श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय चौथा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥
हे संतवरदा विठ्ठला । देवा साह्य व्हाहो मला । हें मांगीश- लिहिण्याला । वेळ न करा येतुलाही ॥१॥
तुम्हात आणि शिवांत । कोठेच ना फ़रक दिसत । तुम्ही एकरुप साक्षात । आम्हांत ऐसे शास्त्र म्हणे ॥२॥
म्हणून हे विठाबाई । वास करुन ह्र्दया -ठायीं । हे मांगीशमहात्म्य लवलाही । वदवा गणूच्या मुखानें ॥३॥
गताध्यायीं  शिवांनी । जी विष्णूस्तुती केली जाणी । ती पंढरींत कैवल्यदानी । विठठल जाणता जाहला ॥४॥
आणि म्हणाला आपणासी । महाधूर्त व्योमकेशी । त्याचे इच्छेनुरुप आपणासी । आहे आतां वर्तणें ॥५॥
शिव आणि शक्ति । जी विभक्त होऊन विचरती । सांप्रत या महीवरती । हें कांही बरें नव्हें ॥६॥
त्या शिवशक्तीचें । व्यवहारद्द्दष्टया कायमचें । ऐक्य करणें आहे साचें । मजलागी येधवां ॥७॥
या कोथल पर्वतावर । उमा आणि शंकर । विवाहसूत्रानें साचार । बांधणें आहे भाग मला ॥८॥
कां की दोघें अलग राहिल्यास । त्याचा उपयोग जगतास । न होईल नि:शेष । हे ज्ञाते जाणती ॥९॥
आतां लग्न या व्यवहाराचा । विचार चित्ती  केल्या साचा । खटाटोप मुर्खपणाचा । प्रथमता वाटेल ॥१०॥
जी साध्वी सती पार्वती । शिवाने मागेंच पर्णिली होती । जी सवाष्ण ती न होती । मागुती कदा कुमारिका ॥११॥
परी ही आदिमाया प्रकृती । दक्षाच्या उदरा आली होती । तीच झाली पार्वती । नामीं मात्र फ़रक झाला ॥१२॥
दक्षानें शिवाला । अवमानिलें, हा वाटला । अपमान त्या साध्वीला । म्हणून कुंडी प्रवेशली ॥१३॥
तीच पुढें सत्वरी । हिमालयाच्या आली उदरीं । धरुनिया नाम गौरी । आपुल्या निजदेहाला ॥१४॥
खडतर तप करुनिया । शंकराची झाली जाया । तैसेंच आतां ये ठाया । व्हावें ऐसें इच्छू जरी ॥१५॥
तरी या कृत्यापरी । पाहिजे उमेची सम्मती । म्हणून विठठल तिची स्तुती । करु लागला मनानें ॥१६॥
हे जगदंब आंबिके भवानी । हे कालिकराले मृडानी । हे गिरिजे हिमनंदिनी । आदिशक्ती आद्दपीठे ॥१७॥
त्वां चंडमुंडाला मर्दिलें । महिषासुराचे प्राण हरिले । असंख्यात मुक्त केले । दु:खापासून जीव तूं ॥१८॥
तूं ब्रम्हाला नटविलें । आपुलें कर्तुत्व दाविलें । देवी भागवती गाईलें । तुजला त्या व्यासांनी ॥१९॥
ऐसें असता अंबाबाई । आतां कां निष्ठूर झालीस आई ! । मोठयाला तो बरा नाहीं । आपुला सोडणें मोठेपणा ॥२०॥
ब्रह्मांड तुझें लेंकरु । नको तया दुरी धरु । नको माया पातळ करु । पदनताविषयीं अंबिके ॥२१॥
ऐसे स्तवन ऐकुन । गौरी म्हणाली जये लागुन । सखे तूं पंढरपुरा जाऊन । विठठलासी भेटावें ॥२२॥
तो माझा धांवा करीत । आहे येधवां सत्य । तूं भेटून येई त्याप्रत । म्हणजे सर्व कळेल कीं ॥२३॥
मनानें जरी कांही कळलें । तरी तें व्यवहारशास्त्रे भलें । पाहिजे कीं खरें ठरलें । म्हणून तूं जा तिथवरी ॥२४॥
अवश्य म्हणाली सखी जया । निघाली गिरजेस वंदूनिया । पंढरीसी येऊनिया । विठठलातें भेटली ॥२५॥
तयीं तो भगवान श्रीहरी । जयेला पाहून अंतरी । नाना प्रकारचे विचार करी । एकामागून एक पहा ॥२६॥
विठठला ऐसे वाटलें । मीं जें आजवरी तप केलें । तें सिध्दीरुपाने प्रगटलें । मजपुढें येवेळां ॥२७॥
ही जी स्त्री आली खरी । मज भेटाया पंढरपुरीं । ती माझ्या तपाची साजिरी । सिध्दी वाटे नि:संशय ॥२८॥
म्हणून तिसी केला प्रश्न । बाई तूं आहेस कोण ? । तयीं जया म्हणे त्यालागुन । सखी मी पार्वतीची ॥२९॥
माझें नांव आहे जया । मी गौरी आज्ञेनें ये ठायां । आले तुम्हासी भेटावया । हे भक्तवत्सला श्रीहरी ॥३०॥
ऐसे भाषण ऐकतां क्षणीं । आनंदला कैवल्यदानी । अर्धांगी ज्याच्या रुक्मिणी । दशावतार धारिता ॥३१॥
भगवान म्हणे जयेला । कैलासाहुनी महितला । कोणत्या धरुनी मार्गाला । एकवीरा गौरी आली ? ॥३२॥
तें साकल्य वर्तमान । मजला तूं करी कथन । कां कीं तुला वर्तमान । अवघेच ठाऊक तियेचें ॥३३॥
तैशीच ती महीवरी । हल्लीं कोठें त्रिपुरसुंदरी । तें सांगुनी सुखी करी । जये मजला ये वेळा ॥३४॥
जया म्हणाली त्यावर । ऐक ऐक हे शार्न्डधर । कैलासाहूनी शंकर । कोथल पर्वता रहाया निघाले ॥३५॥
त्यांच्या मागून अंबिका । शिवविरहानें निघाली देखा । शोधाण्या त्या पिनाका । मृडानीपती हरातें ॥३६॥
परी न कोठे पडती गांठ । देवीस झाले फ़ार कष्ट । परी न भेटले शितिकंठ । ब्रह्म सनातन शिव ते ॥३७॥
हा कोथल पर्वत । शंकराचें शरीर सत्य । म्हणून वाटलें देवीप्रत । कोथळीतें असावें ॥३८॥
परी नाही गांठ पडली । आदिमाय हताश झाली । शिवाच्या शोधा निघाली । दक्षिण दिशा लक्षूनिया ॥३९॥
कोथल पर्वताची स्थानें । धुंडाळिली सर्व तिनें । शिवदर्शन लालसेने । परी न उपयोग जाहला ॥४०॥
कृष्णा वेण्या उतरली । अंबा बिल्ववना गेली । पुढे सूक्ष्मलिंग पहाती झाली । आपुल्या कुतूहल द्दष्टीनें ॥४१॥
नंतर पाहिले मोहपूर । पुढें पिंगल पर्वतावर । नयनीं पहाण्या शंकर । अंबा ती प्राप्त झाली ॥४२॥
तेथ पिंगल पक्षानें तिला । शिवाचा शोध सांगितला । बाई शंकर आताच गेली । गडबडीनें या वाटें ॥४३॥
पुढें स्थान कातरेश्वर । बघीतले तिनें सत्वर । जेथें सर्व दु:खाचा परिहार । होतो पदनतांच्या ॥४४॥
पुढे वेदावतीच्या तीराला । कुरुराजा होता बैसला । तपश्र्चर्या करावयाला । ते ठिकाणी येती झाली ॥४५॥
कुरुराजासी भाषण । करुन केलें समाधान । या स्थापित लिंगालागून । सिध्देश्वर म्हणतील कीं ॥४६॥
पुढें औंघच्या पहाडावरी । येती झाली त्रिपुरसुंदरी । तयीं एही एही अंबरी ।ध्वनी उत्पन्न जाहला ॥४७॥
एमाई नांव धारण करुन । बसली तपा कारण । परी न भेटला पंचवदन । भोलानाथ पिनाकी ॥४८॥
ते ठायी आपुले । भव्य स्वरुप प्रगट केले । हें स्थान अनुपम झालें । लोका गा-हाणें सांगावया ॥४९॥
तेथुनी देवी एकवीरा । निघती झाली करुनी त्वरा । आली भेटण्या सागरा । परशुराम क्षेत्रांत ॥५०॥
सह्याद्रीच्या पश्चिमेसी । हें क्षेत्र परियेसी । येथेंच हरीनें समुद्रासी । बाण मारुनी हटवीलें ॥५१॥
या प्रांतालागून । सांप्रत म्हणती कोंकण । याच्या उत्तरे लागुन । वसई नामें गांव असे ॥५२॥
गोमांतक दक्षिणेसी । आम्रफ़णस बहुवसी । आहेत त्या कोंकणासी । साली आणि काजू पहा ॥५३॥
सह्याद्री पर्वतापासूनी । ज्या नद्दा झाल्या निर्माण । त्यांत अघनाशींचे महिमान । श्रेष्ठ आहे विबुधहो ॥५४॥
या अघनाशी नदीचे तिरीं । तपा बैसली त्रिपुरसुंदरी । वरचेवरी स्तवन करी । परमादरें शिवाचें ॥५५॥
तिचा भाव पहावया । शंकर व्याघ्र होवोनिया । येते झाले ते ठायां । भयंकर गर्जना करुन ॥५६॥
तो व्याघ्र पाहता । अंबा भ्याली सर्वथा । कंप सुटला अवघ्या गात्रा । तनू घामें डबडबली ॥५७॥
माम गिरिश पाही आतां । हें बोलण्याचा हेतू होता । जगदंबेचा तत्वता । परी विपरीत जाहलें ॥५८॥
री हें अक्षर । भयें सुट्लें साचार । मांगीश मांगीश वरच्यावर । अंबा म्हणूं लागली ॥५९॥
मांगीश हें देवी बोलतां । हासूं आले विश्वनाथा । म्हणे भगवान येथें आतां । प्रगट होणे बरें नव्हे ॥६०॥
ही पुढें काय करितें । हें पहाणें आहे निरुतें । म्हणून भगवान तेथल्या तेथे । अद्दश्य झाले विबुधहो ॥६१॥
पर्वती म्हणाली मनांत । हा अवघा कोंकण प्रांत । आहे खराच विपरीत । येथें रहाणें नको आतां ॥६२॥
हा प्रांत निर्मिला ज्यांनी । तो श्रीहरी परशुपाणी । मातृहत्यारा पूर्णपणीं । आहे ख्यात जगाला ॥६३॥
त्यांच्या प्रांतात मी आलें । भलतेंच बखूं लागलें । शिवही ना भेटले । आतां काय करू तरी ॥६४॥
या अघनाशी तीर्था भली । विजया नांव पावली । ही पदवी तिला दिधली । तेथें परशुरामानें ॥६५॥
परी रागाच्या आवेशांत । तें न आणिलें मनांत । पूर्वाभिमुख होऊनी सत्य । अंबा परत फ़िरली कीं ॥६६॥
अशी तेथूनी निघाली । मनोमय वारुवर बैसली । तो थेट जाती जाहली । तुळजापुराकारणें ॥६७॥
ऐशी अंबेची हकिकत । जया पंढरीक्षेत्रांत । सांगती झाली प्रभूप्रत । श्रीविठठलाकारणें ॥६८॥
म्हणून हे शार्डधरा । त्या दोघांचे ऐक्य करा । हें करण्यास दुसरा । तुजवीण कोणी समर्थ नसे ॥६९॥
ही ऐकुनिया मात । विठठ्ल म्हणाला जयेप्रत । मी त्याच विचारांत । पूर्णपणें आहे कीं ॥७०॥
तूं आतां इतकेंच करी । शीघ्र जाऊन तुळजापुरीं । जगदंबेच्या कानावरी । हें सर्व घालणें ॥७१॥
शिवाचे द्ददय कोमल । त्यास तुझा विरहानल । छळीत आहे पहा सबळ । हें तूं आहेस जाणती ॥७२॥
मी तुमचे ऐक्य करण्याचा । विचार केला आहे साचा । तो सांगावयाचा । तूं कोथली आल्यावरी ॥७३॥
ऐसे तिला सांगून । जया दिली धाडून । तुळजापुराकारण । पांडूरंगानें श्रोते हो ॥७४॥
स्कंद म्हणे अगस्ती । कुंभापासुनी तुझी उत्पती । तूं ज्ञाननभींचा गभस्ती । अवघेच कांही कळतें तुला ॥७५॥
असो जया गेली तुळजापुरा । अंबेस सांगे जोडूनी करा । पंढरीचें वृत्त एकसरा । तेणें आनंद झाला तिसी ॥७६॥
इकडे खेटकग्रामांत । भवभवांतक भवानीकांत । प्रगट झाला ही मात । कळली भक्ताकारंणें  ॥७७॥
म्हणून विष्णू ते ठायां । येते झाले लवलाह्या । भीमानदीच्या तीरास या । चार स्थाने शिवाचीं  ॥७८॥
खेटक आणि पंढरपुर । धुळखेंड आणि माचणूर । खेटक आले शार्डधर । शिवालागीं भेटावया ॥७९॥
शिवदर्शन होता क्षणीं । आनंदला चक्रपाणी । दिलें एकमेकांनी । एकमेका अलिंगन ॥८०॥
तैसेच अवांतरांनीं । शिवार्चन केलें त्या ठिकाणीं । शास्त्रोक्त विधींनीं । हें निराळें कथणें नको ॥८१॥
उपनिषद आधारें स्तुतीला । नारदानें आरंभ केला । तेणे त्या कंठनीला । आनंद झाला अतिशय ॥८२॥
शिव म्हणाले विष्णुस । तुझा मी जाणिलें इच्छेस । जे का अवघे तुम्हास । प्रिय तेंच करीन मी ॥८३॥
येथे दहाव्या अध्यायाची । पूर्तता ती झाली साची । येथून पुढे आकरावियाची । कथा आहे मांगीशाच्या ॥८४॥
देवासहीत सदाशिव । तुळजापुरी पातला स्वयमेव । होते समागमें अष्टभैरव । तेधवा की हराच्या ॥८५॥
इंद्र विष्णू चतुरानन । पूषा आर्यमा वरुन । कश्यपादि रुषीगण यक्ष गंधर्व आवघे ॥८६॥
शिवाचिया बरोबरी । येते झाले तुळजापुरी । शिव राहिला समोरी । येऊन त्या गिरजेच्या ॥८७॥
तयीं ध्यानस्थ होती पार्वती । हें पाहून पशुपती । करुं लागला तिची स्तुती । वाद्दे वाजविती देव सारे ॥८८॥
शिव म्हणाला रंभोरु । माझा राग नको धरु । अर्धांगावरी नये करु । राग केव्हाही ज्ञात्यानें ॥८९॥
मी तुझे अर्धांग । तूंही माझें अससी चांग । कौतुकाने आला योग । तुझ्या माझ्या विरहाचा ॥९०॥
असो तूं जगाची आद्दाकर्ती । मूळमाया प्रकृती । निर्गुण असून नटविती । झालीस की गे तूं मला ॥९१॥
तुझ्या कर्तूत्वाचा पार । कोणा न लागे साचार । ब्रह्मांडासी आधार । तूं आणि मीच कीं ॥९२॥
तुझ्या कर्तुत्वें तुजप्रत । नामें लाधली असंख्यात । त्याची नये करितां गणित चांगल्या ज्ञात्याकारणें ॥९३॥
काली दुर्गा भवानी । गिरिजा अपर्णा कात्यायनी । भद्रकाली अघोरा मृडानी । द्क्षकन्या हिमात्मजा ॥९४॥
जैसी तूं माझ्यासाठीं । फ़िरलीस होऊन कष्टी । तैसा मी ही तुझ्यासाठीं । भटकत फ़िरलो अजवर ॥९५॥
अघनाशी तीरावर । तुसी भेटाया साचार । मी आलों होतों शंकर व्याघ्ररुपाने ते ठाया ॥९६॥
माझी गर्जना ऐकता क्षणीं । तूं भ्यालीस कमललोचनी । मांगीश मांगीश ऐशी वाणी । बोललीस ते ठायां ॥९७॥
मला पाहून भ्यालीस । तूंच त्या कोंकणास । विनाकारण दिला दोष । परशरामाकारणें ॥९८॥
त्यानें देवी तेथें तुला । विजया हा किताब दिला । परी रागाच्या भरांत त्याला । तुं न आणिले कीं ॥९९॥
मला वाटले ऐशारिती । मांगीश नांव मजप्रती । तूं दिधलें की निश्चिती । आपुलिया आवडीनें ॥१००॥
तेच नांव मी ग्रहण । केलें, राग दे सोडुन । जें जें मांगीशाचे भजन । करतिल त्या त्या तारीन मी ॥१॥
आतां तुटीची न भिती धरी । जो तूं सांठविला द्ददयमंदिरी । तोच मी हा तुज पुढारी । डोळे उघडून पाही मला॥२॥
मांगीश मांगीश तुझे भजन । निष्फ़ळ ना झालें जाण । हे अवघे देवगण । घेऊन मी येथ आलों कीं ॥३॥
मांगीश मांगीश हेंच करी । भजन तूं हे सुंदरी । मांगीश नांव निर्धारी । मज आवडतें होईल ॥४॥
हा पार्वती स्तुतीचा । अध्याय अकरावा होय साचा । श्रोते न्युन्याधिकाचा । भाग असल्या क्षमा करणें ॥५॥
इति श्रीदासगणु विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥६॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति चतुर्थोध्याय : समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP