TransLiteral Foundation

श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय तिसरा

श्रीमांगीशमहात्म्य


अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नम:
जयजयाजी प्रतापतुंगा । जयजयाजी उमारंगा । तूंच गा-हाणें करण्या जागा । एक आहेस तिभुवनीं ॥१॥
देवा आतां काय करुं । तुजविण कोणा सांग स्मरु । दासगणूला आधारु । आपणची आम्हां सर्वस्वीं ॥२॥
देहा पातलें वृध्दत्व । आवघीं शिथिल झाली गात्र । आणि अशा वेळी उपजला हेत । कीं मांगीश-महात्म्य लिहावे॥३॥
म्हणून हे जगदोध्दारा । शरीर-स्वास्थ्य द्दा थोडे जरा । आणि ह्र्दयीं वास करा । हे मांगीश-महात्म्य लिहावया ॥४॥
म्हणजे अवघें होईल बरें । विघ्न तेंही निरसेल सारें । तुझ्या कृपाप्रसादें खरें । भाललोचना दिगंबरा ॥५॥
स्कंद म्हणे अगस्तीप्रत । मागें एकदां कैलासात । आले देव गंधर्व समस्त । प्रदोषकाली शिवदर्शना ॥६॥
विष्णु आणि चतुरानन । तिसरा तैसा शचीरमण । कश्यपादि रुषीगण । यक्ष गंधर्व इत्यादी ॥७॥
ऐसे त्या प्रदोषसमयीं । कैलासास आले पाहीं । परी तया झालें नाही । दर्शन पार्वतीपतीचें ॥८॥
तेणें हिरमुष्टी होऊन । विचार करु लागले गहन । हा देवाचा देव भाललोचन । कोठे गेला येधवां ॥९॥
अर्धांगी ज्याची पार्वती । जी ब्रम्हाची अभेद्द शक्ति । ब्रम्ह हा शिव निश्चती । जे न विसरती येरयेरा ॥१०॥
ऐसे सत्य असून । दोघेही गेले निघून । या आवडत्या कैलासा सोडून । आतां आमुची गत कैशी ? ॥११॥
अवघ्या देव समूहांचा । शिव हाच प्राण साचा । ज्याचा न कधी व्हावयाचा । अस्त तो येतुलाही ॥१२॥
विष्णु योगबलानें । विचार करु लागला मनें । ब्रम्हा वेद साहाय्यानें । रुषी यज्ञसाह्यें पहा ॥१३॥
तो झाली आकाशवाणी । हे देवहो ! पिनाकपाणी । जरी गुप्त झाला येथुनी । परी आहेच कोठेंतरी ॥१४॥
शंकराच्या आवडीची । सहा स्थानें आहेत साचीं । त्या अवघ्या स्थानांची । नांवें तुम्ही जाणतसा ॥१५॥
कैलास आणि मंदराचल । हिमालय जो का धवल । मेरु आणि कोथल । तेवी सहावें हरीचे वैकुंठ तें ॥१६॥
हल्ली भोलानाथ कर्पूरगौर । आहे कोथल पर्वतावर महाराट्र देशी साचार । कृष्णा भीमेच्या मध्यंतरी ॥१७॥  
गौरीही तेथेंच गेली । जी ब्रहम्याची शक्ति भली । जी ब्रम्हा सोडून न राहे मुळी । क्षण एकही देव हो ॥१८॥
त्या कोथल पर्वतावर । जा जा तुम्ही झडकर । तेथे पार्वती परमेश्वर । भेटेल तुम्हांकारणें ॥१९॥
या आकाशवाणीप्रमाणें । देवांनी केले पार्वती येणे । तों तेथेंही त्याकारणे । नीलकंठ ना भेटले की ॥२०॥
अवघे देव विचारांत । पडले त्या पर्वती सत्य । तों ब्रम्हदेवाचा सुत । नारद तेथे पातला ॥२१॥
तयालागी पाहतां क्षणीं । देव आनंदले मनीं ।  हे नारदा आम्हां लागूनी । शिव कोठे ते सागावे ॥२२॥
आम्ही त्यास धुंडाळीता । कंटाळलो सर्वथा । आतां न जरी भेटता । मृडानीपती आम्हांस ॥२३॥
तरी या नगराच्या उत्तरेसी । जी करनारी दरी परियेसी । तेथें जाऊन प्राणांसी । आम्ही अवघे त्यागूं कीं ॥२४॥
ऐसे भाषण ऐकिलें । नारदा आश्चर्य वाटलें । अरेरे! हे झाले खुळे । विरहाने शंकराच्या ॥२५॥
हे आपणा देव म्हणविती । आणि आज्ञापरी क्रिया करिती । जीव देऊं ऐसे म्हणती । हेंच का यांचे देवपण ? ॥२६॥
अहो देवहो ! तुम्ही ऐका । प्राण उगाच देऊं नका । आत्महत्येसारखा । दोष कोणताही अधीक नसे ॥२७॥
तुम्ही जीव दिला जरी । पुन्हां जन्माल भूमीवरी । याचा कांही अंतरी । विचार तुंम्ही केला कां ? ॥२८॥
तुम्हा देवत्व लाधलें । तें तुम्ही टिकवा भलें । हें अज्ञान नाही चांगले । आत्महत्त्येचा नाद सोडा ॥२९॥
श्रीशंभूच्या दर्शनासाठीं । बसा तप करण्यासाठी । भोलानाथ धूर्जटी । भेटेल तप केल्यास ॥३०॥
आतां कोणते देव कोणत्या स्थानीं । बैसले तपा लागूनी । तेंही देतों सांगूनी । अवधान आपुलें असूं द्दा ॥३१॥
येथे मांगीश -महात्म्याचा । सहावा अध्याय पुरा साचा । झाला, आतां सातव्याचा । आरंभ आहे येथूनी पुढें ॥३२॥
स्कंद म्हणे अगस्तीला । तप करण्याचा विचार ठरला । अवघ्या देवांचा तो भला । त्या कोथल पर्वतावरी ॥३३॥
विष्णु तपाकारण । तेथून करते झाले गमन । चंद्रभागातटी येंऊन । पंढरीसी राहिले ॥३४॥
शिवलिंग धरिलें डोक्यावरी । दिगंबर मूर्ती साजिरी । सर्वागास विभूती खरी । लाविली वैकुंठपतीनें ॥३५॥
वैजयंती टाकुन । रुद्राक्ष केलें धारण । अंगावरी न ठेविलें वसन । येतुलें तें कोठेंही ॥३६॥
त्या हरीच्या करण्या सेवा । विधाता पुंडलिक झाला बरवा । म्ह्सवडनामें गावा । तपा बैसला भैरव ॥३७॥
हें म्हसवड माहेष्मती नगर । आहे माणगंगेच्या तिरावर । तेवीं पश्चिमेला साचार । या कोथल पर्वताच्या ॥३८॥
मणिभद्र यक्षांचा भूपती । जो तो तप बैसला निश्चितीं । या माणगंगेच्या कांठावरती । रक्त पुष्पें असती बहु ॥३९॥
माणगंगेवरुन । या देशालागून । माणदेश नामाभिधान । ऐसें प्राप्त जाहलें ॥४०॥
या माणगंगेच्या तीरासी । बहूत लिंगे परियेसी । मांगीश-महात्मीं इशीं । आहे मोठें महत्व ॥४१॥
माणगंगेचें स्नानपान । ज्यासी घडेल नित्य जाण । तो महापुण्यवान । गणला जाईल मृत्यूलोकीं ॥४२॥
पुढें ज्ञानवापीला । दंडपाणी बसता झाला । शिवासाठी करण्याला । तप अमोघ विबुधहो ॥४३॥
मणिभद्र आणि दंडपाणी । हे समसमान जाणीं । यांत साच नाहीं कोणी । वडील अथवा धाकुटा ॥४४॥
देवांचा जो पुढारी । ब्रह्मदेव निर्धारीं । त्यानें शिवाची अत्यादरीं । ऐशी प्रार्थना करावी ॥४५॥
बिल्वदलें घेऊन कोवळीं । अर्चीतसे चंद्रमौळी । मुखानें ती नामावली । श्रीशंभू पाहि मां ॥४६॥
आणि तैसेंच करावें इतरांनी । दिवौकसे त्या ठिकाणी । शिवाचिया भजनांनी । पर्वत गेला दणाणून ॥४७॥
तो कोथलाच्या नैर्त्येला । ध्वनी ऐसा उठता झाला । जो शिवानेच केला । उदयोस्तु ऐसा शब्द ॥४८॥
हा ध्वनी झाला जेथ । उदितेश्वर लिंग तेथ । उत्पन्न झाले तीर्थासहित । श्रीशिवाच्या इच्छेनें ॥४९॥
हे देवांनी पाहिलें । ते अवघे चकित झाले । त्यांनी येऊन निवेदिलें । अवघें वृत्त श्रीहरीला ॥५०॥
विष्णु बोलले त्यावर । यांत आश्चर्य ना तिळभर । अवघ्याचा मायबाप शंकर । आधीच आहे देवहो ॥५१॥
अवघ्या आपणां निर्जरांसी । तोच आधार व्योमकेशी । जो प्रकृतीसह जगासी । मुळचाच आहे कारण ॥५२॥
लपणें वा प्रकट होणें । हे कांही न ज्याकारणें । जेवी उदय अस्ताविणें । सविता सूर्य-नारायण ॥५३॥
लपणार तरी तोच । प्रगट होणारा तरी तोच । प्रकृति-पुरुषाचा जो नाच । तेंच हे जग पहा ॥५४॥
तो जें जें कांही करी । तें जगहितास्तव निर्धारी । त्याच्यावीण जगीं दुसरी । वस्तूच कांही नसे हो ॥५५॥
लीला करुन दावणारा । आणि ती लीला पहाणारा । तोच एक आहे खरा येथें मुळींच शंका नसे ॥५६॥
हें सत्य ध्यानी धरुन । साधकांनी केल्या भजन । त्याचे मनींचे संकल्प पूर्ण । होतील ईशकृपेंनें ॥५७॥
म्हणुन हे देवदेवा । प्रकृती- पुरुषा सदाशिवा । उभयतां येऊनी पाय दावा । आम्हा अवघ्या देवांसी ॥५८॥
ऐशी विष्णुची स्तूती ऐकतां । भोलानाथ आपुल्या चित्ता । विचार करु लागलां तत्वता । येणे रीती विबुधहो ॥५९॥
प्रकृती आणि पुरुषांत । फ़रक नाहीं यत्किंचित । प्रकृतीलाच अस्तित्व । माझ्यामुळे प्राप्त झालें ॥६०॥
आणि प्रकृतीमुळेच मजलागी । ब्रह्मत्व येते झालें जगीं । ब्रह्ममाया ही उगी । बोलणे करावे कौतुकानें ॥६१॥
कोंणत्याही वस्तूठायीं । माझे तीन भाग असती पाहीं । तैसेच तीन त्याठायीं । प्रकृतीचे आहेत ॥६२॥
जेवढा कांही सत्वगुण । तो ममांशापासून । प्रकृतीचा तमोगुण । रजोगुण दोघांची ॥६३॥
यामुळेच ब्रह्मांडाची । रचना आहे झाली साची । गांठ प्रकृती-पुरुषाची । सर्वठायींच अक्षय ॥६४॥
चक्रशास्त्राप्रमाणे । पहातां या जगाकारणें । सूक्ष्म ज्ञानद्दष्टीने । ऐसे येईल कळून ॥६५॥
नऊ चक्राचे अधिष्ठाण । आहे हे जाणती सूज्ञ । त्या चार चक्रालांगून । शिवें आणिलें अविर्भावा ॥६६॥
पांच चक्रें प्रकृतीनीं । आणिलीं अविर्भावालागूनी । ऐशीं दोन्ही मिळूनी । नऊ ही संख्या झाली पूर्ण ॥६७॥
विष्णू आधींच चक्रवेत्ता । त्याला अवघीच ठावी कथा । माझ्या मुखींचें तत्वता । तेज गिरिजामुखांत गेलें ॥६८॥
ही सृष्टि-रचना ज्यानें जाणिली । तो ज्ञानसंपन्न महाबली । ऐशी व्यक्ती हा वनमाळी । म्हणूनी आहे स्तुत्य मला ॥६९॥
त्यात आणि माझ्यांत । फ़रक नाहीं यात्किचित । आतां रीतीप्रमाणे त्याप्रत । आराधणें भाग मला ॥७०॥
जें जें कांही जगीं घडतें । तें तें अखेंर एक असतें । मायेनें विपुल भासतें । विपुल भासणें भ्रम सारा ॥७१॥
जें स्कंद -पुराणांतर्गत । मांगीशमहात्म्य आहे सत्य । त्याचा हा संपला येथ । सातवा अध्याय विबुधहो ॥७२॥
इति श्रीदासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥७३॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति तृतीयोध्याय: समाप्त: ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-12-26T18:23:43.6170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

vehemently

 • आवेशाने 
 • कडकडून 
RANDOM WORD

Did you know?

विविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.