मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष वद्य ५

मार्गशीर्ष वद्य ५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) छत्रसाल बुंदेले यांचे निधन !

शके १६५५ च्या मार्गशीर्ष व. ६५ रोजीं बुंदेलखंडाचा अधिपति छत्रसाल बुंदेला याचें निधन झालें. याच्या वयाच्या चौदाव्या वर्षीच आईबाप निवर्तून राज्याची वाताहात झाली होती. तेव्हां यानें ‘नशीब’ काढण्यासाठीं मोंगल दरबाराकडे धांव घेतली. मीमी जयसिंग याच्या पदरीं तो राहूं लागला. जयसिंगाबरोबर त्यानें अनेक लढायांत पराक्रम करुन दाखविला. परंतु पुढें मोंगल दरबारांतील बेइमानीपणा पाहून मोंगलांच्या सेवेंतून तो मुक्त झाला. याच वेळीं श्रीशिवाजीमहाराज यांची आग्र्‍याहून सुटका झाल्यामुळें त्यांचें नांव भारतांत दुमदुमून राहिलें. तेव्हां छत्रसाल दक्षिणेंत आला व शिकारीच्या निमित्तानें शिवरायांची यानें भेट घेतली. याची तेजस्विता पाहून आपलें गमावलेलें उत्तरेंतील ‘स्वराज्य’ काबीज करण्यास श्रीशिवाजींनीं याला प्रवृत्त केलें. याच प्रसंगीं शिवाजीनें यास एक तरवार अर्पण केली. तहवर खाँ, अनवर खाँ, सदरुद्दीन आदि शूर सरदारांचा पाडाव केला आणि यमुना व चंबळा या नद्यांच्या दक्षिण प्रांताचा म्हणजे सर्व बुंदेलखंडाचा हा मालक झाला. सन १७३२ मध्यें अहमदशहा बंगश यानें छत्रसालावर स्वारी केली. या वेळीं छत्रसालाचें वय एक्याऐशीं होतें. स्वत:चे अंगीं शक्ति न राहिल्यानें या वृद्ध राजानें स्वातंत्र्य-रक्षणासाठीं दक्षिणेंतील बाजीराव पेशव्यांचे साह्य मागितलें आणि छत्रसालानें त्याल पत्र लिहिलें : -

" - जो गति ग्राह गजेंद्रकी सो गति जानहुं आज ।
बाजी जात बुन्देल की राखो बाजी लाज - ॥"

आणि या विनंतीप्रमाणें बाजीरावानें बंगशचा संपूर्ण पराभव केला. तेव्हां कृतज्ञता म्हणून आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा यानें बाजीरावास दिला. असें सांगतात कीं, त्या वेळी प्रसिद्ध असलेला भूषण कवि याच्या दरबारीं गेला होता. त्या वेळीं यानें त्याच्या पालखीला खांदा त्याचा सत्कार केला.

- १४ डिसेबर १७३३
------------------------

(२) ‘दासबोध’ ग्रंथाचा संकल्प !

शके १५७६ च्या मार्गशीर्ष व. ५ रोजीं श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनीं शिवथरच्या घळींत बसून दहा वर्षेपर्यंत कोठेंहि न जातां दासबोध ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. महाराष्ट्राला योग्य प्रसंगीं जागृति देऊन कार्यप्रवृत्त करणारी रामदास ही एक अलौकिक विभूति होऊन गेली. रामदासांनीं सर्व भरतखंडांत यात्रा करुन देशस्थिति स्वत:च्या डोळ्यांनीं पाहिली होती. ‘आनंदवनभुवन’ म्हणून ज्याचा उल्लेख रामदास करितात त्या महाराष्ट्राच्या कानाकोपरा त्यांना माहीत होता. अनेक सौंदर्यपूर्ण असलेलीं रम्य स्थळें त्यांनी हुडकून काढिलीं आहेत. ‘एकांतेवीण प्राणियातें बुद्धि कैची ?’ असें स्वानुभवानें समर्थांनीं म्हटलें आहे. भोरहून महाडला जातांना दारमंडप लागतो. तेथून खालींच कोंकणच्या खोर्‍यांत शिवथर गांव आहे. डोंगरांतून पाण्याचे प्रवाह सारखे वाहत असतात. येथेंच डोंगराच्या तळाशीं एक मोठी घळ निर्माण झाली आहे. याच एकांतवासांत सबंध राष्ट्राला जागविणारा प्रसिद्ध असा दासबोध ग्रंथ निर्माण झाला. परमार्थ, राजकारण व समाजकारण यांचा सुंदर मिलाफ या ग्रंथांत, पाहावयास मिळतो.

"ग्रंथां नाम दासबोध । गुरु शिष्यांचा संवाद ।
येथे बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरुपण । निरोपिलें ॥"

असें या ग्रंथाचें स्वरुप समर्थांनीं स्वत:च सांगितलें आहे. हा दिव्य ग्रंथ म्हणजे समर्थांची वाड्मयीन मूर्तिच. ‘आत्माराम दासबोध । माझें रुप स्वत: सिद्ध’ असे उद्गार समर्थांचेच आहेत. ‘प्रयत्न, प्रबोध, प्रचीति’ यांचा मंत्र दासबोधांतूनच सर्व महाराष्ट्रास मिळाला आहे. पारमार्थिक ज्ञानानंतर समर्थांनीं दासबोधांत व्यवहारज्ञान व प्रपंचविज्ञान यांचें विवरण करुन महाराष्ट्राला प्रवृत्तिधर्म स्पष्टपणें शिकविला. ‘वैराग्य आणि परमार्थ’ यांऐवजीं ‘प्रपंच आणि परमार्थ’ व ‘भजना’ च्या ऐवजी ‘यत्न’ असे शब्द समर्थांच्या बोलण्यांत येऊं लागले.

- ८ डिसेंबर १६५४

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP