मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष शुद्ध ६

मार्गशीर्ष शुद्ध ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


शूरांचे दैवत स्कंद ऊर्फ खंडोबा !

मार्शशीर्ष शु. ६ हा दिवस चंपाषष्ठी म्हणून देवीप्रीत्यर्थ किंवा खंडोबाच्या स्मृतिसाठीं पाळण्यांत येतो. या दिवशी सर्व शिवालयांतून देवीचा उत्सव सुरु असतो. जेजुरी, पाली, मंगसुळी, आदि खंडोबाच्या ठिकाणीं या दिवशीं प्रेक्षणीय उत्सव होत असतो. शंकरानें खंडोबाचा अवतार घेतला आणि मणिमल्ल नांवाच्या दैत्याला ठार केलें. अशी कथा आहे. या खंडोबाची पत्नी म्हाळसा नांवानें प्रसिद्ध आहे. त्यामुळें खंडोबाला मल्हारी म्हाळसाकांत असेंहि म्हटलें जातें. महाराष्ट्रांतील कित्येक घराण्यांचे खंडोबा हें कुलदैवत आहे. क्षत्रिय बाण्याचा देव म्हणून मराठ्यांना हा विशेष प्रिय वाटतो. जयाद्रि महात्म्यांत या खंडोबाचें महत्त्व वर्णन केलें आहे. रामोशी, धनगर हेहि खंडोबाची उपासना करतात. देव बनण्यापूर्वी खंडोबा लिंगायत वाणी होता असें रामोशी समजतात. वनस्पति-वर्गांत भंडारांत खंडोबाचें अस्तित्व मानून त्यास पावित्र देण्यांत आलें आहे. प्राणिवर्गात कुत्र्याच्या रुपांत खंडोबा वास करतो अशी समजूत आहे. "स्कंद या संस्कृत शब्दाचें रुप खंड. त्याचें ममतादर्शक रुप खंडू व प्राशस्त्यदर्शक मराठी रुप खंडोबा. म्हणजे महाराष्ट्रांतील जेजुरी, पाली, वगैरे ठिकाणचे खंडोबा मूळचे स्कंदाचें म्हणजे खंडोबाचेंच. स्कंद ही देवता शूरांची व योद्द्यांची म्हणून फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. सेनानी असें दुसरें नांव स्कंदाला आहे. शूर वीर लोक यांची उपासन करतात." अशी माहिती ज्ञानकोशांत मिळते. शूर वीर लोक यांची उपासना करतात." अशी माहिती ज्ञानकोशांत मिळते. कित्येक घराण्यांतून मार्गशीर्ष शु. १ पासूनच या दैवताचा उत्सव सुरु असतो. कित्येक ठिकाणीं या उत्सवांत बगाड काढण्याची प्रथा आहे. " बगाड म्हणजे दगडी चाकाच्या मोठ्या गाड्यावर एक मोठा खांब बांधून त्याला एक मोठा आडवा खिळा ठोकावयाचा व ज्याचा नवस असेल त्यानें आपल्या पाठीस तो खिळा टोंचवून घ्यावयाचा व तशाच लोंबकळलेल्या अवस्थेंत शेंकडों माणसांनीं एकमेकांवर बेलभंडारा उधळून तो गाडा पळवावयाचा."

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP