अध्याय दहावा - पुण्यधाम दर्शन

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


जय जय श्री रामेश्वर पावन । नमन करीन अनन्य होवोन । ज्याचे पावता अशिर्वचन । पूर्ण लाभ पडे पदरीं ॥१॥
आता करु यात्रा वर्णन । या एकचि अध्यायी परिपूर्ण । ज्या यात्रा बालपणापासून । मामांनी केल्या ॥२॥
त्यांच्या सवे घेऊ भेटी । हरिहरांच्या भक्तिसाठीं । करु देवाच्या गोष्टि । मामांच्याशी ॥३॥
आचरें गांवी कोकणांत । मामांचे कुलदैवत । स्वयंभू आणि जागृत । शिवलिंग ॥४॥
आहे मंदिर शिवाचे । परी कौतुक तेथें श्रीरामजन्मोत्सवाचे । अनिवार प्रेम रामभेटीचे । शिव शंकरासी ॥५॥
राम आणि महेश्वर । म्हणोनि शोभे रामेश्वर । ऐसा अभिनव प्रकार । शिवराघवाचा ॥६॥
श्रीराम करी शिवस्मरण । आणि शिवाचे अभ्यंतरी राम पूर्ण । ऐसे दोन असोनि एकपण । दोघांचे ॥७॥
दोनही प्रेमसागर । भरती सदाची अपरंपार । “सुखसहिता दु:खरहिता” ही आरती सुंदर । चाले या देवालयी ॥८॥
भोलानाथ शिवशंकर । अखिल विश्वाचें सद्गुरुवर । श्रीसमर्थ ही सादर । आरती रुपे ॥९॥
असो, रामाचें लग्न झाल्यावर एकदा । गोविंद भेटती शिवपदा । जाती देव दर्शनाच्या आनंदा । साठीं कुटुंबियासह ॥१०॥
चालले निश्चय करुनी । मार्ग कठिण आक्रमुनी । मज दरमजल करुनी । गाठिती टप्पे ॥११॥
आला कणकवली गांव । जो प्लेगानें धुतला सर्व । तेथें न दिसे एकही मानव । मार्ग खुंटला ॥१२॥
ना बैलगाडी ना टांगा । म कैशी मोटार सांगा । आता मामा म्हणती गा । नाम श्रीरामेश्वराचे ॥१३॥
तोच आधार सकळासी । त्यापुढें संकटें कायासी । जो तेथें विश्वासी । त्याचा मार्ग सुलभ ॥१४॥
एक इसम अज्ञात । आला विचारपूस करीत । कोण कोठील काय हेत । प्रवासाचा ॥१५॥
श्रीरामेश्वर दर्शनाला । जावें ही आस मनांला ॥ म्हणोनि हा व्याप केला । म्हणती मामा ॥१६॥
तव तो इसम वदला । नका करु खिन्न मनाला । मी जोडतो गाडीला । आलो इतक्यांत ॥१७॥
जी योजना ईश्वराची । तीच तडीस जायाची । संकटे येती जाती त्याची । काळजी देवाला ॥१८॥
गाडी चालली घाटांतून । अति अवघड चढण । तो अकस्मात जोखड सुटून । बैल झाले मोकळे ॥१९॥
गाडी लागली उताराला । अतिवेगाने घसरगुंडीला । सर्वांचा धीर सुटला । कांहीं सुचेना ॥२०॥
गाडी उलटी धडधडा । फोडीत चाललीं कडा । गाडीवान मामा धडाडा । उडया टाकिती ॥२१॥
अधोगती गाडीची । थांबविली एकदाची । करुणा रामेश्वराची । भाकिती सर्व ॥२२॥
पुन्हां दोर आवळून । गाडी निघे घाटातून । अंतरी देवाचे स्मरण । प्रत्येकाच्या ॥२३॥
संकटें जीवावरची । ती देवाची हाक प्रेमाची । परीक्षा पाहून भक्ताची । नेतो निजपदीं ॥२४॥
देव ज्यांचा साहाकारी । तेथे काळाची कैशी येईल फेरी । काळाची नजर चुकवून करी । फजीत काळाला ॥२५॥
आले रामेश्वर मंदिर । मुखीं प्रत्येकाच्या नामगजर । हर्ष झाला सर्वांस थोर । प्रवेशले मंदिरी ॥२६॥
श्रीरामेश्वराच्या मंदिरांत । मामा आले गाभार्‍यांत । मन झालें शांत । शिंवलिंग पाहोनी ॥२७॥
हृदय आले उचंबळून । आनंदाने भरले अंत:करण । आपल्या कुलदैवताचे दर्शन । प्रिय वाटले मामांना ॥२८॥
ती पहा मामांच्या नेत्रांत । शिव जटेंतील गंगा वहात । चालली अविरत पुन्हां करीत । आभिषेक शिवासी ॥२९॥
जोडोनी उभयकरा । म्हणती जयजयरामेश्वरा । आहे तुमचा आसरा । म्हणोनि आम्ही सुखरुप ॥३०॥
तुमच्या कृपा प्रसादावीण । आम्ही करु तों तों शीण । म्हणोन तुमचे स्मरण । असो आम्हासि सर्वदा ॥३१॥
राहतो दूर देशाला । म्हणोन भेटीचा योग न आला । बहुत दिवसांनी जमला । हा योगायोग ॥३२॥
हे सर्वव्यापी परमेश्वरा । वास तुमचा अंतरा । माजी असो दया हा खरा । आशिर्वाद दयावा आम्हासि ॥३३॥
ऐसे विनवून देवासी । मामा आले सागर दर्शनासी । होती मंडळी बरीचशी । त्यांच्या समवेत ॥३४॥
ओहोटची वेळ होती । तरीही एक लाट आली पुढती । मामांचे चरण धुवून पुरती । परतली ॥३५॥
तटस्थ झाले सर्वजण । म्हणती हा आनंदाश्चर्याचा क्षण । सागराने ओळखले कोण । आले आपल्या किनारीं ॥३६॥
मामा परतले मंदिरासी । तो भेटले तेथील रहिवासी । म्हणती आता ऐकू कीर्तनासी । ही आस पुरी करा ॥३७॥
रंग भरे किर्तनाचा । तो ठाव घेई अंत:करणाचा । लोक म्हणती या सत्पुरुषाचा । वास येथेच असावा ॥३८॥
नित्य ऐकता कीर्तन । होईल आमुचे समाधान । म्हणोनि मामांना विनवून । रहा म्हणती ॥३९॥
मामा म्हणती लोकांना । तुम्ही विचार करुन पहाना । आम्हीं परस्थ अडचणीं नाना । सोसून आलो यात्रेसाठीं ॥४०॥
आता आम्हासि आहे परतणे । प्रेमें तुम्ही निरोप देणे । अखंड देवाचें नामस्मरण करणें । हा बोध असो दे अंतरीं ॥४१॥
प्रेमभाव मनीं उमटला । तो पाहिजे टिकवला । आता प्रेमभरे आम्हाला । निरोप दयावा ॥४२॥
तपावरीं वर्षे लोटली । आतां ही दुसरी संधी आली । तुम्ही माझी सेवा गोड मानली । यांत मज समाधान ॥४३॥
गांठी भेटी दैवयोगें । यांत न मानावे वाऊगे । ईश्वरी सूत्र आहे मागे । आपण त्यांचे पायिक ॥४४॥
लोक म्हणती येथील एक । रिवाज असे वर्षे अनेक । कौल देवाचा आम्ही लोक । मानतो सदा ॥४५॥
विचारिती श्रीरामेश्वराला । तो त्यानें दिला हवाला । म्हणे जा उदयाला । नको आज ॥४६॥
आनंदे अंत:करण भरुन । टाळ्या पिटिती सर्वजण । म्हणती आजही कीर्तन । आम्ही ऐकू तुमचे ॥४७॥
बहुत सोपे करुन सांगतां । तेणे प्रसन्नता ये चित्ता । आम्हीही परमार्थाच्या वार्ता । आता मनीं आणू ॥४८॥
कडू संसार मानोनी गोड । आम्ही त्याचेच घेतले वेड । नित्य सुखाचा मार्ग उघड । तुम्हीच दाखविला ॥४९॥
दृष्टींत पडले अंजन । तेणे सत्य देखती नयन । जे जे गेले होते झाकोळून । संसार मदें ॥५०॥
नामस्मरणीं रमवूं मना । होईल तेवढें करुं प्रयत्ना । आम्ही लागलो तुमच्या चरणा । आशिर्वाद दयावा जी ॥५१॥
ऐसा हा प्रेमाचा सोहळा । भक्त झाले गोळा । नाम संकिर्तनी उमाळा । धरोनिया ॥५२॥
दुसरें दिवशीं आनंदानें । आणि वियोग दु:खानें । भारावली अंत:करणे । निरोप देता ॥५३॥
संत्संगाची महती ऐशी । मिळता लाभती सौख्याच्या राशी । वियोग घडता कंठाशी । प्राण येती ॥५४॥
मामा परतले सांगलीला । वेशीपर्यंत लोक झाले गोळा । गाडीवान म्हणे बैलाला । चल आता ॥५५॥
वाटेंत लोक बोलले । कीं काल वाघानें झडपिलें । लोकांच्या तोंडाचें पाणी पळाले । क्षणांर्धांत ॥५६॥
मामा म्हणती मनांत । रामेश्वर दयावंत । तोचि पाठीराखा सतत । आम्हासी ॥५७॥
म्हणोनि हे विघ्न टळले । सुख समाधान घरास आले । म्हणोन वंदू पाऊले । श्रीरामेश्वराची ॥५८॥
स्मरण देण्या संकटें येती । हीच त्यांची असें महती । म्हणोनि स्वस्थ चित्ती । आपण असावें ॥५९॥
सहज स्वभाव मामांचा । तीर्थयात्रा न करण्याचा । परी मोह कुलदैवताचा । न आवरे त्यांना ॥६०॥
सर्व तीर्थे घरा येती । ऐशी जोडावी साधन संपत्ती । म्हणोनि मामा राहिले स्वस्थचित्तीं । आपुल्या राम मंदिरी ॥६१॥
श्रवण मनन निदिध्यास । प्रवचन कीर्तनाचा सोस । अखंड ठेविती अनुसंधानास । हा नित्यक्रम मामांचा ॥६२॥
तपानुंतपावरी । अव्याहत क्रम चालला घरीं । आतां झाली पुरी । छत्तीस वर्षे ॥६३॥
दिन ढळला पश्चिमेला । जीवनाचा अस्त आला । संदेह भेटीचा योग साधला । पाहिजे आता ॥६४॥
ऐसे देव आणि संत । श्रीसाधुमहाराजासहित । ठरविती मनांत । फिरली सूत्रें ॥६५॥
मामा आपण होऊन । कधी न करितील तीर्थाटन । त्यातून देह झाला क्षीण । ईश्वरेच्छा बलीयसी ॥६६॥
श्री. पंडितराव परचुरे यांसी । प्रेरणा झाली एकसरसी । आले मामांच्या घरासी । तो चर्चा सुरुं होती ॥६७॥
उमदीहून प्रेमांचे । आले निमंत्रण तातडीचें । श्रीभाऊसाहेबांच्या पादुकांचे । दर्शन घ्यावया ॥६८॥
दिवस पादुकांच्या स्थापनेचा । संतसज्जना महत्वाचा । परी मामांच्या प्रकृतीचा । विश्वास लागेना ॥६९॥
तव परचुरे बोलती विश्वासानें । चला आता स्वतंत्र मोटारीनें । सर्व व्यवस्था जारींने । माझ्याकडे लागली ॥७०॥
सोडोनि सर्व चिंता । करु आता वारीच्याच वार्ता । उमदी निंबाळ निंबरगी आता । झालेच पाहिजे ॥७१॥
परचुरे पतिपत्नी । मामांच्यावरी भक्ति प्रेम म्हणुनी । हे कार्य आपुलेच मानुनी । तन मन धन वेचती ॥७२॥
पुत्र जपे पित्याला । तैसा पंडितरावांचा भाव भला । उचलती फुलाला । तैसे मामांना जपती ॥७३॥
भक्तांचा सुशब्दाला । मामानी नकार दिला । ऐसा दिवस न उगवला । मामांच्या आयुष्यांत ॥७४॥
हां हां म्हणता तयारी झाली । इतरांचीही धांदल झाली । चाळीस एक माणसे तयार झाली । सहप्रवास कराया ॥७५॥
आले कोल्हापुरहून । विजयसिंह सुर्वे आपणहून । स्वत:ची स्टेशन वँगन घेऊन । खडे प्रवासी ॥७६॥
तव एक बातमी आली । कीं ही वेळ नसे चांगलीं । ओढयांनी मर्यादा उल्लंघिली । पावसामुळे ॥७७॥
रस्ता न नीट कोणाला । माहीत होता चांगला । त्यांतच हा निसर्गाचा घाला । डळमळे निश्चये ॥७८॥
मामा म्हणती जो ध्यास । एकदा घेतला त्याचीच कास । श्रीनारायणपदीं विश्वास । धरोनिया ॥७९॥
सद्गुरुंचा करुन गजर । निघाली मंडळी सत्वर । जैसे वीर धुरंधर । रणासि जाती ॥८०॥
कोणी न पाही पैशाकडे । प्राणाचीही न पर्वा ध्येयापुढें । ऐसे एक एक गाढे । वीर होते ॥८१॥
मामांच्या सह प्रवास । हीच प्रत्येकाची आस । नेती शेवटास । संकटास न लेखता ॥८२॥
मोटारी मागून मोटारी । करती पुण्यधामांची वारी । पाऊस चिखल यांचा न करी । कोणी विचार ॥८३॥
मार्ग नीट सापडेना । लटपटती मोटारी जाताना । खाच खलगे नाना । वाटेंत लागती ॥८४॥
जो रस्ता मिळाला । तो अडचणीचाच ठरला । घसरगुंडी आणि चढाला । जीव होई बेजार ॥८५॥
मोटार ओढयांतून चालेना । तेव्हां बैल ओढती मोटारीना । परी परतावे ऐसे मना । येईना कोणाच्या ॥८६॥
जेथें वाट धोक्याची । तेथें संधी पराक्रमाची । सुर्वे यांनी धैर्याची । कमाल केली ॥८७॥
आपण पुढे जाती । कौशल्याने मार्ग शोधिती । किंवा तात्पुरता बनविती । नाना उपाय शोधुनी ॥८८॥
इतक्या अडचणींतून मामांना । सुखरुप नेती त्या भक्तांना । कशा सुचती कल्पना । एक देवचि जाणे ॥८९॥
अनंत संकटें परी सुखरुप । हीच देवाची दया अमूप । त्याच्या लीलेची साक्ष आपोआप । कळे अशा वेळीं ॥९०॥
आले निंबरगी गांवाजवळ । तेथें ओढयास अति चिखल । निंबरगीचा मार्ग सरळ । दिसेना कोणा ॥९१॥
परतले चडचाण गावांत । तळ दिला श्रीमारुतीच्या देवालयांत । उतरताच मामा सुरु करीत । कीर्तन आपुलें ॥९२॥
ना श्रम ना दम । ऐसे कीर्तनाचे प्रेम । आहे की नाहीं जाजम । याचीही वार्ता नसे ॥९३॥
नेमाची गांठ प्राणाशी । हेचि मनोमन अहर्निशी । हे कळावया लोकासीं । कीर्तन नेम मामांचा ॥९४॥
अंतरीं अखंड नेम चालविला । तरी तो कळेना लोकाला । म्हणोन त्यांच्या मार्गदर्शनाला । प्रगट नियम कीर्तनाचा ॥९५॥
करताल धरुन केले । ईश स्तवन पहिले । श्रीरघुनाथप्रिय उभे केले । मारुती रायापुढें ॥९६॥
श्री मारुतीरायांचे मस्तकावर । येथे शिवलिंग असे सुंदर । इकडे मामांच्या कपाळावर । भस्माचे पट्टे दिसती ॥९७॥
हे अनेकांनी पाहिले । श्रीशिवशंकराचे प्रसाद चिन्ह भले । साक्षात्काराचे बाह्य चिन्ह मानले । जाणत्यांनी ॥९८॥
दुसरे दिवशी मंडळी । निघाली प्रात:काळीं । आली ओढयाजवळीं । तो गाळ दिसे अपार ॥९९॥
विजयसिंहानी पुन्हां केली । पराक्रमाची शिकस्त यावेळीं । उत्तम वाट तयार केली । प्राप्त साधनोपाये ॥१००॥
आपण स्वत: उत्तम । मार्ग शोधिला प्रथम । करोनि अपार श्रम । जीवाची पर्वा न करता ॥१०१॥
एकचि मोटार येरझार्‍या करी । पोचविली मंडळी परतीरीं । ज्याची त्याची वदे वैखरी । हे अद्भुत अचाट ॥१०२॥
म्हणती आता निंबरगीस । जाऊं श्रीनारायण दर्शनासी । तेथून करु निश्चयासी । पुढील मग ॥१०३॥
निंबरगी जवळ पुन्हा ओढा । उतरुन जाणे लागेल पुढा । कमरे इतक्या पाण्यांतून तेवढा । मार्ग होता ॥१०४॥
सगळे गेले मामा राहिले । ते एका मुसलमानाने पाहिले । तो म्हणे हे माझे काम पहिले । मी नेतो याना ॥१०५॥
विष्णु जसा गरुडावरी । तैसे मामा त्याच्या पाठीवरी । तो निघाला परतीरी । लीला विनोदे ॥१०६॥
येता परतीरावर । मोल ठेविती त्याच्या हातावर । तव तो चतूर । ते घेईना ॥१०७॥
संत सेवा घडली । आणि मी ती मोले विकली । म्हणजे बुध्दीच चकली । हे बरे नव्हे ॥१०८॥
कवडीसांठी विकावा परीस । तैसे हे वाटे माझ्या मतीस । नका करु आग्रहास । मोलासाठीं ॥१०९॥
हा ठेवा माझ्या भाग्याचा । मला न विकावयाचा । मानू नका भार यावा । तुम्ही काहीं ॥११०॥
चकित झाली मंडळी । ही भक्त्तीभावाची ज्योत आगळी । परधर्माची तुटली साखळी । संत राज्यांत ॥१११॥
एक ईश्वर सर्वांठायी । हे कळले या समयीं । शुध्द सत्वाची तेवता समई । ईश्वर दिसे सगळींकडें ॥११२॥
देव मानिती निराळे । परी एकभाव सगळीकडे खेळे । भावाचे बळचि आगळे । अनेकी दाखवीं एकत्व ॥११३॥
मामा आले निंबरगीसी । भेटले पीठाधिपतीसी । मग आले समाधिमंदिरापाशी । श्रीगुरुलिंगजंगमांच्या ॥११४॥
जे सांप्रदायाचे मूळपीठ । शाखोपशाखांना आधार श्रेष्ठ । ज्यांनी वरिष्ठाहून वरिष्ठ । संत आणले या सांप्रदायी ॥११५॥
महावृक्ष गेला गगना । सुख समाधान लक्षावधींना । प्रणाम त्या श्रीगुरुलिंगजंगमांना । सप्रेम असो ॥११६॥
जोवरी शाखा आणि उपशाखा । तोवरी आधार पशुपक्षा । म्हणोनि या कैवल्यवृक्षा । सांष्टांग नमन ॥११७॥
जय जय जय श्रीमहेश्वर । श्रीरेवणसिध्दादि सद्गुरुवर । त्यांनी केला हा चमत्कार । वंदन त्या प्रभुपदी ॥११८॥
जय जय जय श्रीनारायणा । येऊन आमुची करुणा । तुम्ही पाठविले या संताना । म्हणूनि आम्ही सुखरुप ॥११९॥
जववरी अज्ञान । या भूतलीं घाली थैमान । तववरी तुमचे आशिर्वचन । असोदया या सांप्रदायावरी ॥१२०॥
तोचि आम्हास आसरा । तोचि आम्हास निवारा । म्हणोनि हे करुणाकरा । कृपादृष्टी पहावे ॥१२१॥
देखिले न तुमचे चरण । परी जाणतसो महिमान । अनंतरुपें अवतरोन । दीन जनासी सांभाळिले ॥१२२॥
मामा समाधी पुढें बसून । सुरुं करिती कीर्तन । लोक आले मागाहून । आळस टाकुनी ॥१२३॥
नित्याचा आपुला अनुभव । कीं साथीदार श्रोत्यांनी करावा गौरव । तेव्हां कीर्तनकारास चढे भाव । ये रंग निरुपणा ॥१२४॥
विदयुद्दीप झळकती । मधुरवादयें वाजती । लोक ही माना डोलावती । तेंव्हा स्फूर्ती कीर्तनकारासी ॥१२५॥
येथें सर्वाआधी । हा पुण्यपुरुष कीर्तन साधी । ही साधी परमावधी । कीर्तन प्रेमाची ॥१२६॥
न मानिती प्रवासाचा शीण । प्रकृतीची साथ ही नसे पूर्ण । देह व्यथा दारुण । पीडा करिती ॥१२७॥
तरी सोस कीर्तनाचा । सद्गुरुंची सेवा करण्याचा । उमाळा भाव भक्तीचा । अलोट आंत ॥१२८॥
येता सद्गुरु सानिध्यांत । वार भरे अंगांत । हे सामर्थ्याचे अद्भुत । वाटे आम्हा ॥१२९॥
आत्मशक्ती वेगळी । ती देहशक्तीहून निराळी । हे कळले गुरुपद कमळीं । येता आम्हां ॥१३०॥
आत्मशक्तीचे सामर्थ्य अचाट । ते कार्ये करवी बिन बोभाट । जेथें न सापडे वाट । कळिकाळासी ॥१३१॥
हेचि दाखवावया । मामा येती शरीरा या । दुर्धंर रोगासि सामना दयाया । परमार्थांसाठीं ॥१३२॥
आश्चर्य चकित लोक होती । वैदय ही आश्चर्य करिती । धन्वंतरीचा धन्वंतरी म्हणती । मामांना ॥१३३॥
नका सुई टोचू शक्तिसाठी । नको गोळी झोपेसांठी । जरी आले प्राण कंठी । तरी उभे कीर्तना ॥१३४॥
नेहमीचा आपुला अनुभव पहाना । प्रवासांत दमलेल्या लोकांना । तहानभूक विश्रांतिची विवंचना । सदा असते ॥१३५॥
म्हणती आधी कपभर । चहा आणा हो लवकर । मग आमच्या बोलण्यास भर । पहा कसा येईल तो ॥१३६॥
मामा म्हणती करु कीर्तन । जेथे सगुण जाईल निर्गूणांत रंगून । मग कैची भूक आणि तहान । कीर्तन विसावा भागल्यासाठीं ॥१३७॥
संत आणि सामान्यजन । यांचें ऐसे वेगळेपण । दोघांचे विश्रांतीस्थान । असे वेगळे ॥१३८॥
ऐशी ही कीर्तनसेवा । लोक म्हणती वाहवा । देवही म्हणती वाऽवा । धन्य केला संसार ॥१३९॥
सुरवर डोलाविती माना । ऐंसे कर्म करावे वाटे ज्यांना । त्यांनी संत चरित्राच्या अध्ययना । साठी रहावे तत्पर ॥१४०॥
वाचोनि करावा विचार । विचारोनि करावा उच्चार । आणि त्या सरिसाच आचार । मग गोविंद रे गोविंद ॥१४१॥
गुलिंगजंगम श्रीनारायण । मामांनी केले सुप्रसन्न । ऐसे प्रेमभरे कीर्तन । मामांचे झाले ॥१४२॥
प्रेम घ्यावे प्रेम दयावे । जेणे संतसज्जनांनी डोलावे । आणि परमानंदाचे कोठार लुटावे । जे संपता न संपे ॥१४३॥
ऐसा विचार मामांचा । ऐसा सुविचार मामांचा । ऐसा भक्ति भाव मामांचा । दिसे सर्वांना ॥१४४॥
श्रीफल आणि आहेर । अर्पिला जेथें सद्गुरुवर । तीर्थप्रसाद सुमधुर । घेतला सर्वानी ॥१४५॥
आकाशीं विजा चमकती । दाखविती पावसाची भीती । म्हणोनि आतां लोक सुचविती । चला परतू ॥१४६॥
सर्वजण परतले विजापूरला । तो दुसरा मार्ग सांगलीला । मामा थेट गेले निंबाळला । श्रीगुरुदेवांचे आश्रमीं ॥१४७॥
श्रीगुरुदेव आणि मामा । यांचा अलौकिक प्रेमा । पुढील अध्यांयी महिमा । वर्णूं सावकाश ॥१४८॥
श्रीगुरुदेवांच्या आश्रमीं । जाता उसळल्या आनंदऊर्मी । तेथें मामा आणि मामी । वंदन करिती प्रेमभरे ॥१४९॥
तेथेही भक्तिगीतें म्हणून । मनोभावे सेवा करुन । श्रीगुरुदेवपदीं नमून । मामा मामी परतले ॥१५०॥
वर्ष नसेल लोटले परचुरें पुन्हां बोलले । आता चिमड उमदीला गेले । पाहिजे आपण ॥१५१॥
धन्य परचुरे यांच्या उत्साहाची । हौस जबाबदारी पेलण्याची । आवडी सत्संगाची । अंतरीं म्हणोनी ॥१५२॥
पर्वा न करिती पैशाची । वाट पाहती संधीची । मामांच्या रुकाराची । तो मिळताचि आनंदले ॥१५३॥
ही निघाली छोटी यात्रा । आली चिमड क्षेत्रा । तापनाशी तीर्था पवित्रा । भेट देण्या ॥१५४॥
सद्गुरु श्रीनारायण । मामा करिती चरणवंदन । गुरुशिष्यांच्या आनंदाचे वर्णन । शब्दानें न करवे ॥१५५॥
शिष्य पावे कृतार्थता । तें गुरुसी ही धन्यता । समाधान उभयंताच्या चित्ता । सार्थकता जीवाची ॥१५६॥
वेळ होता नित्याची । कीर्तन सेवा करण्याची । मामांच्या तत्परतेची । साक्ष येथेही आली ॥१५७॥
करताल धरुन । सुरुं केले कीर्तन । मंडळी जमली नाद ऐकून । हरिकीर्तनाचा ॥१५८॥
श्रीसाधुमहाराजांच्या चरणापाशी । सेवा अर्पून भक्तीभावेसी । मामा निघाले हिंचगिरीसी । श्रीभाऊसाहेबांचे दर्शना ॥१५९॥
सहज मामांना आठवले । पूर्वी प्रवासांत एकवेळे । श्रीभाऊसाहेब महाराजांचे दर्शन झाले । अपूर्व योगायोगे ॥१६०॥
श्रीभाऊसाहेबांच्या समाधीचे । विश्वस्त विश्वासाचे । थोर साधक निष्ठेचे । श्रीबाबुराव गोखले ॥१६१॥
उराऊरीं भेटले मामांना । आनंदून पुन:पुन्हां । त्या भेटीच्या वर्णना । काव्य शक्ति कमी पडे ॥१६२॥
भक्तिप्रेमाचे सागर । उसळती अपरंपार । प्रेम लोटे प्रेमांत अनिवार । शांत अथांग दिसती पुन्हा ॥१६३॥
तेथील थाट अपूर्व । संतोषली मंडळी सर्व । वाटोनी आश्चर्य । आदरातिथ्यांचे ॥१६४॥
एका मागोन एक । प्रवासाचे पिकले पीक । आण्णा देवधर भावीक । म्हणती मामांना ॥१६५॥
चला जाऊ श्रीकाडसिध्दाला । कोल्हापूरच्या वाटेला । सांप्रदाय प्रभुवराला । भेट देऊ ॥१६६॥
चढण डोंगरावरची । कसोटी लागली जीपची । देवधरानीं कौशल्याची । चुणुक दाखविली ॥१६७॥
अति अशक्त मामांची प्रकृति । परी सर्वजण मनाभावे जपती । आपुल्या जीवीताची क्षिती । न बाळगता ॥१६८॥
महाराज श्रीकाडसिध्द । जे महाराष्ट्रांत अतिप्रसिध्द । परमार्थी प्रबुधध्द । भक्त्ति प्रसार करिती ॥१६९॥
मामांच्या भेटीची आवड । म्हनोनि काढिती सवड । प्रेम भेटीसाठीं उदंड । व्यवस्था करिती ॥१७०॥
हार घालती मामांना । तो त्यांना आवडेना । करोनि हरप्रयत्ना । गळा हार घालिती ॥१७१॥
हार घेऊनि हातात । मामा सांष्टांग घालती दंडवत । महाराज सद्गदीत । होत मनीं ॥१७२॥
ईश्वर असे सर्व ठिकाणीं । नाना रुपें घेऊनि । हे प्रत्यया ये अलिंगनी । संत सज्जनांच्या ॥१७३॥
ना मराठा ना ब्राह्मण । ना लिंगायत ना मुसलमान । जेथे भक्तिभावाचे राज्य संपूर्ण । तेथे एक ईश्वर ॥१७४॥
तेथे दिसे बंधुभाव । प्रेमाचा होई वर्षाव । रामराज्याचा प्रभाव । तेथेचि दिसे ॥१७५॥
संत तेथे रामराज्य । रामराज्य तेथें स्वराज्य । स्वराज्य तेथें सुख अविभाज्य । हा क्रम अव्याहत दिसे ॥१७६॥
आतां परचुरे म्हणती मामांना । चला भेटू श्रीरेवणसिध्दांना । श्रीगोंदवलेकर महाराजांच्या निवासस्थानांना । पूर्ण करु यात्रागमन ॥१७७॥
मामा पुन्हा तयार । कधीं प्रकृतीची तक्रार । सत्कार्यी अर्पिण्यास शरीर । सदा सज्ज असती ॥१७८॥
श्रीरेवणसिध्दा समोर । उजळोन तेरा रुपयांचा कापूर । मामा उभे राहिले ईश्वरासमोर । प्रकाशांत कर्पुरगौराच्या ॥१७९॥
धवल शिवलिंग सुंदर । धवल मामांचा मुखचंद्र । हृदय झाले प्रेमार्द्र । नयनीं नीर लोटती ॥१८०॥
मामा राहिले निवांत । शब्द न फुटे मुखांत । म्हणती झालो कृतकृत्य । श्रीरेवणसिध्दराया ॥१८१॥
श्रीरामें केला आराम । आतां जिवनाचा आला विराम । श्रीरेवणसिध्दपदीं प्रणाम । असो माझा ॥१८२॥
सहा तपावरी आयुष्य सरले । आपल्या कृपे सफल झाले । जें जें मनीं धरिलें । तें पूर्ण केले सिध्दराया ॥१८३॥
आता निश्चिंत मानसी । देह आर्पिला चरणासी । जी आज्ञा कराल मजसी । ती मानेन सुखेनैव ॥१८४॥
मी हा असा दीन दुबळा । दुर्धर रोगांचा फास गळा । तरीहि आणिले भेटीला । ही सत्ता असो तुमची ॥१८५॥
धन्य झालो संसारी । आतां आस न दुसरी । स्मरण तुमचें असो अंतरी । सर्वकाळ ॥१८६॥
करवून घेतली सेवा । तैशी केली सदाशिवा । आता आशिर्वाद दयावा । जाताना ॥१८७॥
कंठ दाटला अश्रूनी । परी प्रसन्नता दिसे वदनीं । समाधान श्री रेवणसिध्द दर्शनी । म्हणोनिया ॥१८८॥
झाले सांप्रदाय पुण्यधाम वर्णन । जेथ भाविकांना पूर्ण समाधान । आतां संत दर्शन । असे पुढील अध्यायीं ॥१८९॥
ईश्वराची सुसूत्र रचना । न कळे सामान्य जना । म्हणोनि सच्चरित्राच्या अवलोकना । अपार महत्व असें ॥१९०॥
अनंत देहाच्या यातना । शरीर जागचे हलवेना । परीं देहाच्या सारुन विवंचना । देव बोलवी भेटीला ॥१९१॥
माना अथवा न माना । परी ही अघटीत घटना । निमित्त मात्र करुन जना । ईश्वर सूत्र चालवितो ॥१९२॥
देवाच्या इच्छेने वर्तावे । देव करील ते मानावे । हेचि मामांच्या मनीं स्वभावें । म्हणोन पुण्यधाम दर्शन ॥१९३॥

इतिश्री गोविंदचरितमानस । जे स्वभावेचि अति सुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । पुण्यधाम वर्णन दशमोध्याय ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP