बहार ८ वा - प्रीतीसाठी

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


आम्बराइचा हातामधला सुटतां पुरता बाण,
चरफडले जन अम्भेरीचे , गमावतां ही खाण.
उगवायालां सूड तयाचा, करावया धुळधाणी,
खेळायाला जुगार, गेले मुरास घॆउनि कोणी.
आज पन्धरा दिवस जाहले जाउन त्यास पुण्यास,
हुरहुरुनी मन, सगुच्या जीवा लागे त्यच्या ध्यास.
परोपरीनी शेजार्‍यांनी दिली टोचणी तिजला,
पडत्या काळीं दु:खाश्रूंनी पदर सतीचा भिजला.
तिजभंवतीही जाळें आता विणूं लागले कोणी,
तिच्या स्थितीने समाधानले कोणी उल्हासोनी.
अजुनि शान्तले नव्हते चित्तीं तरिही भाईबन्द -
धि:काराचें वचन बोलुनी मानिति ते आनन्द.
कशी कळावी तिची थोरवी, पार्थिव या क्षुद्रांना,
गुणगम्भीरा सती जाहली प्रिय जी देवाजींना !
दारिद्रयाची आग लागली जाळायाला पोट,
अब्रूखातर मिटले होते घट्ट सतीने ओठ.
वसनें साधीं, घरकामाच्या भाण्डयावांचून कांही,
अता सतीच्या पोराबाळां घरांत उरलें नाही !
सरले सारें धान्य घरांतील; खावें आता काय ?
त्यांत शिलोजी गांवाहूनी आले नव्हते, हाय !
मुलांकडे ती पाहुन, अश्रू एकसारखे ढाळी,
जठराग्रीची आंत वेदना हाय ! हाय ! तों जाळीं !
उपकारांचे उगिच कुणाचें ओझॆं आता घ्यावें,
कुणि पाहीना ढुड्‍कुनही, मुख कोणा वेड्‍गाडावें !
जळूं लागला जीव, उपाशीं दोन सोनुली बघुनी,
सुजले डोळे रडतां पोटाशी ती धरुनी.
आजवरी जी कुठे न गेली, ही थोराची सून,
तिलाच आतां जाणें आलें ,जातां दैव फिरुन !
धीर धरुनी हळूच उठली योजुनि कांही बेत,
गहाण थाळी हलकें आली दारीं,
तोंच पुण्याहुन परतुन आली मुरारजीची स्वारी !
आनन्दाचा सागर हृदयीं उचम्बळोनि आला,
पतिला पाहुन आनंदाचा दारीं स्वर्ग उदेला !
धावत येउन तोंच हिरुने मिठी मारिली त्याला,
लडिवाळपणें शव्दांनी तो आळवि बाळ पित्याला.
पाहत राहे उभाच जागीं विस्मित केरु स्तब्ध,
पतिपुत्रांच्या मुखा न्यहाळी कुतुकें सगुणा मुग्ध.
चुम्बुनि बाळा वात्सल्यें तो घरांत गेला नीट,
कळलें मग की खायालाही घरांत नाही पीठ !
आम्बराइचा सारुनि पैका सारा, केविलवाणें -
आला होता परत घराला मुरार मुग्धपणाने !
शब्द न बोले जरी त्यांतले सगुणा कांहीएक ,
डोळ्यांमधुनी चालू झाला तरि अश्रूंचा सेक.
परि मैत्रीची मात थोरवी धीर तिला तो देई,
आणि निघाला विश्वासाने आणायातें कांही.
रवि मावळला ! अन्धाराने भरली दुनिया सारी,
चारा घेउन घरांत आता सार्‍या अम्भेरींत,
खिन्नपणें परि मुरार होता उभाच अन्धारांत !
घालुनि कोणी धि:काराचे जहरी घाव जिव्हारी,
तोडुनि टाकी मुरास, येतां याचक म्हणुनी दारीं.
हाय ! लोटलें दूर तयाला, केली नाहीं कीव,
काळ उलटला पुरा ! मुराचा व्याकुळ झाला जीव !
मित्रांच्या या दुर्वचनांनी मुरार होऊन विध्द,
आल्यापायीं परतुन गेला, होउनिया हतबुध्द !
हिरवें पिवळें दिसूं लागलें त्याला अन्धेरीने,
हृदय दाबुनी धरी, गांठलें तोंच पुन्हा घेरीने !
रस्त्यामधल्या वडवुन्धाला जरा टेकला मागे,
भिरभिर डोकं हवेमधे तों भ्रमण कराया लागे !
जीवित झालें त्यास नकोसें, दिसतां चरित समोर,
अन्धारीं तों बाळें दिसलीं पुढे उपाशी, घोर !
झर झर झरले अश्रु ! घराला ओढुनि नेती पाय;
थबकत चाले ! मधे हुन्दका देउनि, वदला ‘हाय’ !
पुन्हा एकदां खिसा आपला चाचपुनी तो पाहे ,
एकच पैसा सर्व धनांतील आता हातीं राहे.
गुड्‍गत नकळत दारीं आला, होऊन हृदयीं खिन्न,
वळचणीस तो उभा राहिला, हृदय होउनी भिन्न !
मनांत बोले,‘काय सगूला जाउनश्येनी साड्‍गूं?
आन मागनं अता कोनचं पायांपाशीं मागूं ?’
तोंच येउनी सगुणा दारीं डोकावी बाहेर,
सहज दिसे तिज अन्धारी निज जीवाचें माहेर !
हळूच मारी हाक तयाला मुरार गेला आंत,
भाव उमजलीं परस्परांचे दोघें मुग्धपणांत.
सान्जवात तों कधिच घराची होऊन, बाळें दोन्ही -
भाकर खातां, खातां आलीं साड्‍गत आनन्दोनी.
मनांत बोले - ‘भाकरीस का यावें इतुकें मोल,
की बाळांनी त्यांतच द्यावा स्वर्गसुखाचा डोल !’
दृश्याने या मन निवलें क्षण आणि पेटलें पूर्ण,
धोरण पाहुनि सगुणेचें तर शतधा होय विदीर्ण !
बळें बळॆं तो तिच्या हातची भाकर खाई थोडी,
हीनपणाच्या या संसारी त्यास न वाटे गोडी !
कितीक केले प्रश्न सगूने मूक परी तो राहे,
करपुन जाई आंत कशाच्या तरि तळमळिच्या दाहें !
दीर्घ उसासे टाकित बसला येउन तो सोप्यांत,
स्नेहाभावीं दीप मिणमिणे वरती कोनाडयांत !
पडली होती तोण्डावरती कोनाडयाची छाया,
अन्धाराने पूर्ण घेरिलें होतें बाह्य जगा या.
अन्धाराचें राज्य माजलें अघोर त्याच्या हृदयीं ,
उभी राहिली समोर वृत्ती मित्रगणांची अदयी !
तोच वाटलें मानाजीची बोले येउन मूर्त -
‘पैक्यावांचून्‍ कुनी फुकाचे कुना न देतो तीर्त !’
हृदय करपुनी, दीनपणाने खाली लवली मान,
दारामधल्या तों फकिराचें कानीं पडलेंण गान -
पैसा
[गज्जल]
भाई, जगांत सारा पैसाच एक प्यारा,
पैसा असे जिवाचा स्वर्गापरी निवारा !
पैसाच दिव्य दृष्टी, पैशांत सर्व सृष्टी,
पैशांत अश्रुवृष्टी, स्नेहाळ भाव सारा !
पैशामुळेंच ताई, पैशांत बापमाई;
पैसाच मित्र, भाई, पैसाच पुत्र दारा !
पैशांत शील, शक्ती, सौन्दर्य, धर्म, भक्ती,
पापामधून मुक्ती, पैशामुळें दरारा !
पैशामुळें जिव्हाळा, पैशास पुष्पमाळा ,
पैशामुळें स्तुतीची ये थोरवी अगारा !
पैसा असेल त्याची माती सुवर्ण होई,
पैसाच येथ नीती, वा कीर्तीचा नगारा !
‘हातीं असेल पैसा, या तोंवरीच बैसा !
श्रीनेच थोर ऐसा केला असे पुकारा !
पैसा नसेल त्याने कां हें जिणें शिणावें !
हा धर्म, कायदा हा; पैशाविणें न थारा !
नाग बिळांतुन सळसळ येई मोहुनिया पुड्‍गाने,
मुरार तैसा बाहेरी ये गाण्याच्या गुड्‍गीनें !
हॄद्‍भेदक तें सत्य ऐकुनी गज्जलगीतांतील,
जीव होउनि व्याकुळ त्याचा खचूं लागला दील.
उभा राहुनी जोत्यावरती क्षण अपुल्याशीं डोले,
तळमळुनी मग, कृतज्ञतेने फकीरास तो बोले -
‘गानं किति ह्यें ग्वाड फकीरा, लाकाचं त्या मोल !
पुना पुना म्हन्‍ पगू , जिव्हारीझ भिडलं माझ्या खोल !’
फकीर लागे पुन्हा गावया; तोही एक मनाने,
दारापुढती ओटयावरती गुड्‍गड राहे गाने.
अनुभूतीने पटलें होतें सत्य मना भरपूर ,
गीता सम्पतां घळघळ आले डोळ्यांमधुनी पुर!
कन्दीलाचा उजेड थोडा पडला तोण्डावरती,
आणि मुराच्या नयनांमधली दिसे फकीरा झरती.
आवरुनी मन, पुटपुटला तो - ‘लाकाचं त्या मोल !
खरं हाय ह्ये’!  हात तयाचा खिशांत गेला खोल.
एकच होता पैसा, देउन तोही बोले त्याला -
‘लाकाचं या मोल दिडकिला ! देतो पन्‍ ही तुजला ’ !
पैसा घेउनि ,दुवा देउनि फकीर गेला दूर
मुरार राहे तिथेच, लागुन जीवाला हुर्हुर ?
सभोवताली दाट माजलें अन्धाराचें रान,
निजलीं शेतें; पेड्‍गत होते तारे थोर लहान.
भेसुर सृष्टि खद्योताचे दांत वचकुनी दावी.
भयाणतेचीं भेसुर चित्रें मुरास दिसलीं भावी.
गज्जलगीतामधले कानीं अजुनी घुमले सूर,
भोवतालचीकाळी राई दडपुन टाकी ऊर !
आणि खळखळा- ‘प्रीती म्हणजे यज्ञ’ गात हें गान
कमण्डलूचा ओढा चाले, पूर्ण विसरुनी भान !

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP