स्फुट अभंग - २९

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२९
देव निराकार त्या नाहीं आकार । आकारा संव्हार होत आहे ॥१॥
होत आहे जें जें तें सर्व जाणार । जाणार होणार सर्व माया ॥२॥
सर्व माया दिसे हें पंचभौतिक । आत्मा आहे येक निरंजन ॥३॥
निरंजनीं जन वन कांहिं नसे । दृश्यभास भासे कल्पनेसी ॥४॥
कल्पनसी भासे तें सर्व कल्पितां । कल्पनेरहित परब्रह्म ॥५॥
परब्रह्म नाहीं ऐसा ठाव कैंचा । धन्य तो दैवाचा आत्मज्ञानी ॥६॥
आत्मज्ञानी नर पाहे सारासार । पुढें तदाकार होत आहे ॥७॥
होत असेजन्म सार्थक तयाचा । जेथे सज्जनाचा अनुग्रहो ॥८॥
अनुग्रह घडे बहुतां सुकृतें । साक्षात्कार जेथें रोकडाची ॥९॥
रोकडाची मोक्ष साधूचे संगती । चुके अधोगती आत्मज्ञानें ॥१०॥
आत्मज्ञानें होतें आत्मनिवेदन । भक्तीचें लक्षण नवविधा ॥११॥
नवविधा भक्ति श्रवणीं करावी । धारणा दरावी श्रवणाची ॥१२॥
श्रवणाची स्थिती ब्रह्मनिरूपण । श्रवण मनन निजध्यास ॥१३॥
निजध्यास जनीं वस्तूचा धरावा । विचार करावा आपुलाची ॥१४॥
आपुलाची ठाव ज्ञानें होतो वाव । जाणीजे उपाव श्रवणाचा ॥१५॥
श्रवणाचा भाव जाणते जाणती । तिन्हीहि प्रचीती ऐक्यरूप ॥१६॥
ऐक्यरूप देवी भक्त नामांकित । अनन्या अनंत जैसा तैसा ॥१७॥
तैसा आहे लाभ श्रवणभक्तीचा । जेथें विभक्तीचा ठाव नाहीं ॥१८॥
ठाव नाहीं ऐसें श्रवणें जाणावें । कीर्तण करावें हेंचि आतां ॥१९॥
हेंचि हें कीर्तन नित्य निरंतर । ग्रंथाचें अंतर विवरावें ॥२०॥
विवरावें जेणे तोचि जो जाहाला । रंक तो पावला राज्यपद ॥२१॥
पदीं पद प्राप्त जालेम संतसंगें । सद्य अंतरंगें समाधान ॥२२॥
समाधान जालेम श्रवणकीर्तनें । रामाच्या स्मरणें चित्तशुद्धी ॥२३॥
चित्तशुद्धी जाली तेणें तें धरावें । सेवन करावें सद्गुरूचें ॥२४॥
सद्गुरू करावा तें पादसेवन । सद्गुरूनें ज्ञान होत आहे ॥२५॥
होत आहे ज्ञान सद्गुरू करितां । होये सार्थकता गुरूचेनी ॥२६॥
सद्गुरू करावा तें पादसेवन । सद्गुरूनें तें निवडे प्रत्ययेंसीं ॥२७॥
प्रत्ययेंसीं बोले तेंचि ते बोलणें । अचर्न करणें गुरूदेवा ॥२८॥
गुरूदेवालागी करीं नमस्कार । साहावा विचार भक्ति ऐसी ॥२९॥
सर्व दास्य कीजे ते भक्ति सातवी । सख्य ते आठवी भक्ति जाण ॥३०॥
नौमीचें लक्षण आत्मनिवेदन । सर्वदा अभिन्न परब्रह्मीं ॥३१॥
परब्रह्म स्वयें आपणची होणें । ऐसीं हें लक्षणें सार्थकाचीं ॥३२॥
सार्थक भजन आत्मनिवेदन । विवेकें अभिन्न देव भक्त ॥३३॥
देव भक्त कैसे हें आधीं पाहावें । स्थितीनें राहावें सर्व काळ ॥३४॥
सर्व काळ वस्तु आहे जैसी तैसी । देह प्रारब्धासी समर्पिला ॥३५॥
समर्पिला त्यासी होणार होईल । जाणार जाईल पंचभूत ॥३६॥
पंचभूत माया माईक दिसते । होते आणि जाते स्वप्नाकार ॥३७॥
स्वप्नाकार माया आपण वेगळा । असोनि निराळा सर्वांमध्यें ॥३८॥
सर्वांमध्ये आहे त्यासी सर्व पाहे । आहे तैसा आहे सदोदित ॥३९॥
सदोदित वस्तु तेचि ते आपण । रामदास खूण सांगतसे ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP