श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय पाचवा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥  
हे पार्वतीपते परमेश्वरा । ओंकारस्वरुप उदारा । भवभयहरा शंकरा । पाहि मां दीनबंधो ॥१॥
तूं लीलाविग्रही महेश । तुं देवाधिदेव पार्वतीश । उपेक्षी ना गणूस । हेंच आहे मागणें ॥२॥
तुझ्या कृपेवाचुन । अवघेच कांही आहे शीण । जेवीं का तें पक्वान्न शर्करेवीण ओखटें ॥३॥
हा माझा नमस्कार । तुम्हां उभयतां वारंवार । लेकरा न धरणें दूर । हे पार्वती परमेश्र्वरा ॥४॥
तुम्हीं आतां उभयतांनी । मशी प्रेरणा करुनी । हा ग्रंथ वदवोनी । घ्यावा हेंच मागणें ॥५॥
असो तुळजापुराहुनी मंडळी । देवासह अवघी निघाली । भिमातटीं येती झाली । पंढरीक्षेत्राकारणें ॥६॥
तेथे विठठलासी म्हणे शंकर । मी मधली कामें सारुन सत्वर । येतों पहा कोथलावर । तूंही तेथें यावें कीं ॥७॥
एकवीरा ही गौरी । येथेच राहूं दे तोंवरी । तिची समजुत घालून खरी । उभयता या कोथला ॥८॥
ऐसे म्हणून निघाले । पिप्पलेश्वराप्रती आले ।तेथूनिया पाहिले । रामपर्वता विबुधहो  ॥९॥
खटवांग राजा तपासी । बैसला ज्या जागेसी । तेथे आले व्योमकेशी । देवासह वर द्दाया ॥१०॥
पुढें तेथुनी नागनाथे । येते झाले तत्वतां । मग पाहिले हां हां म्हणतां । कृष्णावेणी संगम तो ॥११॥
पुढे सरिता अघनाशी । जेथून राम वनवासासी। जाते झाले त्या स्थलासी । अवघेच देव विबुधहो ॥१२॥
पहातां अघनाशीला । शंकरासी आठ्व झाला । व्याघ्ररुपाचा तो भला । जें धरलें कौतुकानीं ॥१३॥
श्रीपरशुरामासी बोलून । देवासहीत भाललोचन । निघते झाले त्वरेंकरुन । कोथलासी जावया ॥१४॥
इकडे कोथलाच्या पायथ्यासी । आले उमा आणि रुषीकेशी । जेथे भगवान व्योमकेशी । आधीच येऊन बसला असे ॥१५॥
पार्वतीसी एकांतात । बोलता झाला विश्वनाथ । आतां जगाच्या अंतापर्यंत । राहू आपण कोथलावरी ॥१६॥
परिणाम दयूत खेळण्याचा । तुला मला कळला साचा । विरह एकमेंकाचा । दु:खद झाला उभयतांसी ॥१७॥
मी रुसून निघालों । देशीं विदेशी भटकर फ़िरलों । अतीशय श्रम पावलों । तें सांगूं कुठवरी ? ॥१८॥
तैशीच तूंही माझ्याचसाठी । झालीस की गे बहू कष्टी । नाहीं झाली परी भेटी । उभयतांची एकमेकां ॥१९॥
तुझ्या माझ्या फ़िरण्यात । पुनित झाला दक्षिण प्रांत । आतां अखेरपर्यंत । राहू आपण कोथलीं ॥२०॥
तुझे माझे ऐक्य । पूर्वीचेच आहे देख । तेंच टिकवूं सुरेख ।व्यवहारद्दष्टीनें साच गे ॥२१॥
पहा व्यवहारशास्त्राभीतरीं । एकदां लग्न झाल्यावरी । निरनिराळी न होतीं खरीं । वधू आणि वर पहा ॥२२॥
तो व्यवहार सांभाळण्यास । तूं तयार हो लग्नास । ऐसे बोलतां महेश । दुर्गा मनी आनंद्ली ॥२३॥
परी बळेच अवसान । आणून केले भाषण । श्रीशंकराकारण । तें आतां अवधारा ॥२४॥
छे ! छे ! हे देवदेवा । हा विचार नाही बरवा । माझा स्वभाव आहे ठावा । तुम्हांलागी पहिल्यापून ॥२५॥
मी खोटी अत्यंत । तैसेच माझे कठिण चित्त । भ्रामकपणा जो जगांत । वाढला तो माझ्यामुळेच ॥२६॥
मी निर्दय साहसी । अवघे अवगूण माझ्यापाशीं । म्हणून हे व्योमकेशी । माझ्या न नादीं पडणें तुम्हीं ॥२७॥
मी असत्याची खाण । तुमचें मीं झांकिले मोठेपण । तुम्ही अवघ्यांचे मूळ असून । नाचविले मीं तुम्हांला ॥२८॥
तत्ववेत्ते संतसज्जन । मजला म्हणती डोबांरीण । म्हणून तुंम्ही माझ्यापासून । दूर रहावे हेच बरें ॥२९॥
हे देवीचे शब्द ऐकिले । आश्चर्यचकित देव झाले । हरीकडे पाहिलें । कुतूहलद्दष्टीने ॥३०॥
आणि म्हणाले हे रुषीकेशी । आतां गती होईल कैसी । कात्यायनी आपुल्या हट्टासी । ना सोडी की अणुमात्र ॥३१॥
म्हणून जगाचा अंत ।होण्याची वेळ आली खचित । शिवशक्तीच्या विरहित । जगव्यवहार चाले कसा ? ॥३२॥
या गोष्टी आणून मना । हे कमलनाभ नारायणा । शिव आणि अन्नपूर्णा । विवाहसुत्रें बांध तूं ॥३३॥
तूं चतुरांत चतूरतर । भक्तासी कल्पतरुवर । तूं दयेचा सागर । घाली उमेची समजुत कीं ॥३४॥
शिव-उमेच्या ऐक्याविना । जग हे सुरळीत चालेना । शक्तीवाचून होईना । कोणतेही पहा कृत्य॥३५॥
तें हरीनें ऐकीलें । शिवासमक्ष बोलले । हैमवतीकारणें भलें । येणे रीतीं श्रोते हो ॥३६॥
देवी ! तुझा हा रुसवा खचित । जगाचा करील अंत । म्हणून हें कांही विपरीत । तुवां आतां करुं नये ॥३७॥
दयूत तुम्हींच खेळलां । पण तुम्हीच लाविला । बळेंच अपेश घेऊनी पळाला । तुझ्यासाठीं भगवान शिव ॥३८॥
त्याचा विरह साहवेना । म्हणून या विविध स्थाना । तूं केलेंस आहे गमना । केवळ शिवा शोधण्यास्तव ॥३९॥
तुंम्ही समजूत घालण्या खरी । मी आलों तुळजापुरीं । तूं ही भाक दिधली खरी । की मी तुझें ऐकिन ॥४०॥
आणि पुनरपी आतां । तूं आपुला तत्वतां । हेका न सोडिसी सर्वथा । याला काय म्हणावें ? ॥४१॥
तुंम्ही दोघें कितीही रुसा । अन्य अन्य स्थानीं बसा । यांत न हंशील फ़ारसा । तुम्ही दोघे एकरुप ॥४२॥
पाणी आणि पातळपण । प्रभा सूर्यनारायण । हे शब्दें द्वंद्व, परी जाण । एकपणाच कायमचा ॥४३॥
तुम्ही एक दोघेंही । मग ही कां मांडिली दुही । चाल, लग्नास तयार होई । शिवासवें येधवां ॥४४॥
ऐसे ऐकतां हास्य केलें । दोघांनींही तेधवां भलें । अवघ्या देवांसहीत निघाले । कोथल पर्वती यायातें ॥४५॥
शिव म्हणाला आजचा दिन । खरोखरीच आहे धन्य । तुमचें फ़ळलें तप पूर्ण । माझ्यासाठी केलें जें ॥४६॥
चला आतां पर्वतीं । अवघ्या देवांसह त्वरीत गती । या कामीं रमापती । श्रम पडले फ़ार तुला ॥४७॥
अवघे आलें कोथलावर । देव करिती जयजयकार । शंखशिंगाचे मधूर स्वर । होऊं लागलें तेधवां ॥४८॥
मंडप भव्य घातला । विश्वकर्म्यानें तो भला । त्या मंडपाच्या सौंदर्याला । वानावें तरी कोठवरी ? ॥४९॥
रत्नखचित काम केलें । प्रेक्षक अवघे चकित झाले । सूज्ञ करुं लागले । विश्वकर्म्याचें कौतुक ॥५०॥
अखेर श्रोते चैत्रमासीं । तिथी शुध्द अष्टमीसी । ध्वजावंदन आदरेसी । लग्न सोहळय़ास आरंभ केला ॥५१॥
हिमाचल मुख्य व-हाडी भला । सहकुटुंब होता आला । त्या उमेच्या विवाहाला । देवाचिया विनंतीनें ॥५२॥
विवाहाचे विधी सगळे । बृहस्पतीनें तेथ केले । त्यानें मदतीस घेतले । होते अवघ्या रुषींना ॥५३॥
अष्टमी प्रदोष -वेळेला । शिव उमेचा विवाह झाला । कुबेरानें आहेर केला । प्रत्येकासी विबुधहो ॥५४॥
अप्सरा नाचूं लागल्या । विजयोस्तु म्हणून ठोकिल्या । आरोळ्या रुषीगणांनी भल्या । देव विसरले देहभावा ॥५५॥
नाना वाद्दांचे गजर । होऊं लागले वरचेवर । तो कोथल नामें गिरिवर । गजबजून गेला कीं ॥५६॥
रमा, शची, पार्वती । उमेला औक्षवण करिती । देवस्त्रिया ओट्या भरती । उमा माहेश्वरीच्या ॥५७॥
रुषी म्हणाले त्यानंतर । आतां या पर्वतावर । तुम्ही दोघें रहा स्थीर । करण्या कल्याण जगाचे ॥५८॥
येथून कोठें जाऊं नका । हे भवभवांतका । एवढी आमची तुम्ही ऐका देवदेवा विनंती ॥५९॥
मग शंकर म्हणाले अवघ्यांस । तुम्ही या कोथल पर्वतास । मज म्हणावे मांगीश । हें मात्र विसरुं नका ॥६०॥
कां कीं हें नांव गौरीनें । ठेविलें आहे मजकारणें । मांगीश याच नांवानें । मी तुम्हांस पावेन ॥६१॥
तें देवांनी ऐकिलें । रुषीदेव गर्जिन्नलें । मांगीश मांगीश नांवें भले । पर्वत सर्व दणाणला  ॥६२॥
देव प्रस्तररुपांनीं । अवघे राहिले त्या ठिकाणीं । कोणी वृक्षरुपांनी । वास केला पर्वतावर ॥६३॥
माणगंगेचें स्नान देख । रुद्रसूक्तानें अभिषेक । मंदार वृक्षाचें अमोलिक । पुष्प वहावें शिवाला ॥६४॥
या ठिकाणी शंभूला । श्रीमांगीश ऐसें बोला । जें ऐकतां अपर्णेला । आनंद होईल मनापासून ॥६५॥
गुप्तलिंग, बाणलिंग । बिल्वलिंग, उदितलिंग । भैरव आणि स्तंभालिंग । उदुंबर नी गौरीहर ॥६६॥
आठ ठिकाणें ऐशीं । उत्तमोत्तम या पर्वतासी । तेथल्या अनुष्ठानासी । केल्या फ़ळ रोकडें ॥६७॥
या कोथलाच्या सभोवतीं । जे का पर्वत असती । ते साक्षात देव निश्चितीं । येविषयीं शंका नसे ॥६८॥
कोथलाच्या डावीकडे । हे पांच पर्वत रोकडे । कांही लहान कांही गाढे । यांची नांवे ऐका आतां ॥६९॥
पार्वतीपर्वत, विजयपर्वत । जयापर्वत, सिध्द्पर्वत । आणि पांचव्याचें नांव सत्य । सैन्यपर्वती यापरी ॥७०॥
पर्वताच्या दक्षिणेप्रत । गणेशपर्वत, स्कंदपर्वत । तिसरा तो वीरभद्र पर्वत । हे शिवाचे गुण पहा ॥७१॥
या चैत्रमासाच्या पौर्णिमेसी । जो स्नान करील शिवतीर्थासी । कोटीयज्ञाचें फ़ळ त्यासी । मिळेल नुसत्या स्नानानें ॥७२॥
श्रोते चैत्रमासांत । अगघींच तीर्थे येतीं येथ । जैशीं का सिंहस्थांत । तीर्थे येती गोदेला ॥७३॥
श्र्वेतपुष्प, बिल्व, दवणे । वहावें शिवाकारणें । या दवण्याचें महत्व वदनें । शिव बोलला येणेरीतीं ॥७४॥
जो दवणा वाहिल मला । चैत्रीप्रदोष समयाला । त्याच्या सर्व कामनेला । मी पुरविन सत्वर ॥७५॥
दवण्यानें दरिद्र नासे । दवणा मंगल करीतसें । दवणा ही वनस्पती असें । अंश त्या श्रीहरीचा ॥७६॥
स्कंद म्हणे अगस्तीला । या मांगीश महात्म्याला । जो जो शुध्द भावाला । ठेवून पठण करील ॥७७॥
त्याचीं पहा पातकें सारीं । भस्म होतील निर्धारी । तो अंती कैलासगिरी । पाहील राहण्या अक्षयींचा ॥७८॥
हा शिवपार्वतीविवाहाचा । अध्याय वाचील साचा । नित्य नित्य तयाचा । विजय होईल चोहीकडे ॥७९॥
बारा तेरा अध्यायाचें । हें सार मांगीश पुराणाचें । नाहीं माझ्या पदरचें । चित्ती ठेवा विबुधहो ॥८०॥
इति श्रीदासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥८१॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥  इति पंचमोध्याय: समाप्त: ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP