अध्याय ८६ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


दिनानि कतिचिद्भूमन्गृहान्नो निवसन्द्विजैः । समेतः पादरजसा पुनीहीदं निमेः कुलम् ॥३६॥

परब्रह्मा भो यदुमणी । कांहीं दिवस आमुच्या सदनीं । मुनींसहित निवास करूनी । निमीचें कुळ हें पूत करीं ॥३८॥
मुनींसह आपुल्या पदरजीं । पावन करीं अन्वयराजी । मिथिळावासी तव पदपंकजीं । भजोनि भावें उद्धरती ॥३९॥
ऐसा भगवान बहुलाश्व नृपें । प्रार्थिला प्रार्थिला प्रणयपूर्वक साक्षेपें । प्रणतपाळ प्रणतकृपें । कळवळूनि मान्य करी ॥२४०॥

इत्युपामन्त्रितो राज्ञा भगवान्लोकभावनः । उवास कुर्वन्कल्याणं मिथिलानरयोषिताम् ॥३७॥

जो जगज्जनका जन्मविता । लोकभावना त्या भगवंता । मिथिळेश्वरें संप्रार्थितां । राहता जाला तत्सदनीं ॥४१॥
मिथिळावासी ज्या नरनारी । स्वदर्शनें स्पर्शनें हरी । त्यांचें कल्याण सर्वां परी । सर्वदा करीत होत्साता ॥४२॥
तेंचि मिथिळेचें कल्याण । जियेमाजि कल्याणमंडित जन । येर्‍हवीं अकल्याणाचें आयतन । कीं तें श्मशान न म्हणावें ॥४३॥
मंगलायतन जो श्रीहरी । तो जे स्थिरावला नगरीं घरीं । तेथींच्या कल्याणमय नरनारी । कीं न ते पुरी कल्याणमयी ॥४४॥
सूर्यें केलें तमोनाशन । तेंवि कृष्णें मिथिलाभुवन । स्ववासें कल्याणमय संपूर्ण । केलें जाण परीक्षिति ॥२४५॥
अद्यापि साधनजनमंडळी । हृदयीं स्थिराविती वनमाळी । कल्याणमय ते तेचि काळीं । होती सकळी स्वगुणेंसीं ॥४६॥
तस्मात् नृपाचा भाग्योदय । कीं जेणें प्रार्थितां कमलाप्रिय । तेथ वसूनि कल्याणमय । करी अन्वय मिथिळेसीं ॥४७॥
ऐसा मुनिजनमंडळीसहित । मिथिळेमाजी श्रीभगवंत । राहोनि विदेह कल्याण भरित । केला वृत्तान्त तो कथिला ॥४८॥
तैसाचि श्रुतदेवाच्या सदना । अपररूपें द्वारकाराणा । गेलिया उत्साह द्विजाच्या मना । जाला कथना त्या ऐका ॥४९॥

श्रुतदेवो‍ऽच्युतं प्राप्तं स्वगृहान्जनको यथा । नत्वा मुनीन्सुसंहृष्टो धुन्वन्वासो ननर्त ह ॥३८॥

द्विजांमाजि प्रेमळपणीं । उपासकां शिरोमणी । सत्कर्माच्या सदाचरणीं । चक्रपाणिपरायण ॥२५०॥
अच्युत प्राप्त स्वगृहातें । जाणोनि श्रुतदेव सप्रेम चित्तें । मुनींसह नमिता जाला आर्ते । मिथिळानाथें जिया परी ॥५१॥
आनंद कोंदला त्दृदयकमळीं । सप्रेम नमूनि मुनिमंडळी । नाचे आनंदें धुमाळी । वसन करतळीं झेलूनी ॥५२॥
चामराकार निजाङ्गवस्त्र । नाचे उडवूनियां सर्वत्र । पूर्ण आनंदरसाचें पात्र । जाहला स्वतंत्र श्रुतदेव ॥५३॥
त्यानंतरें सप्रेमभरीं । मुनींसह अर्ची कैसा हरी । तें परिसावें श्रोतीं चतुरीं । शुकवैखरीव्याख्यान ॥५४॥

तृणपोठबृसीष्वेतानानीतेषूपवेश्य सः । स्वागतेनाभिनन्द्याङ्घ्रीन्सभार्योऽवनिजे मुदा ॥३९॥

तृणासनीं पीठासनीं । कृष्णें सहित मुनींच्या श्रेणी । बैसविल्या गृहा आणूनी । स्वागतवचनी गौरवूनियां ॥२५५॥
जाणोनि पतीच्या मनोगता । साध्वी भार्या पतिव्रता । नमिती जाहली सह भगवंता । गृहसंप्राप्ता तपोधनां ॥५६॥
पूर्णकलशीं आणूनियां पाणी । त्यांतूनि उपपात्रीं घेऊनी । कान्त हरिपदप्रक्षालनीं । रिघतां गृहिणी जळ वोती ॥५७॥
रातोत्पलदलसमान मृदुळ । श्रीकृष्णाचें चरणतळ । भाग्यें द्विजाचें करकमळ । मर्दितां कोमळ तळपती ॥५८॥
तेणेंचि न्यायें मुनींचे चरण । सप्रेम प्रक्षाळी ब्राह्मण । साध्वी करीं जळ घेऊन । करी सेचन शनैः शनैः ॥५९॥
मृदुळवचनीं करूनि स्तुती । आजि धन्य जाहलों म्हणती । लाधलों श्रीचरणांची प्राप्ती । न तुळे सुकृती शतक्रतु ॥२६०॥
समस्तसंपदवाप्तिबीजें । तियें स्वामींचीं चरणाम्बुजें । आपत्कुळाच्या दहनकाजें । ब्रह्माग्नितेजें प्रकटलीं हीं ॥६१॥
अगाध अपार भवसागर । ज्याचा न चोजवे पर पार । तन्निस्तरणीं सेतु सधर । पदपांसुनिकर स्वामींचा ॥६२॥
अंधतामिस्रहारकभानु । कीं अभीष्टार्थदा कामधेनु । समस्ततीर्थांचें पवित्रीकरणु । तें पदरेणु स्वामीचें ॥६३॥
माझी अन्वयपरंपरा । लाहतां स्वामींच्या पदपांसुनिकरा । पावन जाली हा प्रत्यय खरा । मम अंतरा बाणला ॥६४॥
क्षाळूनि मुनींसह भगवच्चरण । मृदुलवचनें करूनि स्तवन । मग तें पादोदक घेऊन । प्रमुदित ब्राह्मण काय करी ॥२६५॥

तदंभसा महाभाग आत्मानं सगृहान्वयम् । स्नापयाञ्चक्र उद्धर्षो लब्धसर्वमनोरथः ॥४०॥

मग त्या पादोदकें विप्र । स्वगृहकलत्रपुत्र मित्र । सहित समस्तही स्वगोत्र । सेचनें पवित्र करी हर्षें ॥६६॥
पदजलस्नान घालूनि सर्वां । लब्ध हर्षोत्कर्ष जीवा । माज न संटे मनीं अघवा । मनोरथार्थ उपलब्ध ॥६७॥
अभीष्टमनोरथ लाधलों आजी । जे स्वामिपदाब्जरजीं । सुस्नात कुटुम्ब सान्वयराजी । निष्पाप सहजीं निजभाग्यें ॥६८॥
ऐशिया लाभें प्रमुदित पूर्ण । ब्राह्मण करी मग पूजन । श्रोतीं होऊन सावधान । तें व्याख्यान परिसावें ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP