अध्याय बारावा - निर्याण प्रसंग

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


राजाधिराज श्रीराम । विशुध्दाचरण दाखविले उत्तम । म्हणोनि जन सर्वोत्तम । सदा म्हणती, श्रीराम जयराम जयजयराम ॥१॥
माघ शुध्द सप्तमीचा । दिवस होता शनिवारचा । दोनच कीर्तनाची टाचणें लिहिण्याचा । आता समय म्हणतीरे, श्रीराम जयराम जयजयराम ॥२॥
पर्यायानें सुचविती । आली विश्रांतीची विश्रांती । परी फिटे ना भ्रांती । आशा दुर्धर रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३॥
समय दुपारी साडेचारचा । रामाच्या ज्ञानेश्वरी वाचनाचा । मामांनी प्रगट जयघोष रामनामाचा सुरु केला किरे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४॥
ऐसा कांही धरोनिया नेम । जो नित्य वदे सप्रेम । तो स्वयेचि होय श्रीराम । म्हणती मामा पुन: पुन्हा रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५॥
हे कांही चिन्ह निराळे । म्हणे राम यावेळे । ज्ञानेश्वरीचे वाचन पूर्ण केले । रामानें रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥६॥
घोष चालला श्रीरामाचा । घोष चालला उपास्य देवतेचा । टाहो फोडती अखेरचा । देवाला रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥७॥
तीन तपावरच्या कीर्तनाचा । हाचि सारांश महत्वाचा । अखंड घोष रामरायाचा । सुरु केला किरे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८॥
दिनमणी मावळता पश्चिमेला । आकांशी नक्षत्रांचा मेळा । मुखीं नामस्मरण माळा । नाम संकीर्तनाची रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९॥
म्हणती रात्रीं रामाल । चला सुरु कीर्तनाला । कीर्तन नेम मघाच झाला । म्हणे राम रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०॥
तरी मामानी सुरु केले । रघुनाथ प्रियासि वंदिले । श्रीज्ञानदेवांचे स्मरण केले । नित्याप्रमाणे रे श्रीराम जयराम जयजयराम ॥११॥
सदा नम्र ईश्वरचरणी । शांति सौख्य लाभले झणी । आता मागे परतोनी । कोण पाहे म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२॥
निघाले पुढारा । लावीत कळिकाळासि दरारा । रामचरणांचा मिळाला आसरा । काळ काय करील रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३॥
म्हणतीं आम्हीं श्रीरामाचें दास । केला ब्रह्मांडाचा ग्रास । चरणीं ठेविला विश्वास । म्हणोनिया रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४॥
देहभाव विरोनी गेला । जीव शिव भेद सरला । जन्म सार्थकी लागला । धन्य नरदेह रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५॥
हे शनीवारचे कीर्तन । सर्वभावे झाले परिपूर्ण । प्रसन्न झाला रघुनंदन । निजानंद पूर्ण कामरे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१६॥
अंगी ताप भरला । मामा आठवती श्रीहरीला । म्हणोनि शांति सौख्य त्यांच्या जीवाला । दिसे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥।१७॥
माघ शुध्द अष्टमीचा । दिवस होता रवीवारचा । काळ आला सर्वांच्या चिंतेचा । म्हणोनि आठविती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१८॥
शके आठराशेत्र्याऐंशी । मनाची होय कासाविशी । दुर्धर संकट आदळे उराशीं । म्हणोनि जपती श्रीराम जयराम जयजयराम ॥१९॥
अनेक रोग शरीरात । घर करुन राहिले निवांत । मामांना ताप चढला अतोनात । आता आसरा, श्रीराम जयराम जयजयराम ॥२०॥
आधीच वैदयांनी हात टेकिले । त्यांतच हे नवे विघ्न आले । लोक म्हणती हे काय झाले । धाव रे धाव, श्रीराम जयराम जयजयराम ॥२१॥
रामही तापानें फणफणला । म्हणती हा फ्लूचा घाला आला । संकटावरी संकटांचा पडला । ढीग की रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥२२॥
लोक येती आणि जाती । म्हणती संत असावे या जगती । परी मनीं होती सचिंत किरे, श्रीराम जयराम जयजयराम ॥२३॥
हां हां म्हणता ही वार्ता । पसरली क्षण न लागता । लोकांची गर्दी उसळे आता । सर्वही म्हणती, श्रीराम जयराम जयजयराम ॥२४॥
रवि चालला अस्ताला । मामा उठू लागले कीर्तनाला । अंगी ताप होता भरलेला । तरी ही निष्ठा किरे, श्रीराम जयराम जयजयराम ॥२५॥
म्हणती बापुराव गोडबोले । आता निजूनच कीर्तन पाहिजे केले । परोपरीनें विनविले । मामा रुकार देती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥२६॥
हात जोडून कीर्तन । सुरु केले आनंदून । टाकीचे घावे देवपण । मिळे म्हणतीरे, श्रीराम जयराम जयजयराम ॥२७॥
आघात सहन केल्याविण । कैसे येईल देवपण । तापाचा आघात दारुण । तरी कीर्तन चालेरे, श्रीराम जयराम जयजयराम ॥२८॥
देही ताप सणाणे । आणि मामाम्चे हे बोलणे । जे केले तेचि सांगणें । हे मामांचे ब्रीद रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥२९॥
बोलती सतीच्या गोष्टीं । आणि ताप जाळी शरीर यष्टी । परी मुखावरी शांती पुष्टी तुष्टी । हे काय अघटित रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३०॥
सतीच्या गोष्टी सांगून । हाती घेतले सतीचे वाण । भडकती ज्वाळा मध्यें सगुण । मामा दिसती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३१॥
सोशी थोर आघात । त्यासीच म्हणावें संत । हे दाखविती तंतोतंत । या कीर्तनी मामारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३२॥
रम्य गोष्टि युध्दाच्या । त्या सर्वांनी ऐकावयाच्या । वेळ येता सरतील त्यांच्या । सर्व उडयारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३३॥
मामा निधडया छातीचे वीर । गोळया झेलिती छातीवर । त्यांचा गौरव थोर । म्हणोनि वाटे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३४॥
हा रवीवारच्या कीर्तनाचा सारांश । मामांचे शेवटचें शब्द अधिकांश । चित्ती घ्यावे सावकाश । तरीच श्रोते ही पदवी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३५॥
रंगले कीर्तन शेवटास गेले । बोल बोलता अबोल झाले । आकांशीं घुमत राहिले । शब्द रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३६॥
आज आडतीस वर्षांवरी । जो शब्द घुमला अंबरीं । त्याची आता पुरी । शांती झाली रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३७॥
झांज बसली जाग्याला । तो उचकीचा घाला आला । एकच गलबला झाला । म्हणती बोलवा धन्वंतरी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३८॥
डाँक्टर मुखांत औषध घालिती । दंडांत सुया टोचिती । डाँक्टरांनी उपाय तरी किती  । केले म्हणून सांगू रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥३९॥
जागोजागीं लोक राहिले । लक्ष मामांच्याकडे वेधले । म्हणती कांहीं मागितले । तर लगेंच देऊ रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४०॥
परी मामा कांहीं न बोलती । फिटली प्रत्येकाची भ्रांती । त्यांनी धरिली एकदाचि शांती । आणि मौन रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४१॥
अंतरी जागे होते पूर्ण । ते नव्हते त्यांचे बेशुध्दपण । याची स्पष्ट खूण । दिसली प्रत्येकालारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४२॥
मामा विचारिती नानांना । सखारामपंत जोगळेकरांना । आता वेळ कोणती सांगाना । घडयाळांत रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४३॥
नाना म्हणती बारा वाजले । वार कोणता मामांनी विचारले । तो नानांनी सांगितले रविवार म्हनोनि रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४४॥
उदयां म्हणती सोमवार कां । मामांनी निश्चय केला पक्का । महाराज काय म्हणती ठाऊक आहे कां । म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४५॥
गर्भवास नको पुढती । ऐसेच ना विनविती । सांगा ‘नाना’ निश्चिती । मत म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४६॥
आनंदूरे । आजी पूर्णानंदुरे । हे पद मामांचे आवडते रे । गाती आज मामा श्रीराम जयराम जयजयराम ॥४७॥
पुन्हा मौन धरिले । घडयाळाची टक् टक् चाले । मनोमन आता सर्वांना कळले । काय होणार रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४८॥
लागता धक्का अचानक । हुंकार मिळे क्षण एक । तोडिला संबंध म्हणती लोक । नेत्र पैलतीरी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥४९॥
काळजी हा रोग लागला । आता प्रत्येकाच्या मनाला । चिंतेने चेहरा ओढला । प्रत्येकाचा रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५०॥
जोवरी संत असती । तोवरी त्यांची नकळे महती । परी जातो म्हणता चरचरती । काळजांत सुर्‍यारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५१॥
अज्ञानाची ऐशी महती । मायेची अनिवार शक्ति । जाणत्या बुध्दीस भुरळ पडे ती । काय करु रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५२॥
कळते परी वळेना । समजते परी आळस सरेना । शेवटीं हातीं काहीं उरेना । जड जीवांच्या रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५३॥
त्यासि दयावया धक्का । संत काळास कारे मारिती हाका । आणि जाती श्रीहरीच्या लोका । मग लोक तळमळतीरे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५४॥
आता माझ्या कीर्तनाचे । सार शोधून अंतरीचे । ठेवा हृदयीं कायमचे । हेच मामा सांगती नारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५५॥
प्रेम ठेवा भगवंतावरी । नियमाची ब्रम्हगांठ अंतरी । गुरुवचना वरी । ठेवोनि म्हणा म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५६॥
जणूं हा उपदेश ठसाया । सद्गुरु शोधिती उपाया । कठोर अशा शेवटचय या । कारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५७॥
हे श्रीसमर्था रामराया । आम्ही असेच जाऊ वाया । जरी सद्गुरुंची कृपा छाया । अंतरेल रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५८॥
मामा अंत:करणाचे कोमल । बोलती सदा मधुर बोल । अपराध पोटीं घालून अमोल । उपदेश देती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥५९॥
शोधिता घरीं आणि द्वारी । रस्त्यावरी आणि देशांतरी । ऐशा पुण्य पुरुषाची सरी । येईल कारे कोणा, श्रीराम जयराम जयजयराम ॥६०॥
नको नेऊ तू मामाना । ऐकूदे त्यांच्या अमृतवचना । आम्ही ऐकू त्यांच्या कीर्तना । आणि म्हणू श्रीराम जयराम जयजयराम ॥६१॥
ऐसा विचार करता । रात्र संपली जाता जाता । परीं आशादायक प्रसन्नता । मामांच्या चेहर्‍यावरती रे श्रीराम जयराम जयजयराम ॥६२॥
ओठ मिटले नेत्र झांकले । श्वासोश्छावास मंद चाले । उचकी ठसका येता हलले । म्हणजे वाटे उठतील मामा रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥६३॥
मामा जातील ही कल्पना । न शिवे कोणाच्या मना । जे नित्यनेमे चालविती कीर्तना । काल पर्यंत रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥६४॥
घडेल कांहीं चमत्कार । येतील आता भानावर । होतील उपकार । भाविकांच्यावरी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥६५॥
काळ मेघ दाटती गगनीं । तरी आशेचे अंकुर फुटती मनीं । भक्त पाहती लोचनी । मामांच्या मुखाकडे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥६६॥
एकनिष्ठ सेवा मामांची । करी शरयू अखेरची । सुफल होईल निदान तिची । सेवा ऐसे वाटे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥६७॥
हे रामा तुझ्या अयोध्येचे । साकार रुप शरयूचे । वेड घेऊन मामांच्या सेवेचे । येथें वाटे आले रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥६८॥
सेवा करावी कैशी । तीही पहा ऐशी । हे दाखविण्या पाठविसी मनुष्य रुपे शरयूस कारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥६९॥
आला सोमवारचा दिवस । माघ शुध्द नवमीस । शके आठरांशेत्र्यांशीस । हे जगज्जीवनारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥७१॥
डाँक्टरांच्या फेर्‍या चालल्या । धीर शिणल्या मनाला । परी त्यांच्या चेहर्‍यावरी उमटल्या । उदासीन छाया रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥७२॥
एक व्याधी बंद करिती । तो दुसरीच उद्भवे पुढती । आता डाँक्टर म्हणती । नका बोलावू आम्हाला रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥७३॥
दुपारी दोन वाजल्यावर । येऊ भेटींसी सत्वर । तोवरी आहे उपचार । तोच असो दे म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥७४॥
अर्थ याचा उघड दिसे । मन कासावीस होतसे । तरीही आशा मनीं वसे । दुर्धर आशा रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥७५॥
लोकांनी बैसोन सभोवार । सुरु केला रामनामाचा गरज । उपाय रामबाण या भूवर । घोष चालला रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥७६॥
अखंड आळविती देवाला । म्हणती ये धाऊनी या समयाला । पीळ पदे हृदयाला । धाव रे धाव श्रीराम जयराम जयजयराम ॥७७॥
ठोका दुपारच्या दोनीचा । पडला परी श्वास मामांचा । चालला हे पाहून मनाचा । ताण कमी झाला रे श्रीराम जयराम जयजयराम ॥७८॥
मन दे टाळी आनंदाने । म्हणे कृपा केली रघुराजाने । ऐकोन करुणा वचने । भक्तांची रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥७९॥
फोन केला भरभर । या डाँक्टर आता लवकर । वाचवा प्राण मामांचे सत्वर । गरुडवेगानें या म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८०॥
फडणीस डाँक्टर चकित झाले । म्हणती हे अघटित वर्तले । दुपारी दोनला आयुष्य सरले । बोले हे शास्त्र म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८१॥
शास्त्र हे निसर्गाचे । सामर्थ्य आगळे सद्गुरुंचे । अरे हे विचाराच्या पलीकडचे । झाले म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८२॥
अरे हा संत जिवंत । कीर्तीमंत प्रतापवंत । आमचा साष्टांग प्रणिपात । या राम भक्तारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८३॥
संत एक कान्हेरे आले । त्यांनी मामांच्याकडे पाहिले । नीलवर्ण ज्योत पाहून चमकले । नेत्रांत मामांच्यारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८४॥
अरे आहेत वाटाघाटी सुरु । न कळें सद्गुरुंचा विचारु । म्हणोन अघटित प्रकारु । तुम्हास दिसे म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८५॥
गुरुतृतीयेचा उत्सव । व्हावा एवढा मिळावा वाव । मामा विनविती सद्गुरुराव । म्हणोन हा विलंब दिसे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥।८६॥
निर्णय देवाधिदेवांचा । आणि सद्गुरुरावांचा । म्हणती आत्ताच येण्याचा । समय पातलारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८७॥
सद्गुरुंच्या इच्छेला । मामांनी रुकार दिला । तो पाचाचा ठोका पडला । वेळ मामांच्या किर्तनाची रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८८॥
आज तपानुतपाची । आतां वेळ कांही घडण्याची । म्हणोनी कोणी आले रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥८९॥
नेत्र मामानी उघडले । नील तेज प्रकाशले । ते रामाने पाहिले । समजला तो अंतरी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९०॥
त्रयोदशाक्षरी मंत्राचा । उच्चार गर्जली मामांची वाचा । म्हणती गजर करा याचा । या सुवेळी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९१॥
वेळ मामांच्या कीर्तनाची । भक्त जनानी ही साधली अखेरची । वदे वाचा प्रत्येकाची । सप्रेम रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९२॥
खंड न पडता अखंड चालले । किती एक या नाम गंगेस मिळाले । पर्वकाळी पावन झाले । मंत्र घोष रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९३॥
संत निघाले निजधामा । आळवा आता श्रीराम जयरामा । भक्तवत्सला पूर्ण कामा । वाली तू दीनांचा रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९४॥
वेळ मामांच्या कीर्तनाची । साधली ही अखेरची । झापडे मिटली डोळ्यांची । मामांनी वाचा बंद केली रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९५॥
अडतीस वर्षाचा कीर्तनाचा । सारांश बोलती वाचा । तोच उपदेश नित्याचा । मामांच्या कीर्तनीं रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९६॥
तोच संदेश देऊन । पुन्हा अंतर्मुख केले मन । हे जागेपण नव्हे सामान्य । पटले प्रत्येकाला रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९८॥
नभी विज चमके क्षण एक लकलके । पुन्हां अंधारी भिंतीला थडके । डोके ऐसे झाले रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥९९॥
सकाळपासून । नाडया सुटल्या म्हणती वैदय जन । तरीही हे अनुसंधान । हा काळावरी जय रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१००॥
सारी अघटित घटना । आश्चर्याश्यर्य वाटे मना । सभोवारच्या लोकांना । मुग्ध झाले सारे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०१॥
लोक बसले ठाण मांडून । स्त्रिया पुरुष सगळे जण । सुरु केले त्यांनी भजन । एक सरे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०२॥
वासुदेवराज जोशी राहिले उभे । उभे कीर्तनास त्यावेळे । मामा नाही गेले । ना जाणार म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०३॥
दिनमणी ढळला पश्चिमेला । कभिन्न अंध:कार दशदिशाला । काळ रुपे सर्वाना भासला । भयभीत सर्व रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०४॥
औषधाचा उपाय सरला । अशुध्द येऊ लागले तोंडाला । सर्वांचा आधार सुटला । भार आता तुझ्यावरी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०५॥
हळू हळू रात्र सरे । तैशीच आशा क्षीण होई रे । उशापायशाशी लोक सारे । सेवेस असती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०६॥
अंकावरी मामांचे मस्तक । राम मोजी क्षण प्रत्येक । ठोके हृदयाचे एकूण एक । ऐकू येती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०७॥
आला बाराचा समय । उरली दहा मिनिटे हाय हाय । ज्योत ज्योतिसि मिळून जाय । गोष्ट संपली रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०८॥
दिवस ठरला गोविंद नवमी । या आत्म निवेदिनी सरला मी । ब्रम्ह मिळाले ब्रह्मी । झाला हलकल्लोळ रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१०९॥
अश्रूचे लोट चालले । कोणी रडले कोणी ओरडले । काहींनी पदर लाविले । आपुल्या नेत्राला रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥११०॥
कोणी रडून दु:ख हलके करी । कोणी साठवी हृदयांतरी । जो तो चूर आप आपल्यापरी । अंतरात रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१११॥
तारा गेल्या इष्ट मित्रांना । स्नेह्या आणि सोबत्यांना । जवळच्या नातेवाईकांना । अंत्य दर्शनास रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥११२॥
मृत देह राहिला सहा तास । परी अंगास न सुटला वास । अवयव सैल न ताठले यास । काय म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥११३॥
रामनामाचा वेढा शरिराला । कारण तेच प्रत्येकाच्या तोंडाला । अखंड नामपाठ चालला । पार्थिव देहापुढे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥११४॥।
पुन्हा सूर्य आला पूर्वेला । घेऊन जाणार देहाला । चला आता कृष्णातीराला । मनीं असो रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥११५॥
सोमवारचें कीर्तन । मामांनी ठेविलें टाचून । ते मंत्ररुपें सांगून । मामांनी देह ठेविलारे, श्रीराम जयराम जयजयराम ॥११६॥

मामांचा शेवटचा अभंग :-
मूळ स्वभाव गुरुनाम । श्रीराम जयराम जयजयराम ॥१॥
अहंकाराच्या अभावे । देव होशील स्वभावे ॥२॥
गोविंद म्हणे स्व स्वभाव । जीवा सोडीरे अभाव ॥३॥

व्हावा मूळ स्वभाव गुरुनाम । त्यास कधी न दयावा विश्राम । सदा करील पूर्ण काम । आधार जडजीवास रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥११७॥
अति नको ब्रह्मज्ञान । धरा गुरुवचन प्रमाण । साधनीं बसा मांडोन ठाण । ऐसे मामा सांगती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥११८॥
अहंकाराचा होवोन अभाव । देव हाच होईल स्वभाव । येथे दृढ धरा भाव । गोविंद म्हणे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥११९॥
जन्म सर्व दु:खासि मूळ । मृत्यू हाही दु:ख प्रबळ । त्याचे तोडोनि जंजाळ । मुक्त व्हा म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२०॥
हे शेवटचे कीर्तन । आणि मामांचे स्वानंद भुवनगमन । शब्दाचे क्रियेशी अनुसंधान । केवढे अघटीत रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२१॥
मामा स्वस्वरुपी मिळाले । स्वानंद रुप झाले । त्यांचे देहकष्ट आतां सरले । सुखी झाले मामा रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२२॥
वेगीं होवोन सावधान । जोडोन सारासार विचार धन । प्रपंचाचा लोभ सोडोन । मामा स्वरुपाकार झाले रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२३॥
अरे हा पथ अनंताचा । रोखून मामा चालले भाग्याचा । परी आम्हा पूर अश्रूंचा । अनिवार लोटे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२४॥
सकाळी सूर्योदयाला । मामांचा देह पुष्पांनीं आच्छादिला । वरी अश्रूंचा अभिषेक चालला । प्रत्येकाच्या रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२५॥
हातीं भाव फुलांची माळा । घेऊन प्रत्येक उभा राहिला । मनोमने अर्पी चरणाला । या पुण्य पुरुषाच्या रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२६॥
आता पूजा षोडषोपचार । मंत्रपुष्पांचा संभार । धूप दीप नैवेदय सत्वर । आणा मामांना रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२७॥
आधार ज्या देहाचा । लाभला मामांना वर्षानुवर्षाचा । त्याने मार्ग धरिला कृष्णातीराचा । मामा राहीले जगज्जीवनीं रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२८॥
आधार ज्या देहाचा । लाभला मामांना वर्षानुवर्षाचा । त्याने मार्ग धरिला कृष्णातीराचा । मामा राहीले जगज्जीवनीं रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१२९॥
मामांनी केले कलिमलाचे दहन । मामांचे शरीर पुण्यपावन । तेहि ज्योति सर्व जाईल विरुन । ओवाळू आरती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३०॥
मामांचे मायाविरहित माहेर । मामांना विश्रांतीसुख निर्भर । मामांनी निर्गुणपरीं केले घर । ओवाळू आरती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३१॥
उचलले देहाला । तो हलकल्लोळ उडाला । आता आठवीत मामांच्या गुणाला । चला पुढती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३२॥
प्रशांत, निगर्वी, निर्व्यसनीं । प्रेमळ विरक्त समाधानी । संसारसुख गौण मानुनी । ईश्वर आपुला केला रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३३॥
सदा रत साधनीं । अथवा हरिकीर्तनी । किंवा श्रवण मननी । मामा निमग्न सदा रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३४॥
साधननिष्ठ थोर गुरुभक्त । वागणे अत्यंत नियमित । बोलणे चालणे परिमित । सदा अंतर्मुख दिसती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३५॥
शमदमादि ऐश्वर्य संपन्न । सर्वाभूति सदा लीन । निंदकांचा गौरव करुन । आत्मसुखी रहाती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३६॥
त्यागी तपस्वी पितृभक्त । प्रेमळ सदाचारी मातृभक्त । गुरुनाम स्मरणी आसक्त । अनुरक्त संत पूजनी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३७॥
देहममता शून्य । श्रीरामचरणी अनन्य । कीर्तन सेवेस प्राधान्य । लोकोपकारासाठी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१३८॥
चिंता न देहाची । न आपुल्या संसाराची । निर्भय वृत्ती सदाची । मामांची दिसे रे,श्रीराम जयराम जयजयराम ॥१३९॥
ध्यास नामस्मरणाचा । तेचि अंतकाळीं आले वाचा । पांग फिटला कर्णव्दयांचा । ऐकून अनेकांच्या रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४०॥
अंतकाळी नामस्मरण । उंच स्वरे उच्चारुन । सुखी केले भक्त जन तो हा त्रयोदशाक्षरी मंत्र -
श्रीराम जयराम जयजयराम ॥१४१॥।
नेमाची गांठ प्राणासवे । मामांनीच म्हणावे । सप्रयोग सिध्द करावे । मामांनी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४२॥
यात्रा चालली कृष्णातीराला । मुखीं श्रीराम जपमाला । घाव अंत:करणावरी बसला । तरी सर्वजण म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४३॥
आले समाधि मंदिरापाशी । संत श्रीहनुमंत चरणासी । श्रीगंगाधरराव आणि श्री सोनोपंत दाराशी । तिष्ठत होते रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४४॥
हार घालून पुण्य देहाला । ते ओवाळती आरतीला । पुन्हां पंचारती फिरल्या । जयदेव जय गोविंद म्हणोनि रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४५॥
गोविंद मिळाले श्रीहनुमत्पदीं । एकरुप झाले स्वानंदी । अखंड किर्तनाची गंगानदी । दिसे नेत्रांतरी प्रत्येकाच्या रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४६॥
हे पुण्यपावन श्रीराम । हे सुखनिधान श्रीराम । हे भक्तकैवारी श्रीराम । राम राम रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४७॥
आता मामा तुझ्या ठायी । तुझ्या जवळी आमची आई । गावू “राम, राम” हृदयी । मामांच्यासाठी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४८॥
कधीं येईल तुला करुणा । कधी दाखविशील गोविंद राणा । लोळण घेतो तुझ्या चरणा । नको निष्ठूर होऊ रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१४९॥
जेथे आपुली आई असे । तेच ठिकाण बालक गवसे । तैसे माझ्या जीव वाटतसे । तुझें दार ठोठावावे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५०॥
अरे हा एकनाथ पठणवाला । आला कृष्णातीराला । या संत ताम्हणकरांच्या बोला । आता आठवले रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५१॥
ताम्हणकर महाराज गलितगात्र । वार्ता कळताच मात्र । सुटले कृष्णातीरा पवित्र । लटपटे त्यांची काया तरी रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५२॥
घालिती साष्टांग नमस्कार । तीन प्रदक्षिणा सभोवार । श्रध्दांजली संतवर । अर्पिती संतासि रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५३॥
श्रीराम भेटे श्रीरामाला । ऐसा हा अपूर्व सोहळा । अश्रू झाले गोळा । नेत्री सर्वांच्या रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५४॥
काष्ठांचा ढिगारा । आंत झाकिले पुण्यशरीरा । मंत्राग्नी आणि वारा । एकसरा सुटला रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५५॥
धडधडा ज्वाला उफाळल्या । त्या वाटती गगनास भिडल्या ।  नेत्रीं लोकांच्या प्रकाशल्या । ते आता म्हणती रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५६॥
व्यथित झाली अंत:करणे । त्यानी देवाच्याव्दारी धरिले धरणे । आता भक्तांना चिरशांती देणे । हे कोणाच्या हातीं रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५७॥
जो तो म्हणे आपणासी । सांगली मुकली थोर संतासी । अंतरलो त्यांच्या कीर्तनासी । एकदाच रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५८॥
पुण्यपुरुष सांगलीचा । होता आमच्या भाग्याचा । पूर्ण पुरुष सद्वर्तनाचा । आता गेला रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१५९॥
देह अग्नीत विराला । आत्मा स्वरुपीं लीन झाला । आता आसरा आम्हाला । एक गोविंद स्मरण रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१६०॥
गोविंद गोविंद गोविंद । अंतरी राहो स्मरण सुखद । आमुचे शिरकमल आणि तवपदारविंद । गांठ एक होऊ दे रे, श्रीराम जयराम जयजयराम ॥१६१॥

साष्टांग भावे प्रणिपात माझा । गोविंद घ्या या शुभप्रभाती ।
तेजासवे तेज मिळोन गेले । गोविंद हे नाम आम्हा मिळाले ॥

- श्रीगोविंदाष्टक -
ज्या प्रेमानें प्रतिदिनि तुम्ही बोधिले भाविकांना ।
ज्या धैर्याने अनुदिनि तुम्ही राखिले नित्यनेमा ॥
ज्या शौर्यानें कठिण समयीं गांजिले संकटाना ।
हे गोविंद स्मरण तुमचे नित्य हे गोड आम्हा ॥१॥

भाग्यानें ही अमित जडली संगती सौख्यपूर्ण ।
कोठें शोधू नवल असले लोह झाले सुवर्ण ॥
संसारी या बुडत बुडता आणिले संत मार्गी ।
हें गोविंद स्मरण तुमचे राहुदे अंतरंगी ॥२॥

श्रीरामाचें स्मरण सदया राखुनी अंतरात ।
बाहेरीही स्वभुवनिं वसवी जानकीचाचि कांत ॥
तीर्थक्षेत्रें त्यजुनि सगळी राहिला मंदिरी या ।
हें गोविंद स्मरण तुमचें चित्त हे साठवू द्या ॥३॥

कीर्ती सत्ता धन यश जगीं इच्छिती लोक सारे ।
या मोहांना ढकलुनि जगीं भक्तिमार्गा चला रे ॥
ऐसे लोका विनवित तुम्ही त्याच मार्गे निघाला ।
हे गोविंद स्मरण तुमचे शांतवूदे मनाला ॥४॥

निष्ठा भक्ति प्रिय गुरुपदीं भाव ठेवून नित्य ।
श्रीरामाचा विमल गुण संकीर्तनी भाव सत्य ॥
आत्मारामीं रमवि स्थिरवी भाववृत्ती जनांच्या ।
हें गोविंद स्मरण तुमचें येऊदे नित्यवाचा ॥५॥

काया दु:खे कधि न करिती खिन्न या सज्जनाला ।
संसाराच्या कुटिल विपदा वारिती ना जयाला ॥
राहे ज्याची अचल मति या नाम संकीर्तनांत ।
हे गोविंद स्मरण तुमचे राहू दे मन्मनांत ॥६॥

सौजन्याने सुमधुर वचने वेधिलें सज्जनाना ।
नाना याने सुफलित करिती साधनीं साधकाना ॥
काना मात्रा कधि न चुकती नित्य नेमांत यांच्या ।
हें गोविंद स्मरण तुमचें तोडि पाशा भवाच्या ॥७॥

जे जे गेले तरुनि जगती तोडुनी काळपाशा ।
ते ते मागे अमर असती भक्तकाजा हमेशा ॥
ऐसे तुमचे सुवचन असे विश्वसू त्याच बोला ।
हे गोविंद स्मरण तुमचे थोर आशा मनाला ॥८॥

॥राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय॥

ज्वाला भिडल्या आकाशाला । त्या आता निमू लागल्या । वृत्ती भारावल्या । उपस्थितांच्या ॥१६२॥
कर्णोपकर्णी पसरली । वार्ता अनेकांच्या कानावर गेली । सुजनांची गर्दी झाली । कृष्णा तीराला ॥१६३॥
वाट फोडावया दु:खासी । आता करु गुणवर्णनासी । म्हणोनि उठले बोलावयासी । एक एक जण ॥१६४॥
दत्तोपंत बापट वकील । म्हणती ‘मामा’ शेजारी निर्मळ । हरि कीर्तनांत काळ । समाधाने घालविला ॥१६५॥
थोर सद्गृहस्थ उत्तम शिक्षक । तैसेच निष्ठावंत गुरुभक्त एक । आणि आजीव सेवक । सांगली शिक्षण संस्थेचे ॥१६६॥
जामदार म्हणती गेला । आज सांगलीचा संत भला । ज्यांच्या अखंड भक्तीला । झाला देव संतुष्ट ॥१६७॥
मोरोपंत कुलकर्णी मान्यवर । मामांचा लोभ ज्यांच्यावरी फार । भावपूर्ण अभंग सुस्वर । गाऊन संतोषविती मामांना ॥१६८॥
ते म्हणती निरंजनी घर । आतां मामांनी केले निरंतर । निर्मल चारित्र्याचा प्रसाद सुंदर । आम्हासाठी ठेविला ॥१६९॥
पंडितराव दांडेकर । म्हणती संत हाचि आधार । सामान्य जनासी खरोखर । मार्गदर्शकासाठी ॥१७०॥
पुण्यपुरुष हीच संपत्ती । पाठीसी असता यश-प्राप्ती । तेणेच राष्ट्राची उन्नती । विचारे दिसे ॥१७१॥
तो आसरा आता सुटला । ज्ञानदीप दृष्टीआड झाला । हा तरी मोठा घाला । झाला सांगलीकरांवरी ॥१७२॥
किती एकांचे सांत्वनपर । संदेश आले सविस्तर । कोणीं सवड काढून सत्वर । आले भेटीसाठीं ॥१७३॥
गुरुवर्य दांडेकरांनी । संदेश पाठविला व्यथित अंत:करणीं । भावना व्यक्त विचारातुनी । करिती आपुली ॥१७४॥
मामा संत महाराष्ट्राचे । हरपले हे दुर्दैव लोकांचे । माप नसे या हानीचें । ऐसे संत दुर्मिळ ॥१७५॥
संत वर्णिती संताना । तेव्हां त्याचे महत्त्व इतरांना । संसारी जनांच्या नेत्रांना । दृष्टी संताच्यामुळें ॥१७६॥
संतदास ऐनापुरे । सत्शिष्य गुरुवर्यांचे खरे । ऐकून मामांचे कीर्तन बोल बरे । बहुत संतोषले ॥१७७॥
श्री दांडेकर गुरुवर्यांनी । सांगीतले त्यांना आवर्जुनी । सांगलीत मामांचे कीर्तनी । मन असो दयावे ॥१७८॥
सद्गुरुंचे शब्द पडता कानीं । ते त्यांनी गोड मानिले अमृताहुनी । मामांचे कीर्तन ऐकूनी । साक्ष घेतली सद्गुरुवचनाची ॥१७९॥
मामा गेले हे ऐकुन । व्यग्र झाले अंत:करण । म्हणती कर्ण आणि नयन । अतृप्त राहिले ॥१८०॥
योजिले एक झाले दुसरे । हे दैव गतीचे फेरे । मन अंतरी झुरे । परी सत्संगतीसाठी ॥१८१॥
जिवाजीपंत दीक्षित । उत्तम चित्रकार आणि भाविक भक्त । मामा माझे शिक्षक म्हणत । बाळपणीचे ॥१८२॥
मामा गेल्यावरी आले । नेत्र त्यांचे अश्रूंनी भरले । म्हणती निष्ठावंत संत गेले । दुर्भाग्य आमुचे ॥१८३॥
श्रीगुरुलिंगजंगम । श्रीरामचंद्र प्रभू श्रीसाधुराज श्रेष्ठतम । श्रीज्ञानेश्वर यांची रेखाचित्रें उत्तम । त्यांनी स्वखुषीनें काढिली ॥१८४॥
आता मामांचे यथार्थ व्यक्ति दर्शन । करील ऐसे तैल चित्र अनुपम पूर्ण । तेच दीक्षित काढिती भावपूर्ण । जेणे संतोष बहु, सर्वांना ॥१८५॥
ज्या जागेवर मामानी । अखंड कीर्तन रंगवुनी । अखेर देहही ठेविला त्याच स्थानीं । ती पवित्र जागा ॥१८६॥
तेथें सिंहासन । पादपद्में कमळांत विराजमान । चित्र चरित्र आणि चरण । एके ठायी दिसती ॥१८७॥
भक्त नमिवितील मस्तक । स्मृति मनांत राहील सम्यक । काळापासून हेच एक । आम्ही हिराऊन घेतले ॥१८८॥
श्रीगुरुदेवांचे भाचे । प्राध्यापक दामले नांव त्यांचे । स्मरण होऊन मामांचे । आले श्रीराम मंदिरी ॥१८९॥
श्रीगुरुसिध्दाप्पा धावून आले । प्रेमे रामास भेटले । उभयतांचे नयनीं लोटले । अश्रूंचे पूर ॥१९०॥
सांगलीत संत हनुमंत । आणि गोविंद हे दोघे विख्यात देवचि झाले साक्षात । बोले पुरुषोत्तम ॥१९१॥
आणिक किती एक जण । आले त्यांचे करिता वर्णन । विस्तार भयास्तव आवरुन । नाइलाजे लेखणी धरीतसे ॥१९२॥
जेथे जेथे सद्भाव सोज्वळ । तेथे तेथे मामांचें स्मरण सुमंगल । त्यांच्या भावफुलांची ओंजळ । पडली मामांच्या चरणावरी ॥१९३॥
हा शुध्द प्रेमाचां आविष्कार । कोठे कैसा कोण सांगणार । कोठे प्रगट कोठे गुप्त राहणार । परी सौख्य अनुपम ॥१९४॥
अंत:करणें भारावली । कोणीं व्यक्त केली कोणी न केली । अंतरीची अंतरी राहिली । तळमळ ॥१९५॥
रामाच्या शिरावरील छत्र । उडाले अकस्मात । रामभाऊ गोवंडे येऊन त्वरित । धीर दिला रामासी ॥१९६॥
चार वर्षाचा अनिल । त्याचीही पाहवेना घालमेल । म्हणे जरी मामा दाखवाल । तरीच शांत राहेन ॥१९७॥
पोर म्हणून समजुत काढिती । परी त्याचीही सूज्ञ मती । तो म्हणे हे मज फसविती । आहे कांही विपरीत ॥१९८॥
चंद्रशेखरही बाल । त्याच्या पोटीं उठे कोलाहल । न सांगता श्मशांनीं वाटचाल । करी अनेकदा ॥१९९॥
या चितेतूनही मामांना । मी पाहीन ही त्याची भावना । समाधान त्याच्या मना । क्षणभरही न मिळे ॥२००॥
मामा जातील हे कल्पना । न शिवली कोणाच्याही मना । अवचटे धक्का सर्वांना । जबर लागला ॥२०१॥
दाता आणि घेता । तूचि एक अनंता । सगळीकडे तुझी सत्ता । शरण आम्ही तवपदी ॥२०२॥
जेंव्हा जेंव्हा मामांचे स्मरण । करील हे अंत:करण । सुखद स्मृतीनी येईल भरुन । दिसेल नेत्रांतरी ॥२०३॥
जे जे स्मरण मामांचे । ते ते क्षण आनंदाचे । ऐसे आहे इतर कोणाचे । सांगा संताविण ॥२०४॥
दु:ख झेलून खांद्यावर । ज्यांनी सुखी केले सर्वांचे अंतर । त्यांचे स्मरण वारंवार । आधार आम्हाला ॥२०५॥
आता कळसाध्याय पुढचा । आढावा घेऊ मामांच्या जीवनाचा । हे चरित्र न संपविण्याचा । मोह होय अनावर ॥२०६॥
ज्या ज्या आकांक्षा मामांनी धरिल्या । त्या त्या तात्यांचे कृपे सफल झाल्या । अंतकाळी देह ठेविला । निष्काम होवोनी ॥२०७॥
जो ध्यास जन्मवरी । तेचि स्मरण अंतकाळ करी । हे श्रीराम जयराम जयजयराम गजरीं । मामांनी दाखविले ॥२०८॥
अंतकाळीं नव्हते शुध्दीवरी । मग कैसे स्मरण अंतरीं । ऐसा विकल्प ज्यांच्या हृदयांतरी । त्यांना मामांनी जागविले ॥२०९॥
राम चालवील कीर्तन । ही त्यांची खात्री पूर्ण । याची काकस्पर्शी खूण । आली सर्वाना ॥२१०॥
अखंड कीर्तन चालावे । भगवद्भजन वाढवावे । संसारिकासि मिळावे । समाधान नित्याचे ॥२११॥
हीच एक आशा मनीची । होती मामांची । कावळे पिंड झडपिता सर्वांची । खात्री झांली ॥२१२॥
राम करी कीर्तन । नित्यनेमे आनंदून । मामांच्या निर्याणापासून । न चुकता ॥२१३॥
आता ही कीर्तनपरंपरा । अखंड चालो या नगरा । संसार दु:खितासी आसरा । तोचि एक होईल ॥२१४॥
हे श्रीरामा दयाघना । आम्हां न कळे तुझी योजना । चटका लाऊन अंत:करणा । संत नेसी आम्हापासुनी ॥२१५॥
पूर्ण काम मामा झाले । सच्चिदानंद रुपीं विश्रांतीस गेले । त्यांची उमटली पाऊले । सादर तेथे आमुचा ॥२१६॥

इतिश्री गोविंदचरित मानस । जे स्वभावेचि अतिसुरस । जेथे अखंड उसळेल भक्तिरस । निर्याणप्रसंग वर्णननाम द्वादश अध्याय ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP