श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय पहिला

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम:
जयजयाजी ब्रम्हांडधीशा । जयजयाजी महेशा । जयजयाजी अविनाशा । कारुण्यरुपा सदाशिवा॥१॥
तूं कैसा कोण कोठें अससी । हें कांही न कळे व्योमकेशी । ज्याची मती चालते जैशी । तैसें तो तुज ठरवितसे॥२॥
वेदांनी केले वर्णन । तूं सर्वव्य़ापक परिपूर्ण । ब्रम्हवस्तू जी सच्चिदघन ।  स्वयमेव तूंच की॥३॥
सर्व खल्विदं साजिरा । ऐसा इरुतीचा डांगोरा । सर्वत्र तूंच परमेश्र्वरा ।  जगजगार्दन तूं की ॥४॥
ऐशा अविनाश स्वरुपासी । समर्थ कोणी न जाणण्यासी । हें जाणून निर्मिली खाशी । सोय शास्त्रकारानें ॥५॥
तुजला सगुण कल्पिलें । उपासनेचे धडे दिले । हे अनंत उपकार झाले । शास्त्रकाराचे अम्हांवरी ॥६॥
परी एकची उपासना । भारतवर्षी ना दयाघना । त्या उपासनेसी अनंतपणा । येता झाला भावबळें ॥७॥
शैव म्हणती शंकर । वैष्णव म्हणती रमावर । गाणपत्य म्हणती मयुरेश्वर । सौर सूर्या उपासती ॥८॥
शाक्त म्हणती शक्ति । ऐशी नामाची गंमत अती । अखेर उपासक तेही येती । विचारानें ठायीं एक्या ॥९॥
तत्व कळेपर्यंत । मतमतांतरे माजतीं बहुत ओढे अनंत गोदेप्रत । मिळतां, पुढें गोदाच कीं ॥१०॥
तेथे गोदा ओढा भेद नाहीं । तीच आहे नवलाई । तुझ्या चरित्र्याच्या ठायीं  । हे पार्वतीपरमेश्र्वरा ॥११॥
शैवमतासी संमत । ऐसा जो का असें ग्रंथ । त्याचें पुराणसमूहांत । नांव स्कंदपुराण असे ॥१२॥
त्या स्कंद्पुराणा भीतरीं । बारा ज्योतिर्लिंगें आली खरीं । आणीकही भूवरीं । स्वयंभू लिंगें आहेत ॥१३॥
तैसें विष्णुपुराणांत । ऐसेंच झालें तंतोतंत । गोकुळ, व्दारका, जगन्नाथ । पंढरी, गिरी इत्यादि ॥१४॥
परी मांगीश ऐसें पुराणी ना कोठें दिसे । म्हणून हें पडलें खासें । गूढ मातें सर्वेश्वरा ॥१५॥
महाराष्ट्रदेशाभीतरीं  । या शिखरशिंगणापुरी । आपुला वास त्रिपुरारी । आहे ऐसें जन म्हणे ॥१६॥
जरी ज्योतिर्लिगांत । नाहीं या स्थलाचें नांव सत्य । तरी शिंगणापुराप्रत । मोठा महादेव म्हणती कीं ॥१७॥
म्हणजे ज्योतिर्लिगापेक्षांही । तुझें महत्व अधिक पाही । हे भवभवांतका माझे आई । आता साह्य करावें ॥१८॥
मी असतां देवा लहान । होतों माळशिरस ग्रामालागुन । तेव्हां प्रथमतां दर्शन । तुझेंच मला जाहलें ॥१९॥
माळशिरसामाझारीं  । चुलता माझा अधिकारी । होता देवा हुद्दावरी । मालतीच्या तया वेळां ॥२०॥
तेव्हां कित्येक वेळां दर्शन । झालें आहे मजलागून । प्रथमतां केलें कवन । शिखरावरीच दयाघना ॥२१॥
तुला जें का मोठें म्हणती । तें सार्थ वाटे पशुपती । तुझ्या प्रसादें छत्रपती । सम्राट-पदा पावला॥२२॥
कावडी चैत्र मासांत । येती तुझ्या प्रीत्यर्थ । हें आहे अवघ्या ख्यात । त्याचें वर्णन येथें नको ॥२३॥
तुला हरिहरस्वरुप म्हणती । हें योग्य आहे उमापती । शैव-वैष्णवांची एकी ती । जेणें होईल सहजरीत्या ॥२४॥
असो येथील महात्म्याचा । ग्रंथ गीर्वाण भाषेचा । मांगीश-महात्म्य नांवाचा । उपलब्ध आहे सांप्रत ॥२५॥
त्याच ग्रंथाच्या आधारें । हें मी महात्म्य रचितों दुसरें । प्राकृतामाजीं साजिरें । देवा, तुझ्या बळावरी ॥२६॥
तें तुं पूर्ण करावें । आपुलें ब्रीद सांभाळावें । म्हणुनी तुला मनोभावें । शरण मी गा सर्वदा ॥२७॥
हे पंढरीशा पांडूरंगा । हे दु:खशोक-भवभंगा । नाना-विग्रही श्रीरंगा । मांगीश महात्म्य वदवा हें ॥२८॥
हे शारदे सरस्वती । साह्य करी या लेकराप्रती । मम जिव्हाग्रीं करुन वस्ती । मांगीश-महात्म्य वदवावें ॥२९॥
हे वक्रतुंडा गजानना । नाना-विन्घांच्या कंदना । करुनी करवीं ग्रंथरचना । या गणूच्या करानें ॥३०॥
हे कुलस्वामिनी इंदिरे । तुला नमन हें आदरें । बया साह्य करी त्वरें । मांगीशाचे गुण गाया ॥३१॥
हे रामदासा पुण्यवंता । धरुन दासगणूचे हाता । हें मांगीश-महात्म्य आतां । प्राकृतीं लेखन करा हो ॥३२॥
हे तुकारामा मजवरी । कृपा करावी सत्वरीं । वाद करुन ह्रदयांतरी । कवित्व अमोघ वदवावें ॥३३॥
हे शिर्डीकर साईनाथा । तुला घालीतों दंडवता । मांगीश-महात्म्य रचण्याकरतां । आपुलें सहाय़्य असावें ॥३४॥
हे पंडितवर्या वामना । हे सदगुरुराया दयाघना । करा मनींची मनकामना । पूर्ण माझ्या सत्वर ॥३५॥
भक्तिरसायन लिहिल्यावरी । लेखणी मीं ठेविली खरी । परी पुनरपि धरली करीं । मांगीश-महात्म्य वदावया ॥३६॥
जेथें प्रभुचा प्रसाद झाला । मजवरी हे सदगुरो भला । तो दव तैसाची राहिला । शंभु महादेव म्हणती ज्या ॥३७॥
माधव गांगला म्हणून । मम मित्र एक सज्जन । त्यानें हें मजलागून । मांगीश-महात्म्य दाविलें ॥३८॥
त्यामुळेंच पूर्वीची । आठवण मला झाली साची । आतां उपेक्षा लेकराची । करुं नकोस पार्वतीशा ॥३९॥
हें अवघें मांगीशवर्णन । तुम्हींच करावें लेखन । गणू ही कलम घेऊन । आपुलीया करामध्यें ॥४०॥
कां की लेखणीच्या ठिकाणीं । ज्ञान नसे शूलपाणी । लेखनकर्त्याचे जें मनीं । असेल तें तें लिहीतसे ॥४१॥
म्हणजे लेखणीकारण । स्वतंत्रता मुळींचन । तुझ्याच बळेंकरुन । ग्रंथ लिहिण्या सिध्द झालों ॥४२॥
तो तुमचा तुम्ही शेवटा न्यावा । मम करें ग्रंथ पुरा करावा । एवढी अखेरची करुं द्दा सेवा । मजलागी दयानिधे ॥४३॥
त्यांतून आराध्य दैवत । तूंच माझें पार्वतीकांत । वारंवार दंडवत । असो तुझ्या दिव्य-चरणां ॥४४॥
जैसें तुझ्या येईल मनीं । तैसें करा हो शूलपाणी । मी विनटलों तुमच्या चरणीं । आतां न पुरतें लोटा कदा ॥४५॥
आतां श्रोते सावधान । अभिनव कथा ही करा श्रवण । ज्या श्रवणें दोष दहन । होतील जन्मांतरीचें ॥४६॥
सूत शौनकादिकांप्रती । सांगता झाला ऐशा रीती । कीं मुनी जे का अगस्ती । त्यांनी स्कंदा प्रश्न केला ॥४७॥
हा स्कंद म्हणजे षडानन । जो शंकराचा नंदन । पार्वतीचें हृदयरत्न । सहा मुखें जयाला ॥४८॥
भोलानाथ पशुपती । जो पंचतुंड उमापती । त्याहीपेक्षां निश्चितीं । मुलगा सवाई निघाला ॥४९॥
म्हणजे पित्याकारण । तोंडे असून पांच जाण । आपण केली धारण । सहा त्याच्याच इच्छेनें ॥५०॥
त्या कार्तिकस्वामी प्रती । पुसते झाले अगस्ती । षडानना तूं धवलकीर्ती । सर्वज्ञ, कांही कळलें तुला ॥५१॥
म्हणुन आम्ही तुजकारण । करावया आलों प्रश्न । अवघ्यांत मोठा भाललोचन । देव असे जन म्हणे ॥५२॥
त्या पार्वतीपतीची । कथा आम्हांस सांग साची । ज्या कथेंनें आमुचीं । सर्व पातकें निरसतील ॥५३॥
तूं प्रत्यक्ष शिवाचा । पुत्र आहेस म्हणुनी साचा । तुला आपल्या पित्याचा । इतिहास सर्व ठावा असे ॥५४॥
हे वाक्य ऐकिले । षडानन बोलते झाले । अगस्ते ! मला योग्य पुसलें । तें मी आतां सांगतों ॥५५॥
मागें ब्रम्हदेवाचा नंदन । आला कैलास पर्वता लागुन । ब्रम्हाविणा ती घेऊन । आपुलिया स्कंदावरी ॥५६॥
नारदासी सामशास्त्र । आधींच होतें अवघें विदित । त्यांतुनी आवडी बहुत । होती गाण्याची नारदा ॥५७॥
त्यांनी सामगायनें करुन । शंकर केला प्रसन्न । आणि म्हणाला कर जोडून । माझी विनंती ऐका ही ॥५८॥
आपण या भारत वर्षात । कोठेकोठे आहां स्थित । हें कृपा करुन त्वरित । सांग-सांग हे शंकरा ॥५९॥
त्याजसाठी येथे भलें । आज हें माझें येणें झालें । तें ऐकून तोषले । पार्वतीपती अत्यंत ॥६०॥
वा ! वा ! जगाच्या हितासाठी । तूं ही केलीस मशीं गोष्टी । दीनजनांचा तुझ्या पोटीं । कनवळा तों साच आला ॥६१॥
नारदा एकेकाळी । गोष्ट ऐशी घडून आली । पार्वतीला उदेली । इच्छा ध्युत खेळण्याची ॥६२॥
ती म्हणाली मजप्रत । ऐका हो प्राणनाथ । तुम्ही आणि मी येथ । आज द्युत खेळूं की ॥६३॥  
नुसतें जें का खेळणें । तें या जगीं गुळाविणें । होईल जेवीं आंबट पन्हे । आम्रफळाचें देवदेवा ॥६४॥
आंबा येथें क्रीडा ध्युत । पण त्याचा गूळ सत्य । हें आपण करुं एकत्र । आज या कैलास पर्वतावरी ॥६५॥
मीही होय म्हणालो । पण करुन बोललो । आणि खेळावयासी बैसलों । माझ्या प्रिय भार्येसहित ॥६६॥
पण होता ऐशा रीती । जो जिंकिला जाईल निश्चितीं । त्याने पळून जावें सत्वरगती । अपेश आले म्हणून ॥६७॥
ऐशा पणासी करुन । आम्ही खेळूं लागलों जाण । परि अपयशाचे खापर पूर्ण । फ़ुटले नारदा माझ्यावरी ॥६८॥
म्हणून मी पळालों । कैलास सोडूनी निघालों । ब्रम्हांडांत राहिलो । गुप्तपणानें नारदा ॥६९॥
त्यायोगें पार्वती । दु:खित नारदा झाली अती । केवढी मी मूढमती । भगवान म्यां की दवडिला ॥७०॥
आग लागो त्या पणास । मी माझ्या अर्धांगास । लाविलें की पळायास । हाय हाय रे दुर्दैवा ॥७१॥
मी सहज बोलून गेलें । तेंच त्यांनी खरे केले । ध्युत खेळणें ना चांगले । हें आतां कळलें मला ॥७२॥
कल्याणाची आस ज्यासी । त्यानें या सहा गोष्टींसी । धरुन असावें मानसी । आपुलिया हितास्तव ॥७३॥
मूर्ख जे का अत्यंत । वावरती या जगांत । त्याची बरी ना संगत । तैशी अगोचर स्त्रियांची ॥७४॥
अंत:करण दुष्ट ज्यांचे । वा फ़सवाफ़सवी करण्याचे । व्रत स्वीकारिले कायमचे । ऐसा अधमाधम नर ॥७५॥
मद्दपी वा दुसरे दुयूत । ऐशा सहा गोष्टी शास्त्रांत । त्यागार्थ कथिला सत्य । तें कांही खोटे नसे ॥७६॥
ऐसे भगवान शंकरांनी । कित्येकवेळा मजलागुनी । कथिले होते त्याचा मनी । मी न विचार केला की ॥७७॥
त्या दुयूताचे फ़ळ दुर्धर । मिळाले आज साचार । कोठे माझा भ्रतार । शिव भगवान ये वेळा ॥७८॥
ऐशी आपल्यासी बोलुनी । हिंडे वनावनांनी । ती माझी कमललोचनी । काय सांगू नारदा तुला ॥७९॥
तिशी वाटले शंकर । कोठे तरी असतील स्थिर । त्यांना आहे नाद फार । तपश्रर्या करण्याचा ॥८०॥
एवंच शोध करिता करिता । पार्वती थकली सर्वथा । मम विरहाचा तिच्या चित्ता ताप अनिवार झाला रे ॥८१॥    
ही प्रथम अध्यायाची । कथा झाली मांगीश - महात्म्यची । आतां ऐका दुस-याची । अहो श्रोते शुध्द मने ॥८२॥
त्यांना जरुर तपाची । नाही नाहीं खचीत साची । ऐसी शंका आहे आमुची । ती तूं निरंतर करावी ॥८४॥
भवापासून होण्यामुक्त । तप हे योग्य आहे सत्य। सकाम अवघे जे का भक्त । ते ते तपा आचरती ॥८५॥
शंकर मुळींच निष्काम । वैराग्याचे प्रत्यक्ष धाम । रागाचेही नाही काम । ज्या हराकारणें ॥८६॥
ऐसे असतां रुसून गेले। कां हे आम्हा गूढ पडलें । शक्ति ब्रम्ह वेगळे । कधींच नाहीं होणे जगीं ॥८७॥
ऐसा प्रश्न ऐकिला । स्कंद त्यासी बोलता झाला । हे अगस्ते शंकराला । खरा राग आला नसे ॥८८॥
स्त्री- पुरुषांच्या कलहात । जो जो कोणा राग येत । रुसवा शब्द तयाप्रत । योग्य देणें होईल कीं ॥८९॥
म्हणून राग कौतूकानें । आला त्या हराकारणें । शिवशक्ति भिन्नपणे । येती न की प्रत्यया ॥९०॥
तो व्यावहारिक रुसवा झाला । भगवान शंकर पळून गेला । जगासी धडा घालण्याला । हें कांही विसरु नको ॥९१॥  
एवंच कैलासाहूनी शंकर । रुसून निघाले अंबेवर । तों थेट कोथल पर्वतावर । येते झाले महाराष्ट्रीं ॥९२॥
हा कोथल पर्वत । माणगंगेच्या पूर्वेस सत्य । या प्रांताला म्हणतात । माणदेश व्यवहारीं ॥९३॥
त्या पर्वता भगवान गेला । शंभू महादेव म्हणती ज्याला । मोठा महादेव म्हणण्याला । हाच एक योग्य असे ॥९४॥
केदार, सोमनाथ, वाराणसी । ओंकार, महंकाल, व्योमकेशी । गोदेचिया तटाकासी । त्र्यंबकेश्र्वर परमात्मा ॥९५॥
भीमाशंकर, घृष्णेश्वर । दारुकावनीं आहे स्थिर । श्रीनागनाथ, कर्पूरगौर । वैजिनाथ परळीसी ॥९६॥
मल्लिकार्जुन रामेश्वर । या ज्योतिर्लिंगांहुनी अती थोर । हें क्षेत्र शिंगणापूर । किती सागू नारदा ॥९७॥
शिखर शिंगणापुरीचा महिमा । वदवे न निगमागमा । जो भक्तास दे आरामा । ऐसा प्रभू जे स्थलीं ॥९८॥
ज्या कोथल पर्वतावर । झाडी आहे अती कीर्र । अश्र्वत्थ, वट, औदुंबर । शिंदी, माड, पोफ़ळी ॥९९॥
चाफ़ा शुभ्र, पीत आणि हरित । मदनबाण, पारिजात । वन्य तरु असंख्यात । ज्या पर्वती डोलती ॥१००॥
लताकुंज नानाठायीं । त्याची शोभा वर्णू कांई? । हरिण-गव्याला पार नाहीं । कळप धेनूंचे असंख्य ॥१॥
कोकील, चातक, मयूर । किलकिलाट करिती वृक्षावर । मधुन मधुन निर्झर । पर्वती वहाती जलाचे ॥२॥
ऐसा पर्वत मनोहर । पाहुनी तोषले शंकर । लक्षून नगाची दिशा उत्तर । तिंतिण वृक्षाच्या राईमध्यें ॥३॥
श्रोते सुधाकूपावरी । प्रदोषसमयीं नृत्य करी । श्रीभगवान त्रिपुरारी । आपल्या परमानंदे ॥४॥
इकडे जगन्माता पार्वती । शिवविरहें व्याकुल अती । होऊन निघाली सत्वरगती । निज पतीच्या शोधार्थ ॥५॥
मंदराचल, कैलास । मेरु, हिमालय विशेष । आली पाहून वैकुंठास । अखेर कोथल पर्वतावरी ॥६॥
तेथेंही दिसेना शंकर । मग हताश झाली फ़ार । दोन सख्या बरोबर । होत्या तेधवा अंबेच्या ॥७॥
पोरासम रडूं लागली । हे भगवान चंद्रमौळी । नका उपेक्षूं मजला मुळीं । मी शरण सर्वदा ॥८॥
त्या शिख्रराच्या अग्नियेसी । एक्या द-यांत गुहेसी । सख्यांसह बसली तपासी । आदिशक्ति जगदंबा ॥९॥
लिंगे पांच तपासाठी । केली असे शेवटी । नम:शिवाय वदे ओठी । खंड न ज्या भजनाला ॥११०॥
इकडे भगवान शंकर । द्दाया भेट झाले आतुर । कांतेचा राग साचार । फ़ार वेळ मनीं ना टिके ॥११॥
श्रोते त्या प्रेमकलहाचें । आयुष्य अति क्षणिक साचें । जेवी का थेंब पाण्याचे । कमलपत्री पडती कीं ॥१२॥
परमात्मा त्या गुहेत । प्रगट झाला साक्षात । पार्वतीस पाहून हास्यस्मित । करिता झाला लीलेनें ॥१३॥
त्या नीलकंठा पाहतां क्षणीं । जगदंबा तोषली मनीं । प्रभुच्या जटा धरुनी । बोलती झाली कौतुके ॥१४॥
आतां कोठे सांगा पळतां । मी जटेस धरले तुमच्या आतां । या अहंकार तत्वता । प्रभु अद्दश्य पुनरपी ॥१५॥
कां की जेथे अहंकार । तेथे भगवान सर्वदा दूर । याचे दावण्या प्रत्यंतर । प्रभुने ऐसे केले कीं ॥१६॥
जटा धरितां जटेंतून । जें पाणी येऊं लागलें जाण । तें अंबेनें पाहून । स्थिर केलें जलाला ॥१७॥
आणि त्याच जलाभितरीं । पार्वती करी स्नान खरी । सख्यांसह अत्यादरीं । श्रीशिवाच्या प्राप्तीस्तव ॥१८॥
या स्थलाकारण । गुप्तलिंग म्हणती जन । याच्या शेजारी गांव सान । आहे फ़डतरी नांव त्याचें ॥१९॥
गुप्तलिंग करितां स्नान । जन्मांतरीचे दोष गहन । जाती भस्म होऊन । त्या स्नानाच्या प्रभावें ॥१२०॥
गादा, रेवा, भागीरथी । यापेक्षांही श्रेष्ठ अती । या गुप्तकुंडाची महती । ती न मशीं वर्णवें ॥२१॥
या कुंडी त्रिकालस्नान । करी पार्वती आपण । करावया शिवार्चन । प्रेमभरें की श्रोते हो ॥२२॥
या ठिकाणी जे जे येती । वा जे तपा बैसती । त्यांना त्य़ांना कैलास-प्राप्ती । अंती होय नि:संशय ॥२३॥
कुंडी स्नान करुन । जो जो शिवासी बिल्वपर्ण । अर्पण करील त्यालागून । अलोट संपत्ती मिळेल की ॥२४॥
वा महात्म्य गुप्तलिंगाचे । जे जे श्रवण करतील साचे । त्यांना दुर्धर भवाचें । भय मुळीच नाही कीं ॥२५॥
हें द्वितीय अध्यायाचें सार । मी कथन केलें साचार । यथामती बोलणें फ़ार । आतां नको ॥२६॥
इति श्री दासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥१२७॥  
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति प्रथमोध्याय : संपूर्णम ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP