श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय पंधरावा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥
हे शिखर शिंगणापूरनिवासी । मदनदहना व्योमकेशी । मांगीश या नांवासी । तूंच धारण केलेंस ॥१॥
अवघीच नांवे तुझीं हरा । तूं सर्वव्यापी सर्वेश्वरा । हे गिरिजापते शंकरा । नीलकंठा पंचतुंडा ॥२॥
देवा तुझेंच वर्णन । आहे अवघ्या पुराणांतून । कोणी विष्णू कल्पून । तुजलागी वर्णिलें ॥३॥
कोणी कोणी दक्षिणामूर्ती । देव हाच एक पशुपती । कांही शास्त्री ऐसें म्हणती । दत्त हाच देव असे ॥४॥
या नामांचा प्रकार । जैसे हेमावरी अलंकार । कोणत्याही नगीं साचार । हेम आहे भरलेलें ॥५॥
हेमांत कमतरता नाहीं । तैसीच तुझी नवलाई । हे शंभू महादेवा सर्वठायीं । तुझाच वास दीनबंधो ॥६॥
परी महाराष्ट्राच्या उध्दारा । प्रगटलास तूं शिंगणापुरा । शिखरावरी वास खरा । केलास तूं भक्तास्तव ॥७॥
त्या तुजला दंडवत । करुनिया देवा सत्य । वरदान मागतों खचित । तें देई उदारपणें ॥८॥
एक माधव गांगला । म्हणून भक्त तुझा भला । त्यानें करुन आग्रहाला । ऐशी विनंती केली मज ॥९॥
तुम्ही म्हणविता शिवभक्त । मग शिखर शिंगणापुराप्रत । कां न वर्णिलें आजपर्यंत । काव्यशक्ती असूनिया ?॥१०॥
ती माझी चूक मला कळाली । म्हणून मीं तयारी केली । महात्म्य लिहिण्याची चंद्रमौळी । या कोथल पर्वताचें ॥११॥
ती निजकृपेनें पूर्ण करा । हे देवाधिदेवा पार्वतीवरा । भाललोचना गंगाधरा । शिव शिखरनिवासिया ॥१२॥
महात्म्य वदविणें हें कांही । तुला मुळीच अशक्य नाहीं । म्हणून मी लागलों पायी । तुझ्या शंभू महादेवा ॥१३॥
मशीं आलें म्हातारपण । शक्तीही झाली क्षीण । मग महात्म्याचे लेखन । कैसे सांग करावें ? ॥१४॥
ऐसा मन करी विचार । तों आठव होता साचार । तुझा दयाळा येतो धीर । महात्म्य लिहावयाकारणें ॥१५॥
म्हणून तुझ्या बळावरी । मी ही उडी मारितों खरी । सर्व बाजूनें सावरी । मजला आतां दीनबधो ॥१६॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण । पार्वती आणि पंचवदन । दयूत खेळाया कारण । बैसती झाली विनोदें ॥१७॥
पणामाजीं शंकर हरलें । म्हणून रुसून निघाले । द्युत खेळण्याचे कळून आलें । फ़ळ त्या पार्वतीला ॥१८॥
ती ही भ्रताराच्या शोधार्थ । निघती झाली अति त्वरीत । वनोपवनें पहात पहात । जंबूद्वीपामाझारीं ॥१९॥
द्वितीयाध्यायामाझारी । आले कोथल पर्वतावरी । भगवान शितिकंठ त्रिपुरारी । रम्य वना पाहुन ॥२०॥
पार्वतीही शोधार्थ । आली त्याच पर्वताप्रत । गुप्तलिंगी झाली स्थित । शिवाराधना करावया ॥२१॥
तप करितां प्रगट झाला । पुढें तिच्या शंकर भोळा । तें पाहून जटेला । धरती झाली पार्वती ॥२२॥
आणि म्हणे सांग आतां । प्राणनाथा कोठें पळता । ऐसा अहंकार तिसी होता । शंकर गुप्त जाहलें ॥२३॥
म्हणूनिया तप पुन्हा । करुं लागली त्याच स्थाना । जटातीर्थामाजी स्नाना । प्रत्यहीं ते करुन ॥२४॥
हें मांगीश पुराणाचें । सार दोन्ही अध्यायाचें । ग्रथित मी केले साचें । प्रथमाध्यायी विबुधहो ॥२५॥
तृतियाध्यायीं ऐशी कथा । देवदानवा युध्द होता । इंद्र पाहून झाला भीता । त्या महासंग्रामाकारणें ॥२६॥
आणि आला शिवाकडे । गा-हाणे सांगाया रोकडें । त्याचें ते अवघें सांकडे । निरसिलें अमृतेश्वरांनी ॥२७॥
प्रसाद अमृतकुंभाचा । शिवें त्या दिधला साचा । त्या प्रसादें इंद्राचा । कार्यभाग झाला कीं ॥२८॥
गुप्तलिंगाहून उमाकांत । आला बिल्वलिंगाप्रत । हें लिंग शांडिरिक वनांत । आहे आहे विबुधहो ॥२९॥
येथे बिल्वलिंगासमोर । होतें पहा सरोवर । जेथे एक मगर । आला देवशर्म्यास धरावया ॥३०॥
त्याला शिवानें मारिलें । देवशर्म्यास सुखी केले । हें बिल्वलिंग आगळें । आहे मांगीश महात्म्यांत ॥३१॥
पुढें बाणलिंगासी । येता झाला व्योमकेशी । याची कथा साकल्येंसी । आहे त्या अध्यायांत ॥३२॥
हे तीन चार पांचाचें । सार मांगीश महात्म्याचें । तेंच मी बोलिलों वाचें । द्वितियाध्यायामाझारीं ॥३३॥
देव तृतिय अध्यायांत । आले कोथल पर्वताप्रत । परी न भेटले तयाप्रत । गिरिजा आणि महेश्वर ॥३४॥
म्हणून करमरी दरीत। देव जीव देण्याप्रत । सिध्द झाले अकस्मात । तो नारद भेटलें त्या ॥३५॥
त्यानें समजूत घालुनी । देवा बैसविलें तपासनीं । ज्या तपानें शूलपाणी । शंकराची भेटी होय ॥३६॥
येथे मांगीशाचा । सहावा अध्याय संपला साचा । देवाचिया स्थानाचा । आहे उल्लेख सातव्यांत ॥३७॥
तो सातवा येथेच । मीं विशद केला साच । आतां तपस्थान विष्णूचें । कोणतें तें आहे पुढें ॥३८॥
पंढरी क्षेत्रामाझारी । चंद्रभागेचिया तीरी । लिंग घेऊन डोक्यावरी । विष्णू उभे राहिलें ॥३९॥
पुंडलिकापाशी ब्रह्मदेव । म्हसवडग्रामी भैरव । माणदेश हे नांव । या देशा कां प्राप्त झालें ॥४०॥
तैसें उदितेश्वर लिंगाची । वा इतर देवांच्या स्थानाची । आणि हकिकत नवचक्राची । येथेच आहे विबुधहो ॥४१॥
येथें अध्याय तिसरा । पूर्ण झाला आहे खरा । त्याचा योग्य विचार करा । म्हणजेच अवघेच कळेल ॥४२॥
श्रीपांडुरंगानें विचार केला । या दोघांच्या ऐक्याला । धरुनिया व्यवहाराला । घडवून आणणें आहे मज ॥४३॥
परि या कृत्याप्रती । उमेची पाहिजे सम्मती । म्हणून तिची कमलापती । स्तुती करिता जाहला ॥४४॥
त्या स्तुतीस जाणून । अंबेनें जयेलागुन । दिली पंढरीसी पाठवून । विठोबासी भेटावया ॥४५॥
मांगीशाचा आठवा । येथे अध्याय संपला बरवा । आतां नववा ऐकावा । यथामती सांगतों ॥४६॥
नवव्यांत जया भेटली । पंढरीक्षेत्रामाजीं भली । तिनें सर्व कथन केली । श्रीगौरीची कथा पहा ॥४७॥
पिंगल सिध्देश्वर एमाई । वर्णन आहे येच ठायीं । एकवीरा नाम हेंही । देवीस मिळतें जाहलें ॥४८॥
परी न शिव भेटला । अंबा तप करायला । लक्षून पूर्व दिशेला । तुळजापुरास गेली पै ॥४९॥
सार हें नवव्याचे झालें । आतां दहाव्याचें राहिलें । तेंही मी कथन केलें । याच तृतिय अध्यायांत ॥५०॥
मांगीशाच्या दहाव्यांत । कथा ऐशा आहेत ग्रथित । ती एकीपुढें एकीप्रत । मी आतां सांगतों ॥५१॥
खेटकग्रामाभीतरीं । सांप्रत प्रगटला त्रिपुरारी । म्हणून त्वरेनें निघाला हरी । तयालागी भेटावया ॥५२॥
हरीनें मध्यंतरीं । शिवक्षेत्रे धुडिली सारीं । जी आहेत भीमातीरी । माचणूर आणि धूळखें ॥५३॥
खेटकी परमात्मा भेटला । पांडुरंगासी भला । येथेंच आहे संपला । दहावा अध्याय मांगीशाचा ॥५४॥
अवघे देव शिवासहीत । आले तुळजापुरांत । देवीची स्तुती विश्वनाथ । करूं लागला निजमुखें ॥५५॥
हें अकराव्याचे आहे सार । मांगीशाच्या साचार । येथपर्यंत झाले चार । अध्याय आमुचे विबुधहो ॥५६॥
पांचव्यामाजी आहे कथन । कोथलपर्वतीं येऊन । जगदीश्वर नारायण । पंढरपुरविहारी ॥५७॥
चैत्रशुध्द अष्टमीला । घालून दोघांच्या समजुतीला । विवाह आहे लाविला । कोथलाच्या शिखरावरी ॥५८॥
हें बारा तेराचें आहे सार । मांगीशाचें साचार । आतां चौदाव्यावर । लक्ष ठेवा ऐकावया ॥५९॥
सहावा अध्याय याचा । कोथलाच्या रूंदी उंचीचा । तैसा देवादिकांचा । पर्वती वास कोठे असें ॥६०॥
तेवी महीमीन भस्मीचें । याच ठायीं आहे साचें । ब्राह्मयाच्या उत्पत्तीचें । कथानक येथेची ॥६१॥
भस्म कशाचें करावें । भस्म कोठें लावावें । हे व्याख्यान आहे बरवें । सहाव्या अध्याय माझारी ॥६२॥
सप्तम आध्यायांत । रुद्राक्षांचें महत्व । आणि ते किती असावेत । कंठी मनगटी आणि शिरी ॥६३॥
याचेच आहे कथन । तैसेंच महानंदेचें आख्यान । कुक्कुट मर्कटालागून । मनुजयोनी प्राप्त झाली ॥६४॥
ते काश्मीर देशाला । राजा प्रधानाच्या पोटाला । येऊन गेले कैलासाला । रहावया कायमचे ॥६५॥
शिवपंचाक्षरी मंत्राची । महती येच ठायीं साची । वसुमती आणि कलावतीची । कथा येथेच ग्रथित असे ॥६६॥
हें सतरा अठरा एकोणीसाचे । सार मांगीश महात्म्याचें । हें तीन अध्याय सप्तमीं साचे । आम्हीं आहेत कथन केले ॥६७॥
सोमवार व्रताचें । आणि तें करणाराला कोणचें । फळ मिळतसें साचें । कथन अष्टम अध्यांयांत ॥६८॥
धनराशीस रवी येता । चांद्रव्रत करणें तत्वता । गुप्तलिंगाची योग्यता । येच अध्यायी ग्रथित असे ॥६९॥
श्रोते बिल्वलिंगावर । व्रत उमामहेश्वर । कोणीं केले त्याचा थोर । इतिहास येच अध्यायी ॥७०॥
वीस एकवीस बावीस । पुराण जें का मांगीश । त्या तिघांच्या कथेस । ये अध्यायी ग्रथित असे ॥७१॥
नवव्या अध्यायी ऐशी कथा । आहे ती ऐका आतां । मीन राशीस सूर्य येता । कल्यानव्रत करावें ॥७२॥
तें व्रत करण्याची । जागा आहे शिखर साची । या व्रतें बहुतांची । चिंता दूर झालीसें ॥७३॥
सूर्य वृषभ राशीला । येता विन्घेश्वर व्रताला । करणे वंदून हेरंबाला । कोथलाच्या दक्षिणेसी ॥७४॥
गणपती स्थाना सन्निधान । आहे देव षडानन । तेथे हे सुब्रह्नण्य । व्रत साधकें करावें ॥७५॥
या सुब्रह्नण्य व्रतासी । करणें तूल संक्रांतीसी । शुक्रवारच्या दिवशी । आरंभ याचा करावा ॥७६॥
हें मांगीश पुराणाचे । अध्याय आहेत तीन साचे । तेवीस चोवीस पंचविसाचें । सार या नवव्यामध्यें ॥७७॥
श्रोते दहाव्या अध्यायांत । केले कोणी शिवरात्रीव्रत । बाणलिंगापाशी सत्य । हें ग्रथित केले कीं ॥७८॥
तैशीच उदितेश्वराची । कथा येथेंच आहे साची । त्या केदारव्रताची । भाद्रपदमासीं करणें जें ॥७९॥
महात्म्य जें का मांगीश । त्याचे सहवीस आणि सत्तावीस । कथिलें याच अध्यायांत । दशमानजीं पहा तें ॥८०॥
अकराव्याचियाठायीं । तीन व्रते असतीं हीं । सविधी त्याचें पाही । वर्णन त्या त्या ठायीं असे ॥८१॥
भैरव त्रिशूल आणि गौरी । हीम तीन व्रतें तीन प्रकारी । करणें या कोथलावरी । त्या त्या देवतेप्रीत्यर्थ ॥८२॥
महात्म्य जें का मांगीश । त्याचे अठ्ठावीस, एकोणतीस, तीस । पुरे अकराव्यास । झालें आहे प्राकृताच्या ॥८३॥
अध्याय तो बारावा । वृषभव्रताचा आहे बरवा । हें व्रत महादेवा । अत्यंत प्रिय असें कीं ॥८४॥
नंतर अष्टतीर्थाची । प्रदक्षणा ती कथिली साची । हकिकत ती नागाची । आहे याच अध्यायांत ॥८५॥
सर्व तीर्थाचें वर्णन । त्याच्याच पुढें केलें कथन । ऐसे अध्याय हे तीन । एकतीस बत्तीस तेहतीस पहा ॥८६॥
विदयुन्मालीचा जो सुत । गजासुर नामें प्रख्यात । ज्याचा केला अंत । कोथलावरी सदाशिवें ॥८७॥
दवणा बेल ही वनस्पती । कां प्रिय झाली शिवाप्रती । तीर्थ घ्यावे कोण्यारितीं । त्याचें कथन तेराव्यांत ॥८८॥
चौतीस, पसतीस, छत्तीस । महात्म्य जें कां मांगीश । त्याचे अध्याय झाले खास । येथवरी विबुधहो ॥८९॥
आतां चौदावियाचे मधीं । दहीभात-लेपन विधी । प्रदक्षणा ती कथिली सुधी । सोमसूत्री विबुधहो ॥९०॥
महत्व शिवपूजेचें । एकूणचाळिसांत साचें । हेंच आमच्या चौदाविसाचें । सार कथिले विबुधहो ॥९१॥
वर्णन भविष्यपुराणीं । ज्याचें आहे केले जाणी । तींच हीं स्थानें दोन्हीं । असावीसें वाटे मज ॥९२॥
एक शिखर शिंगणापूर । दुसरें तें पंढरपूर । शिव आणि रमावर । येते झाले महाराष्ट्रीं ॥९३॥
कलियुग जेव्हां लागलें । तयीं अवघेंच विपरीत झालें । भरतखंडीं न राजे उरलें । सूर्य सोमवंशाचे ॥९४॥
अम्मल मुसलमानांचा । चहुंकडेच झाला साचा । नायनाट सुखदएकीचा । झाला असे विबुधहो ॥९५॥
त्या क्रुर यवनलीलेचें । वर्णन कोण करी वाचें । चहूंकडून भारताचें । दैन्य होण्याचा समय आला ॥९६॥
ऐशा भयंकर वेळेला । शिव सोडून कैलासाला । रक्षण करण्या भारतीला । शिंगणापुरांत आले कीं ॥९७॥
तैसें वैकुंठीहून भगवान । आल्य पंढरीकारण । पदनतांचे रक्षण । करावया कारणें ॥९८॥
नरवीर शूर पुरुषाला । शंकरानें हात दिला । संतास्तव उभा ठेला । पांडुरंग विटेवरी ॥९९॥
एवंच हरिहरांनीं । महाराष्ट्रांत येउनी । भरतखंडालागुनी । आणिलें नांवलौकिका ॥१००॥
शिव आणि वासुदेव । हेच हिंदूंचे मुख्य देव । इंद्र पूषा भैरव । हे उपदेव असती कीं ॥१॥
शिवविष्णूच्या नांवावरी । क्षेत्रें अवघीं मोडतीं खरीं । कथा त्यांच्या नानापरी । आहेत ग्रथित केलेल्या ॥२॥
असो शंभूमहादेवाकारण । मांगीश हें नामाभिधान । कां लाधलें याचें कथन । चतुर्थ अध्यायीं दिलें असे ॥३॥
उमामहेश्वर प्रसादें भलीं । जीं नररत्नें उदया आलीं । तीं अवघींच सरतीं केलीं । भक्तानें या विठ्ठलाच्या ॥४॥
शिवाजीस धरणें आलें । तै तुकारामानें रक्षण केलें । कीर्तनीं जे जे होते बसलें । ते अवघेच शिवाजी दिसलें कीं ॥५॥
मांगीश नामाचें दुसरें स्थान । आहे गोमांतकालागुन । हीं दोन्हीं स्थानें समसमान । आहेत कीं विबुधहो ॥६॥
हा कोथलनामें गिरिवर । माण नदीच्या तीरावर । जेथें शंभूमहादेव शंकर । आनंदेंसी राहिला ॥७॥
ज्याच्या प्रसादें महाराष्ट्राचा । लौकिक सर्वत्र झाला साचा । जो महाराष्ट्र आर्यभूमीचा । ह्रदय आहे केवळ ॥८॥
सह्याद्रीखंडांत । याची कथा आहे ग्रथित । बुधहो स्कंदपुराणांत । ऐसे कोणी कोणी सांगती ॥९॥
या मांगीश महात्म्याचे । दोन ग्रंथ आहेत साचे । त्या दोन्ही पुराणाचे । कथेंत फ़रक आहे कीं ॥११०॥
या दोन्ही ग्रंथांचा । गीर्वाणीं कर्ता कोण साचा । उल्लेख त्याच्या नांवाचा । दोन्ही पोथ्यांत नसे कीं ॥११॥
यापैकी एक पोथी । विष्णू माधव सरस्वति । यांच्या जवळील दुसरी ती । घरची असे बडव्याच्या ॥१२॥
याच महात्म्याचा तिसरा । ग्रंथ प्राकृतीं आहे खरा । याचा कर्ता साजिरा । चिन्मयदास असें की ॥१३॥
नाम त्या चिन्मयदासाचें । निंबाजी व्यंकटेश साचें । यांई पचेंचाळीस अध्यायाचें । महात्म्य एक लिहिले कीं ॥१४॥
हें प्राकृत महात्म्य कशावरुन । लिहिलें हें न कळें पूर्ण । दोन्ही पोथ्या गीर्वाण । अवलोकन केल्यावरी ॥१५॥
या तिन्ही पोथ्यांच्या कथेंत । थोडाथोडा फ़रक पडत । आम्ही जो कां लिहिला ग्रंथ । हा सोळा अध्यायाचा ॥१६॥
तो शकें सत्राशे पंधरांत भली । जी का पोथी लिहिली गेली । तीच आम्हीं प्रधान धरली । आहे हें विसरूं नका ॥१७॥
ऐसेंच एक पुराण । गोमांतकी झालें निर्माण । त्याचेंही नामाभिधान । मांगीश ऐसेंच असें कीं ॥१८॥
कांही श्लोक तयाचे । या महात्म्या जुळती साचे । म्हणून काहूर विचारांचे । उठणार आहे सर्वची ॥१९॥
या गोमांतकी मांगीशाचा । सुभानंत पिकली नांवाचा । कर्ता अंकोली गांवाचा । कौंडिण्यगोत्री ब्राह्मण ॥१२०॥
दुस-या त्याच प्रांतीचा । ग्रंथ मांगीश महात्म्याचा । विठठल कृष्ण कायकिणीचा । अध्याय बाराचा असे कीं ॥२१॥
कांही असो पुरातन । हें शंभू महादेव स्थान । काल त्याचा साधारण । हजार तरी असावा ॥२२॥
कां कीं कांही कांही शिलालेख । आहेत त्यांत उल्लेख । या स्थानाचा येतसे देख । म्हणून ऐसे वाटतसे ॥२३॥
शिवस्थानें भरतखंडांत । आहेत जरी अनंत । तरी त्या अवघ्यांत । थोरला महादेव हाच की ॥२४॥
कांही असो या महात्म्याची । रचना गुरुचरित्रापरी साची । याला यथातथ्य इतिहासाची । संगती ना लागेल ॥२५॥
शिवलीलामृत । तैसेंची काशीखंडांत । वा गुरूचरित्रांत । ज्या ज्या येती शिवकथा ॥२६॥
त्या अवघ्या स्कंद पुराणीं । सांपडती शोधकालागुनी । त्याच एके ठिकाणी । करुन हें महात्म्य लिहिले असें ॥२७॥
इतिहासाचा पुरावा । भक्तिमार्गी नाहीं बरवा । तेथें प्रधान लेखावा । साधकाचा भाव कीं ॥२८॥
अवघीं इंद्रियें शरीरीं । जगतीं प्राणाचिया जिवावरी । तैशीच गंमत आहे खरी । येथें या भक्तीमार्गाची ॥।२९॥
साधक जेथें ठेवी भाव । तेथें तेथें आहे देव । सच्चिदानंदाचा ठाव । आहे अवघ्याच ब्रह्मांडीं ॥१३०॥
श्रोते महाराष्ट्राच्या वांटयाला । हा शंभूमहादेव आहे आला । तोच अवघ्यांनी मानिला । पाहिजे या कलींत ॥३१॥
त्रिंबकेश्वर, घृष्णेश्वर । नागनाथ, भीमाशंकर । तैसा वैजनाथ साचार । परळीमाजीं वास ज्याचा ॥३२॥
ऐशीं महाराष्ट्राच्या वांटयासी । चार ज्योतिर्लिंगें परियेसी । तैसाच हा व्योमकेशी । थोरला शंभू महादेव ॥३३॥
चालुक्यवंशीय राजाचा । शंभू महादेव देव साचा । होता पूर्वकालींचा । येविषयीं शंका नसे ॥३४॥
देवालयाची बांधणी खरी । आहे चालुक्य पध्दती परी । म्हणून हा त्रिपुरारी । देव त्यांचा असावा ॥३५॥
तेवीं शिंघणराजाचें । स्मारक शिंगणापुरीं साचें । महत्व या ठिकाणचें । वाढलें मराठीशाहींत ॥३६॥
अवघ्या ब्राम्हण मराठयांनी । हा शंभू महादेव कैवल्यदानी । आपुलें दैवत मानुनी । अलोट श्रध्दा ठेवलीसे ॥३७॥
शिंगणापुरच्या शिखरावर । बैसले उमामहेश्र्वर । अलकगंगा आहे समोर । तीर्थ पूर्वबाजूला ॥३८॥
याला हल्लीं प्रचारांत । अलक्याची विहीर म्हणतात । तेथून जवळ अत्यंत । पुष्करतीर्थ असे कीं ॥३९॥
रसकूप अगियेसी । भटहिरा म्हणती त्यासी । त्याच्या पलीकडील तीर्थासी । ज्ञानवापी सोनटक्का ॥१४०॥
देववापी दक्षिणेस । अमृतेश्वर वायव्येस । मुंगीघाटाच्या सान्नित्यास । नागतीर्थ असे कीं ॥४१॥
याचें खारवण नांव प्रचारीं । श्रोते त्याच्याच पुढारीं । अमृततीर्थ निर्धारीं । साखरवापी नांव त्याचें ॥४२॥
पर्वताच्या खालीं पूर्वेस । नातेपुतें गांव विशेष । तेथें एक्या टेकडीस । गिरिजापती बैसला ॥४३॥
उंबरदेव पिप्रीभीतरीं । अग्नेय दिशेला फ़डतरी । तेथें दर्‍यामाझारी । गुप्तलिंग स्थान असे ॥४४॥
या गुप्तलिंगाचा । महिमा आहे विशेष साचा । हा राजराजेश्वर तीर्थाचा । आहे आहे विबुधहो ॥४५॥
मोहीगांवी बिल्वलिंग । दक्षिणेसी बाणलिंग । वावर हिर्‍यापाशी चांग । पाणलिंग म्हणती या ॥४६॥
थादाळी गांवी उदितेश्वर । नैऋत्य दिशेसी साचार । शिवगणीं जो अती थोर । तो भैरव जावलीसी ॥४७॥
खामलिंग कोथळगांवी । हीं पंचक्रोशीतील तीर्थें बरवी । हींहीं स्थानें लेखावीं । श्रीशंभूचीं विबुधहो ॥४८॥
हीं जीं तीर्थे सांगितली । तीं साधकानें पाहिजे केलीं । तेव्हांच पूर्णता पावे भली । मांगीशाची यात्रा पहा ॥४९॥
तेवी इकडील प्रांताच्या । आजूबाजू शिंगणापुरीच्या । जागा विहार करण्याच्या । आहेत शंभूच्या विबुधहो ॥१५०॥
तीहीं पंधरा स्थानें । शंभूचीच लेखणें । प्रत्यहीं ते होत जाणें । शंभूचिया स्थानावरी ॥५१॥
तें ऐका सविस्तर । खटावीं तो कातरेश्वर । कुरुलीमाजी सिध्देश्वर । पिंपळेश्वर तैसाची ॥५२॥
वाडीमाजीं नागनाथ । रामेश्वर जाखण गांवांत । तेवी संगम माहुलींत । संगमेश्वर असे कीं ॥५३॥
औंध पहाडी एमाई । पिंगलगांवी पिंगळाई । नात्यापुत्याचिया ठायीं । क्षौरविधी होतसे ॥५४॥
बाणलिंग फ़ोंडशिरसीं । अर्धनारीनटेश्वरासी । स्थान वेळापुरासी । आहे पहा अनुपम ॥५५॥
भीमातटाला माचणूर । तैसें धूळखेड साचार । खेटक आणि तुळजापूर । इत्यादिक विबुधहो ॥५६॥
एकवीरा देवी खरी । बैसली आहे पंढरपुरीं । यच्चयावत क्षेत्रें सारीं । मांगीशमहात्मीं वर्णिलींत ॥५७॥
म्हणून त्या स्थलाचा । उल्लेख येथें केला साचा । यावीण सांगण्याचा । दुसरा हेतू नसे कीं ॥५८॥
इति श्रीदासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥१५९॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति पंचदशोध्याय: समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP