मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष शुद्ध ७

मार्गशीर्ष शुद्ध ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


अफझलखानाचा वध !

शके १५८१ च्या मार्गशीर्ष शु. ७ रोजीं शिवाजीमहाराज यांनीं विजापूर दरबाराहून पकडावयास आलेल्या अफझलखानाचा वध केला. शिवाजीचा वाढता प्रताप पाहून विजापूर दरबाराच्या मनांत स्वत:च्या अस्तित्वाबद्दल भीति निर्माण झाली. शिवाजीचें पारिपत्य कपटानें करण्याचें त्यानें ठरविलें. अफजलखान यानें प्रतिज्ञा केली कीं, ‘या डोंगरातील उंदरास जिवंत अगर मेलेला पकडून मी येथें आणून रुजू करतों." त्यानें बरोबर मोठी फौज घेऊन पुण्याकडे प्रयाण केलें. पंढरपूर, माणकेश्वर, करकंब, भोसे, शंभुमहादेव, या गांवांवरुन त्याची स्वारी येत असतां त्यानें अनेक हिंदु देवस्थानें उध्वस्त केलीं. पंढरपूरच्या विठोबाची दुर्दशा केली. ‘श्रीभवानी कुलदेवता महाराजांची, तीस फोडून जातियांत घालून भरडून पीठ केलें.’ या उच्छेदामुळें लोकांची मनें प्रक्षुब्ध झालीं. प्रतापगडीं शिवरायांची तयारी होतीच. श्रीदेवीनें महाराजांना आशीर्वाद दिला - ‘अरे मुला चिंता कां करितोस ? तुजला वर माझा आहे.’ प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशीं भेटीसाठी मंडप तयार होऊं लागला. मार्गशीर्ष श. ७ हा भेटीचा दिवस ठरला. शिवाजीराजे यांनीं अंगांत चिलखत घातलें. डोकीस शिरस्त्राण चढविलें. उजव्या हातांत भवानी तलवार, बाहींत बिचवा, डाव्या हातांत वाघनखें, अशी सिद्धता करुन घेतली. देवीचा आणि मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन महाराज निघाले. भेटीचे वेळी प्रथाम आलिंगन देतांना खानानें शिवाजीस आपल्या डाव्या बगलेत आवळून धरलें व पोटांत जमदाड चालविली. खानापुढें ‘महाराज केवळ द्वितीयेच्या चंद्रासारखे होते.’ वेळ कठिण आहे हें पाहून शिवाजीनें डाव्या हाताची वाघनखें खानाच्या पोटांत खुपसलीं. त्याबरोबर ‘दगा रे दगा’ असे ओरडून शिवाजीच्या डोक्यावर वार केला. शिरस्त्राण असल्यामुळें फारशी इजा झाली नाहीं. शिवाजीनें आपल्या तरवारीचा वार खानाच्या खांद्यावर करुन त्यास पोटापर्यंत चिरलें. त्याबरोबर खान गतप्राण होऊन जमिनीवर पडला.

- १० नोव्हेंबर १६५९

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP