अन्नवहस्त्रोतस् - अरोचक

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या
प्रक्षिप्तं तु मुखे चान्नं यत्र नास्वादते नर: अरोचक स विज्ञेय:
भावप्रकाश म.खं. पान ४७४

तोंडामध्यें घातलेल्या अन्नाची रुचि लागत नाहीं. त्याचा स्वाद कळत नाहीं. रुचकर अन्न घेण्यामुळें बरें वाटण्याची जी संवेदना जिव्हेच्या द्वारां उत्पन्न होते ती होत नाहीं. या व्याधीस अरोचक असें म्हणतात. `अरोचक शब्दाशीं समानार्थक असणारे कांहीं शब्द आयुर्वेदीय वाड्मयांत येतात `आस्य वैरस्य' `विरसास्यता' `भक्तोपघात' `अरुचि' `अश्रद्धा', `अभक्त: छंद' `अनन्नाभिलाष' `भक्तद्वेष'. यामध्यें थोडा फार फरक असला तरी हे सामान्यत: समानार्थक शब्द आहेत असें म्हणतां येईल. प्रमाणभेद आहे पण प्रकारभेद क्वचित‍च आढळतो.

भक्तोपघातम् अरोचकं; अरोचकाभक्तच्छन्दान्नद्वेषा: पर्याया
बोद्धव्या:, कैश्चिदेषां परस्परं भेदोऽड्गीक्रियते ।
तथा च वृद्धभोज:-``प्रक्षिप्तं तु मुखे चान्नं जन्तोर्न स्वदते मुहु: ।
अरोचक: स विज्ञेयो, भक्तद्वेषमत: श्रृणु ॥
चिन्तयित्वा तु मनसा दृष्ट्‍वा श्रृत्वाऽपि भोजनम् ।
द्वेषमायाति यज्जन्तुर्भक्तद्वेष: स उच्यते ॥
यस्य नान्ने भवेच्छ्रद्धा सोऽभक्तच्छन्द उच्यते'' इत्यादि ।
टीका सु.उ.५७-३ पान ७८४

सुश्रुताच्या डल्हण टीकाकारानें भक्तोपघात, अरोचक, अभक्त:छंद, अन्नद्वेष हे एकमेकांचे पर्याय, म्हणून सांगितले आहेत. त्यानेंज भोजाचा उल्लेख करुन या शब्दांचे अर्थ कांहीं, लोक वेगळे करतात, असें सांगितलें आहे. अरोचक अन्नाला चव न लागणें, भक्तद्वेष-अन्न समोर आणले वा अन्नासंबंधीची कल्पनाहि मनांत आली तरी तिटकारा येणें, तें नकोसें वाटतें. अभक्तछंच-अन्नावर वासना नसणें, या शब्दांचे इतरहि कांहीं अर्थ टीकाकार देतात. वैरस्य-मुखस्य विरुद्धरसता (मा.नि. ज्वर ४ टीका) विरसस्यता-अव्यक्तरसतं मुख्यस्य भवति येन मधुराद्यन्यतमं रसं न निश्चिनोति । (वा.नि. २-१७ स. टीका) आरोचाकेन-मपि-अश्रद्धया तु केवलं नाभिलषति मुखस्थंतु भक्षयत्वेव । (वा.नि, २-१७ स.टीका) अरुचि: अन्नाभिलाषाभाव: वा.नि. २-९ टीका)

अरुचि आणि अश्रद्धा यांचे अर्थ एकाच टीकाकारानें दोन ठिकाणीं वेगवेगळे केले आहेत, असें वरील संदर्भावरुन दिसून येईल. यावरुन लक्षणदृष्टया वरील शब्दामध्यें भेद मानला तरी, अरोचक हा व्याधी मात्र वर उल्लेखिलेल्या पर्याय शब्दांतील अर्थ छटांनीं बोधित होणार्‍य़ा सर्व लक्षणांनीं युक्त असतो; असें आम्हांस वाटतें. मधुकोशकारानें स्पष्टपणेंच एषं त्रिविधोपि रोग: चरकसुश्रुताभ्यां अरोचकशब्देन संग्रहीता । असें म्हटलें आहे. (मा.नि.अरोचक ४ म. टीका) आणि म्हणून डल्हनाचें वचन लक्षण वाचक न घेतां रोगापुरतें मर्यादित घेऊन एक रोग या अर्थानें वरील सर्व शब्द परस्परांचे पर्याय मानावें.

अश्रद्धायां मुखप्रविष्टस्याहारस्याभ्यवहरणं भवत्येव परन्त्वनिच्छा,
अरुचौ तु मुखप्रविष्टं नाभ्यवहरतीति भेद: ।
आस्य वैरस्यमुचितादास्यरसादन्यथात्वम्, अरसज्ञता रसाप्रति पत्ति: ।
टीका च.सु. २८-२४ पान ३७८

चरकानें रसदुष्टीच्या प्रकरणांत वरील बहुतेक लक्षणांचा उल्लेख केला असून टीकाकारानें त्यांतील सूक्ष्म अर्थभेद दाखविला आहे.

स्वभाव
व्याधी स्वतंत्र असल्यास कष्टसाध्य, आणि उपद्रवात्मक असल्यास दारूण.

मार्ग
अभ्यंतर

प्रकार
पृथग दोषै: समस्तैर्वा मानसै: । (आरोचको भवेत्) च.चि. ८-६०

वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक आणि मानसज असे अरोचकाचे पांच प्रकार आहेत

निदान
अग्निमांद्य, अजीर्ण, अतिगुरु, अतिस्निग्ध, अतिमधुर, एक रसात्मक असा आहार, चिंता, शोकभयादि मानसिक कारणें, दुर्गंधी व किळसवाणें पदार्थ पुढें येणें, अशुचि अन्नसेवन या कारणांनीं अरुचि हा व्याधी उत्पन्न होतो.

संप्राप्ति
दोषै: पृथक् सह च चित्तविपर्ययाच्च ।
भक्तायनेषु हृदि चावतते प्रगाढम् ॥
नान्ने रुचिर्भवति तं भिषजो विकारं ।
भक्तोपघातमिह पञ्चविधं वदन्ति ।
सु.उ. ५७-३ पान ७८४

संप्राप्तिद्वारेण - संख्यामाह - दोषैरित्यादि । दोषै: पृथगिति
त्रय:, सह चेति समस्तै: एक:, चित्तविपर्ययात् कामशोकभया-
दिभिर्विप्लुपोतचित्तत्वात्, चित्तविपर्ययात्तु एक: केचित्,
`चित्तविपर्ययात्' इत्यत्र `शोकसमुच्छ्रयात् इति पठन्ति,
तन्मते कामादिजानामसंग्रह: । भक्तायनेषु अन्नवहेषु स्त्रोत:सु ।
भक्तायनमिति जिह्वोपलक्षणं, समानतन्त्र दर्शनात् ।
तया च-``पृथग्दोषै: समस्तैश्च जिह्वाहृदयसंश्रितै: ।
जायतेऽ रुचिराहारे द्विष्टैरन्यैश्च मानसै:'' इति ।
अवतते इति भक्तायनेष्वित्यत्रापि वचनविपरिणामात् संबन्धनीयम् ।
अवतते व्याप्ते ।
टीका सु. उ. ५७-३ पान ७८४

पृथग्दोषै: समस्तैर्वा जिह्वाहृदयसंश्रितै: ।
जायतेऽरुचिहारे द्विष्टैरर्थेश्च मानसै: ॥
च.चि. ८-६० पान १०७६

अग्निमांद्यादि कारणांनीं प्रकुपित झालेले दोष भक्तायन म्हणजे अन्नवहस्त्रोतस् या स्थानाला दुष्ट करुन जिह्वेच्या आश्रयानें अरुचि हा व्याधी उत्पन्न करतात. दोषदुष्टी गंभीर असल्यास रसवह स्त्रोतसाचीहि दुष्टी होते आणि त्यामुळेंहि अरुचि हा व्याधी उत्पन्न होतो. यासाठींच अन्नवहस्त्रोतसाबरोबरच रसस्त्रोतसाचें स्थान जें हृदय त्याचाहि उल्लेख केला आहे. चरकानें रसदुष्टीनें उत्पन्न होणार्‍या विकारामध्यें याच दृष्टीनें अश्रद्धा, अरुचि अशा लक्षणांचा उल्लेख केला आहे
(च.सू.२८-२३)
आमच्या मते अरोचक हा स्वतंत्र व्याधी असतो त्यावेळीं त्यांतील दोषदुष्टीची व्याप्ती केवळ अन्नवहस्त्रोतसापुरती मर्यादित असते. व्याधी परतंत्र असतांना रसवह स्त्रोतसाच्या आश्रयानें असतो किंवा अरोचक हा व्याधी जेव्हां दारुण होतो तेव्हां संप्राप्तीला गंभीरता प्राप्त झालेली असते आणि त्यांत रसवह स्त्रोतसहि अन्नवह स्त्रोतसाबरोबर दुष्ट होते. अरोचक हा विकार व्याधी म्हणावा या स्वरुपांत स्वतंत्रपणें क्वचित् आढळतो. बहुधा तो ज्वरादि विकारांचे लक्षण म्हणून असतो. राजयक्ष्म्यासारख्या सर्व शरीरव्याधी दारुणव्याधीमध्यें व्याधी इतक्याच महत्त्वाचा म्हणून, उपद्रव स्वरुपांत अरोचक हा विकार आढळतो. यासाठींच चरक, वाग्भटादि ग्रंथकार राजयक्ष्मा प्रकरणीं त्याचा उल्लेख करतात.

पूर्वरुपें
अरोचकानां प्राग्‍रुपानाभिधानं, रुपाणामेव अव्यक्तानां
प्राग्‍रुपत्वात् ।
सु.उ. ५७-४ टीका

अरोचकाची जीं रुपें म्हणून सांगितलीं आहेत तीच अल्प प्रमाणांत व्यक्त असतांना त्यांना पूर्वरुपें म्हणावें.

रुपें
कषायतिक्तमधुरं वातादिषु मुखं क्रमात् ।
सर्वोत्थे विरसं शोकक्रोधादिषु यथामलम् ॥

वाताद्युद्‍भवेष्वरोचकेषु मुखं-आस्यं, क्रमेण कषायतिक्त-
मधुरं भवति । व्याधिस्वभावात् पित्तारोचकेऽपि तिक्तवक्रता
भवति, न कटुकास्यत्वम् । सर्वोत्थे-सन्निपातजेऽरोचके,
विरसमास्यं भवति-निश्चितरसाज्ञनम् । शोकक्रोधादिसमु-
त्थेष्वरोचकेषु यथामलं यथादोषं, मुखं भवेत् ।
तत्र शोकभयकामलोभेर्ष्यादिसन्तप्तमन:समुत्थे वातप्रकोपात्
कषायम्, क्रोधसन्तप्तमन:समुत्थे पित्तप्रकोपात् विरसास्यत्वम्,
इति यथामलशब्दस्यार्थ: ।
वा.नि. ५-२९ स. टीकेसह पान ४८१

वातादिभि: शोकभयातिलोभक्रोधैर्मनोघ्नाशनगन्धरुपै: ।
अरोचका: स्यु: परिहृष्टदन्त: कषायवक्त्रश्च मतोऽनिलेन ॥
कट्‍वम्लमुष्णं विरसं च पूति पित्तेन विद्याल्लवणं च वक्त्रम् ।
माधुर्यपैच्छिल्यगुरुत्वशैत्यविबद्धसंबद्धयुतं कफेन ॥

अरोचके शोकभयाति लोभक्रोधाद्यहृद्याशनगन्धजे स्यात् ॥
स्वाभाविकं वक्त्रमथारुचिश्च त्रिदोषजे नैकरसं भवेत्तु ॥
आस्यरोगान्तर्निविष्टत्वादेवारोचकानाह ।
यद्यपि राजयक्ष्मचिकित्सतेऽप्यरोचका उक्ता: तथाऽपि
शोषोक्तोरोचकेभ्य: पृथगुत्पन्ना एवारोचका अभिधीयन्त
इति न पौनरुक्त्यम् । अतिलोभेनात्रारुचिरुच्यते तत्राति-
लोभेन कृतं सतताभ्यासमरुचिकारणं दर्शयति ।
विबद्ध संबद्धयुतमिति बन्धयुक्तमित्यर्थ: ।
सटिक च.चि. २६-१२४ ते १२६ पान १४१९

हृच्छूलपीडनयुतं विरसाननत्वं ।
वातात्मके भवति लिड्गमरोचके तु ॥
सू.उ. ५७-३

हृद्दाहचोषबहुता मुखतिक्तता च ।
मूर्च्छा सतृड्‍ भवति पित्तकृते तथैव ॥
सू.उ.५७-४

कण्डूगुरुत्वकफसंस्त्रवसादतन्द्रा: ।
श्लेष्मात्मके मधुरमास्यमरोचके तु ॥
सु.उ. ५७-४

सर्वात्मके पवनपित्तकफा बहूनि ।
रुपाण्यथास्य हृदये समुदीरयन्ति ॥
सु.उ. ५७-५

संरागशोकभयविप्लुतचेतसस्तु ।
चिन्ताकृतो भवति सोऽशुचिदर्शनाच्च ॥
सू.उ. ५७-५, पान ७८४

वातज
वातज अरोचकामध्यें तोंड तुरट होतें, हृदयामध्यें वेदना होतात, कोणत्याही रसाची चव कळत नाहीं.

पित्तज
पित्तज अरोचकामध्यें हृदयामध्यें दाह, चोष हीं लक्षणें जाणवतात. तोंड कडू होतें. आंबट होतें, चव जाते, गरम वाटतें, तहान लागतें, मूर्च्छा येते.

कफज
कफज अरोचकामध्यें कफ विदग्ध झाल्यास तोंड खारट होतें, तोंड गोड पडतें. चिकट होतें, खाज सुटते, जडपणा वाटतो, कफ फार सुटतो, अंग गळून गेल्यासारखें वाटतें, तंद्रा येते, थंडी वाजते. (सुश्रुताच्या टीकाकारानें गिळणें अवघड वाटणें, कंठसाद असें एक लक्षण पाठभेदानें दिलें आहे. ``विबद्ध संबद्ध युतं'' या चरकाच्या पदाचा गिळतां न येणें असाच अर्थ मधुकोशादि टीकाकारानें केला आहे. `विबद्धसंबद्धयुतं' या पदाचा कफाच्या साम स्थितींन कफ न सुटणें असा अर्थ करावा असें वाटतें. चरकाच्या टीकाकारानें चक्रपाणीनें हाच अर्थ अभिप्रेत धरला असावा.)

सान्निपातिक
मुखामध्यें निरनिराळे रस जाणवतात, व तीनहि दोषांची लक्षणें होतात.

मानसज्‍
मानसिक कारणांनीं उत्पन्न होणार्‍या अरोचकामध्यें जरी जिभेला वातादि दोषामुळें विशेष स्वरुपाची विकृत चव जाणवत नसली तरी, अन्नाला रुचि नसणें हें लक्षण येथेंहि असतेंच. तसेंच मानसिक कारण ज्या स्वरुपाचें असेल त्याप्रमाणें दोषप्रकोप होऊन निरनिराळ्या दोषांच्या प्रमाणें लक्षणें उत्पन्न होतात असें वाग्भटाच्या अरुणदत्त या टीकाकारानें सांगितले आहे. मानसिक कारणांनीं अरोचक उत्पन्न झालें असतां अश्रद्धा व भक्तद्वेष हीं लक्षणें विशेष असतात. हा प्रकार आगंतु आहे असेंहि मानतात.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें
कंठरोग, कास, प्रसेक, छर्दी, श्वास, हृद्‍, पार्श्वशूल (वा.चि.५-५५).

उपद्रव
छर्दी उत्क्लेश

उदर्क
दौर्बल्य.

साध्यासाध्यविवेक
स्वतंत्र आणि केवळ अन्नवहस्त्रोतसाश्रित व्याधी साध्य असतो. उपद्रवात्मक आणि रसवहस्त्रोतसाश्रित विकार कष्टसाध्य व असाध्य होतो.

रिष्ट लक्षणे
अत्यंत भक्तद्वेष वा अन्न पुढें येतांच वा तोंडांत घेतल्यास उलटी होणें या लक्षणाचें सातत्य रिष्ट आहे.

चिकित्सा सूत्रे
विचित्रमन्नमरुचौ हितैरुपहितं हितम् ।
बहिरन्तर्मृजा चित्तनिर्वाणं हृद्यमौषधम् ॥
द्वौ कालौ दन्तपवनं भक्षयेन्मुखधावनै: ।
कषायै: क्षालयेदास्यं धूमं प्रायोगिकं पिबेत् ॥
वा.चि. ५-४७, ४८ पान ६१५

अरुचौ कवलग्राहा धूमा: समुखधावना: ।
मनोज्ञमन्नपानं च हर्षणाश्वासनानि चि ॥
च.चि. २६-२१५ पान १४२९

अरुचिमध्यें प्रथम अंतर बाह्य शोधन करावें. बाह्य शोधनांत, तिक्त, कषाय रसाच्या वनस्पतीनें सकाळ संध्याकाळ दोन वेळां तोंड स्वच्छ धुवावें. तिक्त रस न आवडणारा असला तरी अरुचि घालविणारा आहे. तिक्त रसांच्या द्रव्यांच्या काढयाची गुळणी तोंडामध्यें धरावी. मिठाच्या पाण्यानें गुळण्या कराव्या. जीभ घासावी. औषधी धूम्रपान करावें. अंत:शुद्धीसाठी दोषानुरुप बस्ति, वमन, विरेचन यांचा उपयोग करावा. लंघन करावें. नंतर रुचकर असे नाना प्रकारचे पदार्थ खावयास द्यावें. निरनिराळी तोंडीं लावणें द्यावींत. अम्ल, लवण आणि कटु (तिखट) हे रस चव उत्पन्न करणारे आहेत, तरी त्यांचा उपयोग करावा. मन प्रसन्न होईल अशी व्यवस्था करावी. आवडणारे पदार्थ खावयास द्यावेत.

कल्प
महाळुंग, निंबू, आले, सुंठ, मिरे, पिंपळी, आमसूल, जिरे, तालीसपत्र निंबपत्र कुटकी काडे चिराईत हिंग, सैंधव, पांदेलोण. पंचकोलासव, द्राक्षासव, आरोग्यवर्धिनी, अष्टांगलवण चूर्ण.

पथ्य
अजीर्ण होऊं देऊं नये. लघु द्रव अम्ल रसात्मक आहार घ्यावा. आलें लावलेलें ताक उत्तम.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP