो भवबंधन । करितो लोहाचे कांचन । स्पर्शुनी कृपा परीस ॥१३॥
या सूत्राची सत्यकथा । गुरुकृपे होय विस्तारिता । स्मृती करता श्रुता । त्याच श्रृती जाणिजे ॥१४॥
स्वामी कृपेचा घन । पावला प्रज्ञा श्रावण । अत्यानंदे नर्तन । आनंद मयुर करीतसे ॥१५॥
संभाजीनगर जिल्ह्यात । ग्राम धनसांगवी नामक । तेथ वसति नारायण भट । भास्करे उपनाम तयांचे ॥१६॥
वेदशास्त्रसंपन्न । ज्योतिष वैद्यकी ज्ञान । धनाहूनी विद्येसी मान । लाभला राजाश्रय तयांसी ॥१७॥
त्या वंशातील धोंडोपंत । ज्योतिष वैद्यकी निष्णात । वास करिती उमराळ्यात । अपरान्त भूमी भार्गवाची ॥१८॥
परशुरामे सागरातून । केली भूमी निर्माण । ते `क्षेत्र शुर्रापक' म्हणून । सद्य नाम `उमराळे' ॥१९॥
मुंबईजवळ वसई प्रांत । तेथ पोर्तुगीज सत्तांध । पेशवे बाजीराव संग्राम करीत । जिंकण्या वसई किल्ला ॥२०॥
अठरा वर्षे धुरंधर । संगर होतसे तुंबळ । परंतु विजयश्रीची माळ । तरंगे अधांतरी ॥२१॥
कोट्यावधी रुपयांची माती । सैन्य पावे वीरगती । सारे प्रयत्न फोल होती । अखेर साकडे देवासी ॥२२॥
कर्तृत्व, यत्न, बुध्दी, खेत । संपूर्ण झाले नष्ट । करिती देवासी नवस । विविध सायास आरंभिले ॥२३॥
चिमाजी आप्पासी झाले ज्ञात । भास्करे धोंडोपंत । ज्योतिषी अति निष्णात । त्यासी शुभमुहूर्त पुसती ॥२४॥
धोंडोपंत शुभलग्न । घटी पळे योग पूर्ण । कथिला मुहूर्त सुलक्षण । वसई प्राप्त होण्यासी ॥२५॥
धरिला मुहूर्ताचा वेध । गर्जना हरहर महादेव । ढासळला किल्ल्याचा तट । जिंकला वसई ॥२६॥
देवदत्त मुहूर्त लक्षण । सरुन गेला संग्राम । पेशव्यांचे कंठी परम । पडे विजयश्री मालिका ॥२७॥
पाचारुनी धोंडोपंतांसी । पेशवे सन्मान करिती । मानधन देऊ इच्छिती । तया नाकारती धोंडोपंत ॥२८॥
धर्माचे असे काज । म्हणुनी नको धन आम्हासी । धर्माचे कार्यासाठी । केले विद्येसी चरित ॥२९॥
स्विकारिता धनाते । विद्या विक्रय होतसे । आणि नष्ट पावतसे । विद्येचे सामर्थ्य ॥३०॥
पेशवे वदले तयांस । आपणा दक्षिणा देती उचित । श्रुती शास्त्र संमत । द्यावी दक्षिणा ज्ञानवंता ॥३१॥
परमेश्वर कृपेकरुन । आपण ज्योतिर्विद्या सुलक्षण । ज्योतीर्‍ ऋषी सत्य आपण । `जोशी उपनाम तव वंशा ॥३२॥
पृथ्वीच्या अंतापर्यंत । आमुची सेवा राहिल शाश्वत । धर्माचे कृपाछत्र । आपणा केले ईश्वरे ॥३३॥
तरी या सुमुहूर्तापासून । सरले भास्करे उपनाम । ज्योतिर्विद्या निपुण । दिधली जोशी नाम दक्षिणा ॥३४॥
इतिश्री स्वामी कृपांकित श्री मयुरानंद धारामृत सिध्दवंश संकेत नाम प्रथमोध्याय: ॥
॥श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ शुभम्‍ भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP