मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष वद्य ३०

मार्गशीर्ष वद्य ३०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


कौरवेश्वर दुर्योधन याचें निधन !

शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ३० या दिवशीं कौरवसम्राट दुर्योधन याचें निधन होऊन अठरा दिवस चालू असलेंले भारतीय युद्ध समाप्त झालें. दुर्योधन अनाथ व असहाय होऊन घोड्यावरुन फिरत होता. रणभूमीपासून एक कोस अंतरावर एक सरोवर होतें. त्या सरोवरांत मायेने पाण्याचें स्तंभन करुन दुर्योधन विश्रांति घेत स्वस्थ राहिला. पांडवांना ही बातमी कळल्यावर त्यांचे सैन्य जयघोष करीत सरोवराच्या कांठीं आलें. धर्मराज आणि दुर्योधन यांच्या मर्मभेदक संभाषणानंतर दुर्योधन स्फुरण पावून नागाप्रमाणें त्वेषानें खांद्यावर गदा घेऊन सरोवराबाहेर आला. भीम गदा हातांत घेऊन त्याच्याशीं झुंजण्यास सिद्ध झाला. भीमाचे बळ जास्त होतें. दुर्योधन गदायुद्धांत कुशल होता. भीमास जय मिळण्याचें चिन्ह दिसेना. श्रीकृष्ण अर्जुनास बोलले, "आतां कपटाशीं कपट, मायेशी माया पाहिजे." हें ऐकून अर्जुनानें आपल्या डाव्या मांडीवर थाप मारुन भीमास इषारा दिला; त्याप्रमाणें संधि साधून दुर्योधन गदेचे घाव चुकविण्यासाठीं उडी मारीत असतां भीमानें त्याच्या मांडीवर आपल्या गदेचा प्रहार केला. त्यासरशीं दुर्योधन ओरडतच जमिनीवर पडला. भीमसेन आनंदानें गर्जूं लागला. तेरा वर्षे अंत:करणांत दाबून ठेवलेल्या क्रोधाचा व वैराचा असा शेवट पाहून त्यास आवेश चढला. यानंतर अश्वत्थामा-द्रोणाचार्यांची पुत्र-संतापानें बेहोष होऊन त्याच रात्रीं गुप्तपणें पांडवांच्या शिबिरांत गेला आणि आपल्या पित्याचा वध करणारा धृष्टद्युम्न, आणि युधामन्यु, उत्तमौजा, शिखंडी, द्रौपदीचे पांच पुत्र या सर्वांची त्यानें क्रूरपणें कत्तल केली. ही आनंददायक बातमी दुर्योधनास कळविण्यांत आलीं. मरणकाळच्या असह्य वेदना सोसणार्‍या दुर्योधनास ही वार्ता ऐकून हर्ष झाला. "भीष्म, द्रोण, कर्ण यांच्या हातून न होणारा पराक्रम अश्वत्थामा, तूं करुन मला अंतसमयीं आनंद दिलास. तुझें कल्याण असो. तुमची आमची आतां स्वर्गांत भेट." एवढे शब्द कसेबसे उच्चारुन दुर्योधनानें मार्गशीर्ष व. ३० ला प्राण सोडला.

- ५ नोव्हेंबर इ.स.पू.१९३१

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP