स्फुट अभंग - ६ ते १०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  



पळशी तूं तरी नाम कोठें नेशी । आम्हीं अहर्निशीं नाम घोकूं ॥१॥
आम्हांपासोनियां जातां न ये तुज । तें हें वर्म बीज नाम जपूं ॥२॥
देवा आम्हां तुझें नाम हो पाहिजे । मग भेटी सहजें देणें लागे ॥३॥
भोळे भक्त आम्ही चुकलोंचि कर्म । सांपडलें वर्म रामदासा ॥४॥


गजेंद्र सावज पडला पानवडी । रामें तेथें उडी टाकियेली ॥१॥
प्रल्हाद गांजितां कोण सहाकारी । स्वयेंचि मुरारी प्रकटला ॥२॥
क्षत्रियें ब्राह्मणें गांजिलीं बापुडीं । रामें तेथें उडी घातियेली ॥३॥
तेहतीस कोटि देव पडिले बांदोडीं । रामें तेथें उडी टाकियेली ॥४॥
दासापायीं पडली देहबुद्धीबेडी । रामें तेथें उडी टाकियेली ॥५॥
रामदास म्हणे नका करूं शीण । रामें भक्त कोण उपेक्षिले ॥६॥


तुजविण देव मज कोणी नाहीं । मझी चिंता कांहीं असों द्यावी ॥१॥
वैराग्यें कनिष्ठ अभावें वरिष्ठ माझे मनीं नष्ट संदेहता ॥२॥
विवेकें सांडिलें ज्ञानें वोसंडिलें । चित्त हें लागलें तुझे पायीं ॥३॥
तुझे नाम वाचे उच्चारीत असें । अंतरीं विश्वास धरियेला ॥४॥
रामदास म्हणे मी तुझें अज्ञान । माझें समाधान करीं देवा ॥५॥


श्वानचिया पुत्रें कल्होळ मांडिला । कलहो लागला एकसरा ॥१॥
भुंकिता गुरगरी वासितोचि तोंड । वरती थोबाड करूनियां ॥२॥
एक ते भुंकती एक ते रडती । दास म्हणे गती निंदकांची ॥३॥

१०
मेरूचिया माथां ठेवुनीयां पाव । जात असे राव कैलासींचा ॥१॥
कैलासींचा राव एक देव क्षोभला । देशधडी केला लंकानाथ ॥२॥
लंकेच्या चोहटीं मांडियेला खेळ । अग्नीचा कल्होळ घरोघरीं ॥३॥
जाळियेलीं घरें सुंदर मंदिरें । पावला कैवारें जानकीच्या ॥४॥
जानकीचा शोक दुरी दुरविला । यशवंत झाला रामदास ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP