श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय अकरावा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥
हे पंचतुंडा उमापती । विश्वेश्वरा दक्षिणामूर्ती । माझी उपेक्षा तीळरती । देवा ! तुंम्ही करुं नका ॥१॥
मी सर्वतोपरी हीनदीन । नाही पंडीत विद्वान । त्यातून आहें निर्धन । मग काय करावें ? ॥२॥
मांगीशमहात्म्य वदावया । इच्छा झाली देवराया । ती कृपा करुनिया । पूर्ण आपण करावी ॥३॥
शौनकादिका सूत म्हणती । हा जो कोथल कैलास प्रती । ज्याची देव, मुनी आशा करिती । वास घडावा म्हणून ॥४॥
त्या कोथलाच्या पश्चिमेस । आहे भैरवाचे स्थान विशेष । तेथे बसून शिवास । भैरव तो आराधी ॥५॥
येथेच करावे भैरवव्रत । तें तीन प्रकारचे आहे सत्य । तें कसें हें ऐका त्वरीत । तुम्ही विबुध श्रोते हो ॥६॥
मकर राशीला सूर्य । जेव्हां येईल साचार । त्या मासीं रविवार । पाहूनी व्रत करावें ॥७॥
चैत्रमासीं द्वितीय व्रत । भरणी नक्षत्र असतां सत्य । तैसेच अश्विन मासांत । भरणी नक्षत्राचे वरी ॥८॥
या अशा तीन दिवशी । भैरव पूजावा आदरेंसी । त्यासी पुजीता व्योमकेशी । चित्ती संतुष्ट होतसे ॥९॥
व्रत करणे असेल ज्या दिवशीं । साधकानें ते दिवशी । उठून पंचपंच उष:कालासी । भैरव शिवाचें करणें ध्यान ॥१०॥
नंतर ब्रह्ममुहूर्त पाहून । तीर्थामाजी करावे स्नान । भस्मरुद्राक्ष धारण । सविधी करावें देहावरी ॥११॥
ब्रह्मचारी व्रत धरावे । वाणीस मौन असावें । एकाग्र चित्त करावें । भैरवपूजा करतांना ॥१२॥
सोने, चांदी वा तांब्याची । मूर्ती करावी भैरवाची । प्राणप्रतिष्ठा करुन तिची । कुंभी स्थापना करावी ॥१३॥
पूजा षोडशोपचारें । करावी की अत्यादरें । पुष्पें नाना प्रकारें । वहावी की भैरवाला ॥१४॥
बिल्वपत्राबरोबरी । दवना तोही वहावा शिरी । दवण्यावरी प्रेम भारी । शिवगणांचे शिवासह ॥१५॥
धूप म्हैसाक्ष उदाचा । भैरवासी दावणें साचा । मग पायसासह पक्वान्नाचा । नैवेद्य करावा अर्पण ॥१६॥
विडा दक्षणा देऊन । भैरव शिवाचें नामस्मरण । करुन करावे विसर्जन । त्या दिवसाच्या पूजेचें ॥१७॥
मूर्ती ब्रह्मणा दान करावी । शक्तीनुसार दक्षणा द्यावी । मात्र अहंकारवृत्ती नसावी । येतुलीही मनांत ॥१८॥
हे सगळे झाल्यावर । मागूनी येऊनी शिखरावर । शंभू महादेव शंकर । परमादरें वंदावा ॥१९॥
हें व्रत सूर्यानीं । केले पूर्वकालाच्या ठिकाणीं । त्या व्रतप्रभावेंकरुनी । रवी, तेजाचा निधि झाला ॥२०॥
विघ्नाचें करण्या निरसन । भैरवापरी न देवता आन । भैरवभक्ती केल्या जाण । फ़ल तात्काळ मिळतसें ॥२१॥
भूतपिशाच्चबाधा । भैरवभक्ता न होई कदा । भैरव न सांगे वायदा । आपुल्या भक्ताकारणें ॥२२॥
दु:ख तात्काळ निवारी । सर्व बाजूनें सुखी करी । रोग त्याच्या शरीरी । कोणताही न होऊं दें ॥२३॥
येथे अध्याय अठठावीस । पुरा झाला आहे खास । न्युनाधिकाची दासास । भैरव क्षमा करो कीं ॥२४॥
असो कोथलेच्या उत्तरेस । एक स्थान आहे विशेष । तेथे लिंगरुपाने महेश । राहिला होऊन स्तंभापरी ॥२५॥
स्तंभाच्या आकाराचे । ते लिंग आहे साचें । येथे त्रिशूलव्रत शिवाचें । भावें करणें साधकांनी ॥२६॥
श्रोते याच स्थलासी । करिता झाला व्योमकेशी । त्रिशूलाच्या स्थापनेसी । विघ्नें परिहार व्हावया ॥२७॥
या त्रिशूलव्रतें करुन । सर्व बाजूने कल्याण । होईल साधकाचे म्हणून । व्रत हे करा आदरें ॥२८॥
सूर्य मकर राशीस । येता अमावास्येस । हें व्रत करायास । काल उत्तम सांगितला ॥२९॥
त्या अमावस्येच्या दिवशी । उठून पहाटेच्या रात्रीसी । द्दढ धरावा चित्तासी । शूलधारी सदाशीव ॥३०॥
नंतर जाऊन बाहेरीं । स्नान करावें अत्यादरीं । पुनित शिवतीर्थावरी । तेथल्या शीतोदकाचें ॥३१॥
संध्यादिक कर्मे झाल्यावरी । सांग पूजा करणें खरी । सद्भाव असावा अंतरी । नाहीपेक्षां अवघें व्यर्थ ॥३२॥
ताम्र, चांदी अथवा सोनें । आपुल्या ऐपतीप्रमाणें । मूर्ती ती आहे करणें । त्रिशूलधारी शिवाची ॥३३॥
प्राणप्रतिष्ठा समंत्रक । त्या मूर्तीची करणें देख । दवणा, फ़ुले सुरेख । अर्चनासाठी मिळवावी ॥३४॥
सर्व राजोपचारांनी । पूजावा तो शूलपाणी । पक्वान्नपायसाचा दावुनी । नैवेद्य त्या शंकराला ॥३५॥
माध्यान्हीचे कालाला । एका उत्तम शिवभक्त ब्राह्मणाला । भोजन घालून दक्षिणेला । यथाशक्ती द्यावें कीं ॥३६॥
नंतर उजवे घेऊन । शिवा करावें साष्टांग नमन । एकभुक्त असावे आपण । हे विधान चुकू नये ॥३७॥
व्रतसांगता दुसरे दिवशी । करुन  दक्षणा ब्राह्मणासी । देऊन केलेल्या प्रतिमेसी । आपुल्या गुरुसी अर्पावी ॥३८॥
गुरु कोणासी नसल्यास । त्यानें परमशा शिवभक्तास । द्यावे शिवाच्या मूर्तीस । त्या केलेल्या विबुधहो ॥३९॥
नंतर करावी समाराधना । पंक्तीस घेऊन ब्राह्मणांना । वा आलेल्या याचकांना । अन्नदान करावें ॥४०॥
येणेप्रमाने त्रिशूलव्रत । जो का करील आदरें सत्य । त्याला अवघ्या ब्रह्मांडांत । शत्रू न कोणी राहिल कीं ॥४१॥
आधीव्याधी हरतील । सर्व सुखा तो पावेल । त्याचे गंडांतर ही टळेल । त्रिशूलव्रताच्या प्रभावें ॥४२॥
या व्रतापरी आन । व्रत व्हाया भाग्यवान । कोणतेंही नाही जाण । सत्य सत्य त्रिवाचा ॥४३॥
पूर्वी हें त्रिशूलव्रत । करिता झाला लक्ष्मीकांत । ज्यायोगाने बल अमित । आले अंगी हरींच्या ॥४४॥
कालजंघ नांवाचा । असुर हरीनें वधिला साचा । परशुरामें कार्तवीर्याचा । असाच नाश केला की ॥४५॥
सुधर्मा नांवाचा । एक ब्राह्मण होता साचा । त्याने त्रिशूल व्रताचा । जयीं केला अंगीकार ॥४६॥
तयीं तो होऊन बलवंत । जिंकिता झाला मृत्यूप्रत । तैसाच दिलीपनामें नृपनाथ । होता एक सूर्यवंशी ॥४७॥
त्यास हजार पुत्र झाले । या व्रताच्या प्रभावे भले । हें ज्यांनी ज्यांनी असें केलें । ते पावले सर्व सुखा ॥४८॥
वीरभद्र शिवगणांत । जो का प्रमुख झाला सत्य । त्यानें हें त्रिशूलव्रत । शिवाज्ञेनें केल्यावरी ॥४९॥
हें व्यासानें आम्हांप्रती । सांगितलें ऐसे सुक्त म्हणती । तेंच शौनकादिकाप्रती । तयानें की कथन केलें ॥५०॥
नुसतें या अध्यायाचें । पठण जो का करील साचें । कल्याण आहे व्हावयाचें । त्याचें सर्व बाजूनें ॥५१॥
गंडांतर- भिती निमेल । दारिद्र तें नासेल । अंगी येईल अतुल बल । हा अध्याय वाचिल्या ॥५२॥
येथें अध्याय एकुणतिसावा । संपूर्ण झाला असे बरवा । तो परिसतां नसावा । कुभाव मात्र अंतरी ॥५३॥
या कोथलाच्या ईशान्येसी । गौरीहरतीर्थ परियेसी । या क्षेत्राचा महिमा वानण्यासी । ब्रह्मदेवही समर्थ नसे ॥५४॥
मग दुसर्‍याचा पांड कोण । हें तीर्थ अती पुरातन । गौरीहर यालागुन । नामाभिधा ती शोभतसे ॥५५॥
या तीर्थाची बरोबरी । पुष्करतीर्थही ना करी । येथे साधकानें अत्यादरीं । गौरीव्रत करावें ॥५६॥
हें व्रतराज अवघ्या व्रतांत । जेवी कल्पतरु काननांत । वा चिंतामणी मण्यांत । वा कामधेनू धेनूमध्यें ॥५७॥
सूर्य येतां मेषेसी । म्हणजे मेषसंक्रांतीसी । हें व्रत करावें अती हर्षी । शुक्रवार पाहुनिया ॥५८॥
प्रात:काली उठावें । तीर्थी स्नान करावें । भस्म देहास लावावें । रुद्राक्ष कंठी मनगटीं ॥५९॥
आत्म्याचिया ठिकाणा । करुन नारीची कल्पना । तें रुपडें आणून ध्याना । परमभक्तीनें विबुधहो ॥६०॥
कां की पुरुषांत आणि प्रकृतींत । फ़रक नाही यात्किंचित । परी व्यवहार सांभाळण्याप्रत । ऐशी कल्पना करावी ॥६१॥
एक्या कुंभांत निर्मल वारी । भरुन प्रथमतां अत्यादरीं । गौरीस्थापना त्याचेवरी । ताम्हन ठेवून करावी ॥६२॥
तांबे, चांदी वा सुवर्ण । शक्य ती धातू घेऊन । त्याची प्रतिमा करुन । प्राणप्रतिष्ठा करावी ॥६३॥
पूजा षोडशोपचारें । गौरीची करा अत्यादरें । यांत मुख्य अर्चन आहे खरें । कुंकवाचें विबुधहो ॥६४॥
यथासांग पूजा करावी । न्युनता न कोठें ठेवावी । पायस पक्वान्नादि असावीं । देवीचिया नैवेद्या ॥६५॥
मग आठ सवाष्णी वा कुमारी । भोजना घालणें निर्धारी । प्रत्येकीची ओटी भरी । खण आणि नारळानें ॥६६॥
आठीस दक्षणा देऊन । करण्या शिवासी वंदन । येणें आहे परतून । शिखरावरी श्रोते हो ॥६७॥
तेथे शंभू महादेवासी । अभिषेक रुद्रसुक्तासी । करावा कीं अति हर्षी । भाव चित्ती ठेवूनिया ॥६८॥
नैवेद्य नाना पक्वान्नाचा । हरगौरीस करुनी साचा । समय माध्यान्ह-कालाचा । समाराधना करावी ॥६९॥
यथाशक्ती ब्राह्मणभोजन । इष्टमित्रांसह  आपण । प्रसाद म्हणून करणें ग्रहण । एक भुक्त असावें ॥७०॥
मग प्रतिमेचे दान । करावें ब्राह्मणाकारण । करंज्या लाडूचें वायन । द्यावें त्याच्या बरोबरी ॥७१॥
शक्तीप्रमाणें दक्षणा । हरगौरीस वंदना । नाना स्तोत्रें प्रार्थना । करावी त्या गौरीची ॥७२॥
शुक्राचार्यानीं हेंच व्रत । मागें केलें असें सत्य । ज्याला गौरी साक्षात । येऊनिया भेटली ॥७३॥
शुक्र म्हणाले तिजप्रती । हे आदिमाये प्रकृती । दुर्गे, भवाने, हैमवती । तव दर्शनें मी कृतार्थ ॥७४॥
आतां एक मागणें । आहे हें तुजकारणें । तें तूं उदारपणें देणें । नाही ऐसे म्हणूं नको ॥७५॥
या व्रताकारण । माझे नांव चालावें पूर्ण । त्याच्या आरंभा लागून । शुक्रवार योजावा ॥७६॥
गौरी तथास्तु म्हणाली । या व्रता कारण लाभली । शुक्रवार व्रत संज्ञा भली । परंपरेनें श्रोते हो ॥७७॥
ऐसें हें शुक्रवार व्रत । सौख्यदायी अत्यंत । कमलेला आलें श्रेष्ठत्व । याच व्रतानें पहा तें ॥७८॥
याच व्रताला सरस्वतीं । जेव्हां झाली आचरती । तेव्हां सर्व विद्येची अधिष्ठात्री । बैसली ती होऊन ॥७९॥
सुभानू ब्राह्मणास । याच व्रतें सुख विशेष । मिळून गेला कैलासास । अक्षयींचा रहावया ॥८०॥
आतां व्रत  देवीचें । दुसरें आहें यापरीचें । मात्र विधान तयाचें । बदल आहे थोडेसें ॥८१॥
श्रोते आश्र्विनमासांत । उत्तरा फ़ाल्गुनी नक्षत्र । येतां हें करणें व्रत । देवीप्रीत्यर्थ साधकें ॥८२॥
शुक्रवार व्रतापरी । याच्या पूजेची पध्दत खरी । फ़क्त नैवेद्यामाझारीं । फ़रक आहे थोडासा ॥८३॥
तो ऐका सांगतो येथ । साधकें मुगाचिया पिठांत । घालूनिया शर्करा घृत । त्याचे लाडू बांधावें ॥८४॥
आणि त्याच पहा लाडवांचें । भोजन आहे करावयाचें । आपुल्या कुटुंबासह साचें । हें ध्यानात असूं द्या ॥८५॥
दुसरे दिवशी व्रतसांगता । करावी कीं तत्वता । द्विजा दक्षणा देण्यांत हाता । सढळ ठेविलें पाहिजे ॥८६॥
याच व्रतप्रभावेंकरुन । गत वैभव मिळेल पूर्ण । इंद्राचे इंद्रपण । पुन्हां त्यासी प्राप्त झालें ॥८७॥
आतां पहा व्रत तिसरें । येणेपरी आहे खरें । याचा आरंभ अत्यादरें । नवमी तिथीस करावा ॥८८॥
म्हणजे श्रोते आश्विनमासी । हें व्रत करावें नवमीसी । दसर्‍याच्या आदले दिवशी । दुस-या व्रतापरीच हो ॥८९॥
सुवर्णाची प्रतिमा करावी । ती अत्यादरें पूजावी । आणि योग्य सवाष्णीला द्यावी । दान दक्षिणेसहीत ती ॥९०॥
दशमीसी ब्राह्मण भोजन । यथासांग घालून । न्यूनाधिक्यालागून । स्मरण करावे हराचें ॥९१॥
हें व्रत जो जो करील । तो सर्व सुखाते पावेल । कैलासही मिळेल । अंती त्यासी रहावया ॥९२॥
हें तिसाव्याचें सार । आहे बुधहो साचार । विश्वास ठेवुनी त्यावर । व्रत-सांगता करावी ॥९३॥
हा अध्याय शुक्रवारीं । दामोदराश्रमाभीतरीं । पुरा केला अत्यादरी  । आठवुनिया जगदंवा ॥९४॥
इति श्रीदासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥९५॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति एकादशोध्याय समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP