बहार १२ वा - रुग्णालयांत

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


ऐकुनि गाणें आग लागली मुरारच्या हॄदयाला,
आधिव्याधी सर्वाड्‍गाला लागति भाजायाला.
आवरुनी मन धरितां निसटुनि गेलें पुरतें,
तीव्र भडकलें , ताप वाढुनी, व्याकुळनी आतुर तें.
त्यांत ऐकुनी - " व्याकुळ होउनि झुरणी लागे जीव !"
पूर्वस्मरणें पुढती राहुनि उभी, वाढलें हीव.
डोळे ताणुनि निश्चळतेने केव्हा इकडे पाहे,
केव्हां तिकडे; केव्हा वरती तरळुनि दृष्टी बाहे.
समोर त्याला दिसूं लागली मूर्ति सगूची एक,
आता दुसरी, आता तिसरी, सुटला आणि विवेक.
हात पसरुनी पुढती, घेउनि नामाची जपमाळ,
बोलावी तिज करुण वचाने बरळुनि कांही काळ.
‘झुरणी लागे जीव ! कोन तु - सगु , सगु तू माजी.
खरी खरी का तूच सगू ही ? आलिस होउन राजी ?
सगू दया कर, दूर उभी कां ? ये ये जवळी बाई,
इकडं आलिस कवा, कशाला ? आन कशाच्या पायीं?
झूरणी लागे जीव किती त्यो, का म्हुन्‍ जाशी मागं,
याकुळ जाला जीव, कशाचा आला तुजला राग ?
फिरलों सड्‍गं रानोमाळीं नग अशीं तूं पाहूं,
माज्याजवळी बैस जराशी, रानीं सड्‍गं जाऊं.
पोरं हैती कुटं ? कशानं रडवा जाला चेरा ?
अजून किंवा जिवा जाचतो कम्‍ नशिबाचा फेरा ?
तोण्ड फिरवलंस्‍ ! कुटं निगालिस्‍ ? अग ....! अरे ही गेली !
थाम्ब थाम्ब ग, साड्‍ग सगू ही कां इतराजी केली !
कोन पुन्हा तू ? सगू ? अशी कां पगतीस रांग रागं,
काय ? पुन्हा तू गेलिस ? सगुने येऊं कां मी मागं ?’
आवेगें तो चळवळला मग मूर्तीमागें जाया,
परन्तु पडला मागें, आणिक धडपड गेली वाया !
डोळे मिटुनी पडला होता लागुनि थोडी धाप,
थकलीं गात्रें आणि लागला पुन्हा चढाया ताप.
बसले होते हात कपाळा लावुनि कुणि शेजारी,
बघुनि अवस्था मुरारची ही घाबरले ते भारी.
थकल्या हातीं गालावरचे पुसुनी ओघळ ओले,
पुन्हा करुनी धीर मनाचा, उघडुन डोळे बोले,
केव्हा ‘ पाणी !’ केव्हा ‘सगुने’ केव्हा ‘आई ! आई !’
कण्हुनी अर्धेमुर्धे यापरि शब्द वदे तो कांही.
‘तुझ्या मुराच्या पिर्तीसाठी, क्षमा कराया त्येला -
ये ग एकदा ! याकुळलेला जिव हा फार भुकेला.
न्हाई सगुने ? ....सगुने !......सगुने.....!’ बोलुनि इतुके शब्द,
जीभ कोरडी पडुन, जरासा मुरार झाला स्तब्ध !
अखेर घॆई क्षीण वचें तो एक सगूचा ध्यास,
आणि बोलला मधुनी मधुनी ‘येक येवडी आ... स’
तोंच वाजलें कवाड आणिक सगुणा आली आंत,
घाबरली ती; जवळी जाउन बघे लावुनी हात !
शिलोजीनी तर चाचपुनी कर , हाक मारिली त्याला,
कण्ठ दाटुनी, सगुणा विनवी डोळे उघडायाला.
शुध्दीवरती नव्हता तरि ही ऐकुनि करुणावाणी,
डोळे उघडुनि सगुणेवर तो दृष्टी अपुली ताणी
सगुणा बोले ‘ बळाकलं का मजला ? आल्यें आता !
वळाकलं ? मीं सगू !’ अन्तरीं गहिवरली मग कान्ता !
निश्चल त्याची नजर लागुनी सगुणेवरती राहे,
लिखित तयाच्या दुर्दैवाचे सगुण तींतच पाहे.
मग बोले ती शेजार्‍यांना विनवुन भरुनी डोळे,
‘इतुकं जालं आन कळालं काल ?  हाय ! जिव्‍ पोळे !
ओठ जरासे हालवुनी तों मुरार बोलूं लागे
‘कोन... सगू तू ? न्हवस‍ ... !’ एवढे शब्द बोलतां  मागे,
‘मुरा असं ह्ये काय बरं ! मी सगूच, आता आलें !
बोला बोला वळाकलं का ? परान याकुळ जाले !’
‘सगू न्हवस तू ?’ या अर्थाचे बोलायातें बोल,
ओठ हालले इकडे तिकडे आणिक डोळे खोल.
आणि सांठलीं करुण आसवें त्याच्या डोळां दाट,
दाटुनि  येतां कण्ठ, मिळाली शब्दास ही नच वाट.
पाहुनि त्याची अशी अवस्था सगुणेचें मन विरलें,
काळिज कोणी आंत तियेचें चरचर जाणों चिरलें.
कळवळुनी मग मुरार बोले ‘इनती ऐका माजी -
रडूं नगा, मज साड्‍गा सम्दं, करुं नगा इतराजी !’
शिलोजिंनी तों केली तिजला स्वस्थ बसाया खूण,
झटक्यामध्ये अस्फुट त्याची चाले परि भुणभूण १
आशा सुटली सकलांची मग चिन्ता सकलां जाळी,
न कळे दैवें काय ठेविलें वाढुनि पुढल्या काळीं.
सगुणा सेवा करि मातेच्या कोमळ पोटागीने,
भावव्याकुळ विनती ईशा प्रेमळ, नत वाणीने.
उपाय सरलें सकळ मानवी आणि न उरली आस,
अघोर तळमळ प्रतिक्षणाला करपवि तज्जीवास.
धीर सुटूनी, पुढे शिलोजी भविष्य भलतें पाही,
परी सगूचा देवावरचा भाव निमाला नाही.
दु:ख, काळजी, तीव्र वेदना सोशित असतां चार -
दिवस लोटले ! आणि गवसला नाही लव आधार.
दीन अवस्था पाहुनि त्याची भ्याले तेही फार,
घेउनि रुग्णालयांत गेले करण्यातें उपचार.
रुग्णालय नव सुन्दर दगडी, स्मारक औदार्याचें,
विलसत होतें आरामस्थळ दीनानाथजनांचें.
शिल्पसुबकता आणि भव्यता यांचा मिरवुन तोरा,
शोभे सुन्दर गगनामध्ये त्याचा उन्च मनोरा.
मधुनी मधुनी ठोके देउनि, घडयाळ बोलुनि बोल,
सुचवित होतें जीवितांतल्या प्रतिक्षणाचें मोल.
थोर जनांची दानशूरता अथवा उन्च सुराने.
जगता साड्‍गे पुकारुनी हें दीनांचे रडगाणें.
धूसर काळे दगड घेउनी गारवेलिची शाल,
बसले दीनां आरामाया भिन्तींतून विशाल.
सभोवताली फुलवेलींचा बहरुन गेला बाग,
वळणें घेउन मधुनी गेल्या वाटा जागोजाग.
कडवेलींचें कुम्पण हिरवें, कापुन पाताळीत,
कार्यकुशलता दावी  अपुली माळी हिरवाळीत.
उन्च सुरुंची कोठे लववुनि खाली ताठर मान,
केली होती प्रवेशदारीं वाटेवरति कमान.
चौकोनांवर भुईनळ्यांपरि सीकर कारज्‍ जाचे-
उन्च फवारुन अड्‍ग भिजविई खाली भूलतिकांचें.
कीं रुग्णालय ताज आणि हे भवति मनोरे चार ?
वा नन्दनवन दीनांसाठी घॆई हा अवतार ?
आंत चकाकित जिकडे तिकडे नीटनेटकें सर्व,
प्रकाश-वायू खेळून हरती जणु रोगांचा गर्व.
देवांची नव भिन्तीवरती चित्रें होतीं कोठे,
कुठे शिशूंचीं, देखावे वा कुठे आरसे मोठे.
एक हारिने भिन्तीसरशी सरळ माण्डिल्या खाटा,
मधुन फिराया शुभ्र रेखिल्या सड्‍गमरवरी वाटा.
असे मधोमध मेज; तयावर उपकरणॆं हीं सारी,
माण्डुन, बैसे लिहीत कोणी युवती-भगिनी- दारीं.
शुभ्रवाससा गौरकाय ती फिरवुन चौकस डोळे,
शासित होती निजभगिनींना, केव्हा वदनी बोले.
सेवारत कुणि दीन सेविका तडिल्लतेसम फिरुनी,
सुखवित होत्या शुश्रूषेने,  कुणा निरामय करुनी.
वैद्य विशारद, शब्द न वदतां कायीं होते दड्‍ग,
रुग्णालयिंच्या या शान्तीचा न करी कोणी भड्‍ग.
कोठे कोठे मात्र विचारी कुणि न मुळी अधिकारी,
म्हणुन ओरडे रोगी कोणी, दु:खें विवळुन भारी !
मुरारजीला इथेच आणुन, एका खाटेवरती !
नीट निजविलें; गेली नव्हती मूर्छा अजुनी पुरती.
कालपासुनी डोळे मिटुनी शब्द न वदतां कांही -
मुरार पडुनी शान्तपणाने दु:खें अपुलीं साही.
शुध्दीवरती परि आता तो होता पुरता आला,
क्षीणत्वाचा, खिन्नपणाचा ढग वदनीं ये काळा.
सगुणा होती जवळ बैसली रगडित डोकें हातीं,
मुरार वाटे झाली अपुल्या संसाराची माती !
दीर्घ सोडुनी सुस्कारा तो कण्हुनी डोळे उघडी,
वाटे त्याला आयुष्याची एकच उरली सुघडी,
थकलेले मग लोचन लावुनि सगुणेवर, तो पाहे -
एकसारखा, हृदयीं जळुनी तीव्र निराशादाहें.
ओठ हालले पुन्हा सगूशीं बोलायातें कांही,
दु:खवेदना भरुन हृदयीं शब्दच फुटला नाही.
तळमळ मनिंची दिसूं लागली गात्रागात्रांतून,
करुं लागली जिभली धडपड टाकायास वदून.
ओठ उघडले, हलले आणिक मिटले दोन्ही वेळा,
खेचुनि शक्ती, बोलायाचा यत्न मुराने, केला.
अखेर होउन डोळे सुस्थिर खिळले सगुणेवरती,
आणि हळुहळू साठूं लागे त्याच्या नयनीं भरती !
हळुच खोल जड शब्दीं बोले ‘सगू .. ! ’ आणि तो थाम्बे,
ओहळुनी जळ झर झर नयनीं अन्थरुण ओथम्बे.
शब्दाम्बुधि मग अडला ओठी, आणि तयाची लाट,
नेत्रीं फुटली, अनुतापाची अवस माजतां दाट.
प्रेमभावना ढकली आंतुन शब्दांना बाहेरी,
आर्त मनांतिल शब्द प्रेमळ, करुण, सगू परि हेरी !
अखेर बोले थाम्बथाम्बुनी -‘ सगू, बु.. ड.. वली.. तु ज . ला !
जातों... पोरं. शिपत.. थोर त्यो !’ आणि अश्रुंनी भिजला !
वदनीं येउन भेसुर छाया मूर्छा आली घोर,
आणि वाटलें सकलांना, ती आली वेळ कठोर !
काव्य कवीचें लोपुन जावें काळयमाच्या पोटीं,
आणि उरावी एकच पड्‍ क्ति मधुर जनांच्या ओठीं,
आणि जनांनी लागावें मग शोध कराया त्याचा,
मिळूं नये परि हारवलेला दुवाच कधि काव्याचा,
आणि जनांनी पड्‍क्तीं तच त्या, अर्थशोधनासाठी,
तर्क कसाला लावुन, करणें निष्ठुर आटाआटी,
तों उमगावा अर्थ तयाचा आणि मिळावा धागा,
आणि संव्यथा त्यातिल वेधी नाजुक हृदयविभागा,
त्यापरि, राहे विलापिल्का जी शब्दीं भरुन मुराची,
अर्थ उमगतां तिचा, दुणावे धडधड आर्त उराची !
परि द्यायाचा जिवास त्याच्या पूर्णपणें आराम,
उरलें होतें हेंच काय तें इतर जनांचें काम.
स्वस्थ तयाला पडूं दिलें मग सर्वोनी किति वेळ,
न कळे कोणा जगन्नायकें काय माण्डिला खेळ !
मात्र सगूला मुळि न राहवे, शान्तिमधे भेसूर
तेव्हा बोले हळु ती मधुनी काढुन रडवा सूर -
‘मुरा काय ह्यें बरं ! तुमाला बरं करायासाटी
आल्यें मी ना ? व्हनार्‍ बरं ना आता माज्यासाठी ?’
गुड्‍गुन पडला होता डोळे मिटुनी अजुन मुरार,
झुळझुळ तों ये पहाटवारा दारामधुनी गार.
सगुणा वदली शब्द पुन्हा ते व्याकुळुनी हृदयांत,
आणि पिड्‍गळा झाडावरला दे तिज मज्‍ जुळ साथ.
तोंच उघडले हसर्‍या वदनीं हळुच मुराने डोळे,
प्रसन्नतेने हात सगूचा धरुनी मग तो बोले
‘सगू, तुझ्या किरपेनं तर मग व्हनार काय बरा मी ?
व्हनार... !’ हासे आणि पुन्हा तो श्रमुन पडे आरामीं.
स्वर्गसुखाचा अनुभव आला सगुणेला या वचनीं,
‘मुरा , पर्भुच्या किरपेनं अं !’ बोले, वर पाहूनी.
उत्साहाचें तेज चमकलें शिलोजिच्याही वदनीं,
उल्हासाची पहाट वाटे आली होती भुवनीं.
रुग्णालयही मुरास वाटे भरलें उल्हासाने,
खिडकीतुनही कानीं आलीं निसर्गसुन्दर गानें.
उल्हासाची पहाट दिसली त्याला सुन्दर लाल,
केशरकुड्‍कुमरड्‍गीं रड्‍गे देह आणखी भाल.
शुभ्र दूरचे घुमट विलसले सुरम्य आरुण रड्‍गीं,
नवतेजाने नभीं चमकले उन्च मनोरे जड्‍गी.
जागी मुम्बापुरी होउनी भरली आवाजांनी,
घण्‍ घण्‍ , पों पों, धड्‍ धड्‍ आले ध्वनि गाडयांचे कानीं.
नव्या दमाने चळवळ मार्गीं सुरु जनांची झाली.
चुली पेटल्या, तेजें फुलल्या तों मजुरांच्या चाळी.
तेज फाकलें, चढत चाललें वैभव आकाशाचे,
उल्हासाचा जोम अन्तरीं ज्याच्या त्याच्या नाचे.
नवसृष्टीच्या नव्या जीवना होई की सुरवात ?
निसर्ग होता नव्या दमाचें किंवा गायन गात ?
कुणास ठावें ! शिलोजिच्याही हर्ष न मावे पोटीं,
प्रफुल्लतेचा अभड्‍ग नाचे तोंच, तयांच्या ओठीं.
आणि येउनी कमण्डलूची हाक मुराच्या कानीं,
गमे, बोलली ‘नवं जिणं ह्यें ! नवं जिणं ह्यें !’ गानीं !

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP