अध्याय पाचवा - कीर्तन बहिरंग परीक्षण

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


यम नियमांच्या उभोरोनी भिंती । ज्यांनी मायेसीं ठेविली परती । त्या सद्गुरुंचे चरणचित्तीं । मी सद्भांवे नमितो ॥१॥
अविरत साधोनी साधना । ज्यांनी ईश्वर आणिला सदना । त्या सद्गुरुंच्या चरणवंदना । आजि करुं सद्भावें ॥२॥
मामांनी घराची दुरुस्ती केली । श्रीराम मंदिराची उभारणी झाली । संसारग्रस्तांना निश्चितिची साऊली । मिळूं लागली ॥३॥
त्रयोदशाक्षरी मंत्राचें संपूर्ण । साडेतीन कोटींचे पुरश्चरण । झालें तो दिन । सुवर्णाक्षरीं मंत्राचें संपूर्ण । साडेतीन कोटींचे पुरश्चरण । झालें तो दिन । सुवर्णाक्षरीं लिहिण्याजोगा ॥४॥
श्रीराममंदिरी प्रभूचें । वास्तव्य झालें कायमचें । हें जाणोन मारुतिरायांचे । मन झालें सुप्रसन्न ॥५॥
तो इतिहास मौजेचा । ठाव घेईल अंत:करणाचा । विषय सर्वांच्या कौतुकाचा । झाला मनोरम ॥६॥
श्रीसमर्थांच्या वेणाबाईचा । मठ आहे मिरजेंत पुरातनाचा । तेथें समर्थांच्या हातचा । मारुती असे कोरलेला ॥७॥
जो वेणाबाईंच्या रक्षणाला । श्रीसमर्थांनीं प्रेमे दिला । तो देवची म्हणें आतां चला । मामांच्या घरीं ॥८॥
म्हणोनि मठाधिपतींना । मिळाली अतंस्थसूचना । कीं हा मारुती दया मामांना । सांगलीस नेऊनी ॥९॥
ही प्रसादमूर्ति घेउनी । मठाधिपति सांगलीस नेऊनी । मामांच्या स्वाधीन मूर्ति करुनी । आनंदी आनंद केला ॥१०॥
मामांच्या पुरश्चरणाचें । लौकिक फळ हें भाग्याचें । प्रसादचिन्ह साक्षात्काराचें । वाटलें विचारवंतांना ॥११॥
आत्मज्ञानाचा सुखविलास । मुखाविण चवीं ज्यास । ती कशी कळे इतरांस । म्हणोन ही योजना विधात्याची ॥१२॥
श्री दासबोधाचे निष्ठावंत वाचक । मामा, वर्षे कित्येक । म्हणोन हा प्रसाद वेंचक । श्रीसमर्थ देती ॥१३॥
जेथें राम तेथें हनुमान । ऐसे हें प्रसिध्द वचन । येथें हे परिपूर्ण । उमगून आलें ॥१४॥
जेथें मानवी बुध्दि न चाले । तेथें ईश्वराचें राज्यकळे । विवेकी जन भलें । ओळखतीं त्या खुणा ॥१५॥
श्री शंकर श्रीकृष्णदेव । जे श्रीसमर्थभक्त आजीव । करण्यास श्री मूर्तींचा गौरव । आले मामांचे घरी ॥१६॥
संत श्री हनुमंत । श्रीरामाचे परम भक्त । आले कृपाप्रसादार्थ । मामांच्या घरीं ॥१७॥
तो ही इतिहास मौजेचा । सांगेन अति आनंदाचा । समारंभ थाटाचा । झाला त्या दिवशीं ॥१८॥
नाना आणि मामा । गेले तात्यांच्या पुण्य धामा । विनविती पुरुषोत्तमा । यावें भोजना म्हणोनी ॥१९॥
भाविकांचा भाव देखोन । तात्या सदैव देती अनुमोदन । देती संमति आनंदून । मामांना ॥२०॥
संत येती धरां । हा आनंद पिता-पुत्रां । म्हणती आतां तयारी करा । उणें नको कांहीं आतां ॥२१॥
मामीही मनीं आनंदली । बारीक लक्ष घालूं लागली । दही विरजूं घाली । श्री हनुमंतस्मरणें ॥२२॥
तों त्यास अमृताची चव आली । ती तात्यांनी अनुभविली । मधुरवाणी बोलूं लागली । तात्यांची ॥२३॥
अहो काय मथुरेच्या गवळणी । आणिती येथें दही लोणी । ज्या रंगल्या कृष्ण स्मरणीं । म्हणोनी रस मधुर ॥२४॥
अहो अंताजीपंतनाना । असें दहीं घरीं आणाना । मंडळी डोलवितील माना । सुखस्वादें ॥२५॥
भक्तींचा वाहे वारा । तेथें स्त्रवतीं अमृत धारा । मामीच्या संसारा । आलें हें महद्भाग्य ॥२६॥
मंडळी बसली भोजनाला । मुखीं ग्रास जातां ब्रह्मरस झाला । सुगंध दरवळला । सभोंवार ॥२७॥
मामा उभे जोडोनी हात । स्वस्थ असा ऐसे विनवित । श्रीहनुमंतातें अर्पित । भावांजलि ॥२८॥
योग सर्वदा असावा । तव सेवेंत देह पडावा । आशीर्वाद असावा । सदा भक्तावरी ॥२९॥
ऐसे मामा विनविति । हात जोडोनी पुढत पुढतीं । अंगीं रोमांच प्रेम चित्ती । नयनी नीर ॥३०॥
श्री हनुमंतांची प्रसादगिरा । वर्षली जैसी अमृतधारा । जी चित्तांत घेई थारा । भक्तजनांच्या ॥३१॥
कडाडोनी वीज पडो । कीं धरणी जलामाजीं बुडो । देह वणव्यामाजीं पडो । परी नाम न सोडी ॥३२॥
ऐसा भाव जडेल जेव्हां । क्षण न लागतां तेव्हां । कृपाशिर्वाद हां हां म्हणतां होई ॥३३॥
ऐसा संवाद गुरुभक्तांचा । मध्यें स्वाद षड्रस अन्नांचा । सुखविलास भोजनाचा । मुखी आणि कर्णी ॥३४॥
तृप्त झाली मंडळीं । सण दसरा आणि दिवाळी । मन दे आतां टाळी । आनंदाची ॥३५॥
वेळ गेला किती ते कळेना । संत भेटीची इच्छा पुरेना । तात्या म्हणति नाना । “आतां येतो’ ॥३६॥
तंव भक्त मंडळी चरण धरिती । तात्या कृपाशीर्वाद देती । या अपूर्व प्रेमाची स्थिती । कोण वर्णू शकेल ॥३७॥
क्षण एक पर्यंत । तात्या झाले संचित । मनीं योगून पुढला बेत । म्हणती अहो बापूराव ॥३८॥
वेळ सायंकाळी पांचची । तुम्हा असे सोईची । फलश्रुती या वचनाची । उमगली पुढें ॥३९॥
तात्या म्हणति मनांत । आणखी येणे आहे येथ । एवढेंच पुरे तूर्त । म्हणोनि गप्प राहिले ॥४०॥
तात्या घरीं गेले । उमटली त्यांची पाऊंले । त्यांनी मनोरथ पूर्ण केलें । मामांचे ॥४१॥
तात्या विचारिती मनांत । आला आतां देहाचा अंत । परी आपुले भक्त असंख्यात । अंतरतील किर्तना ॥४२॥
हरि किर्तनाचा गजर । हेचि सांगलीचे वैभव थोर । तें रहावें हा विचार । त्यांनी केला ॥४३॥
देह यातनांनीं गांजला । सर्वस्वी पराधीन झाला । खूण गांठ मनाला । तात्यांनी बांधली ॥४४॥
शके अठराशे पंचेचाळीस । पौष वदय षष्ठीस । रविवार हा दिवस । तात्या अमर झाले ॥४५॥
संत देह सोडोनी जाती । तरीही भक्तांचे हित पाहती । म्हणोन तें आम्हांस वाटती । प्रिय सर्वस्वेसी ॥४६॥
पुन: आली माघ वदय तृतीया । आठवण आली हनुमंत राया । म्हणती चला जाऊयां । बापूरावजींकडे ॥४७॥
वेळ रात्रींच्या बाराची । मामांच्या दासबोध वाचनाची । संयमीं जनांच्या जागरणांची । निजसुखासाठीं ॥४८॥
अध्यात्माची चर्चा । श्रीसमर्थांची रंगली वाचा । निर्गुण ब्रह्म शब्दाचा । विषय झाला समर्थांच्या ॥४९॥
नेति नेति वेद म्हणति । तरिही वर्णनाची शिकस्त करिती । संत तरी विडा उचलती । निर्गुण वर्णनाचा ॥५०॥
कळतां कळतां कळेनासे । न कळतां कळलेसें । अंधारामागून प्रकाश दिसे । ग्रंथराज दासबोधी ॥५१॥
अवर्णनीयाचें वर्णन । हेचिं संतांचे अद्भुत महिमान । मामा गेले वेडावून । ब्रह्मवर्णनी ॥५२॥
अध्यात्म आलें रंगांत । ब्रह्म आलें मायातींत । तों संत श्री हनुमंत । साक्षात् प्रगटले ॥५३॥
म्हणोन मन घातलें ग्रंथांतरीं । तों पानांपानांवरी । श्री हनुमंत दिसों लागले ॥५४॥
मन मन हडबडलें । प्रसन्न वदन पुन: देखिले । उठोन उभें राहिलें । शाल घातली बैसावया ॥५५॥
घ्यावें जी आसन । बोलिले चरण वंदून । तव तें प्रसन्न वदन । काय खुणावती ॥५६॥
खंड नको वाचना । आम्हीही करुं श्रवणा । मान देऊन वचना । मामा वाचती ॥५७॥
संपलें दासबोध वाचन । तों मामा बोलती कर जोडून । आनंद झाला दिसें दर्शन । भाग्य माझें उदेले ॥५८॥
माघ वदय प्रतिपदेपासून । दासनवमीपर्यंत संपूर्ण । वाचावा दासबोध हें मनीं धरुन । आजपर्यंत वागलों ॥५९॥
किर्तन सेवा ही करावीशी वाटलें । म्हणून किर्तन सुरुं केले । आज तीन दिवस झालें । प्रतिपदेपासून ॥६०॥
तेंच अखंड चालावें । अनुदिन नामसंकीर्तन व्हावें । हें मनीं घेतलें स्वभावें । तों आज झाले शुभ दर्शन ॥६१॥
वाटे शकुन हा भाग्याचा । दिवस अत्यानंदाचा । निश्चय मनाचा । आज होई ॥६२॥
जरी आज्ञा होईल आपुली । कराल कृपेची साऊली । तरीच जी इच्छा मनीं धरिली । ती पूर्ण होईल ॥६३॥
तवं ते संतदयावंत । खुणेनें अनुमति देत । तों मामा झाले निवांत । चरण धरिले ॥६४॥
वरद हस्त आला शिरावरीं । आनंद उसळे हृदयांतरीं । स्वेद रोमांच शरीरीं । मामा झालें सुख संपन्न ॥६५॥
मज कळले कर्णोपकर्णी । की तात्या गेले पूर्वीच बोलुनी । चालवितील किर्तन तरंगिणी । श्री बापूराव ॥६६॥
शके अठराशे पंचेचाळीस । माघ वदय प्रतिपदेस । केली सुरुवात किर्तनास । तेंच पुढें चालले ॥६७॥
किर्तनसेवा भारतांत । प्राचीनकाळापासून विख्यात । मधुर वादयांचा झंकार । भक्तिगीतांचा मधुर स्वर । मध्यें अध्यात्मचर्चेचा विस्तार । पदोंपदीं ॥६९॥
ज्यांना भगवंताची आवडी । त्यांची येथेंच पडेल उडी । आनंद सरिता दुथडी । भरोन वाहे ॥७०॥
ताल उत्तम सूर उत्तम । संगीताची साथ मनोरम । हरिदासाचे वाक्पटुत्व अनुपम । सखोल ज्ञान तैसेचि ॥७१॥
वरी गोड भक्तिरसाची । आवडी सुरस वर्णनाची । आणि जोड काव्यगुणांची । अधिकस्याधिकं फलम् ॥७२॥
ऐशी किर्तन संस्था । भली । नांवारुपास आली । लोकप्रियता पावली । अतोनात ॥७३॥
तों आली अवकळा । किर्तनाचा झाला रंग निराळा । इतर जन झाले गोळा । झाली किर्तनाची नासाडी ॥७४॥
ज्यांनें त्यांनें उठावें । किर्तन संस्थेस राबवावें । समाजकार्य राष्ट्रकार्य साधावें । इच्छा परत्वें ॥७५॥
हा पोटाचाही झाला व्यवसाय । लोक शोधिती नाना उपाय । लोकरंजन हें कार्य । त्यांनी आरंभिले ॥७६॥
किर्तन संस्थेस पूर्वपदीं । नेऊन जमवावी संतनांदी । अध्यात्माच्या सुखसंवादी । आणावें भाविकासी ॥७७॥
म्हणोनी तात्यांनी अट्टाहास केला । किर्तनास त्यागाचा रंग दिला । परमार्थाच्या कूट प्रश्नास आला । बहर पुन: ॥७८॥
तेथें चालें भक्ति गुणगान । जेथें देव नाचे आनंदून । जें किर्तन मोक्ष साधन । जडजीवासी ॥७९॥
जें किर्तन साधुसंत । करीत आलें आजवर सतत । श्री नामदेव तुकाराम एकनाथ अविरत । झटले ज्यासाठीं ॥८०॥
अशा किर्तनास वैभवाचे स्थान । देऊन श्रीनारद केलें प्रसन्न । म्हणोन तात्यांचे गुणगान । सांगलीत होतसे ॥८१॥
तें किर्तन खरें कीर्तन । जें माया मोहाचें तोडी बंधन । तेथें हा रुक्मिणीपांडुरंग नंदन । उभा रंगणीं नाचाया ॥८२॥
तात्यांनी किर्तनपरंपरा । चालविली या नगरा । केला परमार्थाचा पसारा । अपरंपार ॥८३॥
अगाध विद्वत्ता । कुशल वाक्पटुता । अध्यात्मावरी सत्ता । अढळ तात्यांची ॥८४॥
प्रांतोप्रांतीचे संतजन । त्यांनी केलें जें जें कवन । तें तात्यांनी मुखोद्गत करुन । उदार हस्तें प्रसारिलें ॥८५॥
झाला सर्वतोमुखीं वेदान्त । परग्रामस्थ आश्चर्यचकित । ऐशी समृध्दि तात्यांनीं येथ । सांगलीत केली ॥८६॥
उत्तम बीज जमा केलें । उत्तम शेत नांगरलें । अविश्रांत मेहनतीनें पेरलें । अफाट क्षेत्र ॥८७॥
आपुल्यापुरता परमार्थ । करुन सुखे झाले असते कृतार्थ । परंतु साधावया परमार्थ । कण कण आयुष्य वेंचलें ॥८८॥
तव देहाचा आसरा सुटला । तात्यांचा आत्मा जगदांतरी राहिला । त्यांनी पुन: सोस धरिला । भक्तजनांच्या हिताचा ॥८९॥
जेथवरी कार्य झालें । ते त्यापुढे पाहिजे चालविलें । म्हणोन मामांच्या किर्तनाचें झालें । वेगळेंच रुप ॥९०॥
बालबालिकांचें शिक्षण । तेथवरी भरपूर मनरंजन । प्रतिदिन नित्य नवीन । साधन करमणुकींचें ॥९१॥
पुढें येतां जाणपण । सायास करणें लागे कठीण । सारपूर्ण तत्वशोधन । करणें लागे ॥९२॥
वधुवर उतरतां बोहल्यावरुन । मिरविती चौघडे वाजवून । संसाराची आंच लागतां दारुण । जीव होय कासावीस ॥९३॥
कार्यारंभी नाटक । नाच गांणे आकर्षक । पुढें व्याप वाढता धकधका हृदय होय ॥९४॥
आदि मध्य आणि अंती । कार्याची एकचि नसे गति । जैसे महत्व तैशी मति । वळली पाहिजे ॥९५॥
काय आहे तें समजलें । काय पाहिजें तें कळलें । पुढें करणें तेंचि पाहिजे केलें । आणि तेंच अवघड ॥९६॥
अध:पात झाला कैसा । जीव सोडवावा कैसा । त्याचा मार्ग नीटसा । समजोन आला ॥९७॥
आतां आहे मार्ग क्रमणें । नकाशा बरहुकूम चालणें । सोडोनी वाउगी आकर्षणें । नित्यनेम साधण्या ॥९८॥
यासांठी आणोनी मना । करुन पूर्ण योजना । तात्यांनी निवडिलें मामांना । या कार्यासाठीं ॥९९॥
सांडोनी व्याप सगळा । जो गळां घालील नाममाळा । ऐसा पुरुष केला गोळा । तात्यांनी ॥१००॥
सांडोनी लौकीकाची आस । जो धरील नामाची कास । सिध्दपणीं साधकत्वाचा अट्टाहास । करील जो ॥१०१॥
वृथा तीर्थ क्षेत्रीं भटकणें । हें ज्यास वाटेल कंटाळवाणें । देह काशींत आत्मलिंग पहाणें । शिकवील जो ॥१०२॥
वृथा न करोनि वाचेचा गोंधळ । मतामतांचि वृथा भेसळ । नामस्मरणी निर्मळ । राहील जो ॥१०३॥
कोणी येवो अथवा जावो । ज्याचा न ढळे सद्भावो । अखंड साधनाचा उपावो । शोधील जो ॥१०४।
निष्ठावंत साधकांचे । संदेह निवारिल मनींचे । समाधान त्यांच्या जीवांचे । करील जो ॥१०५॥
ऐसा पुरुषोत्तम निवडणें । त्यासी सर्वभावे जपणें । आपुल्या भक्तांचे करणें । अक्षय हित ॥१०६॥
ऐसे प्रेमळ दयावंत । ऐश्वर्यवंत गुणवंत । प्रतापवंत हनुमंत । संत तात्या ॥१०७॥
छत्रपति श्रीगुरुलिंगजंगम । सुत्रचालक अनुपम । म्हणोन एकामागोन एक उत्तम । संत पाठविती ॥१०८॥
कार्यपरत्वें संत । एकत्वीं अनेक भासत । चरित्र त्यांचे चकित । करी सामान्य जना ॥१०९॥
असो, मामांचे किर्तन । तात्यांच्या किर्तनाहून भिन्न । कां त्याचें वेगळेपण । हें स्पष्ट करुन । दाखविणें असे ॥१११॥
तबला, पेटी आणि वीणा । तालसूर आणि ताना । साथीदार मंडळी नाना । ही उपाधि कीर्तनाची ॥११२॥
वक्तृत्व आणि समयसूचकता । पाठांतर आणि विद्वत्ता । मधुर भाषण विनोद प्रचुरता । ही रंजकता वक्त्याची ॥११३॥
रस आणि अलंकार । सुरस गोष्टी आख्यानें सुंदर । हावभाव कोटया प्रचुर । ही आकर्षणें श्रोत्यांची ॥११४॥
रसाळ वक्ता रसिक श्रोता । मिळतां आनंद भरें क्षण न लागतां । रंग जमें हां हां म्हणतां । हा योगचि अपूर्व ॥११५॥
असामान्य गुणांचे वेड । क्षणभरी काळ करी गोड । परी त्या गुणांची जोड । सामान्यास मिळेना ॥११६॥
गुणसंपन्न वक्ता । क्षणभरीं मोह पाडी चित्ता । तेणें होय गुण संपन्न श्रोता । हें तों घडेना ॥११७॥
ज्या गुणांची जोड मिळतां । श्रोत्यांची होय सार्थकता । त्यास मिळेल वक्त्याची योग्यता । हा मार्ग उत्तम ॥११८॥
पराकाष्ठा करुन साधनाची । ज्यांनी जोड केली देवाची । मनरंजनांच्या क्षुद्र सिध्दींची । नव्हतीच मातब्बरी त्यांना ॥११९॥।
इच्छा तसे प्रयत्न । प्रयत्न तैसें साध्यसाधन । साध्य साधतां निर्विघ्न । मार्ग वाटे ॥१२०॥
इच्छा तेथें मार्ग सुलभ । मामांनाही झाला असतां लाभ । प्रयत्नाअंतीं काय दुर्लभ । या जगामध्ये ॥१२१॥
क्षणभर करमणूकीसाठीं । पडाव्या बहुजनांच्या गांठीं । या कधींच नव्हत्या गोष्टीं । मनामध्यें मामांच्या ॥१२२॥
साधक करावे प्रयत्नशील । आपणां ऐसें सत्वशील । म्हणोनी प्रयत्न विपुल । मामांनी केला ॥१२३॥
सामान्य जनामध्यें रहावें । सामान्यासारिखें वागावें । अलौकिक तें राखावें । आंतील आंत ॥१२४॥
देव भावाचा भुकेला । न पाही अलौकिक गुणांला । तो भुले भक्तीला । तेथें असा निष्ठावंत ॥१२५॥
ताल चुकला गातांना । तरीही देव डोलवतील माना । चांचरति शब्द बोलतानां । तरीही देव मंत्रमुग्ध ॥१२६॥
यासाठीं आगांतुकांची भेसळ । टाळावी समूळ । म्हणोनी करमणुकीचा खेळ । मामांनीं नाहीं केला ॥१२७॥
कोणी आला कोणी गेला । जरी कोणी केला गलबला । हर्ष विषाद न शिवे मनाला । मामांच्या कधीं ॥१२८॥
कधीं न येती रागासी । प्रेमें बुझाविती सर्वासी । लहान तरी बालकांसी । अत्यादरें वागविती ॥१२९॥
कधीं श्रोत्यांची खेंचाखेंच । कधीं त्यांची वानवाच । परी किर्तनाचा रंग तसाच । राही मामांच्या ॥१३०॥
देवभक्तांची दृष्टादृष्ट होतां । कीर्तनासीं, रंगभरे अवचिता । रंगले त्यांना श्रोत्यांची वार्ता । कधींच नसे ॥१३१॥
माझें किर्तन माझ्या देवासाठीं । आत्मसुखाच्या उल्हासासाठीं । ही मामांची दृष्टि मोठी । म्हणून किर्तन अखंड झालें ॥१३२॥
सप्रेम मिळे जेंव्हां श्रोता । तेव्हां आनंद मामांच्या चित्ता । अखंड त्याच्या हिता । मामा जपती ॥१३३॥
जेव्हां श्रोत्यांचे दुर्लक्ष । तेव्हां मामा अंतरीं दक्ष । कीर्तन रंगीं त्याची साक्ष । साक्षेपी श्रोते घेती ॥१३४॥
कोणी कांहीं विचारी । तरीच उघडावी वैखरी । नातरी आपुल्या नेमावरी । लक्ष अढळ ॥१३५॥
कोणी निंदा कोणी वंदा । मामा म्हणतिइ स्वहित साधा । होईल तैसा करा धंदा । स्वहिताचा ॥१३६॥
जीं सुदैवें मिळाली शिदोरी । ईश्वरीं इच्छेनें बरी । तीच मानोनी पुरी । रहावें संतुष्ट ॥१३७॥
जो घाली नरजन्मासी । तो जन्म योग्य देव भेटीसी । तेथें उणें कैसें सामग्रीसी । ठेवील श्रीहरि ॥१३८॥
ईश्वराची भक्ती करणें । हेंचि सर्वांनी साधणें । आणि यासांठी मानणे । संसार गौण ॥१३९॥
प्रत्येकानें करावें । आपुल्या जीवीं धरावें । संसार उतरुन जावें । पैलपार ॥१४०॥
नित्यनियमानें नियमित भजन । मामा कीर्तनी करविती आपण । जरी श्रोते जाती कंटाळून । तरी मामा न सोडीती ॥१४१॥
एकदां श्रीतुकाराम महाराजांना । श्रोते विनविती उत्तम कीर्तन कराना । महाराजांनीं सुरुं केले भजना । रात्र संपेपर्यंत ॥१४२॥
यांचें नांव उत्तम कीर्तन । मामा म्हणती आनंदून । करा टाळ्या वाजवून । भजन देवाचें ॥१४३॥
लोक म्हणती हें भजन । जातें मन कंटाळून । तरी मामा ठेका धरुन । अष्टोत्तरशत ॥१४४॥
सार तेंचि जीवीं धरणें । पुन: पुन्हा तेंचि वदणें । कंटाळा न करितां उच्चारणें । रामनामावळी ॥१४५॥
हितकर आणि पथ्यकर । तेथें कडू गोडाचा न करणें विचार । ऐसे मामा धन्वंतरी थोर । भवरोगावरी ॥१४६॥
अचूक तेंचि साधिती । जेणें भवरोगाची होय शांति । याचसाठीं अवतारस्थिति मामांची होती ॥१४७॥
मामांची कीर्तन धारा । अव्याहत चालली या नगरा । लौकिकाचा पसारा । आवरोन पूर्ण ॥१४८॥
लोक म्हणती अहो मामा । कां घालवितां वेळ रिकामा । काय लोकांना या अमृतनामा- । मध्यें गोडी ॥१४९॥
तवं बोलती संतदेव । आहो हा माझा स्वभाव । लोक रिकामी उठाठेव । काय थोडी करिती ॥१५०॥
चहा पिती वणवण फिरती । गप्पा तरी किती मारीती । तशीच ही माझी रीति । समजा तुम्ही ॥१५१॥
प्रश्न तसें उत्तर । परी अंतरीं फेर फार । एक उरवी येरझार । एक सरवी ॥१५२॥
बाळपणापासूनचा । छंद कीर्तनाचा । तोचि एक जीवनाचा । हव्यास मामांचा ॥१५३॥
मामा करिती किर्तन । हाती वीणा आणि चिपळ्या घेऊन । नाना झांज धरुन । साथ करिती पुत्राची ॥१५४॥
छोटया चिपळ्या हातीं । आणि छोटा वीणा गळ्याभोंवती । बालराम मामांच्या भोंवती । नाचे कीर्तनांत ॥१५५॥
ऐसे मनोरम वैभव । पुरवी मनींची हांव । साथ करिती मामांना । डोलविती माना । अत्यादरें ॥१५७॥
तंव राम झाला मोठा । करी पाठांतराचा सांठा । संत वाड्मय ओठा- । वरी त्याच्या ॥१५८॥
नानांच्या मागें । राम साथ करी वेगें । सुदैवाचे धागे । कसे विणलें पहाना ॥१५९॥
पुढें योग सीता-राम विवाहाचा । आला मौजेचा । तेणें केळकर कुलाच्या भाग्याचा । नवा अध्याय उघडला ॥१६०॥
कर्ता करविंता देव । पुरवी कोड सदैव । मामांचा किर्तनराव । अखंड चालण्या ॥१६१॥
बळवंतराव मराठे श्रीमंत । आले घरांत । वर संशोधण करणें हा मनांत । हेतु धरोनी ॥१६२॥
हा केळकर गोवंडे संबंध । उभय कुलांची एक सांध । साधण्या आलो निर्वेध । म्हणती बळवंतरावजी ॥१६३॥
तवं मामा म्हणती बळवंतरावांना । येथें ना अधिकार, ना संपत्ति कोणा । ना मान, ना प्रतिष्ठा जीवना । जी अपेक्षा बहुतेकांची ॥१६४॥
आम्ही तरी सामान्य जन । आपण आहांत श्रीमान । संबंध कैसे येतील जुळुन । मज आश्चर्य वाटतें ॥१६५॥
तेव्हां बळवंतरावजी म्हणतीं । तुम्हीं आणूं नका चित्तीं । आम्ही सर्व चौकशीं अंती । आलो आहो येथें ॥१६६॥
जेथें सच्छींल आणि सुविचारी जन । तेथें कशाचीं न पडें वाण । ही आमची श्रध्दा पूर्ण । म्हणोन आलो ॥१६७॥
चारित्र्य संपन्न घराण्याशीं । संबंध जुळावें हें मनाशीं । धरोन आलो पायाशीं । नाहीं म्हणूं नका ॥१६८॥
मामा देती रुकार । तो मंगलवादयांचा झाला गजर । नृसिंहवाडी येथे सत्वर । झाला सीता-राम विवाह ॥१६९॥
ऐशापरी दिवस जातां । वाढो लागे किर्तन सरिता । कीर्ति पसरली न सांगतां । दिगंतरी ॥१७०॥
पश्चिमेस ढळतां सूर्यनारायण । ऐके मामांचे किर्तन । त्यांत खंड न एक दिन । अडतीस वर्षे ॥१७१॥
येणें परी किर्तन बहिरंग । यथामति वर्णिले सांग । आतां किर्तनाचें अंतरंग । पुढील अध्यायीं ॥१७२॥

इतिश्री गोविंद चरितमानस । स्वभावेचि जें अतिसुरस तेथें अखंड उसळेल भक्तिरस । किर्तन बहिरंग परिक्षण नाम पंचमोध्याय: ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP