अन्नवहस्त्रोतस् - परिचय

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


अन्नवहानां स्त्रोतसामामाशयो मूलं वामं च पार्श्वम् ।
च.वि.५-११ पान ५२६

या स्त्रोतसामध्यें मुख, गल, वामपार्श्व (अन्ननलिका), आमाशय व लघ्वंत्रें (ग्रहणी, पच्यमानाशय) या अवयवांचा समावेश होतो. स्थूलांत्र किंवा पक्वाशय यामध्यें अन्न हें कोणत्याहि प्रकारें अन्न या स्वरुपांत न राहतां अन्नाची परिणती विष्ठेंत झालेली असते, म्हणून महास्त्रोतसाच्या व्याप्तींत स्थूलांत्राचा समावेश होत असला तरी अन्नवहस्त्रोतसामध्यें त्याचा समावेश करुं नये. शरीराच्या पोषणासाठीं; शरीरांतील सर्व धातूपधातूंची नित्य होणारी झीज भरुन काढण्यासाठीं अन्नाची आवश्यकता असते. सर्व शरीर-अर्थात त्यांतील व्यापारांना मुख्यत: कारणीभूत असणारे `त्रिदोष', शरीराचें धारण करणारे धातूपधातू, व त्यांनीं घटित असे शरीरावयव, आणि त्याज्यभाग म्हणून शरीरांत उत्पन्न होणारें स्वेदमूत्रपुरीषादि मल, हें सर्वपंचमहाभूतांनीं घटित असल्यामुळें त्यांच्या पोषणासाठीं, धारणासाठीं, समानगुणात्मक पंचमहाभूतांनीं घटित अशा आहारद्रव्यांचीं स्वभावत:च गरज असते.

धातव: पुन: शारीरा: समानगुणै: समानगुणभूयिष्ठैर्वा
अपि आहारविकारै: अभ्यस्यमानै: वृद्धिं प्राप्नुवन्ति, र्‍हासं
तु विपरीत गुणैर्विप रीतगुणभूयिष्ठैर्वाप्याहारैरभ्यस्यमानै: ।
च.शा. ६-९ पान ६९०

गुणसामान्य मानूं नये असें म्हणणें चरकाच्या वरील वचनानें आपोआपच खंडित होते. बुद्धि आणि र्‍हास यांचें कारण म्हणून चरक सरळ सरळ समानगुणात्मक व विपरीतगुणात्मक द्रव्यांचा उल्लेख करीत आहे. याच सूत्रांच्या पुढील सूत्रांत चरकानें गुरुलघु इ. सर्व गुणांचा प्रत्यक्ष उल्लेख केला असून त्यांच्या उपयोगानें धातूंची वृद्धि वा क्षय कसा होतो तें सांगितलें आहे. तसेंच कोणत्या दोषधातूकरितां कोणतीं द्रव्यें वा कोणकोणत्या गुणांनीं युक्त द्रव्यें वापरावीं तेंहि चरकानें स्पष्ट केलें आहे. त्यावरुन गुणसामान्य मानणें कसें आवश्यक आहे तें स्पष्ट होईल. षड्‍रसात्मक सर्वगुनसंपन्न व दोषवर्जित असा आहार सेवन करीत असतांना मुखामध्यें त्यावर चर्वणाचा पहिला संस्कार होतो. त्याच वेळीं कफ अन्नाशीं मिसळतो.

बोधक कफ
जिह्वामूलकंठस्तु जिह्वोन्द्रियस्थ-सौम्यत्वात् सम्यक् रसज्ञाने प्रवर्तते ।
सु.सू. २१-१४ पान १०२

रसबोधनात् बोधको रसनास्थायी ।
वा.सू. २१-१७ पान १९५

बोधककफ हा मुखामध्यें जिह्वा-मूल, कंठ यांच्या आश्रयांनीं रहातोतो रुचि उत्पन्न करणें, रसबोधनास साहाय्यभूत होणें हीं कर्मे करीत असतांनाच स्वत:च्या द्रवस्वभावानें चावल्या जाणार्‍या अन्नाला द्रव शिथिल करण्याचें कार्यहि अनुषंगानें करीत असतो. त्यामुळें अन्न पचनास त्याची थोडीशी मदत होते. प्राणवायूच्या क्रियेनें अन्न हे घसा व अन्ननलिका (वामपार्श्व) यांतून आमाशयांत जाऊन पोहोंचतें. व तेथें क्लेदक कफ अन्नाशीं मिसळतो.

क्लेदन कफ
स तत्रस्थ: एव स्पशक्त्या शेषाणां श्लेष्मस्थानानां शरीरस्य
च उदककर्मणा अनुग्रहं करोति ।
सु.सू. २१-१४ पान १०२

यस्त्वामाशयसंस्थित: क्लेदक: सोन्नसंघातक्लेदनात् ।
वा.सू. १२-१६ पान १९४

क्लेदक कफ हा आमाशयात राहून घेतलेल्या अन्नाचें विलोडन करतो. व त्यांतील घट्टपणा (संघात) नाहींसा करुन अन्नाला पातळ, सरबरींत (द्रव) असें रुप आणतों. त्यामुळें पचनाचे पुढील संस्कार चांगल्या रीतीनें होतात. याच क्लेदक कफामुळें शरीरांतील अप्‍ धातूचें संरक्षण होतें आणि इतर कफाचें पोषणहि या क्लेदक कफामुळेंच होतें. आहारसापासून रस धातूच्या निर्मितीच्या वेळीं उत्पन्न होणारा किट्टरुप कफ हा या कफांचें पोषण करणारा आहे. क्लेदक कफ व तो पोषककफ हें कांहीसे परास्पवलंबीं आहेत हा त्यांचा संबंध लक्षांत घेऊनच डल्हणानें (क्लेदक) कफाचें उदीरण आमाशयांत होतें व त्याची निर्मिती रसधातू पासूनच आहे असें म्हटलें आहे.
(सु.सू. २१-१३ पान १०२)

या क्लेदकाने अन्न सूक्ष्म रीतीनें भिन्न संघात होते व त्यावर पाचकपित्ताश्रित अग्नीचे संस्कार होणें सुलभ जाते. याच ठिकाणीं मधुर अवस्थापाक होतो. आमाशयाच्या उत्तर भागापासून पाचक पित्त, तदंतरगत जाठराग्नि व भूताग्नि आणि पचनाच्या कार्याला मदत करणारा समानवायू यांचे संस्कार अन्नावर होऊं लागतात आणि ही क्रिया लघ्वंत्राच्या अंतापर्यंत सारखी चालू रहाते. या आमाशयापासून लघ्वंत्रापर्यंत अन्नाचें वहन पचन होण्याच्या कालांतच त्यावर अम्ल अवस्था पाकाची क्रिया होत असते. लघ्वंत्राच्या शेवटीं अन्न येईपर्यंत अन्नांतील आवश्यक असा सार भाग शोषला जाऊन तो रसवाहिनींच्या द्वारां सर्व शरीराचें पोषण करण्यास सिद्ध झालेला असतो.

व्यान .... विभज्य चान्नस्य किट्टात्सारं तेन क्रमशो धातूंस्तर्पयति ।
अ.सं.सु. २० पान १४७

अन्नविभजनामध्यें व्यानाचेंहि कार्य आहे. आमच्या कल्पनेप्रमाणें समान हा सारकिट्टाला अणुपरमाणुश: पृथक् करतो व व्यान हा त्यांचे वेगळेपण स्पष्ट करुन सार व किट्ट अशा दोन गटांत त्याची विभागणी करुन तद्‍वारां होणार्‍या पोषणास साहाय्यक होतो. अन्नास येथून पुढे मल स्वरुप येतें. या ठिकाणीं कटु अवस्था पाक पूर्ण होतो आणि वातदोषाची उत्पत्ती होते. येथून केवळ द्रवांश तेवढा शोषला जावयाचा असतो. पुरीष आणि मूत्र यांचे पृथक्करण पुढें पक्वाशयांत होते.

आहार परिणमन
अभिनवमृत्कुम्भजललवस्यन्दनन्यायेन सूक्ष्मस्त्रोतोनुप्रवेशितया
सोऽन्नरसो धात्वाप्यायनमात्रं करोत्येव, अन्यथा वर्षगणानुबन्धि
जीवितं क्षयिणो न सम्भाव्यते ।
तस्माद्धातुस्थिति मात्रं भवति न तु धातुपोषणमिति स्थितम् ।
वा.नि. ५-२२ स.टीका पान ४७९

आहार रसाचें रसवाहिन्यांतून सर्व शरीरभर विसर्पण होत असतांना धांतूना आहार रसानें मिळणारें पोषण मृत्कुंभस्यंदनन्यायानें मिळतें. सूक्ष्म सूक्ष्मतम होत गेलेल्या रसवाहिन्या शरीरावयांतील धातूपधातूंचे परमाणु यांचा एकमेकांशीं अत्यंत सन्निकर्ष होतो आणि मग रसवाहिन्यांच्या सूक्ष्म आवरणांतून आहाररस पाझरुन धातूंच्या अंशांचें पोषण होतें. अशा रीतीनें सर्व धातु पुष्ट होत जातात. राजयक्ष्म्याच्या प्रकरणांत टीकाकारानें या न्यायाचा उल्लेख केला असला तरी प्रकृत आहार परिणमनाचें स्पष्टीकरण करण्यासाठींहि तो जसाच्या तसाच उपयुक्त होतो.

अन्नवहस्त्रोतोदुष्टीचीं कारणें
अतिमात्रस्य चाकाले चाहितस्य च भोजनात् ।
अन्नवाहानि दुष्यन्ति वैगुण्यात्पावकस्य च ॥
च.वि. ५-२० पान ५२८

वेळेसंबंधीचा नियम न पाळतां भोजन करणें, प्रमाणानें अधिक मात्रेंत भोजन करणें, शरीराला आवश्यक असलेल्या अन्नांतील, गुणांचा विचार न करतां अति गुरु, अति स्निग्ध, अति विदाही, अति शीत अति उष्ण, अति रुक्ष कट्ट, अम्ल, तीक्ष्ण, अति मधुर, अति लवण असे अहितकर अन्न सेवन करणें यामुळें अन्नवहस्त्रोतसाची दुष्टी होते. तसेंच अन्नाचे पचन करणारा जो अग्नि त्याला विगुणता प्राप्त झाली असतांनाहि अन्नवहस्त्रोतस् दुष्ट होते. अग्नीला विगुणता येण्याच्या कारणांत अन्न सेवनांतील दोषांसवेंच चिंता, शोक, भय, अति श्रम, व्याधिकर्षण हीं कारणें महत्त्वाचीं असतात.

दुष्टि लक्षणें
प्रदुष्टानां तु खल्वेषाम् इदं विशेषविज्ञानं भवति ।
तद्‍यथा अनन्नाभिलषणमरोचकाविपाकौ छर्दि च
दृष्ट्‍वाऽन्नवहान्यस्य स्त्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात् ।
च.वि. ५-११ पान ५२६

अन्नावर वासना नसणें, तोंडाला चव नसणें, अन्न न पचणें, ओकारीं येणें हीं अन्नवहस्त्रोतसाच्या दुष्टीचीं विशेष लक्षणें आहेत. याव्यतिरिक्त शूल, विदाह गौरव, हृल्लास, आध्मान, द्रवमलप्रवृत्ति, उद्गार हीं लक्षणेंहि अन्नवह स्त्रोतसाच्या दुष्टीचीं द्योतक आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP