मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष वद्य ७

मार्गशीर्ष वद्य ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


हनुमंताचें वृत्तांत - निवेदन !

मार्गशीर्ष व. ७ ला श्रीहनुमान रावणाच्या लंकेमध्यें असणार्‍या सीतेचा शोध लावून परत रामरायापाशीं आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. लंकेंत रावणाच्या अंत:पुरांत असणार्‍या अशोकवनांतील सीतेचा शोध मोठ्या युक्तीनें हनुमानानें लावला आणि तिला रामाची सर्व हकीकत सांगितली. रामास सांगण्यासाठीं तिचाहि निरोप घेतला. सीतेचा शोध लावून कर्तव्य केलें आणि लंकादहन करुन आपला पराक्रम शत्रूंनाहि दाखविला. आणि आतां रामाकडे येण्यासाठी तो अरिष्ट नांवाच्या पर्वतावर चढला, व तेथून त्यानें उड्डाण घेतलें. आणि थोड्याच अवधींत उत्तर किनार्‍यावर तो येऊन ठेपल्यावर जांबवान, अंगद आदींनीं त्यांचे स्वागत केलें. त्याच्या कामगिरीचा सर्वांनीं गौरव केला. आणि यानंतर सारी मंडळी राम, लक्ष्मण व सुग्रीव हे ज्या ऋष्यमूक पर्वतावर होते त्या ठिकाणी आली. हनुमानानें सीतेसंबंधीं सर्व प्रकार रामरायाला निवेदन केला. "धरणीवर बसलेली, सारखा नि:श्वास टाकणारी, रावणाविषयीं अत्यंत क्रोध व अनादर असलेली व मरणास तयार झालेली, अशी सीता मीं पाहिली .... मीं तिचें समाधानहि केलें की, वानरांचा राजा सुग्रीव बलाढ्य आहे, माझ्यासारखे शेंकडों बलाढ्य वीर त्याच्याजवळ आहेत. या सर्वांच्या साहाय्यानें रामलक्ष्मण रावणाचा नाश करुन तुझी सुटका करतील" याप्रमाणे श्रीरामचंद्र व हनुमान यांचें आणखी या बाबतींत संभाषण झाल्यानंतर रामचंद्र मारुतीची स्तुति करुन म्हणाले, "हनुमंता, तूं जें काम केलेंस तें दुसरा कोणीही करु शकला नसता. शंभर योजनें रुंद समुद्र ओलांडून जाण्याची शक्ति तुझ्याशिवाय किंवा गरुडाशिवाय दुसर्‍य़ा कोणासहि नाहीं." असें म्हणून रामानें मोठ्या प्रेमानें मारुतीस आलिंगन दिलें. यानंतर सर्व जण पुढच्या तयारीस लागले. मोठ्या प्रयासानें सेतु बांधण्यांत आला. लक्षावधि वानरसेना त्यासाठीं खपत होती.

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP