मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष शुद्ध १०

मार्गशीर्ष शुद्ध १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


हनुमंताचें समुद्रोल्लंघन !

मार्गशीर्ष शु. १० रोजीं शक्ति आणि बुद्धि यांचे मूर्तिमंत प्रतीक असणार्‍या सेवक हनुमानानें श्रीरामचंद्राची पत्नी सीतादेवी हिचा शोध करण्यासाठी समुद्रोल्लंघन केले. ! जटायूंचा बंधु संपति याच्याकडून माहिती कळली कीं, दक्षिण समुद्रापलीकडे असणार्‍या रावणाच्या लंका बेटांत सीता बंदिखान्यांत आहे. लागलीच अंगद, गज, गवाक्ष, गवय, शरभ, गंधसादन,मैन्द, द्विविद, सुषेण, जांबवान्‍ इ. वानर सरदार समुद्रकिनार्‍यावर जमले. पण समुद्राचें तें आवाढव्य व अपार स्वरुप पाहून सर्वांचा धीर खचला. सर्वांनीं आपापली शक्ति सांगितली, पण ती अगदींच अपुरी आढळून आली. तेव्हां जांबवान्‍ बोलला -"हनुमानाची शक्ति विलक्षण आहे. वीराग्रणीच आम्हांस या संकटांतून पार पाडील. याचें सामर्थ्य समुद्राहुनहि अपरंपार आहे. वीराग्रणीच आम्हांस या संकटांतून पार पाडील. याचें सामर्थ्य समुद्राहुनहि अपरंपार आहे. त्याचा पराक्रम रामलक्ष्मणाप्रमाणें आहे. गरुडाच्या पंखांतील बळ त्याच्या भुजांत आहे.-’ हें हनुमानस्तवन होत असतांच हनुमानाचे शरीर स्फुरण पावूं लागलें, त्याला मोठा आवेश चढला. त्याच्या तेजस्वी स्वरुपानें सारे दिपून गेले. त्यानें सांगितलें, "मी शतयोजन समुद्र उल्लंघून करुन सीतेचा शोध लावून आणतों. तुम्ही घाबरूं नका, भिऊं नका. मी सागराला पिऊन टाकीन, पर्वताला चूर्ण करीन - " नंतर मारुति एका पर्वताग्रावर गेला. मान आणि डोकें उंच करुन त्यानें समुद्राचें प्रथम निरीक्षण केलें. वायूला नमस्कार केला. आणि आपलें शरीर हळूहळू वाढविण्यास आरंभ केला. नंतर उड्डाण करण्याच्या अवसानानें त्यानें आपल्या पर्वतप्राय शरिराच्या हातांनीं व पायांनी पर्वतावर जोर दिला, त्याबरोबर तो एवढा मोठा पर्वत पण थरथरा कांपूं लागला. मारुतीनें आपले अंग हालवून केस पिंजारले, व मेघगर्जनेसारखा मोठ्यानें भुभु:कार करुन सत्त्व व तेज यांचें स्फुरण केलें आणि ‘हे कपींनो, रामानें सोडलेल्या बाणाप्रमाणें मी सरळ लंकेला जातों’ असें म्हणून प्रतापशाली हनुमानानें समुद्रावर झेंप घेतली.

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP