श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय चौदावा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥
हे पांडुरंगा मजप्रती । तूं पाव गा सत्वरगती । तूं ज्या आठवितोस चित्ती । तो पिनाकपाणी शंकर ॥१॥
महात्म्य त्या मांगीशाचें । तूं वदवी माझ्या वाचें । तुझे येणे झालें साचें । पंढरीस त्याच्या सहायास्तव ॥२॥
तुम्हां दोघांत फ़रक नाहीं । तुम्ही एकरुप दोघेही । म्हणून हे विठाबाई । मजला साह्य करावें ॥३॥
तुम्हा आवडतो दहीकाला । तैसा दहीभात शंकराला । हे कमलनयन गोपाळा । ह्रदयी माझ्या वास करी ॥४॥
स्कंद म्हणे अगस्तीप्रत । शिवलिंगास दहीभात । लेपन केल्या पुण्य अमित । कर्त्याच्या पदरीं पडतसे ॥५॥
तांदूळ असावे पाच शेर । अथवा पाच पावशेर । तेही अशक्य असेल जर । पांच अदपाव तरी घ्यावे ॥६॥
इतकेही घेण्यास । ताकद नसे जयास । त्यांनी पांच छटाकास । तरी घ्यावे विबुधहो ॥७॥
तांदूळ ते शिजल्यावर । त्यात धेनूचें दही सत्वर । मिळवून एक तय्यार । गोळा करावा लिंपावया ॥८॥
हे दहीभाताचे लिंपन । करणे वसंतऋतूलागुन । वैशाखमास उत्तम जाण । उक्त या व्रताला ॥९॥
या दहीभातलेपनें देख । आध्यात्मिक, आधिदैविक । आणि तृतीय ते आधिभौतिक । व्याधी पावतील नाशाला ॥१०॥
हें अर्चन करणारांनी । यावें कोथल पर्वतालागुनी । आणि पूजावा शुलपाणी । अती सप्रेम भावानें ॥११॥
हे करणे असेल ज्या दिवशी । त्यानें उठून पहाटेसी । स्नान शिवतीर्थासी । जाऊन करणे शीतोदके ॥१२॥
स्नानसंध्यादि कर्मे तेथ । आटपुन यावें मंदिरांत । पूजासाहित्यासहित । नंदीजवळ बैसावें ॥१३॥
तेथे नंदीस वंदन करावे । मग स्थिर आसनी बैसावें । आपुल्या सन्मुख अवलोकावें । पार्वतीपती हराला ॥१४॥
इच्छित गोष्टी मनांत । आणुनिया प्रथम सत्य । आणि करावें त्याप्रीत्यर्थ । बुधहो! आदरे संकल्पाला ॥१५॥
संकल्य तो झाल्यावरी । महान्यास आदरी । गणपती, वरुण त्यानंतरी । पूजा करणें उक्त असें ॥१६॥
सद्योजात मंत्रांनी । पंचोपचार शिवालागुनी । प्रथमता आदरें करुनी । बिल्वदलें घेऊन करा ॥१७॥
ती अर्पावी शिवासी देख । पुढे रुद्र्सुक्ते अभिषेक । शक्तीप्रमाणे नि:शंक । आपुल्या की करावा ॥१८॥
म्हणजे लघुरुद्र  अथवा एकादशणी । किंवा नुसत्या सकृत आवर्तनानी । शुध्द भाव ठेवून मनी । शिवा अभिषेक करावा ॥१९॥
मग शिवलिंगाप्रत । कोरें वस्त्र घेऊन धूत । गुंडाळावे अति त्वरीत । दहीभात तो लिंपावया ॥२०॥
दहिभात तो लिंपाल्यावरी । शिव पूजावा पंचोपचारी । त्र्यंबक हा आदरीं । मंत्र तेथे म्हणूनिया ॥२१॥
वेदाधिकार नसेल ज्यास । त्यांनी अर्पितां या उपचारास । मुखें म्हणावें सावकाश । ॐ नम: शिवाय ऐसे ॥२२॥
गंध, पुष्प, अक्षदा । बिल्वपत्र त्या अभेद्या । दक्षणा ती आधी द्या । धूपदीप ओवाळूनी ॥२३॥
तांबुल तो अर्पिल्यावर । आरती करावी लावून कापूर । अखेरी जोंडून कर । नाना स्त्रोत्रे म्हणावी ॥२४॥
शिव स्त्रोत्रे अवफ़्णित स्तोत्रत्नाकरी आहेत । त्यातून आपणासी समस्त । जी असतील ती म्हणावी ॥२५॥
आणि म्हणावे देवदेवा  ! । माझा मनोभंग ना करावा । माझ्या इच्छा सदाशिवा । अवघ्या तूं जाणसी ॥२६॥
त्या इच्छा पूर्ण व्हायास । मी आलो या कोथलास । या दहीभाताच्या अर्चनास । ते न विफ़ल जाऊं द्या ॥२७॥
माझ्या दोषांचे पर्वत । जळावे की देवा ! त्वरीत । कृपा करुन अत्यंत । दारिद्य अवघे नासावें ॥२८॥
आयुष्य धनमान पुत्रप्राप्ती । निकोप रहावी प्रकृती । माझी हे दक्षिणामूर्ती । भाललोचना शंकरा ॥२९॥
ऐशी प्रार्थना करुन । दहीभाताचें विसर्जन । करावें पुन्हां घालून स्नान । त्या लिंगाकारणें ॥३०॥
मग पुन्हां पूजा करावी । अभक्ती मात्र नसावी । दहीभात तो काढून ठेवी । प्रसाद न्यावा घराला ॥३१॥
स्वगृही आल्यावर । समाराधना करणें सत्वर । भोजना दहा द्विजवर । पांच सवाष्णी घालाव्या ॥३२॥
लेह्य, चोष्य, पायस । पक्वान्न पुरणपोळी, तीस । शुध्द धेनुच्या लोण्यास । कढवून तूप करावें ॥३३॥
शेळ्याम्हशीचे घृत कांही । मुळीच उपयोगाचे नाही । धर्मकृत्याचिया ठायीं । हे घ्यानांत असूं द्या ॥३४॥
तुम्ही धर्मकृत्यांत । भलतेंसलतें वापरता घृत । म्हणून हा भडिमार होत । तुम्हांवरी आपत्तीचा ॥३५॥
दहीभाताचा प्रसाद बरवा । अवघ्यांसी तो वाटावा । आपणही सेवावा । भोजनाचे बरोबरी ॥३६॥
नंतर तांबूल-दक्षणा । देऊन आमंत्रित ब्राह्मणा । आदरेंसी करुन नमना । विधी समाप्त करावा ॥३७॥
मग आपण भार्येसहीत । वा पुत्रपौत्रादिकें सत्य । भोजन करावें आनंदात । नाम घेऊन शिवाचे ॥३८॥
हें व्रत जो जो करी । कृपाप्रसाद त्यावरी । साच करील त्रिपुरारी । शंभू महादेव मांगीश ॥३९॥
स्कंद म्हणे हे अगस्ती । लक्ष देऊनी ऐक आतां । शिवप्रदक्षिणेची कथा । आज माझ्या मुखानें ॥४०॥
वेदसम्मत प्रदक्षणा । दोन प्रकारच्या जाणा । त्यांत जी आपुल्या मना । भावेल ती करावी ॥४१॥
दोन्हीही केल्यास । पुण्य लाभे विशेष । दोहीनेंही महेश । राजी रहात असे की ॥४२॥
सव्यापसव्य सोमसूत्री । जी प्रदक्षणा निश्चिती । कैशी तियेची आहे रिती । ती आतां घ्यानी धरा ॥४३॥
या प्रदक्षणेची नऊ स्थानें । ती वेदमार्गी जाणारानें । कधीही ना ओलांडणें । हा दंडक पाळावा ॥४४॥
मुख्य स्थानें आहेत तीन । त्याची तिप्पट नऊ जाण । हे पूर्ण ध्यानांत धरुन । प्रदक्षिणा ती करावी ॥४५॥
द्वार शिवाच्या मंदिराचें । पूर्वेकडेस असल्या साचे । तें वृषभस्थान प्रथमचें । मानणें आहे भाग पहा ॥४६॥
या क्रमें ईशान्येस । चंडस्थान आहे खास । तैशी जागा सोमास । आहे आहे उत्तरेला ॥४७॥
याचे उलट पश्चिमेचे । वृषस्थान असल्या साचें । चंडस्थान तयाचें । नैऋत्येला येईल ॥४८॥
सोमाची जागा उत्तर । ही केव्हांही ना बदलणार । आतां प्रदक्षणेचा प्रकार । कैसा तो पहा हो ॥४९॥
वृषस्थानापासुन । प्रदक्षणेचा आरंभ जाण । तेथे विधिपूर्वक संकल्प करुन । यावें चंडस्थानाला ॥५०॥
पुन्हा चंडस्थानापासून । वृषास्थाना येऊन । सवेंच ते करावें गमन । सोमस्थानाकारणें ॥५१॥
सोमस्थानापासून वृषासी । यावें त्याच क्रमेसी । वृष असल्या पश्चिमेसी । चंड तो नैऋत्येला ॥५२॥
पश्चिमेकडून निघावें । नैऋत्येसी जावें । आणि पुन्हा पश्चिमेसी परत यावें । सोमालागी जावया ॥५३॥
ऐशा प्रदक्षिणेप्रत । सोमसूत्री म्हणतात । ही प्रदक्षिणा अत्यंत ।  प्रिय आहे हराला ॥५४॥
या प्रदक्षिणा विधीचा । जाबाल ऋषी जनक साचा । हा जाबाल ऋषी शिवाचा । परमभक्त झाला असे ॥५५॥
ही प्रदक्षिणा सोमसूत्री । तांबडें फ़ुटल्या प्रभाती । तैशीच करावी निश्चिती । सायंसंधीकालाला ॥५६॥
या सोमसूत्री प्रदक्षिणा । एक तीन पांच जाणा । आठ, दहा ऐशाच गणा । शेवटी ती बारावी ॥५७॥
म्हणजे बारापर्यंत । प्रदक्षिणा करणें सत्य । ऐसा आहे स्पष्ट हेत । श्रीजाबाल ऋषीचा ॥५८॥
सव्य प्रदक्षिणा कितीही । कराव्या त्या नियम नाही । या आहेत दोन्हीही । मान्य वेदमताला ॥५९॥
ऐशा प्रदक्षिणा जो करित । त्याला वाजपेय यज्ञाचें लाभत । पुण्य पहा पहा सत्य । येथे मुळीच शंका नसे ॥६०॥
अष्टांगासहित । शिवा करणें दंडवत । ही आठ अंगे आहेत शरुत । कोणालाही विबुधहो ॥६१॥
नमस्कार ते शंकरास । आठ अकरा एकवीस । पाहून आपुल्या शक्तीस । प्रत्यही त्या घालणें ॥६२॥
नमस्कारामाजी जाण । हा नियम साधारण । प्रभातकालापासून । दहा नमस्कार घालावें ॥६३॥
माध्यान्हकाली बारा । तैसे अस्तमानी ध्यानी धरा । ते केल्यानें शरिरा । आयुरारोग्य लाभेल ॥६४॥
मुख करुन उत्तरेला । केल्या शिवपूजेला । हा आहे विधी ठरला । अत्युत्तम आधीच ॥६५॥
मुख करुन पूर्वेकडे । पूजन केल्या तें हो घडे । मध्यमप्रतीचें रोकडें । पश्चिमेसी कनिष्ट ॥६६॥
आतां पूजेचा तो प्रकार । ऐका हो सादर । भस्म धारिल्या अधिकार । येतो शिवपूजनेचा ॥६७॥
रुद्राक्षधारी त्याच परी । शिवपूजेचा अधिकारी । वा रुद्रसूक्ती प्रेम भारी । तोही अधिकारी समजावा ॥६८॥
रुद्र्सूक्तें लिंगालागुन । घातिल्यावरी पहा स्नान । वस्त्र करावें अर्पण । तें नसल्या बिल्वपत्र ॥६९॥
परी ती दोन वहावी । यज्ञोपवीतें दोन द्यावीं । तीं नसल्या तत अभावीं । बिल्वपत्रें चालतील ॥७०॥
ऐसा जो अत्यादरीं । मांगीशाची पूजा करी । तो प्रत्यक्ष त्रिपुरारी । झाला असें मानावें ॥७१॥
घडणें शिवाचें पूजन । अती आहे दुर्लभ जाण । या पूजेचें महिमान । शेषही बोलूं शकेना ॥७२॥
जगत हेंच शिवक्षेत्र । आहे आहे पहा खचित । कां कीं भगवान पार्वतीकांत । जगीं पूर्ण भरला असे ॥७३॥
त्या शंभूवीण एकही । रिता ठाव कोठेंच नाहीं । ऐसें जो मानील पाही । तो ब्रह्मवेत्ताच समजावा ॥७४॥
परी उपासकाकारण । भाव बसण्यालागुन । तीर्थें केली निर्माण । शास्त्रकारांनी पहा तीं ॥७५॥
गया प्रयाग अवंती । गोकुळ वृंदावन द्वारावती । जगन्नाथपुरी निश्चिती । पंढरी, बालाजी, दर्भशयन ॥७६॥
ज्योतिर्लिंगें तैशीं बारा । क्षेत्रामाजीं त्याला धरा । तीही आहेत परमेश्वरा । अवघीच की आवडतीं ॥७७॥
शिवभक्तांनी वा ऋषींनी । स्नानें केलीं ज्या ठिकाणीं । तीही तीर्थस्वरूपा येऊनी । बैसली आहेत श्रोते हो ॥७८॥
गोदा रेवा भागीरथी । कृष्णा प्रवरा भीमरथी । अमरजा पुष्कर चर्मन्वती । तापी पयोष्णी इत्यादिक ॥७९॥
जलाशय कोथल पर्वतीचे । तीर्थरुप आहेत साचे । भाग्य उत्तम जयाचें । तोच कोथली येईल ॥८०॥
हजार ब्राह्मण इतर ठायीं । आणि एक कोथलपर्वतीं पाही । घातल्या तो देई । दात्यालागीं पुण्य अमित ॥८१॥
कोथल पर्वतीचें प्रत्येक कृत्य । होईल पहा शतगुणित । ऐसा प्रभाव आहे खचित । मांगीश प्रभू शंकराचा ॥८२॥
शिवभक्तानें कोणाचा । द्वेष करूं नये साचा । पथ सदाचाराचा । केव्हांही सोडूं नये ॥८३॥
या कोथलीचें अनुष्ठान । केव्हांही ना वाया जाण । होईल, याचें महिमान । अतिशय श्रेष्ठ आहे कीं ॥८४॥
हें मांगीशमहात्म्य । जो कां पठण करील नित्य । त्याचे अवघे पुरतील हेत । सत्यसत्य त्रिवाचा ॥८५॥
हें मांगीशमहात्म्य ना कहाणी । प्रत्यक्ष आहे देववाणी । इचा घ्यावा करुनी । उपयोग तो साधकानें ॥८६॥
लग्नार्थियाचें होईल लग्न । धनार्थियासी मिळेल धन । वांझेसी पुत्रसंतान । होईल महात्म्य वाचिल्या ॥८७॥
प्रत्यहीं आनंद त्याच्या घरीं । निर्माण करील त्रिपुरारी । कोणी न तया राहील वैरी । ब्रह्मांडांत विबुधहो ॥८८॥
पठण या मांगीशमहात्म्याचें । चैत्रमासी करणें साचें । दिवशीं वर्षप्रतिपदेचें । पाडवा जया म्हणतात ॥८९॥
तों पौर्णिमेपर्यंत । वाचावें हे महात्म्य । संशय मात्र किंचित । मनी न येऊं द्यावा कीं ॥९०॥
विषबिंदू खिरीचा । नाश जेवी करतो साचा । तैसाच आहे संशयाचा । धर्म पारमार्थिक कृत्यांत ॥९१॥
हें आडतीस एकूणचाळीसाचें । सार मांगीशमहात्म्याचें । जें स्कंदानें कथिले साचें । अगस्तीऋषीस पूर्वकाला ॥९२॥
त्याचा सारांश पाहुन । मी हें आहे केले कथन । याचा उपयोग सूज्ञजन । तुम्ही करुन घ्यावा हो ॥९३॥
इति श्रीदासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥९४॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति चतुर्दशोध्याय: समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP