मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष वद्य २

मार्गशीर्ष वद्य २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


सिंधुदुर्गाची उभारणी !

शके १५८६ च्या मार्गशीर्ष व. २ या दिवशीं शिवाजी राजे यांनीं सिंधुदुर्ग बांधण्यास सुरुवात केली. शिवशाहीपासूनच मराठ्यांचे आरमाराकडे विशेष लक्ष होतें. ‘घरांत जैसा उंदीर तैसा आमचे राज्यास सिदी’ असें शिवाजी नेहमीं म्हणे. आणि जंजिर्‍याच्या सिद्दीमुळेंच मराठ्यांचे आरमार वाढीस लागलें. सरहद्दीचा बंदोबस्त ठेवणें हें राज्यसंरक्षणाचें मुख्य काम असल्यामुळें कारवारपासून सुरतेपर्यंत पश्चिम किनार्‍यावर आपणास कोणी शत्रु नसावा अशी शिवाजीची व्यवस्था होती. समुद्रावर जहाजें ठेवून आपली सत्ता अबाधित ठेवण्याची मनीषा त्याची होती. ‘ - तो स्वत: खलाशी नव्हता म्हणून बरें, नाहीं तर त्यानें जमिनीचा पृष्ठभाग साफ करुन टाकला तसा समुद्राचाहि टाकला असता.’ असें इंग्रज म्हणत. सन १६६४ पासून शिवाजीचें आरमार विशेषेंकरुन वाढलें. ‘जंजिरा पाण्यांत किल्ला, जेर न होय, असाध्य तो आपणांस यावा, समुद्रांत सत्ता करावी, म्हणून बहुत चित्तांत हेतु धरुन, जहाजें नवीन तयार महाराजांनीं करविली.’ दहापांच लक्ष रुपये खर्च केला, समुद्रांत सत्ता बसविली, बेटें चांगली पाहून किल्ले बांधले. त्यापैकीं सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यास शिवाजी स्वत: खपत होता. सन १६६४ हें वर्ष शिवरायांच्या वाढत्या पराक्रमाचें निदर्शक आहे. सुरतेहून अमूप लूट आणली होती. कुडाळ प्रांत हस्तगते केला होता, वेंगुर्ल्याचा बंदोबस्त करुन गोवेकरांस गप्प बसविलें होतें. मुधोळचे संस्थान ताब्यांत घेतलें आणि मार्गशीर्ष व. २ या दिवशी सिंधुदुर्ग बांधण्यास सुरुवात करुन तेथील बंदरांत मोठ्या गलबतांचे लढाऊ आरमार त्यानें बनविलें. "उत्तरेस जंजिरा व दक्षिणेस गोवा या दोन तटबंदीच्या नाविक स्थलांमुळें राज्यास बळकटी कशी येते हें शिवरायांच्या ध्यानीं चांगलेच होतें. जंजिर्‍याच्या जोरावर व्यापार वाढतो, त्यासाठीं लढाऊ व व्यापारी आरमार पाहिजे हें जाणून मार्गशीर्ष व. २ रोजीं महाराजांनी खुद्द आपल्या हस्तें किल्ला बांधण्यास मुहूर्त करुन चिरा भूमीमध्यें बसविला."

- २५ नोव्हेंबर १६६४

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP