मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष शुद्ध १५

मार्गशीर्ष शुद्ध १५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) " तें हें दत्तात्रेय रुप ओतिलें !"

मार्गशीर्ष शु. १५ हा दिवस भारतांत दत्तात्रेयजयंतीचा म्हणून मानण्य़ांत येतो. अत्रि ऋषिस अनसूयेपासून दहा पुत्र झाले. त्यांपैकी दत्त हा एक होय. पुत्रप्राप्तीसाठीं अत्रीने त्र्यक्षकुल पर्वतावर तप केलें. त्याच्या घोर तपानें मस्तकांतून ज्वाला मस्तकांतून ज्वाला निघूं लागल्या व त्या ज्वालांमुळें त्रैलोक्याचा दाह होऊं लागला. तेव्हां सर्व देवांच्या सल्ल्यानें ब्रह्मा-विष्णु महेश यांचा अंशांनीं दत्तात्रेय यांचा अवतार झाला. या अवताराचा मुख्य गुण म्हटला म्हणजे क्षमा. यानें यज्ञक्रियासहित वेदाचें पुनरुज्जीवन करुन चातुर्वर्ण्याची पुनर्घटना केली. या अवताराला अविनाशी समजण्यांत आलें आहे. "अवतारहि उदंड होती । सर्वची मागुती विलया जाती । तैशी नव्हे दत्तात्रेयमूर्ति । नाश कल्पांती असेना" असें श्रीधरानें म्हटलें आहे. दैवतांच्या उपासनांवरुन समाजांत नाना संप्रदाय निर्माण होतात. महाराष्ट्रांतील या मोठ्या दत्तोपासनेचे मुख्य प्रणेते श्रीनृसिंह सरस्वती होत. त्यांचा मुख्य ग्रंथ ‘गुरुचरित्र’ हा आहे. मुसलमानी रियासतीच्या ऐन भरांत नृसिंह सरस्वतींनी चातुर्वर्ण्यघटित वैदिक धर्माचें स्वत:च्या आचरणानें व उपदेशानें संरक्षण करुन सर्व भारतीयांवर आपल्य तपोनिष्ठेची छाप पाडली. या संप्रदायाचें वैशिष्ट्य म्हणजे शिव व विष्णु यांच्या उपासना येथें एकरुप झाल्या आहेत. जनार्दनस्वामी, एकनाथ, दासोपंत, माणिकप्रभु आदि संतवर्यांनीं या संप्रदायाला संघटित स्वरुप दिलें. माहूर, गाणगापूर, औदुंबर व नरसोबाची वाडी ही दत्तक्षेत्रें महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहेत. सर्व सांप्रदायिकांची समजूत आहे कीं, "पूर्ण ब्रह्म मुसावलें, तें हें दत्तात्रेयरुप ओतिले." सांप्रदायिक लोक गुरुचरित्र, औदुंबरवृक्ष व त्रिमूर्तिदत्त यांची उपासना करुन गुरुवारीं दत्ताची पूजाअर्चा करितात.
"माळा दंड करीं कमंडलु, जटेचा मस्तकीं टोप तो ।
ब्रह्मांडांतरिं जो फिरेचि लपतो, भक्तीस आटोपतो ॥
भक्तीची दृढ चित्ति प्राप्ति करितां, युक्ति मला साधेना ।
स्वामी दत्त दयाघना अवधूता, श्रीअत्रिच्या नंदना !"
असें दत्तवर्णन एका भक्तकवीनें केलें आहे.
-----------------------

मार्गशीर्ष शु. १५

(२) गोविंदपंत बुंदेल्यांचा अंत !

शके १६८२ च्या मार्गशीर्ष शुद्ध १५ ला पानिपतच्या मैदानावर मराठे व मोंगल यांचा संग्राम होऊन गोविंदपंत बुंदेले मारले गेले. पंधरा दिवसांपूर्वीच बळवंतराव मेहेंदळे ठार होऊन मराठ्यांची बाजू लंगडी झाली होती. गोविंदपंत बुंदेल्यांनीं दिलेला शह हाणून पाडण्यासाठी अब्दालीनें शिकारीचें निमित्त काढून आताईखान यास दहा हजार निवडक स्वारांनिशी गुप्त रीतीनें गोविंदपंतांवर पाठविले. तीन-चार प्रहरांतच पंचवीस कोसांची दौड करुन दिवस मावळण्याच्या सुमारास गाजद्दीन नगराजवळ आताईखानानें गोविंदपंतांस गांठलें. या शत्रूकडील स्वारांनी बांड्या रंगाचे होळकरी निशाण पुढें धरलेलें असल्यामुळें मराठे फसले आणि शेवटीं निकराची कापाकापी सुरु झाल्यावर स्वत: पंतांचीहि धडगत उरली नाहीं. पंत पळतां पळतां घोड्यावरुन पडले, त्याबरोबर त्यांचे शिर कापून गिलचांनी तें अब्दालीस दिलें. आणि या दिवसापासून मराठ्यांच्या फौजेची छबी मावलली. गोविंदपंत अब्दालीची रसद मारण्याचें काम चांगलें करीत होता ! गोविंदपंत बुंदेले यांचे घराणें रत्नागिरी जिल्ह्यांतील नवरे गांवच्या कुलार्ण्यांचें होतें. गोविंदपंत देशावर येऊन बाजीरावापांशीं राहिले व अंगच्या हुशारीनें व कर्तबगारीनें मोठेपणास चढले. पानिपतच्या युद्धापूर्वीपासूनच फौज जय्यत तयार ठेवण्यास हे पेशव्यांना बजवीत असत. "रांगडे लोक हरामजादे फौज नसलिया बंदोबस्त राहणार नाहीं." असें यांचें सारखें म्हणणें असे. बाजीराव छत्रसालच्या मदतीस निघाले तेव्हां हे लष्कराबरोबर होते. यांच्या पराक्रमामुळें यांना छ्त्रसाल राजाकडून झांशी, जालवण, गुलसराई, काल्पी व सागर हे प्रांत मिळाले होते. गोविंदपंताच्या मृत्यूनंतर त्यांचे शिर सदाशिवरावभाऊंकडे पाठविण्यांत आलें. भाऊनेंहि यांच्या मुलाचे समाधान सांत्वनपर पत्र लिहून केलें व बुंदेलखंडाची व्यवस्था अत्यंत दक्षतेनें घेण्याविषयीं बजाविलें. अब्दालीची रसद मारण्याचें काम गोविंदपंत चांगल्या प्रकारें करीत असत.

- २२ डिसेंबर १७६०

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP