अध्याय आठवा - रौप्य महोत्सव वर्णन

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


जय जय श्री कीर्तन सरिते । जे पावले तुझ्या तीरातें । ते झाले सरतें । भवार्णवीं ॥१॥
जें एकदांही आले तुझ्या तीरीं । त्यांना गोडी लागली भारी । म्हणोनि कीर्तनगंगेची सरी । आणिकासी न ये ॥२॥
एक विदयार्थी भाविक । आला कीर्तनासी दिन एक । त्याच्या श्रध्देचें कौतुक । अपूर्वचि असे ॥३॥
दुसरे दिवशीं अंथरुणाला । विषमज्वरानें तो खिळला । शुध्द उडाली झाला । अधींर मनीं ॥४॥
पाणी प्यावें मामांच्या हातें । औषध प्यावें मामांच्या दृष्टीपुरतें । मामा, मामा, म्हणावें मागुंते । हाचि ध्यास ॥५॥
घाला आला काळाचा । जीव आधार सोडी देहाचा । प्राणज्योति आसरा मामांचा । शोधीत आली ॥६॥
पहांटेच्या प्रशांत काळीं । मामांची दासबोध सेवा सुरुं झाली । तों तेथेंच प्राणज्योति फिरुं लांगली । इकडे तिकडे ॥७॥
सुख संत तों सान्निध्याचें । भोगून अति मोलाचें । तों तेथेंच शिवपिंडिचें । आंत लुप्त झालीं ॥८॥
दर्शन मामांचें घेऊन । मामांचे कीर्तन ऐकून । भक्ति प्रेमाचें दृढबंधन । पडे अंतरी ॥९॥
मामांच्या कीर्तनाचे । आणि त्यांच्या शुध्द आचरणाचे । त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे । खोल परिणाम रुजले ॥१०॥
किती एकांना आसरा । मामांचा सुखद झाला खरा । सुख शांति आणि निवारा । मामांच्या घरी ॥११॥
जानकीबाई दांडेकर । निवासस्थान पालघर । आप्पासाहेब, बाळासाहेब थोर । पुत्र त्यांचे असति ॥१२॥
हेंहि मोठें भक्तिमान । मामांचे चरणीं अनन्य । जानकीबाईचें वर्णन । ऐका आतां ॥१३॥
मृत्युशय्येवरी असतां । मामांच्या भेटीची आतुरता । भेटीसाठीं बोलावणें येतां । मामा गेले ॥१४॥
भेटीसांठीं जीव अडकला । तो दर्शनें शांत झाला । समाधांने प्राण सोडिला । जानकीबाईंनी ॥१५॥
कोणाची भूतबाधा गेली । कोणाची विघ्नें दूर झाली । कोणाची भ्रमली बुध्दि आली । ताळ्यावर ॥१६॥
ऐशी कीर्तनसेवा मोलाची । चिरंतन लोकसंग्रहाची । सुटका निश्चयाची । संसार दु:खातून ॥१७॥
ऐशी कीर्तनगंगा पुण्यपावन । अभागिया भाग्यवंत करुन । अखंड सुखाचें साधन । दे हातीं ॥१८॥
कोठें सांगलीचा गांवभाग । जेथें एकांति चाले कीर्तनरंग । परी परप्रांतीयांचें अंतरंग । गेले वेधुनी ॥१९॥
सांगलींत एक मामा । गाती अखंड हरि नामा । कीर्ति पसरली, वाढला महिमा । न वाढवितां ॥२०॥
नातरी नित्य कीर्तन । ऐसे कोठें ऐकिलें वर्तमान । अखंड भारतात पहा शोधून । किती स्थळें ? ॥२१॥
तात्यांनी पाया भरला । आतां इमारतीला डौल आला । आणि क्रम अव्याहत चालला । हा संतांचा प्रसाद मोठा ॥२२॥
हें भाग्य सांगलीस लाभलें । मुमूक्षूंचे थवे येथें लोटलें । आणि समाधान पावलें । जें दुर्लभ या कलियुगीं ॥२३॥
नाहीं नगारा वाजविला । नांही वर्तमानपत्री बोलबाला । तरीहीं घंटा वाजल्या सत्कीर्तीच्या ॥२४॥
नाद गेला दिगंतरा । हेलावली हृदयें एकसरा । लोक म्हणती आतां मनीं धरा । सांगली क्षेत्र ॥२५॥
जेथें संतांची वस्ती । तेथें करु एकदां आरती । सद्भावेंचरण चित्ती । साठवूं त्यांचे ॥२६॥
हळुहळूं कीर्ति ज्योत । शिरे सुजनांच्या अंतरांत । सर्वकाळ स्थिरावत । तेथेंच मग ॥२७॥
मामांची कीर्तन सरिता । वाहूं लागली अनवरतां । सुखवीत सुजनांच्या चित्ता । अखंड चालली ॥२८॥
नाही गंधर्वसंगीत । नाहींत साथींदार बहुत । बाह्यकर्षणें येथ । काहींच नसती ॥२९॥
नुसते नामसंकीर्तन । श्रीरामाचें प्रेमळ भजन । आणि अखंड साधन । सद्गुरुनिष्ठे ॥३०॥
साधनमार्ग समजाविती । सुगम करोनि सांगती । साधनाभ्यासी आणिती । मुमूक्षूंना ॥३१॥
श्रीराम जयराम जयजयराम । या महामंत्राचा घडविती नेम । प्रतिदिनी अष्टोत्तरशत जप उत्तम । करविती ॥३२॥
प्रसंगे भजन इतर देवांचे । तितुक्याच प्रेमें म्हणावयाचें । स्मरण सगळ्या संतांचे । यथोचित ॥३३॥
सांप्रदायाचा दूरभिमान । येथें दिसे शून्य । जो सद्भावें करी नमन । त्यास म्हणती आपुला ॥३४॥
श्रीराम तोचि पांडुरंग । तोचि द्वारकेचा श्रीरंग । भावभक्ति अभंग । दुजाभाव कधी न दिसे ॥३५॥
म्हणोनि येथें परकेपणा । कधीं न दिसे कोणा । सद्भावें चरणां । सर्व लागती ॥३६॥
सदा गोड बोलावें । मतांतरी न पडावें । समन्वयाचें सूत्र धरावें । अखंड मनीं ॥३७॥
दिन आला दिन गेला । परी क्रम अखंड चालला । खंड न नियमाला । जसा निसर्गाच्या ॥३८॥
तृषार्थी तो धांवे । म्हणे कीर्तन गंगेचे अमृतजवळ प्यांवे । आणि अंतरी व्हावें । म्हणे कीर्तन गंगेचे अमृतजवळ प्यांवे । आणि अंतरी व्हावें । सदा तृप्त ॥३९॥
मामांचे श्रीराम मंदिर । भक्ता झालें सुखाचें माहेर । प्रहर दोन प्रहर । येती जीवा शांतवाया ॥४०॥
श्रीनारायण महाराजांची माता । श्रीमाईसाहेब यांची योग्यता । जाणें चिमडची जनता । खरोखर ॥४१॥
झाली माता सर्व गावांची । कधी न भेदभाव पहावयाची । म्हणोन चिमडमठ विश्रांतीची । जागा सर्वांना ॥४२॥
त जातिभेद ना पंथभेद । येथें सर्वत्र अभेद । भक्तजनांना सुखद । चिमडमठ ॥४३॥
सेवाधर्म थोर । श्रीमाईसाहेबांचा सदाचार । पतिवचनाबाहेर । कदा न जाती ॥४४॥
अलिप्त राहून संसारीं । नामसंकीर्तन अंतरी । समाधानी वृत्ती बाणली खरी । अंतर्बाह्य ॥४५॥
श्रीरामचंद्र महाराज यरगट्टीवर । श्रीहनुमंत तात्यांचे सद्गुरुवर । श्रीनारायण महाराजांचे पितृवर । आणि पतिश्री माईसाहेबांचे ॥४६॥
श्रीरामचंद्र पिता । श्रीमाईसाहेब माता । अधिकारी परमार्थी उभयंता । कार्य चालविती जगदोध्दाराचें ॥४७॥
एके दिनीं माईसाहेब येऊन । त्यांनी सांगली केली पावन । मामांना देऊन दर्शन । सुखसंपन्न केलें ॥४८॥
येथें सांगलीस । मुक्काम केला काहीं दिवस । नित्य येती कीर्तनास । मामांच्या ॥४९॥
भक्तिभावें कीर्तन ऐकून । डोलती आनंदून । समाधानें अंत:करण भरुन । मामांना म्हणती ॥५०॥
बापूराव तुमचें कीर्तन । दे माझ्या मनांस समाधान । थोर साधन करुन । सद्गुरु प्रसन्न केलें ॥५१॥
जो स्वत: तरला । त्यानें बुडू न दयावें दुसर्‍याला । तरीच या संसाराला । सुखरुपत्व ॥५२॥
आतां जडजीवास हातीं धरावें । त्यांस मार्गदर्शन करावें । चुका सुधारुन सांगावें । योग्य मार्ग ॥५३॥
ही युगायुगाची नामनौका । कौशल्यें तुम्ही हांका । असहाय्य जन मारितील हाका । त्यांना साह्य करा ॥५४॥
तुम्हीं आम्हांत जाणते । म्हणून तुम्हांस सांगते । अभागियास सरते । करा भवार्णवी ॥५५॥
सदैवें तुमच्या शिरीं । हें कार्य पडले भारी । परी ज्यास देव तारी । तो सदाचा निर्भय” ॥५६॥
ऐसा सुखसंवाद दोघांचा । जो शुभलाभ सुजनांचा । महोत्सव आनंदाचा । आणि चारित्र्याचा कळस ॥५७॥
मामा म्हणती काय झाले ? । जें कधी नव्हतें मी चिंतीलें । सद्गुरुंचें हातीं आपुलें । भवितव्य असें ॥५८॥
होय, नाही कैसें म्हणूं । कर्ते करविते सद्गुरु । तेंचि आपुलें कर्णधारु । आपण निमित्तमात्र ॥५९॥
वज्रदेही मामा । चालविती आपुल्या नियमा । श्रीरामीं वाढता प्रेमा । ठेवोनिया ॥६०॥
परी काळाचा अधिकार शरीरांवरीं । प्रारब्धाचा जोर भरी । तो काया विकल करी । मामांची ॥६१॥
उत्साहें कीर्तन । मामा करितां होई अस्तमान । परी दिवसें दिवस क्षीण । शरीर होऊं लागलें ॥६२॥
मोजकें अन्न घ्यावें । सदा पथ्यानें राहावें । आळसाचें नरडें दाबावें । ठेवोन दूर विषयसुख ॥६३॥
काळांचे आधीन शरीर । तें झाले आतां परमार्थपर । शरीर झालें आतां बेजार । या काचणीनें ॥६४॥
तंव स्फूर्ति आली रोगांना । म्हणती जाऊं संतदर्शना । देऊं अलिंगना । होऊं सुखमय ॥६५॥
लाभ सत्संगतीचा । आम्हीही घेऊं नित्याचा । पाहूं त्यांच्या आचरणाचा । कित्ता कसा तो ॥६६॥
रक्तदाब वाढूं लागला । तेव्हां कीर्तनास व्यत्यय आला । मग प्रपंच व्यवसाय टाकला । परमार्थासाठीं ॥६७॥
ठेवून विश्वास ईश्वरावर । संसार टाकला प्रारब्धावर । आतां झाले निर्भर । कीर्तनासाठीं ॥६८॥
एकदां महाशिवरात्रीला । एक विक्रम झाला । मामा उभे राहिले निरुपणाला । सकाळी कीर्तनामागून ॥६९॥
अखंड नऊ तास निरुपण । मामा करिती आनंदून । श्रोतेही नेट धरुन । कौतुकाने बैसती ॥७०॥
तैशीच एक आली पर्वणी । श्रीतुकाराम महाराजांची आठवण म्हणूनी । त्रिशत सांवत्सरिक उत्सव गर्जुनी । लोक करिती ॥७१॥
मामांच्याही मनांत आले । त्यांनीं अखंड साधन ठरविलें । आणि तें नऊ तास चाललें । निष्ठावंत साधकांसह ॥७२॥
परी रोग धरिती शरीराला । तेव्हां या विक्रमाला खंड पडला । मामा म्हणती कीर्तन नेमला । आतां घट्ट धरुं ॥७३॥
रोग करिती घायाळ । तेव्हा शरीराचें न चले बळ । तरी कीर्तनासी खळ । कधीं न पडला ॥७४॥
एक वर्ष दोन तपावर । अखंड कीर्तनास आला बहर । भक्तांच्याही उत्साहास भर । आला यावेळीं ॥७५॥
तवं राम म्हणे मामा । आम्ही रौप्य महोत्सवाचा महिमा । प्रेमादरे गाऊं आम्हां । आशीर्वाद दयावा ॥७६॥
मामा म्हणती कशाला । सेवेंचा नको बोलबाला । परी भक्तांच्या मनाला । ही गोष्ट न रुचे ॥७७॥
खिन्न होतां भाविक जन । द्रवलें मामांचे अंत:करण । अनुमति देती मनीं नसुन । राम आनंदला ॥७८॥
झाला अपूर्व सोहळा । असंख्य भक्त झाले गोळा । नामसंकीर्तनाच्या करटाळा । झणझणूं लागल्या ॥७९॥
उभारिली पताका - तोरणें । लखलखाट विदयुद्दीपाने । मंडप शोभे वैभवानें । चित्रविचित्र झालरी ॥८०॥
देशोदेशींचे विद्ववर । कळला त्यांना हा प्रकार । सवड काढून आले सत्वर । संदेश आले इतरांचें ॥८१॥
लक्ष्मण-बुवा निजामपूरकर । मामांची कीर्ती ऐकून थोर । आले पाहण्या कीर्तन मंदिर । अतिशयें संतोषलें ॥८२॥
लक्ष्मणबुवा थोर कीर्तीचें । कीर्तनकार पहिला प्रतीचें । नांव ऐकतां लोकांचें । थवे लोटती ॥८३॥
ते म्हणती आनंदून । मीही कीर्तन सेवा करीन । रंग भरला तो पाहून । श्रोते होती तटस्थ ॥८४॥
करिती गौरव मामांचा । आणि त्यांच्या कीर्तन सेवेचा । तसाच त्यांच्या उज्वल चारित्र्याचा । हर्षभरें ॥८५॥
तैसेच दादासाहेब कोटनीस । तात्यांच्या गादीचे वारस । आशीर्वाद देण्यास । आले मामांच्या घरीं ॥८६॥
आल्या संत मंडळींचा । सत्कार झाला प्रेमाचा । थाट त्या शोभेचा । काय वर्णावा ? ॥८७॥
प्रसादाची खैरात किती । पंक्तीवरी पंक्ती उठती । भक्त हर्षभरें म्हणती । श्रीराम जयराम जयजयराम ॥८८॥
सत्कार्याचा महिमा । तेथें उत्साह गांठी सीमा । ओसंडे प्रेमा । तो अवर्णनीय ॥८९॥
विद्ववर्य आणि प्राचार्य । असूनही करिती देवकार्य । ऐसे श्रीदांडेकर गुरुवर्य । पत्र पाठविती या समयीं ॥९०॥
कराल या कलिकालीं । कीर्तनसेवा मामांची टिकली । रौप्य महोत्सव पर्वणी आली । हें अभूतपूर्व ॥९१॥
टाकी महाराज मुंबईचे । उद्गार ऐसेच प्रेमाचे । काढती जेणे अंत:करणाचे । बांध फुटती ॥९२॥
मामांचे सद्गुरु । श्रीनारायण करुणाकरु । आले जी सत्वरु चिमडाहून ॥९३॥
शिष्य सद्गुरुंचा अंकित । मनोभावें साधनरत । अखंड ज्या प्रिय एकांत । स्वरुपानंदासाठीं ॥९४॥
जैसा गुरु तैसा चेला । म्हणोन प्रेमसागर उसळला । धांवती हांकेला । सच्छिष्याच्या ॥९५॥
प्रसिध्दिविन्मुख श्रीनारायण । कोण वेळीं येती हें न प्रमाण । म्हणोन सर्वजण । तत्पर राहाती ॥९६॥
तवं ते आले प्रात:काळी । जेव्हां नव्हती विशेष मंडळी । परी सुरुं झाली दिवाळी । आगमनक्षणीं ॥९७॥
शिष्य अधिकारी । गुरु पूर्णावतारी । खूण पटली अंतरी । प्रसन्न सद्गुरु ॥९८॥
थाट पाहून परमार्थाचा । शब्द बोलती कौतुकाचा । आशीर्वाद प्रेमाचा । मिळे सच्छिष्याला ॥९९॥
हाचि रौप्यमहोत्सवाचा कळस । झाला सोन्याचा दिवस । समाधान शिष्यास । आणि सद्गुरुंना ॥१००॥
महोत्सवाचा आनंद उसळला । तो गगनावरुन गेला । परी देहयात्रेला । आली उतरती कळा ॥१०१॥
काया झाली विकल । तो वैदय देती निकाल । आतां कीर्तन थांबवाल । तरींच औषध योजना ॥१०२॥
मामा म्हणती नेमाला । धरुन होतील ते उपचार बोला । ना तारी नामस्मरणाला । केला आहेच वैदयराज ॥१०३॥
अखंड व्हावया कीर्तन । या देहाचे कारण । नातरी विचारतो कोण ? या देहाला ॥१०४॥
ध्येयासाठीं जीवन । ध्येयासाठीं शरीर धारण । ध्येय मानून प्रधान । सदा वर्तणें ॥१०५॥
कवडीच्या लाभासाठीं । ध्येयाची सोडावी लागे मिठी । मग लाभ उठाउठी । काय पदरी पडला ॥१०६॥
देह नव्हें साध्य आपुलें । तें एक परमार्थाचें साधन भलें । परमार्थासाठीं कौतुक चालें देहाचें या ॥१०७॥
नामस्मरणावरी भर । ठेवून मामा राहती निर्भर । इतरांच्या समाधानासाठीं येरझार । चाले वैदयांची ॥१०८॥
काळ चाल करी देहावरी । तंव मामा दिसती देहाबाहेरी । तवं काळ चित्तीं थरारी । अपयशामुळें ॥१०९॥
एकामागून एक । आतां रोग पाठवूं अलौकिक । कोपें काळ लावी धकधक । मामांच्या मागें ॥११०॥
रक्तदाब होता पहिला । तेथें मधुमेह आला वसतीला । रोगराज क्षय घुसला । पाठीच्या मणक्यांत ॥१११॥
मूत्रपिंडात एक शिरले । ‘कँन्सर’ नांव त्याचे भलें । ऐसे सुरुं झाले हल्ले । एकामागोन एक ॥११२॥
एक एक रोग ऐसा । जो चूर करी माणसा । तेथें या चौघापुढें कसा? । निभाव लागावा ? ॥११३॥
वैदय आणि डाँक्टर । घरीं येती वारंवार । तों मामा सुखसागर । दिसती त्यांना ॥११४॥
रोग्याच्या तक्रारीला । अनुसरुन वैदय शोधी रोगाला । जेथे वावचि नाहीं तक्रारीला । तेथे कैची परिक्षा ॥११५॥
सगे सोयरे हितचिंतक । येती मामांच्या नजीक । म्हणती आतां प्रकृति ठिक । आहे कीं कसे ? ॥११६॥
तंव मामा सुहास्यवदन । म्हणती ठीक आहे प्रकृतिमान । रोज करितो कीर्तन । ही साक्ष त्याची ॥११७॥
तवं कांही साक्षेपी लोक । म्हणती चेहर्‍यावरी न दिसे ठीक । रोगाचें न मोडलें बीक । वाटे तुमच्या ॥११८॥
तों मामा देती प्रत्युत्तर । जंव वृध्दपण गांठी घर । तवं हें असेच चालणार । मी आहे सुखरुप ॥११९॥
मामांचे चालें कीर्तन । तवं हे रोग दीन वदन । राममंदिराबाहेर उभे राहून । वाट पाहाती ॥१२०॥
रोगांची वस्ती शरीरीं । फिकीर त्याची न दिसे चेहर्‍यावरीं । जेथें ब्रह्मानंदाच्या लहरीवरी । लहरी उठती ॥१२१॥
परदु:खाची जाणीव । मामांच्या अं:तकरणाचा घेई ठाव । दु:ख विमोचनार्थ सर्व । प्रयत्न मामा करिती ॥१२२॥
शरयू नामं एक कन्या । मामांच्या चरणीं झालीए अनन्या । तो इतिहास आतां न्या । श्रोते हो आपुल्या कर्णी ॥१२३॥
बालवय शरयूंचे । परी वेड मामांच्या कीर्तनाचें । नित्य नेमे वदे वाचे । नाम ईश्वराचें ॥१२४॥
ऐकतां ऐकतां तल्लीन । विसरे देहभान । धरी मामांचे चरण । कीर्तनरंगी ॥१२५॥
लोक म्हणती हे काय ? याला शोधा कांहीं उपाय । हा कीर्तनांत व्यत्यय । येतो रिकामा ॥१२६॥
कोणी म्हणती बंद करा । नको हिला मामांचा वारा । कठोर शब्दांचा मारा । झाला तिच्यावरती ॥१२७॥
शरयू भोळी बालिका । मारी मामा, मामा हांका । म्हणें देवराया आतां ऐका । हांक माझी ॥१२८॥
माता आणि पिता । समजाविती आपुली सुता । परी ती दु:खिता । रडे आणि आक्रंदे ॥१२९॥
म्हणती ऐक बाळ । सांगलींत कीर्तनांचा सुकाळ । दाखवूं रोज एक देऊळ । तुजसाठीं ॥१३०॥
नको करुं हळहळ । जीवाची तळमळ । ऐकून तुझा कल्लोळ । काळीज करपे आमुचे ॥१३१॥
तवं ती म्हणे देवाधिदेवा । आस मामांची लागली जीवा । माझ्या निजसौख्याचा ठेवा । एक मामांचे कीर्तन ॥१३२॥
शब्द नको दुसरा । मजवरी देवा दया करा । मामांच्या चरणाचा आसरा । एकचि मला असो दया ॥१३३॥
अश्रुं ढाळी नयनीं । कळी गेली कोमेजूनी । पिता म्हणें जाईन सदनी । आतां मामांच्या ॥१३४॥
आले मामांच्या घरीं । तों मामा उघडेच होते गादीवरीं । म्हणती शरयू आकांत करी । मामा तुमच्यासाठीं ॥१३५॥
तुमचें कीर्तन ऐकावें । हेचिं तिनें घेतले जीवें भावें । तुमचें कीर्तन ऐकावें । हेचिं तिनें घेतले जीवें भावें । तिजसाठी दार उघडें व्हावें । हेच मी प्रार्थितो ॥१३६॥
ऐसें म्हणून प्रेमळ वडील । धरिती मामांचे चरण कमळ । मामांचे अंत:करण कोमल । हेलावलें ॥१३७॥
लगबगीनें उठलें । आणि घराबाहेर पडले । कपडे घरीं राहिले । मामांची लगबग रस्त्यावरी ॥१३८॥
मागें वदील पुढें मामा । दु:खितासाठीं इतुका प्रेमा । आले घरीं सांडून गृहकामा । शरयूच्या सांत्वनासाठीं ॥१३९॥
श्रीराम धांवले शबरीसाठीं । श्रीकृष्ण द्रौपदीसाठीं । तैशीच ही कथा मोठी । वाटे मज ॥१४०॥
शरयू मनीं आनंदली । मामांचे चरणी विनटली । अश्रुंचा अभिषेक घाली । चरणांवरी ॥१४१॥
शरयू तूं दु:ख आवरी । नित्यनेमें कीर्तन श्रवण करी । कोणी न तुज निवारी । येथून पुढें ॥१४२॥
करोनि संसाराची होळी । झाली नामरुपा निराळी । मामांची सेवा सर्वकाळीं । करी मनो भावे ॥१४३॥
जें उमज पडेल तें काम । करी सर्व भावें उत्तम । हें गौण हें प्रधान हा तरतम । भाव तिच्या जवळीं नसे ॥१४४॥
ऐसा देह कष्टविणें । हें तपासि काय उणें । हे अखंड भाग्याचें लेणें । भाग्यवंतासचि मिळे ॥१४५॥
ही सेवा पाहतां । उल्हास ये माझ्या चित्ता । जेथें आमची कर्तुत्वता । फिकी पडे ॥१४६॥
तिची माता आणि पिता । भाविक तैशीच उभयतां । तिच्या सेवेने संतुष्टता । ये त्यांच्याही चित्तासी ॥१४७॥
कन्या संसार पराड्मुख । आणि माता पित्यासी हरिख । ऐसे अपवादात्मक देख । संसारी असती ॥१४८॥
मामांची करावी सेवा । चित्तीं साठवावा नामठेवा । संसार सुखाची कधी न पर्वा । हें कथन शरयूचे ॥१४९॥
सेवेंत मानून आनंद । ती प्रसन्न करी श्रीगोविंद । करी मामांच्याशी सुखसंवाद । परमार्थाचा ॥१५०॥
सदा रत साधनीं । कधीं न दिसे अभिमानी । कार्यमग्न अनुदिनीं । दिसे सदा ॥१५१॥
नित्य नेम मामांचा । श्रीहनुमंत समाधिमंदिरीं जाण्याचा । प्रात:काळी आवडीचा । ऐसे प्रेम तात्यांचे ॥१५२॥
हळूं हळूं उठती । कोणाचा तरी आधार घेती । शरयूची भक्ति । मामांच्यावरी मोठी ॥१५३॥
ती नेई मामांना । जीवें भावें जपे त्यांना । अति आनंद तिच्या मना । सेवेंत मामांच्या ॥१५४॥
ती म्हणे मामा । मज नेती पुण्यधामा । या सुखास उपमा । शोधूं कोठें ? ॥१५५॥
संत भेटती संतांना । तें सुख माझ्या नेत्रांना । नित्य नवें वाटतें मना । आनंदी आनंद ॥१५६॥
यमुना मिळाली गंगेला । तैसे मामा भेटती श्रीहनुमंतांना । कीर्तन सरितांच्या संगमाला । स्नान घडतें नित्य मज ॥१५७॥
सद्गुरुवचनाची खूण आंत । तीच सरस्वती गुप्त । हा त्रिवेणी संगम सतत । साधे कोणा ? ॥१५८॥
भजन कीर्तन साधन । राम करी ज्ञानेश्वरी प्रवचन । भक्तांचें शंकानिरसन । हा क्रम अव्याहत ॥१५९॥
लोक येती राममंदिरीं । संसारदु:ख ठेवूनी घरीं । मामांच्या चरणांवरी । मस्तक ठेविती ॥१६०॥
क्षणभर पाहोन प्रसन्न वदन । जाती मग आनंदून । हृदयीं सद्विचारजल साठवून । ओतिती संसार दु:खावरी ॥१६१॥
काशी, प्रयाग रामेश्वर । गोकर्ण आणि बद्रीकेदार । अयोध्या, द्वारका, पंढरपूर । या राममंदिरी असे ॥१६२॥
येणे परी काल क्रमिता । वर्षे लोटली बहुता । साठीं उलटून गेली न कळतां । कार्यमग्न मामा असती ॥१६३॥
माईसाहेब दांडेकर । म्हणती आणखी न करावा उशीर । साठीशांतींसाठी बोलवा सत्वरा । शुध्द आचारशील ब्राह्मण ॥१६४॥
माईसाहेबांनी हट्ट धरिला । म्हणती जरी उशीर झाला । तरी समारंभ पाहिजे केला । यथासांग ॥१६५॥
मनीं आणिती तें करितीं । ऐसी माईसाहेबांची ख्याती । त्यांनी केली पूर्ति । आपुल्या वचनाची ॥१६६॥
ऐसे असंख्य भक्त मामांचे । अकृत्रिम प्रेम त्यांचे । तन-मन-धन वेंचून स्वत:चें । आनंद मानती ॥१६७॥
धर्मकृत्य यथासांग । झाले परिपूर्ण सर्वांग । जेणें धालें अंतरंग । भक्तजनांचे ॥१६८॥
रसाळ चरित्र मामांचे । भाग्य खरें वाचकांचें । कारंजें ब्रह्मरसाचें । उडती येथें ॥१६९॥
क्षणोक्षणीं मज वाटते । माझें सामर्थ्य कमी पडते । वर्णन करण्या चरित्र पुरते । मामांचें ॥१७०॥
फिर फिरुन मिटून लोचन । करितो सद्गुरुस्तवन । मागतो करा न्यून पूर्ण । या ग्रंथी ॥१७१॥
तुमच्या कृपेचा मेघ वळतां । आनंद उसळेल गगनावरुतां । माझे शब्द तेथें न्हातां । पावतील मोल रत्नांचे ॥१७२॥
म्हणोनियां वारंवार । मस्तक ठेवितो चरणांवर । विनवितो जी सद्गुरुवर । करा कृपा मजवरी ॥१७३॥
जैसे तुमचे आचरण । तैसेच व्हावें माझें वर्णन । तेथें नसावें अधिक न्य़ून । ही माझ्या मनीं भावना ॥१७४॥
चरित्र तुमचें कामधेनू । निववील तनु आणि मनु । करील मार्ग सुगमु । कैवल्याचा ॥१७५॥
आतां पुढील अध्यायीं । पाहूं त्रितप महोत्सवाची नवलाई । भक्ति रसाची पाणपोई । रस चाखूं तेथील ॥१७६॥

इति श्री गोविंदचरित मानस । जें स्वभावेंचि अति सुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । रौप्य महोत्सव वर्णन नाम अष्टमोध्याय ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP