TransLiteral Foundation

बहार ९ वा - कसोटी

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


बहार ९ वा - कसोटी
सगुणेनें हें पाहुन त्याला हळुच मारिली हाक,
दचकुनि , गेला घरांत झणि तो , वाटुनि कांही धाक.
आंत काम्बळयावरती पडला, व्याकूळ होउनि फार,
सरत्या रात्रीं झोप न आली, जाळी एक विचार -
‘हाय ! दुकवली पिर्त जिवाची ! दोन सोनुलीं माजीं !
जळलं सोनं हाय ! कोळसं आलं हातामाजीं !
करुं सुखी मी कशी सगूला, सुखवूं कशिं हीं पोरं ?
आग लागली ! आग लागली हाय जीवाला घोर !
तोण्ड कुनाला ह्यें दावावं  ! गेलं माजं नांव !
फुलं येचिलीं ततं गोवर्‍या येचाया का र्‍हावं ?
सगुना माजी ! पिर्त जीवाची -दोन सोनुलीं माजीं !
नगं नगं ह्ये गांव ! चलावं कुटं तरी का आजीं ?
खिनभर आता नगं राहानं जावं परमुलकाला !
सगुच्या पिर्तीसाठीं जावं निघुनी का मुमईला ?’
विचार येतां शेवटला, तो चमके फार मनांत,
गतजीवन तो उभें राहिलें समोर अन्धारांत !
यज्ञ जिवाचा करावयाला प्रीती शिकवी त्याला,
उद्योगाला जयाचा तर निश्चय त्याचा झाला.
पहाट झाली तरी अजूनी बघुनी त्याला जागा,
प्रश्न विचारी सगू- ‘जिवाला काय जहालं साड्‍गा !’
पुन:पुन्हा ती तेंच विचारी; करुनी त्याने धीर -
निश्चय मनिचा साडि‍गतला; तिज लागे हृदयीं तीर !
शीतळ सुखकर वाहुं लागले झुळझुळ वारेझोत,
एकामागुन एक नभीचीं विझूं लागली ज्योत.
उदयगिरीवर मोहरला तों अरुणाचा अनुराग,
झाडांमधुनी चराचराला येऊं लागे जाग.
घरटें सोडून जो तो  जाई उद्योगाला दूर,
सगुणा-हृदयी परी माजलें दु:खाचें काहूर.
आळवुनी ती पतिला निश्चय सोडुनि द्याया साड्‍गे,
‘हातच राबा शेतामन्दी !’ हेंच मागणें मागे.
अम्भेरीला आणि जनांला कायमचा जो विटला,
काय शिणावें जीवित त्याने, संशय जेथें फिटला?
शिलोजिचीही भेट घ्यावया नुरली त्याला आस,
आजच रात्रीं निघावयाचा निश्चय ठरला खास.
परोपरीची करुण विनवणी पटली नाही त्याला,
उत्सुक नव्हता शेतामजीं मुळि तो राबायाला.
मानाजीच्या शपथपूर्तिचा आठव सगुणा देई,
अढी न सुटली;अपमानाचें चित्र पुढे तों येई !
शिलुकाकाला परतायाला दिवस राहिले थोडे,
तरी मुम्बईकडे मुराचें चित्त सारखें ओढे.
पैसाअडका जवळ न कांही, तरि निधडया छातीने,
उद्योगाला जाया सजला, घालवितां प्रीतीनें.
पाहुनिया हें, सगुच्या बसली मनास मोठी भीती,
प्रीती वदली ‘काय करावं?’ चिन्ता उपजे चित्ती !
कोळपलेल्या अखेर हृदया सुचली एकच तोड,
तिला मुराच्या प्रीतिवांचुनी नव्हते कांही गोड.
मानाजीच्या प्रेमळतेची खूण ‘डोरले’ एक,
मायस्मृति ही जपून ठेवी विश्वासाची लेक;
आजवरी जें सन्मानूनी जपलें जीवापाड,
करणें आलें तें हाताने आता दृष्टीआड !
हाय ! जिवाच्या तीव्र वेदना कुणा साड्‍गणें काय !
विकावयाचा धीर न होई अबलेला असहाय !
परन्तु पडला तिच्या जिवाला चहूंकडूनी पेंच,
मूर्त पित्याची उभी राहिली डोळ्यांपुढती तोंच.
नजर मूर्तिवर वरती लागे; अश्रू त्यांतुन खाली -
एकामागून एक निसरले सरसर येउन गालीं !
‘रडूं नग तूं पोरी ! माजं इकुन डोरलं टाक !’
वाटे तिजला मूर्त बोलली, हळुच मारुनी हाक.
स्वप्र लोपलें पुढलें ! सगुणा भानावरती आली,
प्रीतीसाठी निष्ठुर कर्तव्याला सिध्द जहाली.
सायड्‍काळी घरांत होतें चार जणांचे अन्न,
मुरार बैसे हिरु-केरुंना सड्‍गे घेउनि खिन्न.
ब्रह्माण्डाची भेसुर चिन्ता गेली डोळ्यांपुढुनी,
उष्ण आसवें अड्‍गावरती ओघळलीं कढकढुनी.
‘कसं व्हतं अन्‍ कसं जहालं !’ अपुल्याशीं तो बोले,
क्षण मोहाने ‘जावं ! र्‍हावं ! ’ऐसें मन आन्दोले.
तोंच सगूने मुळि न जेवतां , अपुला बान्धुनि शेर,
जिवाहुनि प्रिय मुरास दिधला, संयमुनी मन थोर,
मुरा निघाला ! पुन: एकदा तिनें विनवणी केली,
परि मुग्धत्वें त्याच्या, विनती सतिची वाया गेली.
ढसाढसा मग रडूं लागलीं दोघें ओथम्बून,
रडूं लागली मुलें अकारण, त्यांना रडत बघुन !
डोळे पुसले तोंच सगूनें, जरा धरुनी धीर -
दिले पन्धरा रुपये त्याला; पुन्हा ओघळे नीर !
विस्मित झाला मुरार, गेला पुनरपि भाम्बावून,
‘नग नग ह्यो पैका मजला ’ बोले परत करुन.
‘असं नका वड्‍गाळ बोलुं ह्यें ! दिला आमुचा ठेवा !
परान अमुचं दिलं तुमांला; जपून वागा, देवा !’
अशाच परिने समजावोनी तिने घातली आण;
आणि घातलें खिशांत त्याने सुभग सतीचें वाण !
अन्धाराचा सागर काळा दोलोकांमधि भरला,
चमकूं लागे फेस अम्बरीं काळ्या लाटांवरला.
दाट माजली घराभोवती काळोखाची छाया,
अन्धाराने अन्त: सृष्टी होय मुराची जाया.
जड हृदयाने निरोप घेउनि, मनामधे करपून,
मन्द पावलीं मुरार गेला भान जरा हरपुन.
अन्धारांतुन वळून पाही पुन: पुन्हा तो मागे,
अश्रुधार तों पैरण त्याची भिजवायाला लागे.
दिसलें नाहीं मुळीच कांही सगुणेला अन्धारीं,
किती वेळ परि फिरली नाहीं दारांतुन माघारी.
पुन्हा एकदा फुटला मोठा हॄदयांतून उमाळा,
बापुडवाणीं बघुनी बाळें गहिवरली वेल्हाळा.
कोण, कशाला,कोठें गेला, कुणास कळलें नाहीं,
खिन्न मनाने मात्र परतली दीन मुलांची आई !
मुरार हृदयीं होमकुण्ड तों पेटुनिया वेगानें,
जळूं लागलीं पापें आंतील आता अनुतापाने.
करपुन गेले अश्रु त्याचे उठुन मनीं काहूर,
काटित चाले मार्ग एकला अन्धारांतुन दूर.
रहिमतपुरच्या थाम्ब्यावर तों घण्‍ घण्‍ घण्टा वाजे,
हादरुनी मग मुरार येई भानावर आवाजें.
अज्ञातांतुन सतेज गर्जत यावी कविची वाणी,
अन्धारांतुन त्यापरि आली गाडी, फुडिकत गाणी,
गडबडुनी मन यन्त्रच बनलें , शिरतां ध्वनि कानांत,
निमिषभराचा खेळ ! बैसला मुरार जाउनि आंत.
भुभु:कार तो पुन्हा जहाला, भेसूर गर्जे शीट,
धक्का बसला, मेघामधली चपला गेली नीट !
दूर नभांतुन वातावरणीं घुमले बेसुर नाद,
तेथुन खालीं कृष्णासलिलीं उठली अस्फुट साद.
विश्व शान्तलें शोकावेगें किंवा भरले ऊर ?
कमण्डलूही गुणगुणला, पण ऐकूं न आले सूर !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-29T20:50:45.8570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

entry search and seizure

 • प्रवेश झडती व जप्ती 
RANDOM WORD

Did you know?

Gharamadhye Shriramachi ani marutichi pooja karavi ka ? baykani keli tar chalate ka ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.