बहार ६ वा - शपथ

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


मुरार आता बघूं लागला संसाराचें काम,
सगुणा म्हणजे केवळ होतें त्याचें प्रेयोधाम.
शेतीभाती आणि मागला मुभ्बइचा व्यापर,
चालू केली त्याने पडतां संसाराचा भार.
कधि आईची, कधी पित्याची  स्मृति हृदयाला जाळी,
मित्रसड्‍गतीं मन तो अपुलें रमवी ऐशा काळीं.
मात्र सगूचें  चुकून दुखतां मृदु मन त्याच्या हातीं,
तीव्र वेदना ज्वाला त्याच्या हृदया जाळुनि जाती !
तरिही, उधळण सुरु जहाली भलत्या दिलदारीने,
मित्रासड्‍गे मानस होई दुर्बळ अपुल्या परिने.
परि मनाने उमदा आणिक हाताने दिलदा,
निजहृदयाच्या श्रीमन्तीने होता तो सरदार.
गैरफायदा घेती याचा गांवामधलीं पोरें,
अवगुण त्याचा वाढविती हा गुण्ड आणखी थोरें.
श्रीमन्तीच्या, दिलदारीच्या विभवें असता धुन्द,
मना न शिवला कधि मैत्रीचा कावा असला कुन्द.
श्रीमन्तीच्या त्याच्या भुलुनी मित्र घोळती गोण्डा,
दुदैवाने जळ- वेगाने वाहत गेला ओण्डा !
मानाजीने उधळणुकीची जाणिव दिधली त्याला,
शब्द तयाचे वाहवलेल्या पटले कधि न मनाला.
कानाडोळा होऊं लागे कधि शेतीच्या कामीं,
मित्रसड्‍गे दड्‍ग असावें केव्हा सौख्यारामीं.
ढिलेपणाला थोडी थोडी होय अता सुरवात,
सेवक  त्याचे जरा लागले झोकायाला बात.
पडत्या विभवीं छिद्रांवरती घाव घालुनी घोर -
पुरें बुडविणें, यांत मानिती नीती कोणी थोर.
वैभव त्याचें थोर जयांना मुळि पाहवलें नाही,
स्वार्थी कोणी टपले होते उडवायाला लाही.
गोड अमृतामधे विषारी पडूं लागले बिन्दू,
न कळे कसला लड्‍घायाचा आहे त्यानां सिन्धू !
भलत्या मार्गीं ओढुनि नेई जरी मुराला गांव,
केवळ सगुच्या चतुर हुशारीवरती चाले नाव.
सूख हेंच कीं सगुला होतें दिवस लोटले कांही,
मानाजी या नव आशेने दु:खे विसरुन जाई.
दिवस सुगीचे सरले, आता फार उन्हाळा तावे,
उघडया नाड्‍गरलेल्या रानीं मृगजळ मोहक भावे.
माय मुराची गेली त्याला पुरें लोटलें वर्ष,
घरीं जनांच्या तोण्डावरला आज मावळे हर्ष !
कालपासुनी सगुच्या जीवा नव्हतें चैन जराही,
उदासवाणीं चित्रें मागिल गेलीं पुढुनी कांही.
आठदिसां जों मुरार गेला होता व्यापाराला,
घोडेशर्यत खेळुन नुकता पुण्याहुनी तो आला.
मनास त्याच्या आज वेदना जाळित होत्या कांही,
चित्र मनाचें भेसुर त्याने परी दाविलें नाही.
दिवस साजरा होउन, झाली जखम मनाची ओली,
तों तान्ह्याच्या नवरुदनाने भरली सगुची खोली.
औदास्याचे ढग मावळले; प्रफुल्ल हृदयें झालीं,
‘नातू झाला मानाजींचा !’ हळूच वाणी आली !
मुरार धाला आनन्दाने मुग्ध आंतले आंत,
प्रेम बहरलें नवाड्‍कुराचा गोड वाहतां वात.
अज्ञ जिवाला माहित नसतें परी, अरेरे !कांही,
एक उडविले रड्‍ग लाट, तों दुसरी उडवी लाही.
एक खेळते नौकेभवती, अन्य चालते वाट,
एक हासवी, दुसरी बुडवी येउन पाठोपाठ.
फूल निरामय रम्य हासतें केवळ आनन्दाने,
कीड खालुनी मार्ग चालते खाण्याच्या रोखाने.
पुलकित होतें सुवर्णतेजें जेव्हा वसुधाराणी,
तिमिर येतसे मन्द मागुती, करण्यातें धुळधाणी !
एक एक दिन पाउल पुढती टाकुनि चाले जीव,
परि न कळे की काळपुरीची जवळ करी तो शीव !
क्षण विभावाला सौख्य गणावें आणि रडावें अन्तीं,
हसतां हसतां मोरासम कां मग न वाटणॆं खन्ती ?
मुरार रमला आनन्दाने पुत्रोत्सवविभवांत,
‘वीस हजारीं गोता बसला !’ कळलें व्यापारांत -
गोड बोलुनी ज्यांनी केलें मुक्तकण्ठ गुणगान,
मोहमयीचे स्वार्थी ऐसा गळा कापिती छान!
धक्का बसला ! हादरलें मन ! हृदयीं झाला खिन्न १
गुणगुण ऐकुनि मानाजीचें हृदय जहालें भिन्न !
तळमळलें मन, खळबळ झाली हृदयीं वारंवार,
उदासवाणा बसूं लागला रात्रदिवस मुरार !
यापरि महिने चार लोटतां आला श्रावाणमास,
आकाशांतुन पडू लागली जलमोत्यांची रास.
केव्हां पिवळें ऊन पडावेम जळबिन्दूवर पानीं.
झाडावरती अड्‍ग चोंचिने झाडावें विहगांनी.
पहिल्यापहिल्या रम्य पिकांनी हिरवलेलीं रानें,
डुलूं लागलीं वार्‍यासड्‍गें मड्‍गल आनन्दाने.
खळखळ वाहुन ओढे नेती तासामधली वाळू,
तटिंच्या फुलल्या रम्य कण्हेरी; फुटले सुन्दर वेळू.
कोठे कोठे अम्भेरीच्या रानी नाचत मोर,
केका गाउन, वर आकाशीं बघती नीट समोर.
खडकामधुनी एकसुराने गाती ओढे गाणीं,
शेतकर्‍यांच्या मुली गुम्फिती रानफुलांची वेणी.
निसर्ग अपुले तेच पूर्विचे खेळूं लागे खेळ,
मुरार मित्रांसड्‍गें पहिल्यापरी घालवी वेळ.
आज पातली नागपश्चमी ! घेउनि बाळ हिरुला -
सगुणा जाउन आली होती नुकती बहिरोबाला;
बाळ गोजिरें घेउन बसला माण्डीवर मानाजी,
टक लावोनी त्यावर रमला खोल विचारामाजी.
डोळां पाणी तोंच सांठलें ! हळुच सगूला बोले -
‘पोर येवडं पगुन्‍ रावबा असते जर का गेले -!
तोच दाटुनी गहिवर कण्ठीं, भरुन आला ऊर,
शब्द थाम्बले, वाहुं लागले  अश्रुबिन्दुचे पूर !
मुरार खालीं पाहत राहे; सगू रडाया लागे,
तुटक्या शब्दीं पिता मनोगत अपुलें तिजला साड्‍गे.
‘लई ग्वाड ह्यो हिरु !येवडा जाते पगुनीश्यानी !
नशिब कुणाचं कुनी पगितलं !...जालं सपनावानी !
करुना न्हाई देवाजीला आली अमची कांही.. !’
पुन्हां थाम्बला, शब्द एकही वदनीं फुटला नाही.
तीव्र वेदना आंतुन कांही अन्तर करिती खाक,
तोंच वाटलें अज्ञातांतुन कुणी मारली हांक !
एकाएकीं सगुणेजवळी देउनि करिचें मूल,
आम्बराइच्या घरास गेला, होउनि करिचें मूल,
आम्बराइच्या घरास गेला, होउनि आंत मलूल !
नागपञ‍चमी सण मौजेचा, दड्‍ग जाहाले सर्व
मुरारसदनीं जणू उदेलें आनन्दाचें पर्व.
एक हिरुच्या जीवाकरितां हौशी केल्या नाना,
नव्या सणाचीं दिलीं बक्षिसें त्याने किती जणांना.
अजून ‘बाबा’ आले नव्हते अम्बेराईहून.
म्हणून सगुणा अधीर झाली, व्याकुळ मन होऊन.
तोंच गडी कुणि सांगत आला ‘मालक न्हाई येत!
डोकदुकिनं त्ये पडल्यातई वाडुळचं छप्परांत !
धडकी भरली सगुणाहृदयीं ! काम सुचेना कांही,
आवरुनी ती परी पसारा, करी निघाया घाई
तशी उपाशी सगुणा गेली, जेवण घेउन त्याला,
गाडी जुम्पुन मुरार गेला तिजला पोचविण्याला.
वाटेवरती कुणीं बसविले नाग मातिचे कोठे,
कुणीं चढविले कडुलिम्बावर झोके मोठे मोठे.
तालिमबाजी खेळ चालले कोठे कोठे कांही,
भव्य शिळेला कुठे काकडी पेलुनि धरुनी राही.
‘चका ग बाऊ वारुळाला ’ कुठे घोळका गाई,
आर्त मनाला सगुच्या यांतिल दिसलें न परी कांही !
छपरामध्ये सगू पित्याला जाउनि आधी पाहे,
अन्थरुनावर डोळे झाकुनि बाप पडूनी राहे.
डोकें दुखतां दुखतां आत चढला भलता ताप,
जेर होउनी पडला होता मुग्धपणाने बाप.
गिळून टाकी सर्व वेदना सोशिक त्याचा जीव,
सगुला पाहुन नयनीं सांठे जलरुपाने कीव.
परि अश्रूंना ओघळण्याला त्याने न दिला वाव,
लागूं न दिला त्याने अपुल्या मुग्ध मनाचा ठाव.
हात लावुनी अड्‍गाला तों सगुणा बोले त्याला,
‘येरवाळि का कुनीं धाडलं न्हाई कळवायाला ?
कां म्हुन आला हकडं बाबा?... काय ताप हा देवा !
चेपु डोकसं ? ... घास दोन तर माज्या हातुन जेवा !’
ओठ हालले मानाजीचे बोलायातें कांही,
परि डोळ्यांनी नुसत्या देई होकाराची ग्वाही.
हिरुस घेऊन बसला होता मुरार पाठीमागे,
शिलोजिच्या हळुवार मनाला अघोर चिंता लागे !
घास सगूने तोण्डाजवळी नेतां बोले बाप,
‘अजून उपाशी पोरी?’ लागे तों कसलीशी धाप !
डोळ्यांमधले अश्रू अपुले तो दाबाया पाही,
पाणी जिरुनी तेथ, सगूच्या नयनी येउन राही.
मानाजीने तळमळ केली व्यक्त न कांहीएक,
डोळां पाणी आणुन भरवी  त्यास लाडकी लेक.
सूर्य टेकला अस्तगिरीवर; वाढूं लागे ताप !
भिऊन हृदयीं सर्व राहिले तिथेच आपोआप.
दिवस यापरी चार लोटले चिन्तेचे, भीतीचे,
पुढचें पाउल दुखणें पाहून थरके हृदय सतीचें !
मित्र शिलोजी क्षणहि न त्याला सोडून गेले दूर,
परस्परांचे कितीकदा तरि भरुन आले ऊर.
मुरार जाउन येउन राहे; तरि सगुणेशीं कांही-
खळबळणारी तळमळ मनिंची बाप बोलला नाही !
दिवेलागणी झाली ! कोणी नव्हते आसोपास,
सगू-शिलोजी-मानाजीचे ऐकूं येती श्वास !
मन आवरुनी धीर धरुनी मानाजी तों बोले -
‘सगू ! मुरारी कुटं हाय ग?’ डोळे झाले ओले.
येतिल आता बरं ! वाटतं बरं अता ना बाबा ?’
सगुच्या प्रश्नें दुखूं लागला तद्‍हृदयाचा गाभा.
मेघ तरळती जळभाराने ओथम्बुन आकाशीं,
तसे तरळले भाव अश्रुंनी भिजुनी नयनाकाशीं,
जळ डोळ्यांतिल आंत जिरेना एकवटूनहि शक्ति,
तरळ आसवें-नव्हे, गळाली परस्परांची भक्ती.
दु:ख गिळूनी मानाजी परि बोले धीर करुन,
‘पोरी , समदं तुला साड्‍गतों ! मन ह्यें जाय भरुन !
रडूं नग ! तू लई इचारी, हुशार, शानीमुर्ती;
सड्‍गत अमची तुला लाभली एक इसा तर पुसती.
अता वाटतं तुला हिरुला डोळे भरुन पगून-
जावं, पोरी मुरारसड्‍ग मन माजं बोलून !’
जरा थाम्बला ! अडखळला - तों मुरार आला आंत,
येउन बसला जवळ; जाहलें क्षणभर सारें शान्त.
डोळां पाणी आणुन कुंथत थकलेल्या वाणीनें -
उघडें केलें हृदय आपुलें अखेर मानाजीने-
हृद्वीणेची तार अश्रुंनी भिजतां थिजला सूर,
थाम्बथाम्बुनी बोले, उठतां मनामधे काहूर.
‘मुरार ! आमी पडलों ! आता देवावरती भार !
जगनं इथलं सरलं ! न्हाई येळ र्‍हाइला फार !
यात्रा सरली, उगिच कशाला गुतवूं साड्‍ग सराई !
जिमिन जकडची तकड आता खण्डाची ही जाई !
कुनी करावा शोक फुका अन्‍ कसला, कोनापायीं !
रडूं नग तू सगू ... !’ थाम्बला, शब्द खोल तों जाई.
सर्वाड्‍गांतिल खेचुन शक्ती पुन्हां एकदा बोले -
‘उगी उगी तू पोरी !’ भरले आणि तयाचे डोळे.
‘मुरा जिवाची ग्वाष्ट साड्‍गतों एकच आता, ऐक,
रागा येऊं नग ! चुका तूं केल्या मागं कैक.
पैसा गेला लई तुजा पग्‍ ! दिवस कठिन ह्ये आलं,
गांव गान्जलं पैक्यापायीं ! जग ह्ये दुबळं जालं .
शेतकर्‍याला आन मिळेना कष्टुन , शेतामन्दीं,
कितेक मेले कटून, केवळ बुडत्या कर्जामन्दीं !
किती पोरगा नशिबाचा तू, गुनी सगू लइ माजी !
अजुन खेळते लक्षिमि होउन तुमच्यावरती राजी !
लइ नशिबाचा ! लइ नशिबाचा मुरार तू या गांवी !
पन्‍ ही उधळन्‍ सोड अता पग, तोडिल एका घावीं !
किति घालविला पैका, तुटतो मुरार माजा जीव;
मालक आता तुजा तूच पग्‍ ? येत्ये लइ लइ कीव !
सगुला आनिक तुज्या हिरुला पगून फुटते छाती,
मुरा, सगूच्या सौसाराची तुज्यात दोरीं हातीं.
हिर्‍यासारकं पोर हिरु ह्यें काडिल अपुलं नांव,
पोर केवडा तालिवार तू ! न्हाई का ह्ये ठावं ?
खराब असल्या वागुकीनं जाइल सारी कीर्त !
पैक्यावांचून कुनी न देतो कुना फुकाचं तीर्त !
जीव तुजा लइ सगुनेवरती, पिर्त जिवाची भारी,
सगुना माजी ! सगुना माजी !’ गहिवरली तों स्वारी !
झरझर झरझर डोळ्यांतुन तों गळले अश्रूबिन्दु,
सगुणेचा तर खालीवरती हेलावे हृत्सिन्धू.
मान खालती घालुन बसला मुरार होता मुग्ध,
अनुतापाने किंवा न कळे झाला होता दग्ध !
गभीर पसरे रात्र भोवती आम्बराईचे रानीं,
प्रशान्ततेने ध्वनी दुणावे कमण्डलूचा कानी.
दीर्घ उसासा टाकुन बोले - ‘उदास का म्हुन्‍ व्हांवं ?
शेतीभाती अपुन आपुलं घरचं काम पगावं.
मुरा परानावानी जपली पग ही अम्बेराई,
समदी माजी तुजीच माया, तूंच जिवाचा भाई !
लई उदळला मुरार पैका सूद जरा धर आता,
देवा भ्यावं , त्येच्यावाचुन न्हाइ पिर्तीचाअ दाता.
मुरार ! देवा सुमरुन आता शिपत घेऊन साड्‍ग,
‘आम्बराइला जपन्‍ जिवाच्या पल्याड तुमच्या मांग !
कसा बि आला वक्त तरी मी न्हाई ती इकनार !
तितंच राबुनश्येनी माजं राकिन मी घरदार !
मुरा शिपत घे ! म्हातार्‍यावर नग रागाला येऊं.
सरलं अमचं तुला बोलनं ! निरोप आता घेवूं !’
वदनीं शान्ती-समाधान तों दिव्य चमकलीं कांही,
एकमनाने डोळे लावुन मुरार पाहत राही.
मनांत ठसले मानाजीचे बोल असे बिनमोल,
छटा मुखींची साड्‍गे की ते हृदयीं भिनले खोल.
परन्तु ‘आला वक्त तरी मी न्हाई ती इकनार !’
शपथेच्या या शब्दांनी तो हसला तालेवार.
परि भोतीच्या गभीरतेने पाळाया उपचार,
उकळी दाबुन त्याच्यासाठी बोले शपथ मुरार.
शपथ ऐकुनी मानाजींचें गहिवरलें मन भारी,
अथाड्‍ग शान्ती चमकत होती वदनीं परि खुलणारी.
मुरार- सगुणा-हिरुवरी तो क्षणभर दृष्टी लावी,
अन्य दिशेला मग ती वळवी, लिखित वाचुनी भावी !
दृष्टी ठरली तोंच शिलोजीवर, बोलाया कांही,
आर्त मनाची प्रेमळ इच्छा मुकेपणाने पाही.
ओठ हालले ! इकडे तिकडे मानाजी मग पाहे
आणि जरासा डोळे मिटुनी स्वस्थ पडूनी राहे.
औषध आणाया तों कांही सगुणा गेली दूर,
गोन्धळुनी मग हळूच गेला पाठोपाठ मुरार !
गहिवरलें मन मानाजीचें ! मग मित्राचा हात -
धरुनि उराशीं प्रेमळतेनें कुन्थत बोले मात:
‘शिलू ! असूं ..दे..लोभ !’दाटुनी आला कण्ठ भरुन,
परि उमाळा दाबुन बोलेक निमिषाने विनवून--
‘अम्बराफ़ी आन सगू ही तुजी ! अता संभाळ !
मुरार.. येडा...नादी ...! त्येचा हिरु गुनाचा....बाळ !
समद्यावरती मुरार आनिल कोन्या येळीं घाला.. !
शिलु तूं मैतर एक जिवाचा सगुला वाचविन्याला !
पोर गुनाची...तूच.. जिवाचा !’ बोलवलें मग नाही.
गाळित अश्रू त्यास शिलोजी अभड्‍ग वचनें देई.;
समाधानुनी मानाजीने पुनरपि धरिला हात,
मुरार-सगुणा जवळ बैसलीं तोंच येऊनी आंत;
औषध करितां पुढे तयाने केला अडवा हात,
उशाखालुनी काढुनि कांही धीर हृदयाशीं तात.
हळूच देई मग तें सगुला; नयनीं आणुनि पाणी -
‘तुज्या... आइचं.. सगू, डोरलं !... ह्यें घे’ थाम्बे वाणी.
धरुनि उराशीं लेणॆं सगुणा, हृदयीं तो गहिवरली;
गभीर शान्ती पुन्हा पित्याच्या विलसे नयनांमधली !
ओढ लागुनी आंतिल तेजा क्षणभर डोळे मिटले,
करी ध्यान तो वाट, कारण ओठ जरा पुटपुटले.
डोळे झाकुन पडला त्याला एक लोटला तास,
लक्षण नव्हते ठीक आज हें ! खुटली त्यांची आस
तोंच लोचनें उघडून बोले, भ्रान्त भाषणीं खोल -
‘किरन्‍ पगा ह्ये अम्ब्यावरती ! किरन्‍ पगा !’ हे बोल.
तरळुनि डोळे सगू- मुरारावरती बोले तेंच,
‘सार दूर त्यो पडदा !’ बोले विनवुन हलक्यानेच.
छप्पर-दारावरचा पडदा मुरार सारी दूर,
मानाजीची आम्बराइवर दिव्य रुपेरी शोभा होती आली.
धावत होते इकडुन तिकडे कांही काळे मेघ,
भिर भिर वारा घोंघावूनी, घुमवी अपुला वेग!
मागेपुढती डुलुनी शेतें, सळसळ वाजति पानें,
विश्वात्म्याची गभीर शान्ती सेवित होती रानें.
डोकें ठेवुन माण्डीवरती सगुच्या, वळवुन मान,
क्षणभर रमला आम्बराइवर बाप लावुनी ध्यान !
तोंच ‘किरन्‍ ह्ये पगा ! किरन्‍ ह्ये... ! पुन्हां बोलला खोल,
आणि वेळुच्या मानाजीचा गेला कायम बोल !
काळा ढग तों येऊनि राहे नभांत चन्द्राआड,
आम्बराइचें तेज लोपुनी मलूल झालें झाड !
वारा पडला ! स्तब्ध जाहलीं शेतें थाम्बुनि डोल !
भयाण शान्ती विरवुन टाकी रातकिडयांचे बोल !
मात्र एकला समचित्ताने कमण्डलूचा ओढा
सुस्वर आपुला धीटपणाने छेडित होता थोडा!

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP