मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गोविंदचरितमानस| संत दर्शन श्री गोविंदचरितमानस अणुक्रमणिका प्रस्तावोध्याय ज्ञानेश्वरदर्शन संसार स्थितिवर्णन साधन सिध्दता कीर्तन बहिरंग परीक्षण कीर्तन अंतरंग परीक्षण जीवन प्रसंग वर्णन रौप्य महोत्सव वर्णन त्रिताप महोत्सव वर्णन पुण्यधाम दर्शन संत दर्शन निर्याण प्रसंग कळसाध्याय पूर्णविराम आरती अध्याय अकरावा - संत दर्शन भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र. Tags : govindacharit manasmarathiगोविंदचरित मानसमराठी संत दर्शन Translation - भाषांतर यश कीर्ति आणि प्रताप । न इछिताही जोडपे अपाप । पूर्ण होताची तप । मामांचे ॥१॥कीर्ति हा सुगंध सत्कृत्यांचा । यश हा वाटा धर्माचा । प्रताप हा ठेवा ईश्वराचा । मनुष्यापाशीं ॥२॥जेथ हें तीन्ही एकवटले । ते परम भाग्यवंत ठरले । संत सज्जनांचें लागलें । लक्ष त्याकडे ॥३॥सहज उद्गार गौरवाचें । येती ज्याच्या त्याच्या वाचे । म्हणती कलियुगीं हें भाग्य आमुचें । म्हणोनि घेती संतदर्शन ॥४॥नित्य नेम तडीस गेला । साधनाभ्यास पुरा झाला । शुध्दाचरणाचा कित्ता दिसला । सामान्य जनांनाहि ॥५॥महापुरुषांचे दिव्यत्व दर्शन । लोकांसी घडावया कारण । ईश्वर पसरवी कीर्ती आपण । भक्ताची इच्छा नसतांहि ॥६॥देणें ईश्वराचें । ते न इच्छिताही भोगावयाचे । नातरी अंगीं आदळायचें । हा विधिक्रम दिसे ॥७॥सागराच्या शांत लहरी । पोंचती दूर किनार्यावरी । हा सहज क्रम परी । चाले अव्याहत ॥८॥तैसा मामांच्या कीर्तीचा सुगंध । दशदिशा पसरला अनिर्बंध । फोडोनिया बांध । जें मामांनीं सुविचारें घातलें ॥९॥कीर्ति ठेवून दूर । मामांनीं चालविला परमार्थ खडतर । परी देवाची इच्छा अनिवार । वेगळीच दिसे ॥१०॥पंख फुटले कीर्तीला । ती पसरली दशदिशाला । हरएक समंजस व्यक्तीला । वाटे दर्शन ऐकूं ॥१३॥ते मुक्त कंठानें प्रशंसति । मामांना वाखाणति । गांठी भेटी होतां आनंदती । अकृत्रिम सौख्यभरें ॥१४॥पौत्र श्रीगुरुलिंगजंमांचे । श्रीनागाप्पाण्णा नाम त्यांचे । थोर सिध्द परी कीर्तीचे । वावडे त्यांना ॥१५॥आले मामांच्या घरीं । भेटून आनंदले अंतरीं । आनंदाच्या लहरीवरी । लहरी अंत:करणांत ॥१६॥निरोप घेऊन टांग्यात । बैसले जाण्याचा करुन बेत । परी घोडयानें पाय रोवले तेथ । हालेना जागचा ॥१७॥तव श्री सद्गुरु बोलले । पहा कैसे नवल झाले । या घोडयांच्या मनानेंही घेतले । विरह दु:ख अनिवार ॥१८॥ऐसें प्रेम एकएक संतांचे । वर्णन करतां मन आनंदानें नाचे । भाग्य श्रोत्यांचे । आणि लेखकांचेही ॥१९॥शंकर महाराज मिरीकर । महाराज ताम्हनकर । तसेच संत श्री मळणगांवकर । एकनाथ म्हणती मामांना ॥२०॥रामानंद खटावकर । मुकुंदराजपंथीं संत थोर । पशंसोद्गार । मामांच्या संबंधीं काढीती ॥२१॥निर्लोभ निस्वार्थी सेवक । निष्ठेचे साधक । कीर्तन भक्तीचे उपासक । संत थोर मामा ॥२२॥श्री गुरुदेव रानडे एकदां । मान देण्या मामांच्या शब्दा । आले सुख संवादा । मामांच्या घरीं ॥२३॥आले सांगलीस अवचित । श्रीमंत राजेसाहेबांचे पाहुणे नित्य । दोघांचे प्रेमसंबंध अत्यंत । असती बहुसाल ॥२४॥आवड अध्यात्माची । श्रीमंतांना मनापासूनची । म्हणोन गुरुदेवांच्या आगमनाची । वाट पाहती आतुरतेनें ॥२५॥यावेळीं श्रीमंतांकडे आले । क्षण-एक थांबले । म्हणती जाणें आहे पहिले । बापूरावजींकडे ॥२६॥वेळ असे रात्रीची । श्रीमंत म्हणती विश्रांतीची । घाई कासयाची । उदयां चला ॥२७॥परी न मानले श्रीगुरुदेवाना । ह्मणती घोडेस्वार पाठवाना । कळविण्या बापुरावजींना । जाऊं आम्ही पाठोपाठ ॥२८॥तवं इकडे उडाली घाई । काय भेटीची नवलाई । झटपट केली साफसफाई । तों मोटार वाजली दारांत ॥२९॥श्रीगुरुदेवांचे आगमन । मध्यरात्रीं सूर्यदर्शन । साक्षात्कारी संत विद्वान । मामा जाती लोटांगणीं ॥३०॥आनंद झाला उभयता । न ये शब्दाने वर्णितां । पुसती परमार्थाच्या वार्ता । एकमेका ॥३१॥कांहीं दिवस लोटले । श्रीगुरुदेव श्रीमंतांचेकडे आले । तेव्हां मामांना आमंत्रण आले । भेटीसाठीं ॥३२॥क्षेमकूशल झाले । श्रीगुरुदेव आनंदले । मामांना विचारूं लागले । अहो बापूराव ॥३३॥श्रीमंतांनीं तुमचे । कीर्तन ऐकावें भक्तिचें । ऐसा योग जमण्याचें । आजवरी सुचिन्ह नव्हतें ॥३४॥माझ्याही मनींची । इच्छा कधींची । पूर्ण करुन घेण्याची । आतां संधी यावी ॥३५॥आपण अनुमति दयाल । तरी हा योग येईल । मामा म्हणती आज्ञा कराल । तेव्हां मी आहे हजर ॥३६॥तों त्याच दिवशीं भला । योग जमला सायंकाळला । आणि किर्तनाला । आला रंग बहुत ॥३७॥तवं श्रीमंत म्हणती आनंदून । घरगुती छान झालें कीर्तन । जेणें पूर्ण समाधान । चित्तास होई ॥३८॥याहीवरी एकदां । श्री देशपांडे यांना हलवून गदागदा । श्रीगुरुदेव म्हणती उचला पदा । ते पहा बापूराव चालले ॥३९॥आपण त्यांना बोलावून । पाहूं करितील कां कीर्तन । रमेल आपुलें मन । हरिकीर्तनीं ॥४०॥मामा आले आणि बसले । करताल धरुन सुरुं केलें । कीर्तन श्रीगुरुदेवांनी ऐकिलें । भक्तिभावें ॥४१॥ऐसे श्रीगुरुदेवांचे पूर्ण । मामांच्याशी स्नेहबंधन । वेळोंवेळीं आले दिसून । अभावितपणें ॥४२॥श्रीमंतही तैसेंच उदार । हरिभजनीं ओढा फार । गुणी जनांचा गौरव तत्पर । राहून करिती ॥४३॥त्रितप महोत्सव झाल्यावरतीं । मामांची गांठ घेण्याचे ठरविती । मामांच्या प्रकृतीची क्षीण स्थिति । म्हणूनिया ॥४४॥थोर आदर परमार्थाचा । आणि संत सज्जनांचा । गौरव गुणी जनांचा । गुणी लोक करीती ॥४५॥“मी एक सामान्य नागरिक । तरीही श्रीमंतांना हे कौतुक । ऐशी ही प्रेमाची जवळीक ।” म्हणती मामा ॥४६॥ऐसे किती एक प्रसंगोपात् । मामांच्या घरी आले सज्जन संत । आवडींने मामांच्या घरांत । सुख समाधानासाठीं ॥४७॥आचार्य श्री दांडेकर । महाराष्ट्राचे संत थोर । जेव्हां जेव्हां भूषविती सांगली नगर । येती मामांच्या घरीं ॥४८॥मामांचे कीर्तन ऐकून । तेही होती तल्लीन । संतांचें संतचि महिमान । ओळखती खरें ॥४९॥गोविंद मह्हाराज वाटेगांवचे । प्रेम जाणून मामांचे । सोसून दु:ख वृध्दपनाचें । येती मामांच्या घरीं ॥५०॥तें प्रेमचि अनिवार । ओळखति एकमेकांचें अंतर । अध्यात्मास बहर । येई त्यांवेळीं ॥५१॥मामांनी चरण धरिले । गोविंद महाराजांचे भले । आनंदून बसले । पाय आपुले मुरडून ॥५२॥तंव “गोविंदजी” म्हणती । पाय करा देवाचे मज पुढती । मी जाणें त्यांची महती । ह्मणोन चरण धरिती ॥५३॥देव भेटला देवाला । हा त्याला आणि तो याला । सीमा आनंदाला । मुळींच नसे ॥५४॥श्रीकेतकरमहाराज । पोटीं प्रेम निर्व्याज । भेटींचे मनीं धरुन काज । येती मामांच्या घरीं ॥५५॥दासगणु थोर हरिसेवक । कीर्तिमंत अलौकिक । आधुनिक महिपती ह्मणती लोक । गौरवून त्यानां ॥५६॥तेहि आले मामांच्या घरीं । रंगले कीर्तन गजरीं । मामांच्या गुणगौरवापरी । बोलती मुक्तकंठ ॥५७॥तैसेच गोंदेमहाराज दूरचे । मार्ग मानून जवळचे । उराउरीं भेटण्याचे । सौख्य उपभोगती ॥५८॥गोपाळकाका कोटणीस । मामांचे वर्णन सर्वापरीस । करिती अत्यंत सुरस । मामांची योग्यता जाणोनी ॥५९॥पैठणकरमहाराज एकनाथ वंशांचे । शोभते थोर कुलाचें । मामांच्या कीर्तन सेवेचें । कौतुक करिती प्रेमभरें ॥६०॥सांगलीच्या आसपास आले । आणि मामांच्या घरीं न येता गेले । ऐसे कधीं न झाले । ऐसे प्रेम उभयतांचे ॥६१॥धुंडा महाराज चौंडे महाराज । निजापूरकरमहाराज, चाफळकर महाराज । बाळेकुद्रींकर महाराज आणि इतरही संतराज । भूषविती मामांचे घर ॥६२॥आण्णासाहेब कुलकर्णी इचलकरंजीचे । अधुनिक सावंता माळी लोकांचे । शब्द बोलती आदराचे । मामांच्यासंबंधी ॥६३॥रामनामें बेळगावचे रहिवासीं । येती मामांच्या घरासी । गौरविती सद्भक्तासी प्रेमभरे ॥६४॥अखिल संतजन म्हणती । धन्य बापुरावांची भक्ति । एकच पुत्र परि तोही परमार्थी । हे भाग्य परम दुर्लभ ॥६५॥ऐकून रामांचे निरुपण । संत पावती समाधान । म्हणती धन्य धन्य धन्य । हें केळकर कुल ॥६६॥संतांचा सहवास लाभावा । त्यांचा प्रसाद मिळावा । त्यांचा आशिर्वाद लाभावा । हे इच्छिती सुजन ॥६७॥गुंडूबूवा बुधगांवचे । जे भानावर नसायचे । परी मामांच्या कीर्तनी नाचावयाचे । समाधि मंदिरांत ॥६८॥अहो जी श्रोतेजन । मी एक प्रश्न करितो लहान । मज दयावे अवधान । एक वेळ ॥६९॥एक एक संतांची गांठ पडायां । पुण्याच्या क्रोडी लागती कराया । श्री राममंदिरीं या । येती किती संत ॥७०॥अखिल विदयमान संत । ज्ञात आणि अज्ञात । मामांच्या गुण गौरवांत । आनंद मानिती ॥७१॥हे काय गणित असे ? याचे उत्तर काढावें कसे ? हें ज्याच्या त्याच्या मनीं वसे । असंदिग्ध आणि स्पष्ट ॥७२॥तरीही निंदक म्हणती मामा । वेळ घालविती रिकामा । मोठेपणासाठीं यम नियमां । सांभाळिती ॥७३॥सतेज जो सुर्यासारखा । त्यास म्हणती अत्यंत फिका । परी किलकिलती त्यांचेच नयन कां ? । सागां मज ॥७४॥हे निंदक बाहेर निंदती । परी त्यांच्याही अंतरीं असेल जागृति । ती न दिसे लोकांती । अहंभाव चित्तीं म्हणोनियां ॥७५॥प्रसंगी तेही करद्वय जोडून । करिती अभावितपणें वंदन । ऐसे संतांचें संतपण । दिसोन येई ॥७६॥भक्तिभाव तरी सद्गद होती । मामांची जाणून महती । लाभावी त्यांची संगति । म्हणोनि करिती प्रयत्न ॥७७॥माई करमरकर । दूर सोडून आपुलें घरा मामांछ्या वाडयांत निरंतर । वसतीस आल्या ॥७८॥अठरा वर्षे ऐकून कीर्तन । त्या झाल्या तल्लीन । म्हणती आतां देह ठेवीन । याच पवित्र आवारांत ॥७९॥तो पण त्यांनी साधला । अखंड सहवासाचा लाभ घेतला । नामस्मरणी जीव रमविला । माईसाहेबांनीं ॥८०॥नाना जोगळेकर । आप्त माईंचे निकटतर । त्यांनींही श्रीराममंदिर । जवळ केलें ॥८१॥निष्ठा मामांच्यावरी । त्यांची बसली भारी । परततांना एकदां पुण्यपुरीं । त्यांनी वस्ती केली ॥८२॥तेथें श्री-सहस्त्रबुध्दे संत । होते अति विख्यात । म्हणोनिअ चरणवंदनाचा हेत । धरोनि गेले ॥८३॥तवं ते संत बोलती । तुम्ही सांगलीहूनि आलाति । ज्या चरणांची मिळाली संगति । ती आतां सोडूं नका ॥८४॥तंव चमकले । म्हणती हें यांना कसें कळलें ? । अंतर्ज्ञानी संत भले । म्हणोनिया ॥८५॥ज्ञात आणि अज्ञात । हा मागील उल्लेख आणा लक्षांत । मामांच्या महत्वाची संगत । आतां नीट लागेल ॥८६॥ऐसा हा वृत्तांत । सांगावा तितुका अद्भुत । एकचि चांचपोन शित । जाणावें सुजनानी ॥८७॥ऐसा हा सुरम्य इतिहास । घडतां वर्षे पन्नास आणि वीस । त्याहीवरी दोन खास । उलटून गेलीं ॥८८॥कालचक्र गरगरा फिरे । माया मोहांचें वारें । अज्ञानतिमिर भरे । करी क्षीण विवेक ॥८९॥विवेक जागवावया सतत । संतांची धरावी लागे संगत । काळ म्हणे मी हातोहात । आतां नेईन संतासी ॥९०॥शक उगवला अठराशे त्र्यांऐंशी । आणि जमल्या दु:खराशी । आकाशीं अष्टग्रहासी । मेळ आला यावेंळीं ॥९१॥मामा मनांत विचार करिती । कांही खूणगांठ बांधिती । लोकांना ती विचार संगती । कळली वेळ गेल्यावरी ॥९२॥रामनवमीस कीर्तन । मामांनी केले उत्साह भरुन । देह सार्थक साधन । सांगती सुगम शब्दें ॥९३॥श्रीराम जयराम जयजयराम । घोष करिती सप्रेम । श्रीराम हाचि विराम । म्हणती जीवाचा ॥९४॥कीर्तन संपल्यावर । स्वस्थ राहती अंथरुणावर । तो सहस्त्रबुध्दे चरणांवर । माथां ठेवती ॥९५॥जातो दूर देशाला । आशीर्वाद असावा मजला । आता भेट पुढील वर्षाला । तोंवरी स्मरण असूं दे ॥९६॥राहतो तुमच्या वाडयांत । हे सौख्य मनांत । वियोग होतां दु:खित । मन होय ॥९७॥तवं मामा त्यांना म्हणती । वर्षाची काय निश्चिती । झाली भेट हीच चित्तीं । असो दयावी ॥९८॥बुध्दि याचा अर्थ सांगे । परी मन विकल्पी तरंगे । मायेचा पडदा लागे । आपोआप ॥९९॥मामा मनीं विचारती । तीन तपावरी केली कीर्तन संगतीं । त्याचा आढावा चित्तीं । आतां घेऊं ॥१००॥सार ठेवूं लिहून । आतां स्वमुद्रांकित करुन । भाविकांना मार्ग दर्शन । तेचि पुढें होईल ॥१०१॥एक वर्षाच्या किर्तनाची टांचणें । आतां सुसंबध्द लिहिणें । तेंचि होईल ठेवणें । पुढीलासी ॥१०२॥विकल शरीर सावरती । उशा पायांशी ठेविती । सावकाश बसोन लिहती । टीपणें कीर्तनाची ॥१०३॥हात न चाले भराभरा । घाम सुटे शरीरा ॥ तरीही सुवाच्य काढूनि अक्षरा । विचार धन सांठविती ॥१०४॥कोणी येतील साक्षेपी जन । ते वेंचितील हें धन । तेची त्यांचे सुफल जीवन । म्हणोनिया ॥१०५॥तासन् तास काम चाले । देहदु:खाची तमा न चालें । ऐसें दहा महिने चाललें । काम अव्याहत ॥१०६॥हीच मामांची संपत्ति । ते आपल्या भक्तासाठीं गोळा करिती । जन उध्दाराची तळमळ चित्ती । धरोनियां ॥१०७॥प्रत्येक आपुले कीर्तन । त्यांनी ठेविलें स्वमुद्रांकित करुन । वाचतां मन ये आनंदून । क्षणोक्षणी ॥१०८॥ऐसे दहा महिने होत आले । काळाचे माप भरत आलें । शरीर थकतचि चाललें । दिवसें दिवस ॥१०९॥लिहिण्याचे कष्ट न सोसती । तेव्हां दुसर्याची मदत घेती । परी कार्य न थांबविती । क्षणमात्र ॥११०॥दिनप्रतिदिन विकल काया । डाँक्टरही थकले औषध दयाया । कांहीं न चले उपाया । म्हणती हा वृध्दापकाळ ॥१११॥उभा राहून कीर्तन । तें न जमे तेव्हां खुर्चीवर बसून । तीही सीमा उल्लंघून । गादीवर आले ॥११२॥बसल्या बसल्या कीर्तन । तेही होई कठींण । परी नित्य नेम समाधान । ढळूं न देती ॥११३॥करोनि मन घट्ट । देहाचा एकही न पुरविती हट्ट । हें कर्मचि अचाट । वाटे किती एकांना ॥११४॥ध्येयासाठीं जीवन । ईश्वरासाठीं पंचप्राण । उपासनेंसाठीं देहदंडन । ऐसे तप खडतर ॥११५॥होतां होतां हनुमत् षष्ठी । आली दयावया स्वानंद पुष्टी । परी मामांची देहयष्टी । खिळली अंथरुणाला ॥११६॥समाधी मंदिरात उत्सव । मामांचा तेथे अडकला जीव । परी त्यांना आपले अवयव । आपले नव्हते ॥११७॥श्रीहनुमतषष्ठीच्या दिवशीं । समाधि मंदिरांत कीर्तन करावें ऐशीं । मामांची इच्छा मनाशीं । परी उपाय काय ? ॥११८॥अंतकाळीची इच्छा कळलीं । श्रीहनुमंत सद्गुरुंची कृपा वळली । गंगाधररावजींना बुध्दि झाली । अकस्मात ॥११९॥उत्सवांत राम करितो कीर्तन । तेंच आपुलें मानून । त्यांतच समाधान । मामांनी मानलें ॥१२०॥तें न मानले श्रीसद्गुरुंना । म्हणती “फुलासारखे उचलून आणा । येथें आज बापूरावजींना । माझ्यापुढें ॥१२१॥तरीच माझे मन । आज होईल सुप्रसन्न । कीर्तन करीत असतां वदन । पाहीन बापुरावजींचें” ॥१२२॥दिन गेला अस्तवानीं । मामांना अणिले खुर्चीत बसवूनी । लोक सांभाळति प्राणाहुनि । या भीष्माचार्यांना ॥१२३॥देह दु:ख विसरुन । मामांचे हृदय गेले आनंदून । चेहर्यावरी खदखदून । हास्य उमटले ॥१२४॥निरागस हास्यबालकाचें । की मुक्त हास्य शिवशंकराचें । कीं सहज उमलणें कमल कलिकेचें । ऐसे वाटे मना ॥१२५॥खुर्ची ठेविली समाधि समोर । तों मामा बोलूं लागले सुरवर । रघुनाथ प्रिय गुरुवर । त्यांनी पाचारिलें ॥१२६॥प्रसन्नवदन मामांचे । की अमृतहास्य तात्यांचे । भाव मिळाले एकमेकांचे । मामांच्या वदनीं ॥१२७॥कीर्तनासी अपूर्व रंग आला । ऐसा पूर्वी कधीं न देखिला । लोक म्हणति प्रभुवर देखिला । मामांनी आज ॥१२८॥मामा गर्जून सांगतीं । अढळ निष्ठा सद्गुरु चरणांप्रती । ठेवा त्याची प्राप्ति मोठी । कोण मोल करील त्याचे ॥१२९॥हनुमंत षष्ठी । करी स्वानंदाची पुष्टी ॥१॥षडैश्वर्ये देऊन । करीती भक्तांचे रक्षण ॥२॥गोविंदासी नेमी । आणिती गंगाधर स्वामी ॥३॥सद्गुरु भक्तांचेंरक्षण । करिती षडैश्वर्ये देऊन । शमदमादि साधन संपन्न । स्वयें करिती भक्तांसी ॥१३०॥भव दु:खाच्या पार । कसें व्हावें हे शिकविणार । सामर्थ्य संपन्न करणार । आपल्या भक्तांसी ॥१३१॥नेभळ्या भक्तासी खांदयावर । घेऊन सद्गुरु पार करणार । ऐसा नाहीं येथें प्रकार । सुजन हो ॥१३२॥ज्याचें त्यांने हित साधावें । आपण सामर्थ्य संपन्न व्हावें । संत होवोनि संतासी मिळावे । हे भाग्य देती सद्गुरु ॥१३३॥ऐसे प्रभावी कीर्तन । मी ऐकलें नव्हते अजून । आतां मामा बोलती आवर्जून । ऐका काय तें ॥१३४॥आजवरी कीर्तन घडलें । प्रतिवर्षी पूर्ण झालें । म्हणोन आज माझें मन धालें । पूर्ण पावलों समाधान ॥१३५॥आतां माझी सेवा पूर्ण झाली । ती सद्गुरुंनी करवून घेतली । यापेक्षां अधिक न पाहिली । मी मौज कोठें ? ॥१३६॥तात्यांचे भक्तजन । असती कितीतरी अधिकार संपन्न । त्यांत मी पहिला परी शेवटून । असो दया जी ॥१३७॥शब्द मामांचे ऐसे । ऐकतां मन झालें कसेसें । अपार प्रेम हृदयीं वसे । म्हणोनि वाटे बोलती ॥१३८॥हा निरोप अखेरचा । हा नसेल हेत मनींचा । हे मानोन आम्हीं त्याचा । नादच सोडला ॥१३९॥मामा आहेत अजरामर । ते नाहींत आम्हांस सोडून जाणार । आम्ही मरुं परंतु मामांचे कीर्तन चालणार । अखंडित ॥१४०॥नरदेह आहे नश्वर । कितीएक संत गेले भवपार । हा नित्त्याचा कीर्तनी गजर । तरी ही आम्ही विसरलो ॥१४१॥मामा घरीं कीर्तन करिती । समाधिमंदिरात जाती । तेव्हा त्यांची आत्मशक्ति । कांहीं वेगळींच दिसे ॥१४२॥जेथें प्रथितयश डाँक्टर । सोडती मनींचा धीर । तेथें मामांचे धैर्य अनिवार । दिसे सर्वांना ॥१४३॥जोंवरी मामांचे कीर्तन अखंड । तोंवरी आम्हास विश्वास उदंड । वाटे येथें कळिकाळांचे बंड । पडेल मोडून ॥१४४॥रोग जरी असाध्य दुस्तर । तरी मामांचे आयुष्य शंभरावर । डाँक्टरांचा सुटे विचार । तेथें चमत्कार मामांचा ॥१४५॥ऐशीं भोळी आशा मनीची । दृढावली साची । मामांच्या प्रकृतीची । धास्ती कधीं वाटेना ॥१४६॥परी जाणते बोलूं लागले । कीं हे चिन्ह नव्हे भलें । मामांचे आयुष्य उरलें । बोटावर मोजण्याचें ॥१४७॥परी हे न पटे कोणासी । भोळी भावना धरिती मनांशी । मामा राहावे अशी । आशा मनांत ॥१४८॥मामा कीर्तन करिती । गोजिरी दिसे त्यांची मूर्ति । बाल गोपालांचा मेळा भोवतीं । म्हणती श्रीराम जयराम जयजयराम ॥१४९॥शुभ्र सदरा लाल रुमाल । गौरवर्ण गोल मुखकमल । शांत भाव प्रसन्न बोल । ऐसे मामा ॥१५०॥जैसा प्रेमळ पिता । बुझावी आपुल्या सुता । कधीं न रागेजतां । ज्ञान सांगे ॥१५१॥तैसे हे वयोवृध्द । विमल ज्ञानवृध्द । कठोर तपोवृध्द । प्रेमळ मामा ॥१५२॥विशाल परिवार त्यांचा । पडदा न जेथें जातिभेदाचा । विशुध्द सागर प्रेमाचा । ऐसे मामा ॥१५३॥जेव्हां त्यांच्या कीर्तनास विराम । मिळेल आणि सुटेल शरीराचा आराम । तेव्हांच म्हणूं राम रे राम । धांव आतां ॥१५४॥कांहीं कुशल विचारुं । कांही मनींच्या शंका निवारुं । कांही संदेश मागूं । अंतकाळी ॥१५५॥करुं निरवा निरवीच्या गोष्टी । नातरी विचारु स्पष्टास्पष्टी । फिरवा काळासी यासाठीं । हट्ट धरुं ॥१५६॥घालूं देवासी सांकडे । नवस करुं देवापुढें । आपुलें आयुष्यहीं रोकडें । वेचूं मामांच्यासाठीं ॥१५७॥भाबडया ऐशा लोकांना । कांहीं न देवोन सूचना । मामा म्हणती प्रभुवरांना । कांहीं वेगळेच ॥१५८॥मामा म्हणती रामाला । चालीव या कीर्तन परंपरेला । जरी तूं अशक्त तरीं हें तुला केलें पाहिजे ॥१५९॥अरे आपण श्रीरामाचें सेवक । नको येथे देहदु:खाचें कौतुक । चालीव माझा प्रिय नेम एक । नित्य कीर्तनाचा ॥१६०॥कोणा आवडो वा नावडो । कोणी कीतीही विघ्नें घेऊन पडो । जन निंदेचीही झडो । रास शिरावरी ॥१६१॥एक देव आणि आपण । यांची गांठ असोदयावी करकचून । तुटे देह परी कीर्तन । चुकू नये कदापिही ॥१६२॥ऐशी आवडी धरुन हे रामा । मी गांठली आयुष्याची सीमा । आतां सहजेची या कामा । हातीं धरावें ॥१६३॥कोण कैसी येईल वेळ । हे न कळे सदा सर्वकाळ । मन राखोनि निश्चल । सदा वर्तावें ॥१६४॥प्रेमापोटीं बोललें । ऐसे रामाला वाटलें । हे जातील हें न शिवलें । त्याच्या मना ॥१६५॥विशुध्द प्रेम अंतरींचे । तेथें काय काम कुकल्पनेचें । हें असेल बोलणें नित्याचे । म्हणें राम ॥१६६॥मामांचे अनेक भक्त । दचकती अंतरांत । माम सुचविती आपुला अंत । विविध प्रकारें ॥१६७॥कोणी म्हणे हा तेजाचा गोळा । चालला पहा दक्षिण दिशेला । अरे याचा अर्थ मला । सांगा कोणी ॥१६८॥मामांच्या फोटोची फ्रेम दिसे । परी देहाकृतीवरी पडदा भासे । म्हणती हें नवलसें । झालें काय ? ॥१६९॥कोणी बसे साधनाला । तों मामा म्हणती चला । झडकरी सांगलीला । तरीच भेट ॥१७०॥नारायणरावांना भेटती । तात्या आणि बोलती । आतां बापुरावांची निश्चिती । मुळींच नसे ॥१७१॥चालल्या आहेत वाटाघाटी । या साधुमहाराजांच्या हातच्या गोष्टी । हे ऐकतां मन हिंपुटी । होय त्यांचे ॥१७२॥सौ. इंदिराबाई वाटवे विचारिती । मामांना पुढतपुढतीं । दासबोध ऐकावा म्हणती । मामांच्या मुखें ॥१७३॥मामा देती प्रत्युत्तर । आतां हें रामचि सांगणार । हें कार्य त्याच्या शिरावर । सहजचि आहे ॥१७४॥माघ शुध्द सप्तमीचा । दिवस उगवला दु:खाचा । काळ म्हणे आमचा । समय पातला हळुहळूं ॥१७५॥मामा म्हणती दोनच कीर्तनाची । आतां टांचणें करायचीं । तीच आपुल्या कार्याची । पूर्तता समजूं ॥१७६॥सोमवारचें पुढील टांचण । रामचि सांगेल आपण । रविवारी मामा गेले बोलून । ते ऐकती धुंडिराज ॥१७७॥नातू शेठ माधवनगरचे । काय थोरपण त्यांच्या उत्साहाचें । क्ष किरणें फोटो काढवून मामांचे । मुंबईला पाठविती ॥१७८॥तेथे थोर डाँक्टर तपासती । सुक्ष्मदर्शक त्यांचे नेत्र असती । परीक्षेची झाली परिणती । त्यांचे निर्णय आले ॥१७९॥सर्वतोमुखी निराशा । परी डाँक्टर देती दिलासा । भयशोक निवारावया थोडासा । परी खिन्नता पसरे ॥१८०॥इष्ट मित्र गणगोत आले । कोणी सेवेस तिष्ठत बसले । रजेचे अर्ज पाठवलें । सांगली सोडवेना ॥१८१॥धनंजय कोल्हापुराहून । आला तार पोंचून । गाडींत उभा राहून । धांवला मामांच्या दर्शना ॥१८२॥जो आला तो खिळून बसला । छाती धडधडे क्षणाक्षणाला । उचकी ठसका मामांना लागला । कीं पाहे मुखाकडे ॥१८३॥कोणी ओळखी कोणी अनोळखी । कोणी पाही कोणी नेत्र झांकी । सर्वांची तोंडे फिकी । पडली त्या दिवशीं ॥१८४॥अटळ दिसे विधी घटना । निराशा घेरीं अंत:करणा । कोणी पुसे डाँक्टरांना । केविलवाण्या मुद्रेनें ॥१८५॥शुक्रवार शनिवार रविवार । चिंता वाटे अनिवार । मामांनी सुरुं केला गजर । श्रीराम जयराम जयजयराम ॥१८६॥होते पूर्ण भानावरी । परी मौन धरिले बाह्याभ्यंतरी । आणि रंगले अंतरीं । नामस्मरणांत ॥१८७॥नेत्र ठेविले झांकून । मुख सतेज प्रसन्न । संसार चिंता सोडून । रंगले नामस्मरणांत ॥१८८॥लोक म्हणती मामांना । धनंजय आला पहाना । डोलवून माना । ऐकिलें हे सुचविती ॥१८९॥सुत्रचालक परमेश्वर । अखेर हित तेंच करणार । आशेचे उमाळे वारंवार । तरीही येती ॥१९०॥नारायणराव वाटवे गेले । श्री बाबूरावजींना निरोपलें । तेही त्वरेंने आले । मामांची विचारपूस करण्या ॥१९१॥येथून पुढें निर्याण प्रसंग । अति कठीण करुणरसरंग । अनिष्ट अटळ शोकसागर अथांग । परी वर्णन करणें असे ॥१९२॥कैशी चालेल मति । विचारांची मोडेल संगति । हृदय उचंबळेल किती । सांगता नये ॥१९३॥इतिश्री गोविंदचरित मानस । जे स्वभावेचि अतिसुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । संत दर्शननाम एकादशोध्याय ॥११॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP