TransLiteral Foundation

बहार ७ वा - शापवाणि

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


बहार ७ वा - शापवाणि
अमृतवाणिनें ज्यानें दिधला जनहृदयास विसावा,
कोळपलेल्या जीवलतेला सौख्यचन्द्र जो व्हावा;
दु:ख आपुलें दूर सारुनी जनहृदयेम जो सान्धी,
आणि रेशमी प्रेमरज्जुने कायमचीं जो बान्धी;
नवल कशाचें , कुणी गाळले अश्रू त्याच्यासाठी,
किंवा दर्शन शेवटलें जर ध्याया जमली दाटी ?
मानाजीच्या दहनविधीला गाव लोटले दोन्ही,
कमण्डलूने पुरांत नेली राख झणी वाहोनी !
शोकसागरीं अघोर बुडली मानाजीची लेक,
वेळिं - अवेळीं करुं लागली उष्णाश्रूंचा सेक !
आयाबाया तिला साड्‍गती समजुन परोपरीने,
व्याकुळ होउन मुरार घाली समज आपल्यापरिने.
परि न थाम्बला उष्णाश्रूंचा डोळ्यांमधला पाट,
धावत होता काळ निरामय; गेले महिने आठ !
चैत्रपालवी डवरुन गेली तरुवर ठायीं ठायीं,
आम्रफळांनी वेळूमधली भरली राई राई.
बान्धावरच्या रानगुलाबांवरी कळे मोहरले,
सुगन्ध भारिती हवेंत वारे मोगरवेलीवरले.
फान्दीफान्दीमधुनी गाई गीत कोकिला गोड,
मन्द सुरांनी ओहळ त्याला देई अपुली जोड.
पाण्यावरलीं हिरवलेलीं पिकें डोलतीं रानीं,
तिथेच घुमलीं शेतकर्‍यांची गाणीं मधुर सुरांनी.
सृष्टीसुन्दरी देऊं लागे नित्याचे निज पाठ,
आनन्दाने दड्‍ग जाहला सारा कृष्णाकांठ.
परन्तु सगुणा- हृदयीं नव्हती समाधान वा शान्ती,
वाटे तिजला, ‘ओहळ सारे निरर्थ गाणीं गाती !’
कुठे विचारीं एकसारखें तिष्ठत तिने रहावें,
आणि गाळुनी अखेर अश्रू माघारी परतावें.
कधी हिरुला कुरवळतांना फुन्दावें हृदयांत.
वेळूवरती नजर लावुनी कधी रमावें शान्त.
व्रण जीवाचा परि न कुणाला सती बोलुनी दावी,
डोळे लावून हवेंत वाची लिखित आपुलें भावी.
व्याकुळ झालें मुरारचें मन जरि पडल्या काळांत,
कृतिंनी अपुल्या तरि तो लागे रुतावया गाळांत.
प्रथम जिवाला अवघड वाटे मानाजीच्या मागे,
परन्तु सत्ता त्यास आन्धळी हळू कराया लागे.
स्वातन्त्र्याने उध्दरिले जन कितीक नेउनि वरती,
मुरारच्या परि संसारा ये कधि न तयाने भरती.
स्वैर मनाला गमेल तिकडे वाहत त्याने जावें;
क्षणिक हासर्‍या लहरीवरती तरलपणें नाचावें.
स्वैरपाणान अशा, मुराचा जाउं लागला आब,
स्वेच्छाचारी स्वातन्त्र्याला कोण मागतो जाब ?
राजरोस तो घोडेशर्यत खेळायास पुण्याला -
मित्रासड्‍गें जाई आता, बघुनि न अधिकउण्याला.
विचित्र असल्या नादी, कायम पडे खिशाला भोक,
त्याच्या जीवावरती चाले मित्रगणांचा झोक.
विवेकशक्ती जागीं झाली जेव्हां उव्देगाने,
मित्रगणांनी तिला निजविली मदिरेच्या पानाने.
कधीबधीची मौज लागली व्हाया दरमासाला,
दरमासाची कधी पन्धरा, केव्हा आठ दिसाला !
गांवामधले कुणी कडेचे पोहुन बघती मौज.
दिलदारीवर कुणी घालिती घाला, आणुन फौज.
तळमळणारे कुणि वेलूचे, कोणी अम्भेरीचे,
वडीलकीचे शब्द सांगती स्नेही आजवरीचे.
सगुणेची तर साड्‍गुन थकली दुखावलेली वाणी,
डोळे झाकुन, मुरार राहे ओढत अपुली घाणी.
तीनच गेली वर्षे, सरलें द्रव्य आणखी पैसा,
कुबेरधन ही पुरेल का, कुणि वाहत जातां ऐसा ?
वैभवकाळीं जिने सुखावें आनन्दूनी जीव,
आपत्काळीं उद्भवमात्रें तिच्याच भरतें हीव.
वैभवकाळीं फिटे  पारणें बघुन जयाला डोळां,
आपत्काळीं तदवलोकने उठतो पोटीं गोळा,
वैभवकाळीं चालुनि येतां, जी वाटावी गड्‍गा,
आपत्काळी तिने गाठतां आग लागते अड्‍गा.
वैभवकाळी प्रेम जयाच्या भेटीसरशीं दाटे,
आपत्काळी दर्शनमात्रें सलती त्याच्या काटे.
पुत्र जाहला सुरुप दुसरा सगुणेला जों आता,
मुरार-जीवा क्षणभर वाटे असेंच, वैभव जाता.
परि आईची निर्मळ माया कधि ही ढळणें नाही,
हिमालयासम थोरपणें ती सन्तत निश्चळ राही.
उलट, आतपें पुत्रवीच्या वितळाया ती लागे,
शुध्द जळानें हृदयामधली गड्‍गा भरुनी, मागे.
सगुणेवरलें प्रेम तयाला एकसारखें ओढी.
आणि वाटली केरुविषयीं नंतर त्याला गोडी.
ऋण काढोनी सणास केली मुरारने सुरवात,
काळ उलटला ! कोणाचा मग कुणी धरावा हात !
ग्रीष्मर्तूचें ऊन कडकलें कौलारावर फार,
उठुन धुरोळा, कधी दुपारीं ये वळवाचा धार.
भासूं लागे घरीं हलाखी, होउन ओढाताण,
तळमळ होउन सगुला घडलें रोज अश्रुचें स्नान.
संसाराला विटुनी लक्ष्मी घेइ काढता पाय;
सगू बिचारी होत चालली रात्रन्दिन असहाय !
डोळा ठेवी कुणी घरावर, कुणी खिलारांवरती,
स्वार्थबुध्दिनें कुणि शेतावर करि कर्जाची भरती.
नजर स्वार्थी अम्बराईवरी कुणाची खिळली,
पापी दृष्टी दुष्ट कुणाची सगूकडे ही वळली.
जो तो अपुल्या योग्य सन्धिची पहात होता वाट,
दुर्दैवानें सर्व बाजुंनी त्यांत पुरविली पाठ.
नाड्‍गर विकला त्याने गेल्या रड्‍गपंज्चमीसाठी,
आणि कराया चैन, जमविली मित्रगणांची दाटी.
अनेक केले रंग तयाने उसना आणुनि पैसा,
गांवकर्‍यांनी मौज उडविली, बुडवुन त्याला ऐसा !
सुटे कासरा; कोण उतरणीवरी आवरी गाडी?
महापुरांतुन वांचविण्याला दावी कोण धडाडी ?
अवर्षणानें दुष्काळाची पडली पुरती छाया,
हात मारुनी कुळें लागलीं मुरारला बुडवाया.
हळूहळू मग पैशासाठीं विकलीं त्यानें शेतें,
हपापलेले सजले त्याला पैसे द्याया जे ते.
पैशासाठीं, पोटासाठीं गहाण पडला वाडा,
हळूहळू मग गाडी, घोडा, मोट आणखी नाडा !
उरल्या सुरल्या आम्बराइचा जेव्हा थकल सारा,
अधिकार्‍यांनी गुरें नेउनी आवरलाच पसारा !
सोडुन गेलीं गुरें, माणसें, वैभव, कीर्ती त्याला,
आपत्काळीं जैसा इमला सोडितसे जोत्याला !
अजुन न होई अम्बेराई विकावयाला धीर,
चिन्ताजालीं गुन्तुन गेला कधीं कधीं मग वीर.
गतविभवें हीं क्षणांत मिळवूं सोडत जिंकुन मोठी,
हिंमत ऐशी मित्रगणांनी नित्य घातली पोटीं;
हितशत्रूंनी स्वार्थ साधुनी चोरुन केले वार,
वेडया असल्या आकांक्षेने मुरार बुडला पार.
यापरि वर्षे पांच लोटली उरला नाही थारा,
हिरु-केरुंना मात्र लागला दारिद्र्याचा वारा !
उरली होती अम्बेराई केवळ आधाराला,
विरड्‍गुळा हा एकच होता सगुणेच्या जीवाला;
शिलोजिची पण अडचण होती मार्गावरती मोठी,
गावकर्‍यांचे भव परतले म्हणुनि येउनी ओठी.
परन्तु जेव्हा घडावयाचें नसतें नीटच कांही,
कुयोग जुळती अमाप; कांटे जमती ठायीं ठायीं.
‘देवदेव’ तों करावयाला रत्नागिरीच्या प्रान्तीं,
जाय शिलोजी पत्नीसड्‍गे , मिळावाया हृच्छान्ती.
सर्व व्यवस्था सगूस साड्‍गुन गेला जरि तो गांवा,
कसा कळावा स्त्रीबुध्दीला गांवकर्‍यांचा कावा !
अम्बेराईवरी सारखा होता त्यांचा डोळा,
मोहवितां मन मुरारजीचें, हलूं लागला दोला
कुणी उठवुनी शहर पुण्यांतिल जड्‍गी शर्यतहूल,
चेतविलें मन त्याचें , देउन वर मदिरेची भूल
अम्बेराई- विक्रय आता व्हाया काय उशीर ?
एकामागुन एक लागले पुढे यावया वीर.
मानाजीच्या थोरपणाची स्मृति कोणाला राहे?
मित्रगणांच्या लहरीवरती मुरारमानस वाहे.
धूर्त त्यांतले कुणी मुराला घेऊन गेले दूर,
गुप्तपणाने सवाल करण्यामाजीं झाले चूर.
कशास गेले दूर शिलोजी या वेळीं परगावी !
शपथ मोडते मानाजीची ? कुणी तिज साम्भाळावी !
अख्रेर सरशी कुणी गेनबा नामें जरठें केली,
आणि मुराची अम्बेराई घरांत त्याच्या गेली !!
विक्रय होउन, मुरारजीच्या पैसे पडले हातीं;
दैव बोललें - ‘कळल्यावर हें, सगुने खावी माती !
रवि अस्तवला ! काळ्या छाया अवतरल्या भेसूर !
किरकिर रडवा रातकिडयांचा चालू झाला सूर !
रात्र भासली घोर ! घरावर घुबड आरडे घू घू !
कोटयांमध्यें आवाजाने भ्याले चिमण्या-राघू !
वारा बोले- ‘अदृश्यांतली ही शापाची वाणी !’
लक्ष न देतां, कमण्डलू पण गात चालला गाणीं !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-29T20:48:56.5270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

monolithic

 • Bot. एकसंदिस्तंभी 
 • एकाश्म 
 • एकसंघ 
 • एकाश्म, अखंडात्म, एकशैल 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जीवाच्या बारा दशा कोणत्या?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.